दानशूर बळीराजा

बळीराजा आपल्या नगरीत सुखाचे राज्य करीत होता. धर्माचे, समृद्धीचे, दानाचे अधिष्ठान असा ह्या नगरीचा लौकिक होता. सर्व प्रजा आनंदाने नांदत होती. आपल्या राज्यात सर्वत्र आबादी आबाद असावे म्हणून नेहमीच राजा देशोदेशीच्या विद्वान दशग्रंथी ब्राह्मणांना व ऋषिजनांना बोलावून यथासांग यज्ञयाग करीत असे. अगणित दानधर्म करीत असे. विद्वानांचा आणि प्रजेचा दुवा घेत असे.



बळीराजा आपल्या नगरीत सुखाचे राज्य करीत होता. धर्माचे, समृद्धीचे, दानाचे अधिष्ठान असा ह्या नगरीचा लौकिक होता. सर्व प्रजा आनंदाने नांदत होती. आपल्या राज्यात सर्वत्र आबादी आबाद असावे म्हणून नेहमीच राजा देशोदेशीच्या विद्वान दशग्रंथी ब्राह्मणांना व ऋषिजनांना बोलावून यथासांग यज्ञयाग करीत असे. अगणित दानधर्म करीत असे. विद्वानांचा आणि प्रजेचा दुवा घेत असे.

होता होता बळीराजाच्या पुण्याईने ९९ यज्ञ यथासांग पार पडले. आपल्या हातून झालेल्या ह्या धर्मकृत्याने आणि दानधर्माने तो संतुष्ट झाला होता, सुखावला होता आणि शंभरावाही यज्ञ आपल्या हातून व्हावा ह्या इच्छेने तो यज्ञाची तयारी करू लागला होता.

इकडे इंद्रपुरीत मात्र स्वतः देवेंद्र बळीराजाच्या ह्या अलौकिक धर्मपरायणतेमुळे आणि त्याने केलेल्या अपरंपार पुण्याच्या साठयामुळे चांगलाच हादरला होता. बळीचे शंभर यज्ञ झाले तर त्याला इंद्रपद मिळण्याचा हक्क होता आणि त्यासाठीच आपले पद जाते की काय या चिंतेने खुद्द इंद्र चांगलाच घाबरला होता. रात्रंदिवस त्याचे मन चिंतेने पोखरले जात होते.

म्हणूनच बळीचे शंभर यज्ञ होता कामा नयेत यासाठी तातडीने काहीतरी करणे भाग होते. त्याने जर शंभर यज्ञ पुरे केले तर? या अशुभ शंकेने इंद्र अक्षरशः आपले डोके धरून बसला होता. ह्या भयाण संकटातून कसे निभावून निघावे याचा विचार करता करता तो अगदी वैतागून गेला होता. अखेर त्याने काही तरी तोडगा काढण्यासाठी सर्व देवांची तातडीची सभा बोलावली.

देवांना कळेना की, इतक्या तातडीने देवेंद्राने सभा का बोलावली? पण इंद्राचे बोलावणे म्हणताना सर्वजण आपापली कामे बाजूला सारून इंद्रसभेत वेळेवर उपस्थित झाले. सर्वजण आसनस्थ झाल्यावर काळजीयुक्त स्वरात आपल्यावरील संकटाची समग्र हकिगत इंद्राने कथन केली आणि बळिराजा सारख्या महान दानशूर, धर्मनिष्ठ राजाला शंभराव्या यज्ञयागापासून कसेही करून परावृत्त करण्यासाठी काही उपाय सुचवा असे विनवून सांगितले.

अशावेळी देवगण यावर काय तोडगा काढतात याकडे तो आशेने पहात राहिला.

हकिगत ऐकल्यावर देवांमधील प्रत्येकानी आपापली मते मांडली. बरीच उलटसुलट चर्चा झाली. शेवटी बळीकडे श्रीविष्णूंनी वेषांतर करून स्वतः जावे आणि बळीचे सत्वहरण करावे; वेष बटुवामनाचा घ्यावा हेही ठरले. दानाच्या पेचात बळीस टाकावे आणि त्याचा व्रतभंग करावा असेही सर्वांचे मत पडले.

श्री विष्णूंना ह्या कामगिरीवर लगेच जाणे भाग होते. कारण तिकडे बळीराजाची यज्ञाची तयारी पूर्ण होत आली होती. म्हणून त्यांनी घरी जाताच, हुबेहूब बटू वामनाचा वेश परिधान केला. त्या वेषातच ते लक्ष्मीपुढे उभे राहून निरोप मागू लागले. लक्ष्मी देवीपदातच राहिल्याने तिने मनोमन ओळखिले की, आपले पतिराज काही महत्वाच्या कामासाठी जात असावेत. सहज विचारावं “कुठे जाताय’ म्हणून तर विचारलंही, त्याला ‘जरूरीच्या कामाला’ असं उत्तर देऊन विष्णूभगवान निघालेही.

बराच प्रवास झाल्यावर बळीची नगरी जवळ दिसू लागली आणि लांबूनच त्या भाग्यनगरीचे वैभव डोळे दिपवू लागले. अनेक रेखीव फळाफुलांनी लहडलेली वने- उपवने, उंच उंच टोलेजंग प्रासाद, विशाल भव्य मार्ग, झगमगत्या वस्तूंनी भरलेल्या बाजारपेठा, ही सारी समृद्धी पाहून विष्णू सुखावले, आनंदले.

पण आपण ज्या कामासाठी आलो ते योजिलेले काम करावयासच हवे म्हणून ह्या साऱ्या राजवैभवाने मोहित झालेले भगवान आपल्या कामगिरीवर निघाले. भव्य राजरासादापाशी येताच द्वारपालाने लवून वंदन केले. त्याकाळी द्विजांचा सर्व ठिकाणी आदर सत्कारच होत असे.

बटुवामनाने आत प्रवेश केला. सत्वशील बळीराजा यज्ञाच्या तयारीत गुंतलेलाच होता. पण बटुवामन आल्याचे कळताच लगेच आपल्या कामातून त्या द्विजाजवळ गेला आणि विनम्रपणे वंदन करता झाला. द्विजाला आसनावर बसवून त्याची यथासांग पूजा केली. आणि लीनतेने राजा बटूस म्हणाला, “महाराज, आपली कोणती इच्छा मी पुरी करावी ती आज्ञा व्हावी.’ आर्जवी आणि हात जोडून हे राजाने विचारातच प्रत्यक्ष भगवानही ” ह्याचे सत्व कसे बरे हरण करावे या विचाराने अस्वस्थ झाले, तरी क्षणभरातच सावरले आणि काही सांगणार तेवढ्यात…. काही निराळेच घडू लागले.

गुरूवर्य शुक्राचार्य बळीराजाजवळच यज्ञयागाची तयारी करीत दर्भ निवडीत बसले होते. त्यांनी अंर्तमनाने जाणले की, हा बटू खरा नव्हे. ही विष्णूंची स्वारी इथे सत्वहरण करण्यासाठी बटुवेषात आलेली आहे. आणि म्हणूनच बळीसारख्या पुण्यशील राजाचे सत्व जाऊ नये यासाठी बळीने दानाचे उदक बटूचे हातावर सोडू नये असे शुक्राचार्यांना वाटले.

त्यांनी लगेच राजास बाजूस नेऊन वस्तुस्थितीची स्पष्ट कल्पना दिली व तू इच्छित दानाचे आश्वासन देऊ नकोस असे आर्वजून सांगितले. तसेच “राजा, ह्या दानाने तुझा घात होणार आहे.” असा इशाराही दिला पण……

हे सारे मुनिवर्यांचे ऐकूनही दानासाठी आजवर पुढे केलेला हात परत मागे कधीच न घेणारा बळीराजा, त्याने क्षणभरही विचार केला नाही. तो म्हणाला, “आजवरचे दानाचे सत्व राखण्यासाठी आज सत्व गेले तरी चालेल पण आलेल्या याचक द्विजाला इच्छित दान करणे हे माझे ब्रीद आहे. त्यापासून मी कधीही वंचित होणार नाही.” असे शुक्राचार्य गुरूंना राजाने नम्रपणे सांगितले.

जवळच राजाची धर्मपत्नी बसली होती. तिने सारे संभाषण ऐकले होते. ती पतिव्रता स्त्री राजास म्हणाली, ‘हे पतिदेवा, बटूच्या रूपात प्रत्यक्ष भगवान श्रीविष्णू आलेत असे आपले मुनिवर्य सांगताहेत ना, मग विचार कसला करायचा? अहो, एवढा महान पृथ्वीमोलाचा याचक म्हणून आपल्या घरी आलाय. हे आपलं केवढं पुण्य आहे? आणि महाराज, प्रत्यक्ष देवाधिदेव आपणाकडे आलेत त्यांचे आतिथ्य त्यांच्या इच्छेप्रमाणेच व्हावे हे उचित नव्हे काय? मी सांगते ह्या दानाने कोणतेही अरिष्ट कोसळू दे, चालेल. पण आपण ह्या याचकाची इच्छा पूर्ण करावी.’ पत्नीचे हे ओजस्वी विचार ऐकून राजा प्रसन्न झाला नि द्विजाला म्हणाला, “महाराज, करावा पुढे हात, मी इच्छित दानाचे उदक आपल्या पवित्र हातावर सोडण्यासाठी उत्सुक आहे.’ शुक्राचार्य सारे जाणून होते. राजाचे हे बोल ऐकताच ते फार अस्वस्थ झाले.

त्यांना रहावेना. म्हणून त्यांनी एका अतिसूक्ष्म जिवाचे रूप घेतले आणि राजा ज्या सुवर्ण झारीने बटूच्या हातावर उदक सोडणार होता त्या झारीच्या ताटीत आचार्य जाऊन बसले. म्हणजे पाणी पडू नये. ते बंद रहावे हा विचार.

पण भगवंत, तेही सर्व जाणणारेच की? त्यांनी मनोमनी हा आर्चायांचा कावा ओळखला आणि एक दर्भाची काडी घेऊन ती बाहेरून तोटीत खुपसली. ती काडी नेमकीच शुक्राचार्यांच्या डोळ्यांत घुसली व भळाभळा तोटीतून रक्त वाहू लागले. हे पाहून बळीराजा घाबरला. हे रक्त कसले? काहीच कळेना.

इतक्यात डोळा फुटलेले गुरूजी झारीतून बाहेर आले. मग बळीराजाने बटुवामनाच्या हातावर यथासांग दानाचे उदक सांडले. आणि संतुष्ट होता राजा बटूस म्हणाला, “द्विजवरा, तू तुझे इच्छित काहीही माग, जे मागशील ते मी या क्षणी द्यायला तयार आहे.”

तेव्हा घाईघाईने वामनरूप विष्णू म्हणाले, “छे, छे, महाराज मला आपले राज्य, धनदौलत काहीही नकोय; माझी मागणी फार अल्प आहे. राजा, मला फक्त तीन पाऊले धरणी दे.”

“तथास्तु, दिली धरणी महाराज” असे राजाने म्हणताच श्री विष्णूनी झपाझप आपुली पाऊले एका क्षणात कल्पनातीत मोठी केली. आणि एक पाऊल स्वर्गात व दुसरे धरणीवर ठेवले ह्या दोनच पाऊलांनी सारा स्वर्ग व पृथ्वी भरुन गेली.

हे पाहून बळीराजा भांबवला, त्याला कळेना की हे काय घडते आहे? राजाचा असा अस्वस्थ चेहरा पाहून बटू म्हणाला, “राजा पहातोस काय? तू तर दानशूर म्हणून मोठा लौकिक मिळविलेला आहेस तरी ही साधी तीन पाऊले जमीन देण्यास तू असमर्थ ठरतो आहेस असे दिसते!”

राजाने क्षणभर विचार केला नी बोलला, “नाही नाही! महाराज, मी माझे सत्व जाऊ देणार नाही. बटुराज आजवर माझ्या घरातून कुणीही याचक अतृप्त, विन्मुख गेलेला नाही. तसे आपणही जाणार नाही.” असे म्हणत बळीने आपले मस्तक खाली झुकविले व म्हणाला, “महाराज, आपले तिसरे पाऊल ह्या मस्तकावर ठेवावे.” बटूने तिसरे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवले आणि पायाच्या दाबाने बळीला पाताळात गाडले!

अर्थात बळीराजाच्या ह्या असीम दानशूरतेने श्री विष्णू मनोमन अति संतुष्ट झाले. म्हणाले, “हे बळीराजा, तू धन्य आहेस, राजा, तुझ्या दातृत्वाची किर्ती अखंड तेवत राहील. मी तुजवर पूर्ण संतुष्ट आहे. तेव्हा तू काहीही वर मागून घे.

मी तो आनंदाने तुला देईन.”

इतके अरिष्ट घडले तरीही बळीराजा स्थितप्रज्ञपणे देवास म्हणाला, “भगवान्, आपण याचक म्हणून मज दारी आलात, मला आपल्या सारख्या सर्वेश्वराला दान करण्याची संधी दिलीत या परता आणखी काय हवे? मी कृतार्थ झालोय, देवा एकच मागतो आपणापाशी, आपण अखंड माझ्या सन्नीध रहावे हीच इच्छा.

भगवान “तथास्तु’ म्हणाले नि तेव्हापासून बळीराजाचे ते व्दारपाल म्हणून राहू लागले. असा हा दानाने अमर झालेला राजा.

ह्याच बळीराजाच्या अमर कहाणीची स्मृति रहावी म्हणून आपण भारतीय कार्तिक शुद्ध प्रतिपदेस “बलिप्रतिपदा’ हा दिवस साजरा करतो.

Author