राम पटवर्धन हे मौज या मराठीमधील सर्वात जुन्या व उल्लेखनीय प्रकाशन संस्थेचे मेहनती व साक्षेपी संपादक होते. मौज या संस्थेला स्वतःची प्रेस व फाउंड्री मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. खटाव वाडीतील त्यांच्या कार्यालयामधून या संस्थेची सर्व सूत्रे हलत असत. मराठी साहित्यातील मानदंड ठरलेले त्यांचे सत्यकथा हे मासिकही अत्यंत लोकप्रिय होते. त्यातील कथांची निवड पटवर्धनांकडून अतिशय तावून सुलाखून व्हायची व मगच त्या कथा छापखान्याकडे जायच्या. कथासंग्रह असो, किंवा कादंबरी, तिचे पुस्तकात रूपांतर करताना प्रत्येक टप्प्यावर विलक्षण दक्षता घेतली जायची. मौजची नाममुद्रा उमटली, की त्याच्या दर्जाबद्दल कसलाही संदेह उरत नसे.
राम पटवर्धन
साक्षेपी संपादक आणि अनुवादक म्हणून ख्याती असलेल्या राम पटवर्धन यांचा जन्म २१ मार्च १९२८ रोजी रत्नागिरीतील गणेशगुळे गावात झाला.महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी अनुवाद करायला सुरुवात केली.१९४९ मध्ये ते “मौज” साप्ताहिकात काम करू लागले तसंच मुंबईतल्या काही महाविद्यालयांत काही काळ अध्यापन देखील केलं .त्यांनी “नाइन फिफ्टी टू फ्रिडम” या पुस्तकाचा “अखेरचा रामराम” या नावाने मराठी अनुवाद केला. तसेच बी. के. अय्यंगार यांचे योगविद्येवरील पुस्तक “योगदीपिका” नावाने मराठी साहित्यात आणले.