कमल शेडगे यांचा जन्म २२ जून १९३५ रोजी झाला. कमल शेडगे हे धुरंधर, ज्येष्ठ कलाकार. अक्षरांची कलात्मक मांडणी करून शेडगे शीर्षकाला असं काही रुपडं बहाल करत असत की ते शीर्षक हीच कलाकृतीची ओळख बनत असे. कमल शेडगे यांनी मुद्रित माध्यमात विपुल काम केले असले तरी त्यांची खरी ओळख होती ती टाईम्स समूहातील प्रकाशनांसाठी तसेच नाटक, सिनेमाच्या जाहिरातींसाठी त्यांनी केलेल्या कला दिग्दर्शन व सुलेखनामुळे!
कमल शेडगे १९५५ पासून टाइम्स ऑफ इंडियामध्ये कला विभागात काम करू लागले. त्या वेळी टाइम्समध्ये त्यांच्यासोबत मराठी व्यावसायिक नाटकांचे नेपथ्यकार रघुवीर तळाशिलकर हेही नोकरी करत होते. शेडगे आणि तळाशिलकर हे कोकणातलेच असल्यामुळे दोघांची मैत्री झाली. तळाशिलकर नोकरी सांभाळून व्यावसायिक नाटकांचं नेपथ्य, डिझाइनचं कामही करत. १९६२ मध्ये ‘गोवा हिंदू असोसिएशन’ने वसंत कानेटकर लिखित ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाची निर्मिती करण्याचे ठरवले. या नाटकाच्या नेपथ्याची जबाबदारी तळाशिलकर सांभाळत होते. तळाशिलकरांनी कमिटीतील लोकांशी बोलून कमल शेडगे यांना नाटकाचं लेटरिंग तयार करण्याचं काम मिळवून दिलं.
प्रभाकर पणशीकर यांनी नाट्यसंपदा या संस्थेची स्थापना केली आणि आपल्या पहिल्याच ‘मोहिनी’ या नाटकाच्या डिझाइनचं काम शेडगे यांना दिलं.
कमल शेडगे यांनी डिझाइन केलेल्या संस्थांची आणि नाटकांची यादी करायची म्हटलं तर खूपच लांबेल. तरीही विशेष उल्लेख करायचा तर राजाराम शिंदे (नाट्यमंदार), अनंत काणे (अभिजात), मच्छिंद्र कांबळी (भद्रकाली प्रॉड.), लता नार्वेकर (श्रीचिंतामणी), उदय धुरत (माऊली प्रॉड.), महेश मांजरेकर (अश्वमी थिएटर्स), प्रशांत दळवी, चंद्रकांत कुलकर्णी (जिगिषा), अजित भुरे (असिम), अशोक हांडे (चौरंग) या निर्मात्यांचा आणि त्यांच्या संस्थांचा करावा लागेल.
कमल शेडगे यांचे ४ जुलै २०२० रोजी निधन झाले.
अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा
https://www.marathisrushti.com/articles/aksharkar-kamal-shedge/