तुंडलनलि जातक

ही कथा शास्त्याने जेतवनात राहत असताना लालुदायी येराळा, ज्याला मठ्ठ असे म्हणत असत, त्याला उद्देशून सांगितली.



ही कथा शास्त्याने जेतवनात राहत असताना लालुदायी येराळा, ज्याला मठ्ठ असे म्हणत असत, त्याला उद्देशून सांगितली.

त्यावेळी दब्ब नावाचा थेर भिक्षुसंघात अन्नवाटपाचा अधिकारी होता. सकाळी भात वाटताना कधीकधी उत्तम तांदळाचा भात तर कधी अगदी वाईट तांदुळाचा भात लालुदायी थेराच्या वाट्याला येत असे. वाईट भात असेल त्या दिवशी तो त्या वाटणाऱ्याला अगदी हैराण करुन टाकायचा. तो म्हणायचा, ‘दब्बालीचं वाटप कसं करावं हे कळतं का ? आम्हाला काही कळत नाही क काय ? ‘एकदा तो असाच त्या वाढणाऱ्याला बोलत असतांना ‘ठीक आहे तर मग. तूच वाटे दे ना’ असे म्हणून ते भांडे तिथल्या वाटपाच्या लोकांनी त्याच्या स्वाधीन केले. तेव्हापासून तोच संघात अन्नाचे वाटप करू लागला. पण कुठला भात उंची तांदळाचा आणि कुठला हलक्या तांदळांचा हे त्याला कळत नसे.
ह्याप्रमाणे संघात इतक्या अधिक वर्षे घातलेल्या माणसाला उंची तांदुळांचा भात आणि कमी वर्षे घालवलेल्यांना हलक्या तांदुळांचा भात द्यायचा हे ठरलेले होते. त्याप्रमाणे जागा ठरवताना अमुक वर्षाचे या ठिकाणी आणि दुसरे ह्या ठिकाणी असेही त्याने नीट मांडून ठेवले नाही. त्यामुळे एकाच वर्गातले लोक काही इथे तर काही तिथे बसले. कारण अमुकाने अमुक ठिकाणी बसावे अशा खुणा त्याने जमिनीवर नाही तर भिंतीवर रेघा मारून करून ठेवल्या आणि त्यामुळे काही इथे तर काही तिथे अशी पांगापांग झाली.

दुसऱ्या दिवशी वाटपाच्या दालनात काही ठिकाणी भिक्षूंची गर्दी झाली तर
काही ठिकाणी ते अगदी विरळ झाले. काहींच्या रेघा वर होत्या तर काहींच्या
खाली. लालुदायीला ह्या स्थानरचनेची माहिती नसल्यामुळे त्याने आपण
ठरवल्याप्रमाणेच वाटप केले.

भिक्षु त्याला म्हणाले, ‘आयुष्मान, उदायी, काही खुणेच्या रेघा वर आहेत तर
काही खाली आहेत. उत्तम भात अमुक वर्षे काढलेल्यांसाठी असतो, हलका
भात अशा अशांसाठी असतो. ‘

पण त्याने त्यांना असे उत्तर दिले की, ‘जर ही खूण इथं आहे, तर तुम्ही तिथं
उभे का राहिलात ? मी तुमच्यावर का विश्वास ठेवू ? मी केलेल्या खुणेचाच मला
विश्वास वाटतो?’
तेव्हा पोरगेले श्रावक त्याला म्हणाले, ‘आयुष्मान लालुदायी, मठ्ठ उदायी,
अशा खुणा दिल्यास की भिक्षुना जे द्यायचं असतं ते मिळत नाही. त्या खुणा
द्यायला अगदी अपात्र आहेस. तू इथून चालता हो. ‘ असे म्हणून त्यांनी त्या मठ्ठ
उदायीला उर्फ लालुदायीला तिथून घालवून दिलं. त्यावेळी त्या वाटपघरात
खूपच गलका झाला. ते ऐकून शास्ता आनंद थेराला म्हणाला, ‘आनन्दा,
वाटपघरात खूपच कल्लोळ माजला आहे. काय झालं आहे ते पाहून ये.’

आनन्द थेराने घडलेली हकीगत तथागताला सांगितली. तेव्हा तो म्हणाला, ‘हा उदायी आताचअसा मूर्खपणानं दुसऱ्यांना त्यांच्या लाभापासून वंचित करतो आहे असं नाही. तर पूर्वीसुद्धा हा असंच करीत असे.’थेराने त्याची फोड करण्याची विनंती केली तेव्हा भगवानाने पूर्वजन्मीचे कारण सांगून ही गोष्ट सांगितली.

पूर्वी वाराणशीत ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असता बोधिसत्त्व मालाची
किंमत ठरवून त्याची खरेदी व विक्री करणारा अधिकारी होता. राज्यात येणाऱ्या
जाणाऱ्या हत्ती-घोड्यांची, रत्नांची, सोन्याची व अशाच सर्व तऱ्हेच्या किंमती
वस्तूंची तो खरेदी व विक्री करीत असे. परंतु राजा लोभी होता. प्रामाणिक व
बुद्धिमान अशा या सेवकाची सचोटी ह्याला आवडेना. कारण ‘लबाडीने किंमती
ठरवण्याखेरीज दुसऱ्याला लुबाडून आपल्याला धनवान कसं होता येईल ?
असा चोख व्यवहार करणारा माणूस असल्यावर फायदा तो कितीसा होणार ?
दुसराच माणूस पाहिला पाहिजे असा विचार करून राजाने एका गावंढळ
माणसाला आपला कारभारी नेमले व बोधिसत्वाला कामावरून काढून टाकले.
हा दुसरा कारभारी परदेशातील मालांच्या किंमती राजाची मर्जी पाहून ठरवू
लागला.

एकदा उत्तरेकडील देशातून एक घोडयांचा व्यापारी पाचशे घोडे विकायला
घेऊन आला. त्या घोड्यांची किंमत या नव्या अधिकाऱ्याने मापटेभर तांदूळ
एवढीच ठरवली. तांदूळ त्याच्या पदरी टाकून घोडी पागेत बांधली. व्यापारी पूर्ण
नागवला गेला. पण बोलतो काय ? राजाविरुद्ध न्याय कोण देणार? अखेर तो
बोधिसत्त्वाकडे आला आणि सारी हकिगत सांगून म्हणाला. ‘आता मी काय
करावं ते सांगा ?’ असं करा, त्या माणसालाच लाच द्या आणि मग त्यालाच
विचारा- आम्हाला हे तांदूळ विकायचे आहेत. त्यांची किंमत काय ठरवावी ?
राजेसाहेबांच्या समोर आपण याची किंमत ठरवाल कां ? तो जर ‘ठरवतो असे
म्हणाला तर मला कळवा. मी पण येतो तिथे. ‘ठीक आहे असे म्हणून तो व्यापारी
त्या नव्या कारभाऱ्याकडे गेला आणि त्याला त्याने भरपूर लाच दिली.
त्याबरोबर तांदळाचा भाव ठरवायचे त्या अधिकाऱ्याने कबूल केले. व्यापाऱ्याला
घेऊन तो राजाकडे गेला. तिथे दुसरेही मंत्री आले होते. बोधिसत्त्वही होताच.
व्यापारी राजाला म्हणाला, ‘महाराज, पाचशे घोड्यांबद्दल हे तांदूळ मला
मिळाले आहेत. आता त्यांची किंमत करायची आहे. तर ती किती असावी ? ‘ हा
व्यवहार राजालाही माहीत नव्हता. त्याने अधिकाऱ्याला विचारले, ‘पाचशे
घोड्यांची किंमत तू काय केलीस?’

‘एक मापभर तांदूळ.’

‘ठीक, पाचशे घोड्यांचा भाव मापटंभर तांदूळ. पण आता या तांदळाचा भाव
कसा काय ठेवायचा?’

‘वाराणशीची राजधानी आणि तिच्या आसपासची गावं असं सारं राष्ट्र, हीच
या तांदळाची किंमत. त्या अधिकाऱ्याने उत्तर दिले. हे तांदूळ इतके महाग
असल्याचे कारण, ते तांदूळ राजाच्या कोठारातले होते. हे ऐकून बोधिसत्त्व
म्हणाला,’महाराज,पाचशे घोड्यांची किंमत मापटंभर तांदूळ होते का ? आणि
मापटंभर तांदळाचं मोल सारं राज्य नव्हे का ?’

‘तू तांदळाच्या एका मापाची किंमत किती म्हणून विचारतोस? अरे, आतून
बाहेरून सारी वाराणशी आणि त्यातल्या त्यात हे पाचशे घोडे जमेस धरले
तरीही ह्यांची किंमत या तांदळांच्या एका मापाएवढी होणार नाही.’

ते ऐकून सारे मंत्री टाळ्या पिटून हसू लागले. ‘वा ! वा !‘ आमचं राज्य
आतापर्यंत आम्ही पृथ्वी मोलाचं समजत होतो. पण त्याची किंमत आज या
अधिकाऱ्यानं मापटंभर तांदूळ ठरवली. याला इतके दिवस अधिकारावर
ठेवलाच कसा ? पण हा महाराजांचा तोंडपुजेपणा करतो. मग काय ?’ असे
म्हणून सारे चेष्टा करीत सुटले.

आता मात्र राजा ओशाळला. त्याने ह्या अधिकाऱ्याला काढून टाकले व
फिरून बोधिसत्त्वाला त्या जागेवर नेमले.

शास्त्याने धर्मकथन करुन ही गाथा सांगितली.
मापटे तांदुळाचे ते वाराणशी बरोबरी ।
घोड्यांच्या पाचशे तैसे मापटे ते बरोबरी ॥

शास्त्याने धर्मोपदेश केल्यावर दोन्ही गोष्टींचा मेळ बसवून जातकातल्या
व्यक्ती कोण ते सांगताना तो म्हणाला, ‘हा मठ्ठ उदायी अथवा लालुदायी
म्हणजेच तो मूर्ख खेडवळ किंमती ठरवणारा आणि मी म्हणजे तो शहाणा किंमती
ठरवणारा.’

Author