(निकोबारची लोककथा)
कोणे एके काळी निकोबारमध्ये एकाकी जागी असलेल्या घरात एक विधवा स्त्री चार मुलींसह राहत होती. त्या चौघींमध्ये तीन मुली मोठ्या वय झालेल्या तर शेवटची मुलगी छोटी होती. त्या छोटीचे नाव होते टो-मी-रॉक (म्हणजे सौंदर्य ) तर इतर मुलींची नांवे अशी होती. टो-केन (मेहनती), टो-पेट-नागेन (स्वतःपूरते पाहणारी) आणि वा-मी-रो (गोष्ट सांगणारी )
घरापासून काही अंतरावर त्यांची बाग होती. उन्हाळ्याच्या प्रारंभी जेव्हा निरुपयोगी झाडे बागेत वाढली होती, आईने मुलींना ती झाडे तोडून टाकण्यास सांगितले. ती स्वतः जाऊ शकत नव्हती. कारण सर्वात छोट्या मुलीची देखभाल करण्यास दुसरे कुणी नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी मोठी बहिण टो-केन आपल्या दोन बहिणींसह जंगलात निघाली. तिथे गेल्यानंतर त्या बहिणींनी काम सुरू केले. सूर्य जसजसा आकाशात वरती आला तसतसे वातावरण अधिक उष्ण होऊ लागले. थकल्यामुळे त्या बहिणींपैकी वा-मी-रो विश्रांती घेण्यासाठी झाडाच्या सावलीत गेली. त्यानंतर ती झाडावर चढली आणि झाडांच्या पारंब्यांवर लोंबकळून खूप खेळली, मजा केली. तिने दिवसाच्या राहिल्या वेळातही काही काम केले नाही. दुसऱ्या दोन्ही मोठ्या मुलींनी सूर्याचे प्रखर ऊन पाठीवर झेलून खूप काम केले.
‘वा-मी-रो कृपया खाली ये आणि ही वाढलेली झाडे काढण्यास मदत कर.’ टो-केन म्हणाली. त्या विनंतीचा काही परिणाम झाला नाही. कारण वा-मी- रोला कुठल्याच प्रकारचे काम करायचे नव्हते.
टो-पेट-नागेत (दुसरी बहिण) तिला म्हणाली, ‘आपण जेव्हा घरी परत जाऊ आईला तुझ्याबद्दल सांगू मग तुला खूप मार मिळेल.’ परंतु वा-मी-रो बधली नाही. कारण ती आईची आवडती मुलगी होती.
जेव्हा संध्याकाळ झाली वा-मी-रोने आपल्या डोक्यावर चिखलाचे काही शिंतोडे उडवून घेतले आणि ती दोघी बहिणींच्या अगोदर घरी पोचली. तिने आईला सांगितले, दिवसभर मी एकटीने काम केले. दुसऱ्या दोघींनी दंगामस्ती केली आणि दिवसभर खेळण्याशिवाय काही केले नाही.
हे ऐकल्यावर तिची आई खूप रागावली आणि म्हणाली,’त्यांना येऊ दे तर खरं. मी त्यांना चांगला धडा शिकवते. तू खूप थकली असशील म्हणून जा आणि जेवून घे. जेवण फळीवर ठेवलेले आहे.’
थोड्या वेळानंतर दिवसभर कामाने पूर्ण थकलेल्या त्या दोघी मोठ्या बहिणी घरी पोचल्या. कुठल्याप्रकारे स्वागत न झाल्यामुळे त्यांची खूप निराशा झाली. त्यांना अगदी कमी जेवण देण्यात आले. त्यांनी ते शांतपणे खाल्ले. त्यांचे जेवण संपल्यानंतर त्यांच्या आईने विचारले, ‘जेवण चांगले होते की नाही? त्यावर त्या उत्तरल्या,’हो चांगले होते. ‘
‘तुम्हाला हे माहित आहे की, मी तुम्हाला आज जनावरांसाठी राखून ठेवलेले अन्न दिले; कारण तुम्ही दोघींनी काही काम केले नाहीत, फक्त खेळत राहिलात आणि स्वतःचे मनोरंजन केलेत!’ आईचे बोलणे ऐकल्यावर टो-केन आणि टो-पेट-नागेन या अतिशय दुःखी झाल्या. त्यांनी उत्तरादाखल काही म्हटले नाही; कारण त्यांना माहित होते की, त्यांची आई वा-मी-रो ने जे तिला सांगितले त्याच्यावर नेहमी विश्वास ठेवला. त्याची ती पुनरावृत्ती करीत होती.
त्या अतिशय निराश झाल्या. त्यांचे आपल्या घरावरचे सर्व प्रेम संपले आणि त्यांनी पळून जाण्याचा निश्चय केला. एका छोट्या पेटीमध्ये आपले सामान भरुन त्या रात्री त्यांनी चोरपावली घर सोडले. बेटावर कुठेही गेल्यास आई त्यांना शोधून काढेल या विचारांनी त्यांनी चंद्रावर जाण्याचा निश्चय केला. भटकत असताना त्यांना एक टो-आ-न्यू- ओ नावाची खाली लटकलेली वेल दिसली. त्या वेलीच्या साहाय्याने त्यांनी आकाशात जायचा प्रयत्न केला. परंतु लवकरच तो प्रयत्न सोडून दिला.
‘चल कोळ्याच्या जाळ्याच्या मदतीने चढण्याचा प्रयत्न करु या’ टो-केनने सुचवले.
‘आपण पाय ठेवल्याबरोबर ते तुटले, तर आपली फजिती नाही का होणार?’ टो-पेट-नागेन म्हणाली.
‘काही असले तरी प्रयत्न करू या.’ दुसरी उत्तरली.
अशा प्रकारे प्रथम टो-केन वर गेली आणि त्यानंतर तिच्या बहिणीने तोच कित्ता गिरवला. आश्चर्याची बाब म्हणजे कोळ्याचे जाळे तुटले नाही. त्या दोघीही अधिक अधिक वर गेल्या. त्यांनी खूप अंतर कापल्यानंतर त्यांच्या एकाएकी लक्षात आले की, त्या रा- फोहची बनवलेली छोटी छानशी करंडी खाली विसरल्या आहेत. म्हणून टो-केनने तिच्या छोट्या बहिणीला ती आणण्यासाठी खाली धाडले.
तथापी ती घरी पोहचल्याबरोबर तिच्या आईने तिला ताबडतोब पकडले. आईने वा-मीरो ला टो-पेट नागेनवर लक्ष ठेवण्यास सांगितले आणि स्वतः टो-केनला शोधण्यासाठी गेली. तिला जमिनीपासून काहीच अंतरावर कोळ्याच्या जाळ्यावर असलेली टो-केन सापडली. ती आपली बहिण टो-पेट नागेनची वाट बघत होती आणि त्यासाठी काही अंतर खाली आली होती. आईने तिला ताबडतोब खाली येण्यास सांगितले. परंतु तिने नकार दिला. त्यानंतर तिने टो-केनचा पाय पकडला आणि खाली ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने कोळ्याचे जाळे घट्ट पकडले आणि लाथ मारुन आईच्या पकडीपासून स्वतःला मोकळे केले. या क्रियेमध्ये तिच्या एका पायाचा लवचिकपणा हरवला. असे होऊनही ती चढून वर गेली आणि शेवटी चंद्राच्या पृष्ठभागापर्यंत पोचली. आपल्या निष्ठुर आईच्या पंज्यामधून आपण मोकळे झालो याने ती भयंकर खुष झाली. चंद्राच्या पृष्ठभागावर तिने अंग टाकले आणि ती झोपली. तिने जवळच्या पेटीचा उशी म्हणून वापर केला.
निकोबारचे रहिवासी अजूनही मानतात की चंद्रावरचे पट्टे म्हणजे तिथे शांतपणे पहुडलेल्या टो- केनची सावलीमय आकृती होय. पौर्णिमेच्या दिवशी कुणीही हे पाहू शकतो.