(कोरियन लोककथा)
कोणे एके काळी समुद्राच्या तळाशी एक महाल होता. या महालात विविध प्रकारचे मासे, कासव आणि साप राहत असत. एके दिवशी सापांचा राजा पोटदुखीमुळे इकडेतिकडे सरपटत होता. दिवसरात्र वेदना असह्य झाल्यामुळे तळमळत होता. त्याच्या कुटुंबातील राजकुमार, राजकन्या, राणी, प्रधान सगळेच काळजी करू लागले. काय करावं कुणालाच काही सुचत नव्हते आणि राजाच्या वेदनाही कुणाला बघवत नव्हत्या. प्रधान म्हणाले, “आपण आपले मुख्य राजवैद्य माशाला बोलावू.” राजवैद्यांनी राजाची नाडी पाहिली आणि म्हणाले, ”महाराजांना सशाचं हृदय उकडून खायला दिलं तर लवकर आराम पडेल.”
ससा आणण्यासाठी कासवाला सांगण्याचं ठरलं. कारण कासव पाण्यात आणि पाण्याबाहेरही जिवंत राहू शकतं. राजासाठी काम करण्याची संधी मिळते आहे, याचा कासवाला विशेष आनंद झाला. राजाचा निरोप घ्यायला कासव आला आणि कामगिरी यशस्वीपणे पार पाडीन असा सगळ्यांना विश्वासही दिला. याच वेळी राजालाही खूप आनंद झाला. राजा म्हणाला, ”कासवा, फार पूर्वी तुझे आजोबा सशाबरोबरची धावण्याची शर्यत जिंकले होते. जा, माझ्यासाठी ससा घेऊन ये, आमच्या सगळ्यांच्या तुला शुभेच्छा आहेत!”
कासव समुद्रातून वर जमिनीवर आलं. हळूहळू समोर दिसणाऱ्या पर्वताच्या दिशेने चालू लागलं. वसंत ऋतूचा काळ असल्यामुळे जिकडे तिकडे हिरवळ होती. फळं-फुलं बहरलेली होती. पक्षी, फुलपाखरं भिरभिरत होती. अवतीभोवती हरीण, माकडं, चित्ते, हत्ती, वाघ, इ. प्राणीही दिसू लागले. तितक्यात हिरवळीवर एक सुंदर गुबगुबीत पांढरा शुभ्र ससा दिसला. कासवाने सशाला नमस्कार केला. “ससोबा, अशा या सुंदर हिरवळीवर आपली भेट झाली, खूप खूप आनंद झाला आहे.” ससा म्हणाला, “मी जगातील जवळ जवळ सगळ्या प्राण्यांना भेटलो आहे; पण तुझ्यासारखा विचित्र प्राणी काही पाहिला नाही. तुझे पाय कसे तर बिनबोटांचे! मान कशी तर सतत हलणारी! पाठ कशी तर दगडासारखी टणक! एखादा दगडाचा वाडगाच जणू! काय म्हणायचं आहे तुला?” खरं तर कासवाला फार राग आला होता. पण राजाने सोपवलेली कामगिरी फत्ते करण्यासाठी कासवाने राग गिळला. शांत झाला आणि म्हणाला, “मी कासव, माझी पाठ जरी दगडासारखी टणक असली तरी तिच्यामुळे मी पाण्यात राहतो, मनात आलं तर जमिनीवरही फिरू शकतो. मी खूप लांबवरचं पाहू शकतो. समुद्रातल्या सगळ्या सजीव प्राण्यांचा मी कॅप्टन आहे! ससोबा, जगातले सगळे प्राणी पाहिले आहेस, असं म्हणतो म्हणून विचारतो, समुद्रातले प्राणी, वनस्पती, समुद्रसर्प, त्यांचा महाल पाहिलास का? नसेल बघितला तर चल, बस माझ्या दगडाच्या टणक पाठीवर आणि बघ सागराची नवलाई!”
सशाने विचार केला, खरंच सागर, सागरतळ आपण पाहिलाच नाही. कासव म्हणतं आहे तर बघू एक नवं जग. कासवाच्या पाठीवर ससा बसला. कासव खोल समुद्रात सशाला आपल्या राजाच्या महालात घेऊन आला. एका सिंहासनावर एक कुरूप राक्षसासारखा सर्प पाहून ससा घाबरला.
“ए भित्रोबा, चिल्लूर, चिमुरड्या मी या समुद्राचा राजा आहे. डोळे भरून सागराची नवलाई पाहून घे. कारण थोड्याच वेळात मला तुझं हृदय उकडून खायचं आहे. आमचे राजवैद्य मासेराव यांनी सांगितलं आहे की सशाचं हृदय उकडून खाल्ल्याशिवाय पोटदुखी थांबणार नाही आणि म्हणूनच आमचे कासवराव तुला येथे घेऊन आले आहेत”
आपण आता मरणारया कल्पनेने ससा थरथर कापू लागला. राजा म्हणाला, “ए ससोबा, बघ, तुझं हृदय काढल्यावर तुझं शव (मृत शरीर ) रेशमी कापडात ठेवण्यात येईल. एका सोन्याच्या पेटीत ठेवलं जाईल आणि ही पेटी फळांच्या बागेत पुरण्यात येईल. त्याजागी चांगलं स्मारक बांधू, तुझा फोटो लावू. अनेक शतकं तुझी ही स्मृती जपली जाईल. कारण तू एका राजाचे प्राण वाचवणार आहेस. कधीतरी एखादा शिकारी किंवा वन्य प्राण्यांचं तू भक्ष्य झाला असतास त्यापेक्षा तुला अशा या मरणाची संधी मिळाल्याबद्दल तू देवाचे आभार मान!” असं सशाला समजावल्यावर राजाने आपल्या सहकाऱ्यांना सशाचं हृदय काढण्यास सांगितले. सहकारी पुढे आले.
तेवढ्यात ससोबा म्हणाले, “माझ्यामुळे एका राजाला जीवदान मिळत असेल तर मी जरूर माझं हृदय देईन. खरंतर मला त्याचा आनंदच आहे. पण मी सहज हिरवळीवर फिरायला आलो होतो. माझं हृदय मी सुरक्षिततेसाठी लपवून ठेवत असतो. कासवदादांनी मला ही सगळी कल्पना दिली असती तर मी हृदय घेऊनच इकडे आलो असतो.”
“खरं सांगतो आहेस का? राजा म्हणाला. महाराज कुणाच्याही उपयोगी पडण्यातच प्राण्याच्या जीवनाची सार्थकता असते. आणि आपल्यासारख्या महान राजासाठी हृदय देण्यात ही सार्थकता लाभत असेल तर मी कसं खोटं बोलणार?” राजालाही ते पटलं. राजा कासवरावांना म्हणाले, “जा, लवकर जा, आणि हृदयासह ससोबांना घेऊन या.”
ससोबा तडक कासवाच्या पाठीवर बसले आणि समुद्रकिनाऱ्यावर आले.पाठीवरून उडी मारून ससोबा दुडक्या चालीने आपल्या हिरवळीकडे निघाले. कासव ससोबाला म्हणाले, ”ससोबा हृदय घेऊन लवकर ये.”
ससोबा मागे वळून म्हणाले, “कासवासारखा मूर्ख कासवच. अरे कासवा, तू, तुझा राजा, तुम्ही सगळे मूर्ख आहात! अरे, असं हृदय काढून कुणी हिंडू-फिरू शकतं का? आणि कुणाचं हृदय खाऊन कुणाचा मृत्यूही टळू शकत नाही. मृत्यूला राजा असो वा रंक, माणूस असो वा प्राणी सगळे सारखेच असतात. त्यामुळे आपल्या गावाला जा आणि राजाला आपल्या मृत्यूला आलिंगन देण्याची तयारी ठेवायला सांग. झाडाची जुनी पानं गळतात आणि चैत्रात नवी पालवी येते. प्राणिसृष्टीतही एक प्राणी गेला की दुसरीकडे दुसरा प्राणी जन्माला येतो, हे सृष्टीचक्र समजून घे. म्हणजे पुन्हा असा मूर्खपणा करण्याची वेळ येणार नाही. “