बहु असोत सुंदर संपन्न की महा

महाराष्ट्राचा गौरव करणारी अनेक गीते अनेक कवींनी लिहिलेली आहेत. यातली काही निवडक महाराष्ट्र गीते या मालिकेत सादर करत आहोत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेलं हे एक महाराष्ट्रगीत.



बहु असोत सुंदर संपन्न की महा

महाराष्ट्राचा गौरव करणारी अनेक गीते अनेक कवींनी लिहिलेली आहेत. यातली काही निवडक महाराष्ट्र गीते या मालिकेत सादर करत आहोत.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेलं हे एक महाराष्ट्रगीत.

बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

गगनभेदी गिरीविण अणु नच जिथे उणे ।
आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे ।
अटकेवरी जेथिल तुरंगि जल पिणे ।
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ।
पौरुषास अटक गमे जेथ दुःसहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे ।
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे ।
रत्नां वा मौक्तिकांही मूल्य मुळी नुरे ।
रमणींची कूस जिथे नृमणीखनि ठरे ।
शुद्ध तिचे शीलही उजळवी गृहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

नग्न खड्ग करि उघडे बघुनि मावळे ।
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे ।
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले ।
भासति शतगुणित जरी असति एकले ।
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

विक्रम वैराग्य एक जागि नांदती ।
जरीपटका भगवा झेंडाही डोलती ।
धर्म राजकारण समवेत चालती ।
शक्ति युक्ती एकवटुनि कार्य साधिती ।
पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो ।
स्फूर्ती दीप्तीधृतिही जेथ अंतरी ठसो ।
वचनी लेखनीही मराठी गिरा दिसो ।
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनी वसो ।
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

कवि – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →