दोन बेडूक मित्रांची गोष्ट

एक सुंदर बाग होती. बागेत एक तळे होते. तळ्याकाठी दोन बेडूक रहायचे. दोघे अगदी जिवाभावाचे मित्र. एकाचे नाव राम, दुसऱ्याचे श्याम. राम शूर, तर श्याम भित्रा. आजुबाजूला थोडा खुट्ट आवाज झाला तरी श्यामराव तळ्यातल्या
पाण्यात लपून बसायचे.



एक सुंदर बाग होती. बागेत एक तळे होते. तळ्याकाठी दोन बेडूक रहायचे. दोघे अगदी जिवाभावाचे मित्र. एकाचे नाव राम, दुसऱ्याचे श्याम. राम शूर, तर श्याम भित्रा. आजुबाजूला थोडा खुट्ट आवाज झाला तरी श्यामराव तळ्यातल्या
पाण्यात लपून बसायचे. श्यामरावांच्या या भित्रेपणाला तळ्यातले मासे, कासव
हसायचे. ‘भित्रे मंडुकराव’ म्हणून चिडवायचे. रामने श्यामला भिऊ नको म्हणून
खूप वेळा सांगून पाहिले. पण त्याचा काही उपयोग होईना. तळ्यातले इतर
जलचर राम बेडकाला म्हणायचे, ‘माणूस लोकात मुलांनी भिऊ नये म्हणून
त्यांना हनुमान चाळीशी म्हणायला शिकवतात. तसा हा राम बेडूक श्यामला
‘मंडुकोपनिषद” शिकवतो. पण पालथ्या घड्यावर पाणी, तसे श्याम बेडकाच्या
बाबतीत या मंडुकोपनिषदाचे व्हायचे. त्याच्या भित्रेपणात कुठलाच फरक
पडेना.

एकदा बेडूक राम आणि श्यामराव बेडूक तळ्याकाठच्या झाडाखाली
लपाछपीचा खेळ खेळत होते. खेळता खेळता श्यामराव बेडूक सापाच्या
विळख्यात सापडले. श्यामला शोधण्यासाठी राम झाडाभोवती फेरी घालून
तळ्याकाठी आले. पहातो तर काय? श्याम सापाच्या विळख्यात सापडल
आहे. रामने एक युक्ती केली. सापाला दगड मारला. तशी सापाने जागच्या
जागी हलचाल केली, आणि श्याम चपळाईने झाडाकडे पळाला. नंतर घाबरून
तळ्यातल्या कपारीत जाऊन बसला. बरेच दिवस तो बाहेर येईचना. रामने खूप
वेळा त्याची भीती घालवण्यासाठी त्याला समजावून सांगितले, तेव्हा कुठे तो
सावधपणे बाहेर आला.

तलावाला लागून एक आंब्याचे झाड होते. या झाडावर एक कावळा बसायचा. त्याला श्याम बेडकाच्या खोड्या काढण्याची मोठी हौस. एके दिवशी कावळ्याने श्याम बेडकाला चांगलेच धमकावले. म्हणाला, “ए, भित्रा भागूबाई, गोल डोळ्याचा. तुझ्या डोळ्यावर मारतो चोच, आणि फोडतोच बघ तुझा डोळा”. श्यामची घाबरगुंडी उडाली. त्याने श्यामला जाऊन सगळे सांगितले. दुसऱ्या दिवशी राम कावळ्याला भेटला. म्हणाला, “ए, कावळ्या. तुझी कृष्ण कारस्थाने कळली मला. तू आमच्या मित्राला डोळा फोडण्याची धमकी दिली. ठीक आहे.तू त्याचा डोळा फोडणार तर मीही तुझे एक रहस्य फोडणार. बागेतल्या आणि तळ्यातल्या सगळ्या पक्षी-प्राणी मित्रांना मी तुला एकच
डोळा कसा आहे ते आज ओरडून सांगणार”. रामच्या या बोलण्याने कावळा
घाबरला, आणि म्हणाला, “अरे मित्रा, मी तर श्यामची फक्त गंमत करत होतो.
पण आज मी तुला वचन देतो, येथून पुढे मी कधीच श्यामला त्रास देणार नाही,
त्याच्या खोड्या काढणार नाही”. रामने श्यामला हा सगळा संवाद सांगितला.
तेव्हापासून श्यामच्या मनातली भीती गेली आणि तो बिनधास्तपणे तळ्याकाठी
हिंडू लागला.

एके दिवशी बागेत फिरता फिरता राम श्याम एकमेकांना भेटले. रामने विचारले, “तू काही खाल्लंस का?” श्याम म्हणाला, “अरे रामा, खरं म्हणजे आज मला दूध प्यायची इच्छा झाली आहे. चलतोस का डेअरीत ?” रामने संमती दिली. टुणूक टुणूक उड्या मारीत दोघेही डेअरीत जायला निघाले. चालता चालता धांदरट श्यामचा मिठाच्या पिशवीवर पाय पडला. पिशवीतल्या मिठाने श्यामचे पाय आणि डोके पांढरे झाले. पुढे एका पाण्याच्या डबक्यात रामने श्यामचे पांढरे अंग थोडेफार धुतले, पण मिठाचा खारटपणा काही गेला नाही. या सगळ्या गोंधळामुळे डेअरीत पोहचायला बराच उशीर झाला. डेअरी एव्हाना बंद झाली होती. पण रामने शक्कल लढवली. डेअरीच्या दरवाजाला एक भोक होते. त्या भोकातून तो आत गेला. पाठोपाठ श्यामही आत गेला. तिथे खोलीभर दूधाची कॅन पाहून श्याम बेडकाचा आनंद गगनात मावेनासा झाला.
श्यामने एक उंच उडी मारली, तसे कॅनचे झाकण सरकले आणि तो धपकन कॅनमध्ये पडला. रामच्या हे लक्षात आले. दुसऱ्या कॅनवर बसून राम म्हणाला, “घाबरू नकोस श्याम. तुला बाहेर पडता येईल. तू फक्त सतत हालचाल करीत रहा. त्यामुळे आपोआप दूध ढवळले जाईल. मीठामुळे तुझे अंग खारट झाले आहे, त्यामुळे दूधाचे दही होईल. एकदा का दही तयार झाले की, त्या दह्यावरून उडी मारून तुला बाहेर येता येईल. आत्मविश्वासपूर्वक प्रयत्न करीत रहा. घाबरलास तर दूधाच्या तळाशी राहशील. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ या न्यायाने अंग घुसळले तर तू नक्की बाहेर येशील. श्यामने विचार केला, “राम आपला सच्चा मित्र आहे. त्याने आपल्याला अनेक संकटातून,
अडचणीतून बाहेर काढले आहे, तेव्हा आताही तो सांगेल तसे वागावे’. आणि तो
सतत आपले अंग घुसळत राहिला. थोड्याच वेळात दह्याचा घट्ट थर तयार झाला. आणि त्या दह्यावर पाय रोवून श्यामने टुणकन उडी मारली व तो कॅनबाहेर आला. श्यामची सहीसलामत सुटका झालेली पाहून रामला खूप आनंद झाला. त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली, आणि आल्या मार्गाने ते भोकातून बाहेर पडले आणि तलावाच्या दिशेने निघाले. आता श्यामला मंडुकोपनिषद पाठ झाले होते. या मंडुकोपनिषदाच्या डरावाने त्याला घाबरवणारा कावळाही दूर उडून जाऊ लागला.

Author