अनंत माधव क्षीरसागर हे मिशीगनमध्ये आपल्या कर्तुत्वाचा झेंडा मानाने फडकविणारे व मराठी पाण्याची गोडी आणि खोली यांची जाणीव सातासमुद्रापार पोहोचविणारे एक अत्यंत बुधिमान व विचारशील व्यक्तिमत्व आहे. त्यांचा जन्म 16 ऑगस्ट, 1931 रोजी झाला. स्वातंत्र्यपुर्व काळात जन्मलेल्या अनंत यांनी भारताचा तो स्वातंत्र्यसंग्राम अगदी जवळून पाहिला आहे. नंतर शिक्षणानिमीत्त व नोकरीनिमीत्त
ते मिशीगनला स्थायिक झाले व त्यांच्या आयुष्याने वेग घेतला.
मँचेस्टर विद्यापीठातून डी.एस.सी. व पी. एच. डी. मिळविल्यानंतर त्यांनी मिशीगन विद्यापीठामध्ये स्टॅटिस्टीक्स व बायोस्टॅटिटीक्स या विषयांचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे काम केले. अल्पावधीतच त्यांनी तेथील विद्यार्थ्यांमध्ये आदराची व मायेची जागा संपादन केली. अत्यंत प्रेमळ व कुशाग्र बुध्दीचे शिक्षक अशी तिथे त्यांची ख्याती होती. कित्येक विद्यार्थ्यांना स्टॅटिटीक्स या विषयाची रोचक शिकविण्याच्या पध्दतींद्वारे, खरी गोडी निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
संशोधक वृत्ती व कामाची चिकीत्सक जातकुळी ह्या त्यांच्या उपजत स्वभावपैलुंमुळेच त्यांनी आपल्या जिव्हाळ्याच्या विषयांमध्ये पी. एच. डी. संपादन केली आहे. सध्या ते अमेरिकन स्टॅटिस्टीकल असोसिएशन, व इन्स्टिटयुट ऑफ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टीक्स चे फेलो म्हणून, तसेच इन्टरनॅशनल इन्सटिटयुट ऑफ स्टॅटिस्टीक्स चे माननीय सदस्य अशा अनेक संस्थापदांवर सक्रिय आहेत. या संस्थांच्या पदाधिकरांच्या बरोबरीने काम करून, व त्यांच्या विविध उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभागी होवून, स्टॅटिस्टीक्स या विषयावरील संशोधनकार्याला, आणि या विषयाच्या अद्ययावत विकासाला, गती प्राप्त देण्याचे अमुल्य काम त्यांनी केले आहे. ते स्वतः या विषयामधील तज्ञ व जाणकार शास्त्रज्ञ व लेखक आहेत.
स्टॅटिस्टीक्स या विषयावरच्या तीन अॅडव्हानस्ड पाठयपुस्तकांचे लेखक, जगभरामध्ये प्रसिध्द होणार्या अतिशय नामांकित व नावाजलेल्या अशा अनेक स्टॅटिस्टीक्स जर्नल्स मध्ये प्रकाशित झालेल्या शंभरांहून अधिक संशोधन लेखांचे जनक , 35 पी. एच. डी. विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक तयार करणारे लेखक, अशी त्यांच्या नावावर असलेल्या लेखनसंपदा पाहिली की विज्ञानाप्रती असलेल्या त्यांच्या विलोभनीय निष्ठेची ओळख पटते.