उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने कार्य करणाऱ्या शिवसेनेच्या समाजकारणाची दखल गिनीज बुकने घेतली आहे.



महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. त्यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबई येथे झाला. गेल्या अनेक दशकांपासून मराठी माणूस, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ठाकरे यांना त्यांचे वडील शिवसेनेचे संस्थापक स्व.बाळासाहेब ठाकरे, आई स्व.मीनाताई आणि आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा समृद्ध वारसा लाभला आहे.

उद्धव ठाकरे जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे स्नातक असून त्यांच्या छायाचित्रांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. एक सिद्धहस्त लेखक आणि व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या ठाकरे यांच्या कलाकृतींची दखल अनेक नामवंत मासिकांनी वेळोवेळी घेतली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात विद्यार्थी दशेपासून झाली. शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रीय असलेल्या ठाकरे यांच्याकडे २००२ च्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आली आणि महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करीत त्यांनी ती यशस्वीरीत्या पूर्ण केली.

शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसेनेला अधिक सर्वसमावेशक करतानाच आधुनिकतेशी त्यांनी शिवसेनेला जोडले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने कार्य करणाऱ्या शिवसेनेच्या समाजकारणाची दखल गिनीज बुकने घेतली आहे.

उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कल्याणावर लक्ष केंद्रीत करीत आपल्या पक्षाचा विस्तार वाढविला आणि आता राज्यानेही त्यांचे नेतृत्व स्वीकारले.

उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस च्या सहकार्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन नवीन अध्यायाला सुरुवात केली आहे.

अधिक विस्तृत लेखासाठी:

https://www.marathisrushti.com/articles/chief-minister-uddhav-thackrey/

Author