(गढवाली लोककथा)
वसंतऋतू नुकताच सुरू झाला होता. अलखनंदेच्या काठी एक अत्यंत सोयीची जागा वसंतोत्सवासाठी निवडली गेली होती. आर्य युवक युवती यांचा जल्लोष सुरू झाला होता. आपल्यायोग्य वर वधू निवडण्याची स्पर्धा वसंतोत्सवात सुरू व्हायची!
उत्तमोत्तम पोषाखांची जणू ही एक प्रदर्शनीच भरली होती. पुरुषांनी आपले ठेवणीतले कपडे घातले होते आणि तरुणींनी आपापले केस उत्तम प्रकारे गुंफून तऱ्हेतऱ्हेच्या फुलांनी सजविले होते. एकमेकांशी गोष्टी, परिचय, हा आपल्याला शोभेल काय? ही स्त्री आपल्याला पसंत करील? ते इशारे, ती इंगिते… तरुण तरुणींना शोभण्याजोगी होती ! नृत्य, गीत आणि घोडदौडीचा कार्यक्रम आखलेला होता.
कुमारिकांच्या गर्दीत एक षोडशी पिवळा पोषाक करून सुंदर वेणी घालून आपल्याच नादात गुंग होती. सर्वांचे लक्ष तिच्याचकडे लागले होते. पिवळ्या वस्त्रामधून तिची कांचनकाया झळाळत होती. गोऱ्या गोऱ्या मुखावर तिच्या सुंदर केसांच्या बटा खेळत होत्या. तिच्या ओठावरचे हास्य… हिमालयावर पहिला किरण जसा शोभा देतो तशी तिच्या मुखावरची शोभा विलसत होती. एखाद्याचे रूप हे अनेक जन्माच्या पुण्याईचे फळच असते! त्या पुण्यफळाकडे सगळ्यांचीच दृष्टी लागलेली होती. युवक मनातल्यामनात निश्वास टाकत होते, अन् प्रार्थना करीत होते, देवांनो, मदनाला लवकर पाठवा.’ त्यांची पंचमहाभूतांची पूजा मनोमन चालू होती!
ती तरुणी मात्र याबाबतीत उदासीनसी दिसत होती. हरिणसारखे तिचे डोळे कुणाला तरी शोधत होते. एवढ्यात काय झाले? एक सुंदर राजकुमार एका सुसज्ज रथावर बसून कुठूनतरी वसंतोत्सवात सामील झाला. पौरुषाचा आणि मदनाचा जणू पुतळाच ! त्याच्या केसामध्ये पंख सजविले होते. हातात धनुष्यबाण होता. बांधा सुडौल होता. त्या सुंदर रूपाकडे ती षोडशी मुग्ध होऊन बघतच राहिली. तिला एका प्रकारे संकोच वाटला. ती त्याच्याकडे कटाक्ष टाकू लागली.
तो राजकुमारही रथाखाली उतरून तिच्याकडे जाऊ लागला. ती कुमारीही पुढे झाली. मंद मधुर हास्य करीत तिने त्याचे स्वागत केले. राजकुमाराने चटकन तिचा हात धरला आणि काही क्षण चालून एका सधन कुंजाकडे ते वळले.
अलखनंदाच्या धारा सर्वदूर वाहत होत्या. हिमालयाच्या शोभेत जणू त्या हसत होत्या. हिमालयाचे सर्व सुगंध घेऊन वारा वाहू लागला. तेथील शिळांना स्पर्श करीत करीत पंचमहाभूतांची क्रीडा सुरू झाली. बुराँसची लाल लाल फुले म्हणजे जणू कोवळ्या सूर्य-किरणांचे हास्यच. निसर्गात एक प्रकारे उन्माद भरलेला होता आणि युवक-युवतींच्या कोलाहलामध्ये हिमालयाची सर्व शोभा सामावून गेली होती.
‘तुला,फार दिवसापासून मी शोधत होतो. आज तू दिसलीस. डोळ्याचे पारणे फिटले माझ्या. वाऱ्याने तृणांकुर या भूमीवर जसे खेळविले आहेत, तसाच मी तुझ्या मनाशी क्रीडा करतो. ती झाडे बघ चहुकडून वेलींनी वेढलेली आहेत. तू ही तसेच कर.’ त्याने त्या तरुणीला आपल्या बलदंड बाहूत आबद्ध करून टाकले.
तारुण्याच्या या नवीन अनुभूतीने ती तरुणी रोमांचित झाली. तिच्या गालावर उषेची लाली उठून दिसू लागली. तिच्या डोळ्याच्या पापण्या खाली झाल्या. आपण स्त्री आहोत हे तिला जाणवले. असा मधु-मधुर अनुभव तिला पहिल्यांदाच आला. ती मंदमंद हसू लागली.
‘ये राणी, तुझ्या केसात मी फुले माळतो. परागयुक्त फुले तोडून त्याने तिचे केस सजविले. वृक्षांच्या सालींचा रक्तिम आणि फुलांच्या पिवळ्या चूर्णाने राजकुमाराने तिचा भांग भरला.