सत्यकाम अगदी एकटा पडला. त्याचे सर्व खेळगडी त्याला सोडून गेले होते.
त्यांच्या आईबापांनी त्यांची उपनयने करून त्यांना विद्याध्ययनासाठी गुरुगृही पाठवून दिले होते. बरोबरचे सर्व खेळगडी गुरुगृही जाऊन विद्याभ्यासाला लागले असता, आपण मात्र माशा मारीत बसणे किंवा गावात भटक्या मारीत राहणे, माझ्या मित्रांनो, सत्यकामासारख्या हुषार व होतकरू मुलाला पसंत कसे पडावे? त्याच्या मनाला मोठी हुरहूर लागून राहिली. आपली आई आपले उपनयन करून विद्यार्जनासाठी आपल्याला गुरुगृही का पाठवून देत नाही, हे त्याच्या बालमनाला उमगेना. तो मोठा बुचकळ्यात पडला. सत्यकामा, तू पितृहीन व शिवाय एका दासीचा मुलगा. तुझी काळजी कोण वाहणार? परंतु जगाने आपली काळजी वाहिली नाही तरी आपण आपली काळजी घ्यावयाची व बालपणाचा बहुमोल काल फुकट जाऊ द्यावयाचा नाही असे सत्यकामाने ठरविले. गुरुगृही जाऊन विद्याभ्यास करावयाचा असा त्याने आपल्या मनाशी निश्चय केला. गुरुगृही गेले असता आपले स्वतःचे नाव, आपले गोत्र म्हणजे आपल्या कुळाचे नाव वगैरे सागावे लागते ही माहिती त्याला होती; म्हणून तो आपल्या आईकडे गेला आणि तिला म्हणाला: “आई, मी ब्रह्मचारी होऊन विद्याभ्यासासाठी गुरुगृही जाऊ इच्छितो. मी कोणत्या गोत्राचा आहे ते मला सांगतेस?”
मुलाचा प्रश्न अगदी साधा व सरळ होता; परंतु तिला तो मोठा अवघड वाटला असावा. मुलाच्या त्या एका प्रश्नामुळे तिच्या पूर्वचरित्राचा चित्रपट तिच्या डोळ्यांपुढे सुरू झाला असला पाहिजे. तथापि आपल्या मुलांपासून सत्य लपवून ठेवावयाचे नाही असा तिने निश्चय केला. तिने आपल्या मुलाला उत्तर दिले: “तुझे गोत्र काय ते मला माहीत नाही. दासी म्हणून मी अनेक ठिकाणी अनेक तह्रांचे काम करीत असता, मुला, तू माझ्या पोटी जन्मलास तेव्हा मला तुझे गोत्र काय ते माहीत नाही, माझे नाव जाबाला आणि तुझे नाव सत्यकाम आहे. मी सत्यकाम जाबाला आहे, एवढे तू आपल्या गुरूला जाऊन सांग.
मुलांनो, ती बिचारी आपल्या मुलाला अधिक काय सांगणार? आणि तिने अधिक सांगितले असते, तरी त्या निष्पाप बालकाला त्यांत फारसे काय समजले असते? एकाच वाक्यांत तिने आपले आत्मवृत्त मुलाला व त्याच्या निमित्ताने सर्व जगाला सांगून टाकिले, ती अविवाहित असूनहि तिला सत्यकाम झाला होता. अनाथ अबला मूग गिळून गप्प बसली होती. तिच्या करुण कहाणीने कोणाच्या हृदयाला पाझर फुटणार नाही? आपल्या आईचे हे दु:ख व त्यामुळे आपल्या विद्यासंपादनाच्या मार्गात उत्पन्न होणारी धोंड सत्यकामाच्या ध्यानात आली होती, असे त्याने पुढे गुरूला दिलेल्या, उत्तरावरून अनुमान निघते. परंतु तो विद्येसाठी अधीर झाला होता. आईचाच सत्य बोलण्याचा कित्ता गुरुपाशी गिरवावयाचा व त्याचेच पाय धरावयाचे, असे त्याने मनाशी ठरविले व जरूर ती माहिती आईकडून मिळताच तो गौतम ऋषीकडे गेला व त्यांना म्हणाला, ‘भगवन्! मी आपल्याजवळ विद्याध्ययनाकरिता ब्रह्मचारी म्हणून राहतो. मी आपल्याला शरण आलो आहे.’ सत्यकामाने अटकळ बांधली होती त्याप्रमाणे गौतम ऋषींनी त्याला प्रश्न केला, “हे मुला, तू कोणत्या गोत्राचा आहेस?” सत्यकामाने उत्तर दिले, “मी कोणत्या गोत्राचा आहे ते, महाराज, मला ठाऊक नाही. मी आईला विचारले; ती मला म्हणाली, की परिचारिका, दासी अशी मी अनेक तांनी सेवा करीत असता, तारुण्यामध्ये मला तू झालास. त्यामुळे तू कोणत्या गोत्राचा आहेस हे मला माहीत नाही. फक्त माझे नाव जाबाला आहे आणि तुझे नाव सत्यकाम आहे. तो मी सत्यकाम जाबाल आहे.”
त्या काळच्या रिवाजाप्रमाणे गौतमाने सत्यकामाचा पूर्व इतिहास ऐकून त्याला विद्या देण्याचे कदाचित् नाकारलेही असते. परंतु आईने सांगितलेल्या माहितीपैकी सत्यकामाने एक अक्षरसुद्धा आपल्या गुरूपासून लपवून ठेविले नाही. माझ्या मित्रांनो, याला म्हणतात सत्यनिष्ठा, सत्य बोलण्याने जन्माचे नुकसान होण्याचा संभव असताहि जो सत्यापासून एक रतीभरही ढळत नाही, त्यालाच सत्यवान् हे नाव शोभते.
सत्यकाम गौतमाच्या कसोटीला उतरला. शिष्याच्या गुणावरून तो उच्च कुळातीलच असला पाहिजे असे त्याने ठरविले व तो सत्यकामाला म्हणाला, “तू उच्चवर्णीय नसतास तर तुझ्या तोंडून असे निर्भय सत्य बाहेर पडले नसते. वत्सा, तू सत्यापासून ढळला नाहीस, एक समिधा आण. मी तुझे उपनयन करतो.’ मुलांनो, तुमच्यामध्ये स्वतःला उच्चवर्णीय म्हणवून घेण्यात अभिमान बाळगणारे पुष्कळ असतील, परंतु माझा तुम्हाला असा सवाल आहे, की जर गौतम ऋषी आज पुन्हा आपल्यामध्ये अवतीर्ण झाले व त्यांनी या मंडळींची सत्यकामाप्रमाणे परीक्षा घेतली, तर त्यात किती उत्तीर्ण होतील बरे? या प्रश्नाचे उत्तर माझ्या पत्त्यावर पाठविण्याची आवश्यकता नाही. तुमच्यापैकी प्रत्येकाने त्याचे आपल्या मनाशी उत्तर दिले म्हणजे माझे काम झाले. आज हिंदू समाजात गुण व वर्ण यांचा काहीच संबंध उरलेला नाही. जन्म हाच केवळ वर्ण ठरविण्याचे साधन समजला जातो. जो ब्राह्मणकुळात जन्मला तो ब्राह्मण. मग त्याच्या आंगचे गुण ब्राह्मणाला न शोभणारे असले, तरी समाज त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे मनुष्याच्या आंगचे गुण व त्याचा धंदा यांच्यामध्ये मेळ राहिला नाही. या स्थितीत गुणांचा विकास होण्याला संधी मिळत नाही. आज हिंदू समाज अपकर्षाच्या उतरणीला लागलेला दिसतो त्याचे हे एक मुख्य कारण आहे. वर्ण ठरविण्यात जन्माला काहीच महत्त्व नाही असे, मुलांनो, माझे म्हणणे नाही. जन्माला स्थान आहे, परंतु ते गौण आहे. मुख्य स्थान आपण गुणांनाच दिले पाहिजे. ज्याच्यामध्ये ब्राह्मणाचे गुण नसतील, तो केवळ ब्राह्मण आईबापांच्या पोटी जन्माला आला आहे, म्हणून आपण त्याला ब्राह्मण मानतां कामा नये. उलट, ज्याच्या अंगी ब्राह्मणाचे गुण असतील तो ब्राह्मणकुळात जन्मला नसला, तरी आपण त्याला ब्राह्मण मानिले पाहिजे. हिंदुधर्मात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे फक्त चारच वर्ण आहेत. समाजाच्या सुव्यवस्थित संघटनेला व धारणेला बुद्धी, शौर्य, संपत्ती व शरीरसेवा या चार गोष्टींची मुख्यतः जरुरी असते. जो बुद्धीने समाजाची सेवा करतो तो ब्राह्मण, जो शौर्याने सेवा करतो तो क्षत्रिय, जो संपत्तीने समाजाची सेवा करतो तो वैश्य, व जो शरीराने समाजाची सेवा करतो तो शूद्र, या चार वर्णाचा हेतु गुणांप्रमाणे कर्मीची वाटणी करून व्यक्तीच्या विकासाला मदत करणे एवढाच आहे. यात उच्च-नीच या भावनेला मुळीच स्थान नाही, आपल्या शरीराचे कान, डोळे, दात, पाय वगैरे निरनिराळे अवयव आहेत व त्यांची निरनिराळी कार्ये आहेत. म्हणून आपण कानांपेक्षा डोळे श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असे का मानीत नाही. (तसे मानू तर तो आपला मूर्खपणा होईल.) या अवयवांचे निरनिराळे व्यापार शरीराच्या आरोग्यासाठी व सुखासाठी अवश्य असतात. त्याचप्रमाणे समाजपुरुषाच्या धारणेसाठी व सुखासाठी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांच्या चतुर्विध सेवेची जरूरी आहे. प्रत्येकाने आपला विशिष्ट गुण इतरांच्या सेवेला लावून आपला व त्याचबरोबर आपल्या समाजाचा उद्धार करावयाचा आहे. हे वर्ण प्राधान्यतः गुणांवरूनचे ठरले पाहिजेत व पूर्वीच्या काळी ते तसे ठरत असत, हे सत्यकाम जाबालाची गोष्ट आपल्याला स्पष्ट दाखवीत आहे.
माझ्या मित्रांनो, पूर्वीच्या काळी गुणांनाच प्राधान्य देत. म्हणूनच ज्याच्या पित्याचे कुलही माहीत नाही, अशा सत्यकाम जाबालासारख्या दासीपुत्राला गुरूच्या घरी जाऊन विद्यार्जन करता आले; व परमेश्वराने त्याला जे गुण दिले होते त्यांचा विद्येने विकास करून त्यांच्या द्वारा त्याला समाजाची सेवा करता आली, नियमितपणा, कष्टाळूपणा, गुरुसेवा व गुरुभक्ती, दीर्घोद्योग व दांडगा अभ्यास या गुणांच्या जोरावर सत्यकाम जाबाला गुरूपासून विविध विद्या संपादन केली. विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर तो स्वगृही परत आला व योग्य वधूशी विवाह करून तो आदर्श आश्रमवासी व नागरिक यांचे जीवन कंठू लागला. त्याने अनेक सत्पात्र ब्रह्मचाऱ्यांना विद्या देऊन आपल्याप्रमाणेच त्यांनाही धन्य केले.