प्रगतीच्या मार्गावर.. एक किस्सा

भैय्याजीच्या गल्ल्यावर भाजी घेत उभी होते. पंजाबी ड्रेस परिधान केलेली साधारणपणे पंचविशीतली एक तरुणी धक्का मारत धाडकन शेजारी येऊन उभी राहिली. तिचा मोबाईल फोन चालूच होता. एका हातात तो कानाशी धरून, मान वाकडी करत तिने पर्स उघडली. त्यातला एक कागद काढला आणि भैय्याजीकडे दिला. भैय्याजीनी पण माझी भाजी तोलता तोलता तो हातात पकडला. त्याचा मला भाजी देण्यातला उत्साह मावळला.



भैय्याजीच्या गल्ल्यावर भाजी घेत उभी होते. पंजाबी ड्रेस परिधान केलेली साधारणपणे पंचविशीतली एक तरुणी धक्का मारत धाडकन शेजारी येऊन उभी राहिली. तिचा मोबाईल फोन चालूच होता. एका हातात तो कानाशी धरून, मान वाकडी करत तिने पर्स उघडली. त्यातला एक कागद काढला आणि भैय्याजीकडे दिला. भैय्याजीनी पण माझी भाजी तोलता तोलता तो हातात पकडला. त्याचा मला भाजी देण्यातला उत्साह मावळला. त्याने तिच्या कागदावरची भाजी काढायला सुरुवात केली. ती पण फोनवर बोलता बोलता हाताच्या खुणानेच त्याला दाखवत होती “हा फ्लॉवर गड्डा नको तो पलिकडचा दे. टोमॅटो कडक दे.” मध्येच त्याच्यावर ओरडली, “अरे भैय्याजी कितने बार बोला है, भेंडी, वांगी जरा छोटा छोटा दे, ये क्या दिया है? ” त्याने पण निमूटपणे भाजी बदलून दिली.
मी मुकाट्याने बघत होते. सगळी भाजी घेऊन झाल्यावर खुणेनेच त्याला विचारले किती पैसे झाले? त्याने सुध्दा कागदावर काही हिशोब केल्यासारखे केले म्हणाला, “दो सो तीस रुपये ” फोनवर बोलता बोलता तिने पर्स मधून पैसे दिले आणि शेजारच्या फळवाल्याकडे गेली अजूनही फोन चालूच होता. तिथे ही अशीच अरेरावी. तेवढ्यात एक बाई तिला हाका मारत मारत आल्या, “आटोपले काग चल लवकर.
तशी घाईघाईने फोन बंद करुन, “झालं मॅडम आलेच” असे म्हणत पिशव्या उचलून पटापट त्या बाईच्या मागे धावत सुटली. अरेच्चा आता लक्षात आले त्या बाईची कामवाली असावी.
भैय्याजीला विचारले, “कोण होती ती? ”
म्हणाला, “त्या मॅडमच्या घरी काम करते. ‘
क्या बात है, मॅडमपेक्षा हिचा रुबाब जोरदार.
सहजच आठवले, दोन तीन दिवसांपूर्वी दारावरची बेल वाजली. मी पूजा करत होते. घरात कामवाली बाई काम करत होती. तिला सांगितले “जरा दार उघडतेस का? ” ती दाराशी पोहचेपर्यंत परत बेल वाजली. कुरियरवाला आला होता. कुरियर सही करुन घेईपर्यंत हिची बडबड चालू होती. ” समझता नही क्या रे मैं घरमें काम करती हूं, आनेमे थोडा टाईम लगेगाचना, ” मलाच वाईट वाटले असे कशाला बोलावे. तो मात्र गुपचूप काही न बोलता निघून गेला. जणू त्याला ह्या गोष्टीची सवय असावी.
मुंबईत रहायला गेले की अशा खूप मजेशीर गोष्टी बघायला मिळतात. मुलगा आणि सून सकाळी दोघे ही कामावर गेले की आम्ही दिवसभर घरी असतो. सोसायटी खूप मोठी आहे. जवळजवळ चारशे फ्लॅट असतील.
सोसायटी कसली, वसाहतच म्हणा, भरपूर माणसे, भरपूर गाड्या, ड्रायव्हर आणि गाड्या साफ करणारे पण भरपूर, असंख्य वॉचमन. दिवसपाळीचे वेगळे, रात्रपाळीचे वेगळे, अगणित सफाई कामगार, स्वयंपाकवाल्या “मावश्या” भरपूर आणि घरात काम करणाऱ्या या मुली, बायका पण भरपूर. फक्त तुमच्या आमच्या सारख्या एकमेकाला ओळखून एक दुसऱ्याची विचारपूस करणाऱ्या शेजारी माणसांचाच तुटवडा. दिवसभर वेळ कसाबसा घालवायचा असतो. संध्याकाळी मुले आली की मग वेळ पटकन जातो. त्यामुळे सकाळपासून खिडकीत बसून या घरकाम करणाऱ्या बायकांची ये जा बघणे हा माझा एक छंदच होऊन गेला.
मी इथे नेहमी बघते. सकाळच्या वेळेस तिघी चौघीजणी मिळून रिक्षाने कामावर येतात. एका पाठोपाठ एक दर दोन-चार मिनिटाने यांना घेऊन येणाऱ्या रिक्षांची ये जा चालूच असते. व्यवस्थित कपडे, डोक्यात गजरा, हातात छोटीशी पर्स, गळ्यात घातलेला सोसायटीचा गेटपास टाईप आयडेंटी कार्ड यांना बघून या घरकाम करत असतील असा विचारही आपल्या मनाला शिवणार नाही. प्रत्येक मजल्यावर यांच्यासाठी वॉशरुम आहेत. तिथे किंवा जिथे काम करतात तिथे जातात कपडे बदलतात आणि आपापाल्या कामाला लागतात. दिवसभर भरपूर पडेल ते काम व्यवस्थित करतात. त्यात कुठलीही काटकसर करत नाही. ते आटोपले की मग त्यांचे फेशियल केसाला कलर लावणे बरेच वेळा तर आंघोळीपासून सगळे व्यवहार होत असतात.
आमच्या घरी दिवसभर येऊन जाऊन एक बाई काम करत असते. साधारणपणे तीस-बत्तीस वर्षाची असेल. चार पाच घरात तिने कामाच्या वेळा बरोबर अॅडजेस्ट केल्या आहेत. सकाळी दोन घरी चपात्या (पोळया) करते. मग आमच्याकडे येते. थोडे काम करुन दुसऱ्या दोन घरी जाते. तिकडे झाडूपोछा करते. मग मात्र एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत ती आमच्याकडे असते. नंतर पुन्हा दोन ठिकाणी चपात्या वगैरे असे करत करत ती संध्याकाळी सात वाजता सोसायटीच्या बाहेर पडते.
एक दिवशी मी तिला गप्पा मारायला पकडले. म्हणजे झाले काय आदल्या दिवशी मी सहज दुपारच्या वेळेस बाहेरची गंमत बघत हाते. बघता बघता खालच्या गार्डनमध्ये बऱ्याच काम करणाऱ्या या बायका, स्वयंपाकवाल्या मावश्या, वॉचमेन एकदम जमा झाले. बाराव्या मजल्यावरून त्यांचे संभाषण ऐकू येत नव्हते पण हावभाव थोडेफार टिपता येत होते. पहिल्यांदा घाबरले. वाटले, “अरे बापरे, यांची युनियन आहे की काय? कुठल्या मॅडम विरुध्द तक्रार, निषेध वगैरे नोंदवणे आहे की काय?” (आजकाल बाईसाहेब म्हणत नाहीत. “इंडिया शायनिंग” ना ! ‘मॅडम’ आणि साहेबाला ‘सर’ म्हणतात) दहा पंधरा मिनिटाने लक्षात आले की तसे काही नसावे. एका वॉचमनने एक डायरी काढली. प्रत्येक जण त्याच्याजवळ जाऊन त्याला काही देत होते तो डायरीत काही लिहित होता आणि मग आपल्या जागी जाऊन बसत होता. माझे कुतूहल फारच वाढत होते. प्रकार तरी काय आहे? तेवढ्यात दोघी बायका मोठी पिशवी भरून काही घेऊन आल्या आणि त्यातून त्यांनी प्रत्येकाला ‘वडापाव’ द्यायला सुरुवात केली. ‘वडापाव’ मात्र मला बाराव्या मजल्यावरुन ही दिसला.
हाश, मी सुटकेचा निःश्वास टाकला. म्हटले यांची कोणाची पार्टी दिसते आहे. निदान भांडणे, वाद तरी नाही.
दुसऱ्या दिवशी हिला मी विचारले, “काय ग सायरा, काल खाली गार्डन मध्ये काय होते?”
पटकन, मी काय विचारते हे तिच्या लक्षात आले नाही. पण विचार करुन म्हणाली, “आंटी ते होय. काल आमची किटी पार्टी होती.” मी शॉक्ड .
म्हटले, ” वा खूप मेंबर दिसताय.”
म्हणाली, “सगळे मिळून तीस जण आहोत.”
“अरे बापरे, किती रुपयांची आहे गं? ” मी जरा कौतुकाने विचारले.
“ हजार हजार रुपयांची, ” आता मात्र मी खुर्चीतून उडता उडता स्वतःला सावरले.
म्हटले, “अग एवढा हिशोब कसा ठेवता? आणि किती महिने चालत असेल तुमची एक राऊंड? तेवढ्यात कोणी काम सोडून पैसे घेऊन निघून गेले तर ” ती म्हणाली, “नाही तसे काही होत नाही दर महिन्याला दोन नंबर काढतो. वॉचमेन डायरीत हिशोब लिहितो आणि सोसायटीत येणाऱ्या सगळ्या कामाच्या लोकांची पोलिसांकडे नोंद असते. आम्ही सगळे आजूबाजूला रहातो. एकमेकांना ओळखणारेच लोक आहेत. अंटी या शिवाय तीस रु. वडापाव आणि चहाचे काढतो. मग तो खर्च कोणालाच येत नाही,” म्हटलं, “वा, खूप छान.
म्हणाली, “मागच्या वर्षी मी आणखी एका मॅडमकडे महिन्याचे हजार रु. जमा करायची आणि हे आणि किटीचे पैसे मिळून मुलीला सोन्याची चैन केली. ”
आता मात्र मला फारच कौतुक वाटले.
काहीतरी बोलायचे म्हणून विचारले, “किती मुले आहेत तुला? ”
आंटी दोन, एक मुलगा, एक मुलगी दोघेही शाळेत जातात.
विचारले, “तु कामावर आली की मुलांना कोण बघते?
सांगू लागली, “ चार पाच घरे सोडून एक बाई राहतात. शिकलेल्या आहेत. आमच्या चौघी कामाच्या बायकांची मुले आम्ही सकाळी तयार करुन त्यांच्याकडे सोडून येतो. त्या शाळेत पाठवतात. शाळेतून आल्यावर मुलांचा होमवर्क करुन घेतात. आम्ही घरी जाताना मुलांना घेऊन जातो. प्रत्येक मुलाचे जेवण आणि पाचशे पाचशे रुपये देतो, त्यांना” थोडक्यात काय तर क्रश.
मी आवाक होऊन बघत होते. अतिशय कौतुकाने सांगत होती, “आंटी माझ्या मुलांना बघाल त्यांचे रहाणे, वागणे बघाल तर तुम्ही म्हणणार नाही काम करणाऱ्या बाईचे मुले आहेत. महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ‘पेरेन्टस मिटींग’ असते शाळेत. मी न चुकता जाते. म्हणून तर त्या शनिवारी यायला उशीर होतो.”
तिच्या तोंडून ‘पेरेन्टस मिटिंग’ ऐकून मी विचारले, “सायरा तू किती शिकलीस गं? तुझा नवरा काय करतो?”
“मी ना आंटी काहीच नाही शिकले. लहानपणी वडील गेले. मामा आईला आणि आम्हाला मुंबईला घेऊन आला. आई घरकाम करायची. मी लहान होते. आई बरोबर कामावर जायचे. थोडी मोठी झाले तेव्हा ही बिल्डींग बनत होती मजुरी काम करायचे. जवळच्या बिल्डींगमध्ये एक आंटी रहायची. तिच्या मुलीला सांभाळायला ती मला तिच्या घरी घेऊन गेली. त्यांच्याबरोबर राहून खूप चांगल्या गोष्टी शिकले. तेव्हापासूनच नक्की केलं होतं मला नाही शिकता आले पण कधी पोरबाळे झाली तर शिकवीन. नवरा काय करतो ते नका विचारू. मजुरी काम करतो. पण दारूत पैसे घालवतो. त्याच्या नावाने कुठे डोक्याला त्रास करुन घ्यायचा.
आम्ही कामाला येणाऱ्या कितीतरी बायकांचे नवरे असलेच आहेत. पण आम्ही चांगल्या माणसांकडे काम करतो आम्ही मुले चांगली वाढवण्याचा प्रयत्न करतो. ”
“ऐकता ऐकता मी तर थक्कच झाले.” म्हटले, “बाई धन्य हो तुझी. ‘ एवढी समज आहे ग्रेट.
तिच्या या कहाणीने भारावूनच गेले. म्हणजे इथे या ज्या कामाला येणाऱ्या मुली किंवा बायका आहेत त्यांची सगळ्यांची जरी नाही तरी निदान ७०-८० टक्के बायकांची कहाणी आमच्या सायरा सारखीच आहे. त्यांच्या आयुष्यात दुःख नाही असे नाही, पण या आशावादी आहेत. आशावादी लोकांचा दृष्टिकोन वेगळाच असतो. सकारात्मक, उजळ बाजूचा विचार करणारे आणि रडगाणी बाजूला ठेवणारे हे लोक आहेत. आशेवर जगत असतात. मुलांना शिक्षण देऊन त्यांचे आयुष्य उज्वल करणे हा आशेचा किरण यांना खूप मोठा दिलासा देत असावा. खरोखरच इतका होकारात्मक विचार करणे हा त्यांच्यातला दुर्मिळ गुण आहे.
या शिकलेल्या नाहीत. पण येणारे पैसे सांभाळून ठेवावेत, मुलांना शिकविणे जरुरी आहे आणि स्वाभिमानाने, आनंदाने, इमानदारीने जगणे जरुरी आहे याची त्यांना पूर्ण जाणीव आहे आणि ते त्या अतिशय व्यवस्थित करत आहेत.
पूर्वी म्हणजे आत्ता गेल्या आठ दहा वर्षापूर्वी पर्यंत हे चित्र फार वेगळे दिसत होते. या बायका कष्ट करुन पैसे मिळवित होत्या आणि नवरे यांना मारझोड करुन पैसे काढून घेत होते आणि कित्येक बायका नशिबाला दोष देत हे सहन करत होत्या. दिवसभर कष्ट करुन जेमतेम मुलाबाळांची पोट भरत होत्या.
पैसे न राहिल्यामुळे यांची मुले सुध्दा लहानपणापासून काबाडकष्ट करत होती आणि शिक्षण तर जाऊच द्या. उलट बहुतांशी मुले वाईट मार्गाला लागत होती. पण शेवटी ‘स्त्री’ ही एक शक्ती आहे. आयुष्यात आपल्या काय करायचं आहे? काय महत्त्वाचे आहे याचे ज्ञान जर स्त्री ला झाले तर घरातील आचार, विचार आणि रहाणीमान सगळेच बदलून जाते. कुटुंबाला प्राधान्य देणे हा तिचा स्वभाव तर असतोच. स्त्रीला एकदा जर तिच्यातील क्षमतेची जाणीव झाली किंवा ओळख झाली तर तिच्या विचारांची पध्दती पूर्ण बदलून जाते.
जर ‘स्त्री’ जागृत झाली तर सुधारणेस नक्की मदत होईल असे नारे आपण नेहमीच ऐकून असतो. आज याची झलक बघायला मिळते. गेल्या काही वर्षात कायदे पण थोडे बायकांच्या बाजूचे झाले. त्यामुळे या स्त्रियांना थोडे पाठबळ मिळाले आणि या अशिक्षित अबला अशा नावाजल्या जाणाऱ्या बायकांनी सुध्दा आजुबाजूचे वातावरण बघून त्यातून चांगली शिकवणूक घेऊन स्वतःचा आणि स्वतःच्या मुलाबाळांचा उध्दार करायला सुरुवात केली आहे. ही एक फारच चांगली प्रगती आहे. पण या नाण्याचा एक दुसरी बाजूही आहे. अलिकडे कायदे, युनियन यांनी त्यांना जी ताकद मिळाली आहे त्याचे थोडे परिणाम आपल्याला सुध्दा अनुभवायला लागतात.
महिन्यातून दोन सुट्या, दिवाळीत दोन सुट्या शिवाय गौरी गणपतीला सुट्टी, प्रत्येक कामाचा ठरलेला भाव अशा गोष्टींना तोंड द्यायला लागते. नाईलाज आहे. संपूर्ण समाजाची प्रगती होत असेल तर थोडी किंमत आपल्यालाही मोजायला हवी.
समाज सेवेत आपलाही थोडा हातभार…

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →