गेल्या आठ्वड्याभराच्या पूर्ण तणावानंतर डॉ. समर तिन्हीसांजेच्या वेळेस एकटेच घरासमोरच्या लॉनवर शांतपणे वरच्या आकाशाकडे बघत बसले होते. त्यांचा बंगला पण सोसायटीत अगदी एका बाजूला होता. ह्या बाजूला फारशी वर्दळ नसल्यामुळे तसे वातावरण ही अगदी शांतच होते. मधून मधून त्यांच्या ‘rocking-chair’ चा ‘कर-कर’ आवाज त्या शांततेचा भंग करीत होता. एका मोठ्या जागेवर त्यांनी आपला बंगला मागच्या बाजूला बांधला होता. आणि पुढील बाजूस ही प्रशस्त लॉन केली होती. ती लॉन त्यांची अगदी विरंगुळ्याची लाडकी जागा होती. रात्रीच्या वेळेस जेवणानंतर किमान अर्धा तास तरी ते आणि डॉ. संगीता म्हणजे त्यांची पत्नी इथे बरोबर बसतातच. त्यांचा कुत्रा ‘मोती’ त्यांच्या आजूबाजूला इकडून तिकडून दुडकत असतो. शनिवारी मात्र इथे मेहफिल असते. ह्या एका दिवशी त्या दोघांचेही ठराविक मित्र-मैत्रिणी इथे एकत्र जमा होत असतात. आणि रात्री बऱ्याच उशिरापर्यंत खाण्यापिण्याची रंगत जमलेली असते. तशी डॉ. समरना पिण्याची सवय नाही. संपूर्ण आठवडाभर चहा पिण्यासाठी पण उसंत नसते तर बाकी काही पिण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. मात्र शनिवारी रात्री न चुकता “दोन पेग” मित्रांसोबत घेणे ही त्यांची वर्षांपासूनची सवय होती. आजपर्यंत लॉनवर ते कधीही एकटे बसले नव्हते. त्यांना अश्या ह्या अवस्थेत बसलेले बघून ती लॉन ही आज संभ्रमात पडली असेल.
वरच्या बेडरूमच्या बाल्कनीतून डॉ. संगिता त्यांना शांतपणे एकटक बघत बसली होती. कित्येक वर्षात असे कधीच घडले नव्हते, की दोघे दोन बाजूला बसले होते. कुठलाही problem असो, मग तो घरचा असो किंवा दवाखान्यातला त्या दोघांनीही एकमेकाला कधीच एकटे सोडले नव्हते. परंतु आज मात्र तिने त्यांना अगदी एकटे बसून दिले होते. घरातील नोकरचाकर लोकांसाठी पण हा जरा विचित्रच प्रसंग होता. घरातील शिस्त त्यांच्या अंगवळणी पडलेली होती त्यामुळे त्यांना बोलविल्याशिवाय ते समर किंवा संगीताच्या जवळ जात नसत. ते दोघेही दवाखान्यातून घरी आल्याबरोबर त्यांना पाणी देणे, दिवसभर बांधून ठेवलेल्या त्यांच्या लाडक्या मोतीला सोडून देणे, आणि त्यानेही त्या दोघांच्या अंगावर उड्या मारून त्यांचे स्वागत करणे हा त्यांच्या दैनंदिन नियमातील एक भागच होता. आज वासू म्हणजे त्यांचा नोकर मोतीला सोडायला निघाल्याबरोबर संगीताने त्याला डोळ्यानेच ‘आत्ता नको’ असे खुणावले होते. पिण्यासाठी पाणी पण तिने स्वतःच आणून डॉ. समरला दिले होते. हे बघून दोघे नोकर सुद्धा गुपचूप आपल्या कामासाठी आतमध्ये निघून गेले होते.
डॉ. समर देखील शांतपणे आपल्या खोलीत निघून गेले होते. आणि थोडेसे फ्रेश होऊन लॉनवर जाऊन बसले होते. डॉ. संगीताला काय करावे काही उमजत नव्हते. त्यांच्याजवळ बसून त्यांना कंपनी द्यावी असे तिचे मन तिला सांगत होते. पण तिचा नाईलाज होता. नुसती घालमेल चालू होती तिच्या मनाची. बराच वेळ ती नुसती इकडून तिकडे येरझाऱ्या घालत होती. आयुष्यात आज प्रथमच तिला मूल नसल्याची प्रकर्षाने जाणीव झाली होती. आज तिला तिच्या आईची खूप आठवण आली होती. तिच्या आईने तिला कित्येक वेळेला सांगण्याचा प्रयत्न केला होता कि, “असेच मूल नाही म्हणून राहण्यापेक्षा एखादे मूल दत्तक घ्या. त्याला जीव लावा. माणसाला उतारवयात मुलाची खूप जरुरी असते. कधी तरी तुमच्या दोघात वाद झाला तरी त्या मुलाकडे बघून विसरून जाल. मुलाला मोठे करताना आपल्या सुखदुःखाचा विचार करण्यासाठी आपल्याकडे फुरसदच नसते”. वगैरे वगैरे.
परंतु तिने ह्या सगळ्या गोष्टींचा कधी विचारच केला नव्हता. ती आणि डॉ. समर आपआपल्या कामात इतके मशगुल होते कि त्यांना त्याची कधी उणीव भासली नसावी किंवा सगळे उमजत असूनही दोघांनीही एकमेकांची मने दुखावली तर जाणार नाहीत ना असा विचार करून परिस्थितीला किंवा वास्ताविकतेला स्वीकारले असावे.
लग्नानंतरच्या चोवीस वर्षांनंतर हा विचित्र प्रसंग समोर येऊन ठेपला होता. संगीता समोर शांतपणे आकाशाकडे बघत बसलेल्या समरला बघून बेचैन होत होती. त्याच्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होती, की हा कसला विचार करत असेल? त्यालाही आज माझ्यासारखीच मुलाची उणीव भासत असेल का? का तो घडलेल्या प्रसंगाचा विचार करत असेल? तिचे मन विचार करून करून थकून गेले होते. पण विचारांचे हे भरधाव वेगाने धावणारे चक्र कुठेही थांबायला तयारच नव्हते. निसर्गातल्या सुंदर सुंदर गोष्टी टिपणारे तिचे काळेभोर टपोरे डोळे आज आसवांनी भरून गेलेले होते. तिच्या डोळ्यातील अश्रू पुसुन टाकण्यासाठी तिच्याजवळ कोणीही नव्हते. त्या क्षणी ती एकटीच आहे असे तिला जाणवत होते. तिचा समर तिच्या समोर असूनही तिच्या पासून खूप दूर होता.
आजपर्यंतचा ‘समर’ म्हणजे फक्त हुशार कर्तव्यदक्ष, मनमिळाऊ, खूप helping nature चा असाच तिला माहित होता. चोवीस वर्षांपूर्वी का? नाही, जवळ जवळ २६-२७ वर्षांपूर्वी तो तिला मेडिकल कॉलेज मध्ये भेटला होता. तिला सिनियर होता. त्याची आणि तिची पहिली भेट सिविल हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये झाली होती. दोघांची duty बरोबरच होती. त्या दिवशी ती तिची duty संपल्यानंतर बसस्टॉप वर एकटीच उभी होती. तिचा हॉस्पिटलचा पहिलाच दिवस होता. रात्रीची वेळ होती. आजूबाजूला कोणीच नव्हते. ती मनातून घाबरलेली होती. पण दुसरा काही पर्याय नव्हता. समरही त्याची duty संपवून निघाला होता. तिने त्याला तिथून स्कुटरवर जाताना बघितले होते. त्याने सुद्धा तिच्याकडे पहिले होते. एका क्षणी त्याच्याकडे लिफ्ट मागण्याची तिला इच्छा झाली होती पण तो भुर्रकन पुढे निघून गेला होता.
परंतु काही क्षणातच तो माघारी आला होता, “ मी तुला घरी सोडतो, रात्रीचे नऊ वाजून गेलेत. ह्या भागात एवढ्या उशिरा लोकांची चाहुलही नसते. चल बस”. असे सगळे पटापट बोलून गेला होता. तिने स्कूटरवर बसता बसता त्याला आपल्या घराचा पत्ता सांगितला. “अरे वा, तुझे घर माझ्या घराच्या रस्त्यावरच आहे. असे तो हसत हसत म्हणाला होता”. नंतर दोघांमध्ये कसलेच संभाषण झाले नव्हते. तिचे घर आल्यावर त्याने स्कूटर थांबविली, तिने खाली उतरून ‘Thank-you’ एवढेच म्हटले होते.
दुसऱ्या दिवशी पण ती आपल्या dutyवर पोहोचली होती. महिनाभर दोघांची एकाच वॉर्ड मध्ये duty होती. त्या दिवशी देखील ती आपले काम संपवून बस स्टॉपवर उभी राहिली होती. समर देखील त्याची duty संपवून स्कूटरवर आला होता. पण आता तो पुढे जावून मागे न येता पहिल्यांदाच तिच्याजवळ आला आणि तिला स्कूटरवर बसवून दोघे निघून गेले. हा सिलसिला पंधरा वीस दिवस चालूच होता. हळूहळू दोघांची थोडीशी ओळख झाली होती. कामापलीकडे दुसरे काही बोलणे सुद्धा होत होते. आता बस स्टॉपवर थांबून ती बसऐवजी त्याच्या स्कूटरची वाट बघू लागली होती. आणि असे काही तरी होत आहे हे तिच्या लक्षात सुद्धा आले नव्हते.
अचानक एके दिवशी त्याच्या स्कूटरच्या आधीच तिची बस आली होती आणि ती बसमध्ये चढण्यासाठी पुढे सरकली आणि काही कळण्यापूर्वीच ती परत मागे झाली. कंडक्टरने, “ताई चला” म्हणून हाक सुद्धा मारली. परंतु तिने “नाही” म्हणून बस सोडून दिली होती. बस निघून गेली इतक्यात घाईघाईने horn वाजवत समर तिथे पोहोचला.
आणि म्हणाला, “ओ sorry आज मला थोडा उशीर झाला. एक क्षण मला भिती वाटली कि तू आता बसमध्ये चढतेस कि काय? Thank God, तू बस सोडून दिलीस. अग त्या कोपऱ्यातल्या बेडवरच्या पेशंटला injection द्यायचे होते. त्या म्हाताऱ्या आजीबाई सिस्टरला हातच लावून देत नव्हत्या. शेवटी मीच त्यांना injection दिले. त्यामुळे थोडा उशीर झाला”.
“हो खरेतर मी बसने जाणार होते पण मला वाटले कि तुम्ही काळजी कराल मी कुठे गेले? म्हणून बस सोडून दिली. तिने उत्तर दिले होते. पण मी उद्यापासून मी बसनेच जाईन म्हणजे तुम्हाला कुठे उशीर झाला तरी चालेल”. असे तिने त्याला सांगण्याचा प्रयत्न केला होता.
त्यावर त्याने तिला हसत हसत सांगितले होते कि, “उद्यापासून तू बससाठी थांबायचेच नाही आपण दोघेही हॉस्पिटलमधून बरोबरच बाहेर निघत जायचे”.
तेंव्हापासून त्यांची मैत्री वाढत गेली होती. नंतर ती घट्ट होत गेली. आणि अचानक एके दिवशी त्याने तिला प्रपोज ही केले होते. कदाचित ती ही त्या क्षणाची वाट बघत असावी असा पटकन तिने त्याला होकार दिला होता. आणि “झट मंगनी पट ब्याह” तसे दोघे विवाह बंधनात बांधले गेले होते. तसे दोघे नोकरी बरोबरच करत होते. नंतर त्याने M.S. केले. तिने मात्र आपले शिक्षण तिथेच थांबविले. होते. दोघांचाही संसार सुखाने चालू होता. सुखी संसाराला गालबोट लागल्याप्रमाणे, मुलबाळ नव्हते पण त्यावर विचार करत बसण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नव्हता. स्वतःचा दवाखाना सुरु करून आता पंधरा वर्षे झाली होती. सिस्टर्स, वॉर्डboyes, नर्सेस, लेडी डॉक्टर, इतर दोन डॉक्टर्स असा बराच स्टाफ त्यांच्याकडे होता. डॉ. समर आपले काम बरे आणि आपण बरे, अशा स्वभावाचा माणूस. कधी पण कुठल्याही ladystaff बरोबर तो वेडावाकडा वागत नसे. दवाखान्यात त्याचा भरपूर दरारा होता. कामाच्या वेळेस डॉ. संगीता; त्याची बायको आहे हे तो विसरून जात असे.
सरळ स्वभावाच्या समरच्या मागील आयुष्याची संगीताने कधी विचारपूस केली नव्हती. आणि त्यानेही तिच्या पूर्वायुष्यात कधी डोकावून पहिले नव्हते. अशी कधी त्यांना त्याची गरजसुद्धा भासली नव्हती. फक्त शनिवारी मात्र त्याच्या ठरलेल्या दोन चार मित्रांबरोबर ‘दोन पेग’ पिणे तेवढाच त्याचा छंद होता. त्या वेळेसही तो कधी वेडेवाकडे वागत नव्हता.
अशीच शनिवारची पार्टी संपवून दोघेजण झोपण्याच्या तयारीतच होते कि दवाखान्यातून फोन आला होता, “मॅडम इमरजन्सी आहे येता का?”. दवाखाना घराच्या जवळच होता. ते दोघेही दहा मिनिटाच्या आतच दवाखान्यात पोहोचले होते.
साधारण त्यांच्याच वयाच्या एका बाईला तिचा नवरा Ambulance मध्ये घेऊन आला होता. हॉस्पिटलच्या स्टाफनी, ‘डॉ. तिला तपासेपर्यंत Ambulance मधून उतरवू नका” असा कडक इशारा दिला असावा. कारण समरची गाडी बघून तो माणूस रडतच त्यांच्याजवळ पोहोचला होता, “डॉ. साहेब काहीही करा माझ्या बायकोला वाचवा”. त्याचे ते केविलवाणे रडणे बघून दोघांच्याही मनात कालवाकालव झाली होती. डॉ. समर काही बोलणार तेवढ्यात Asst. Dr. त्यांच्याजवळ आला व त्याने समरला पेशंटची सगळी माहिती दिली. B.P., Sugar, Pulse etc आणि पेशंट ठीकसा श्वास घेऊ शकत नाही. गेल्या महिनाभरापासून हा त्रास होत आहे परंतु आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे घरगुती उपायच चालू होते. काय करू या? अॅडमीट करून घेऊ की सिविल हॉस्पिटल मध्ये पाठवून देऊ? अशी त्याने विचारणाही केली होती. ते ऐकून तो नवरा अधिकच गयावया करू लागला, “डॉक्टर तसे नका करू. तिथे कोणी लक्ष देणार नाही. मी कसेही करून तुमचे पैसे देईन. पण तिच्या शिवाय मला कोणी नाही. तिला वाचवा”.
क्षणभर डॉ. समरने संगीताकडे बघितले. आणि तिच्या नवऱ्याला त्याने शांतपणे बसवले व समजावून सांगितले कि, “तिला वाचवण्याचे आम्हाला शक्य होतील तेवढे प्रयत्न करू. तुम्ही शांत राहा”. त्याच्या त्या दिलासा देण्याने तिचा नवरा थोडा सावरला होता.
डॉ समरने वॉर्ड बॉयला तिला इमरजन्सी मध्ये घेऊन या असे सांगितले. संगीताला चांगले आठवत होते कि ते दोघे जण मिळून इमरजन्सी ट्रीटमेंट देत होते. तिच्या नवऱ्याकडे एक पैसाही न मागता त्यांच्याच दवाखान्यातील औषधे, इंजेक्शन्स ऑक्सिजन, सलाईन सगळे वॉर्डमध्ये मागवून त्यांनी तिची ट्रीटमेंट चालू केली होती. जवळ जवळ दोन तास त्यांनी व त्याच्या स्टाफने तिच्यावर मेहनत केली होती. दोन तासानंतर तिने पहिल्यांदा थोडी positive sign दाखवली होती. आणि समर फार खुश झाला होता. नंतर अर्धा तास तिला observe करून दोघांनी कॉफी घेतली होती. ती संपूर्ण रात्र ते दोघेही दवाखान्यातच होते. असा इमरजन्सी मध्ये दवाखान्यात राहण्याचा प्रसंग देखील नवीन नव्हता.
दुसऱ्या दिवशी सकाळी दवाखान्यात पोहचायला त्यांना थोडा उशीर झाला होता. सिस्टर ने सगळ्या इनडोर पेशंट्सच्या फाइल्स त्यांच्यापुढे आणून ठेवल्या होत्या. सगळ्यांचे रिपोर्ट्स व्यवस्थित होते. म्हणून त्यांनी सुरुवातीला बाहेरचे (ओ.पी. डी.) सगळे पेशंट तपासून पूर्ण केले होते. त्या नंतर दोघेही जण round ला गेले. तेंव्हा त्या बाईची तब्येत बरीच चांगली होती. तपासत असताना डॉ. समरची नजर सहज त्या बाईच्या चेहऱ्याकडे गेली. आणि एक क्षण तो गप्पच उभा राहिला. तो तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. संगीताला काय प्रकार आहे ते समजत नव्हते. त्या बाईचे खोल गेलेले डोळे, समरकडे बघत होते. दुखण्याने तिचे शरीर जर्जर झाले होते. ती दुखण्याने अत्यंत क्षीण झाली असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचे भाव संगीताला टिपता आले नव्हते. डॉ समरने स्वतःला कसेबसे सावरले आहे हे मात्र तिच्या लक्षात आले होते.
रुटीन राउंड पूर्ण करून डॉ. समर स्वतःच्या रुममध्ये जाऊन गंभीरपणे बसले होते. संगीताला आत्ताही त्याच तो बदललेला चेहरा आठवत होता. काहीतरी वेगळाच प्रकार आहे असे तिला जाणवले पण होते. तसे तिने त्याला विचारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, “काही नाही, तुझा काहीतरी चुकीचा समज झालाय का?” असा उलटा प्रश्न त्यानेच तिला केला होता.
तिचे नाव ‘राजश्री’ होते. दोन दिवस तिची ट्रीटमेंट चालू होती. पण म्हणावी तशी सुधारणा तिच्यात दिसत नव्हती. “तिला आपण सिविल हॉस्पिटलमध्ये shift करूया” असे संगीताने समरला सुचवले होते. पेशंट दुसरीकडे shift करणे हे काही नवीन नव्हते. पण समरने त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. सगळे रिपोर्ट आल्यावर ठरवू. असे शांतपणे उत्तर दिले होते. त्याच्यासामोर कोणी काही बोलू शकत नव्हते. तिच्या ट्रीटमेंट मध्ये तो जरा सुद्धा हलगर्जीपणा चालवून घेत नव्हता. हे संगीताच्या लक्षात येत होते. पण त्याचा तसा स्वभावाच आहे असा तिने त्यावेळी विचार केला आणि तो प्रकार आपल्या डोक्यातून काढून टाकला होता.
परंतु राजश्रीचे रिपोर्ट आले आणि सगळे चित्र वेगळेच झाले होते. तिचे ते रिपोर्ट बघून मात्र समरने डोक्याला हात लावून घेतला. तो तसाच खुर्चीत बसून राहिला होता. त्याचे डोळे पाण्याने भरून आले होते. हा काही तरी विचित्रच प्रकार होता. समरचा तो अवतार बघून सगळे काही ठीक नाही, कुठे तरी काहीतरी गौडबंगाल आहे ह्याची संगीताला खात्री झाली होती. नाहीतर इतके पेशंट येत होते. कित्येकांचे असे रिपोर्ट येत होते. अगदीच वाचण्याची शक्यता नसेल तर त्या पेशंटला घरी पाठवून दिले जात होते. आणि तिथे डॉक्टर आणि पेशंटचा संबंध संपून जातो. पुन्हा नवीन पेशंट येतो. असे चक्र चालूच असते. मग ह्याच्या डोळ्यात पाणी येण्याचे कारण काय असावे? हा विचार तिच्या डोक्यात चालू होता. दवाखान्यातील सगळे दृश्य तिच्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहत होते. आणि त्या आठवणींनी ती बेचैन होत होती.
तेवढ्यात मोती शेपटी हलवत हलवत संगीताजवळ आला. त्याच्या खाण्याची वेळ झाली होती. समर शिवाय जेवण्याची त्याला सवय नव्हती. तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला खावू घातले. तो तिच्या बाजूला शांतपणे उभा राहून खाली बसलेल्या समरकडे एकटक बघत होता. तिची नजर सुद्धा समोर दिसणाऱ्या समरकडेच होती. अजूनही तो तसाच बसला होता. त्याच्या मनाची तिला पूर्ण कल्पना होती.
तिला स्वतःची मात्र लाज वाटत होती. अतिशय निष्ठूर मनाने वागलेला तो स्वतःचा भयंकर अवतार ती विसरू शकत नव्हती. हॉस्पिटल मधील समरच्या रूमचा तिने जोरात बंद केलेल्या दरवाज्याचा आवाज तिच्या डोक्यात हातोडा मारल्यासारखा तिला छळत होता. “समर असे काय आहे कि तिचा रिपोर्ट वाचून तुझ्या डोळ्यात पाणी आले?” हा प्रश्न ती घरी येऊनही त्याला विचारू शकली असती पण ती स्वतःच्या मनाला आवर घालू शकली नव्हती.
तिने दहा वेळा विचारूनही त्याने ह्या प्रश्नाचे उत्तर दिले नव्हते. पण शेवटी दाराच्या त्या भयंकर आवाजाने त्याचा ही त्याच्या मनावरचा संयम सुटला होता.
“असे काय झाले कि माझ्या डोळ्यात पाणी आले, याचे तुला उत्तर ऐकायचे आहे ना, मग ऐक बस इथे.” तो जोरात ओरडला आणि तिच्या हाताला धरून तिला समोरच्या खुर्चीत त्याने धाडकन बसवले. हे त्याचे रूप संगीताने कधीच पहिले नव्हते. ती घाबरली होती. समरने समोरच्या ग्लासमधील पाणी गटागट पिवून टाकले. आणि बोलायला सुरुवात केली होती. पुढचा कितीतरी वेळ समर एकटाच बोलत होता आणि ती हताश होवून ऐकत होती.
“राजश्री माझी लहानपणची मैत्रीण आहे. ती वसंतराव देशमुखांची मुलगी आहे. त्यांचे घर आमच्या घराच्या शेजारीच होते. ते दोघेही नवरा बायको नेहमीच त्यांच्या त्यांच्या उद्योगात गुंतलेले असायचे. आणि राजश्री आमच्याकडे खेळायला म्हणून दिवसभर असायची. लहानपणापासून आम्ही एकत्र जेवत होतो, खेळत होतो, शाळेतही बरोबरच जात होतो. बालपणाची आमची ती मैत्री आम्ही जसे मोठे होत होतो तशी घट्ट होत गेली होती. आणि आमच्या वाढत्या वयांबरोबर आमची मैत्रीही वयात आली होती. कॉलेजच्या पहिल्याच वर्षी तिच्या घरातल्या लोकांच्या हे लक्षात आले होते. ते खूप पैसेवाले आणि प्रतिष्ठित लोक होते. त्यांची ही एकुलती एक मुलगी होती. आम्ही खाऊन पिऊन सुखी लोक होतो परंतु श्रीमंत नव्हतो. तिच्या वडिलांना हे पटले नसावे. मे महिन्याच्या सुट्टीत मावशीकडे म्हणून तिला नागपूरला घेऊन गेले आणि तिकडेच तिचे लग्न लावून टाकले होते. सुट्टी संपवून ती घरी नवऱ्याबरोबरच आली होती. त्यानंतर ती मला कधीही भेटली नव्हती. तिचा नवरा सुद्धा मी आत्ताच बघितला. तिच्या लग्नानंतर मी खूप खचून गेलो होतो. परंतु मी माझे सगळे लक्ष शिक्षणावर केंद्रित केले आणि हिच्या वडिलांपेक्षा जास्त पैसा मिळवायचे ध्येय ठेवले. नशिबाने मेडिकलला अॅडमिशन मिळाली, डॉक्टर झालो. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मी हे सगळे विसरूनही गेलो.
मध्यंतरी कोणीतरी सांगीतले होते की हिची परिस्थिती खूप वाईट झाली आहे. श्रीमंत बापाच्या ह्या मुलाने सगळा पैसा व्यसनात घालवला. पण मी काही फार चौकशी केली नव्हती, माझ्यासाठी हा विषय केंव्हाच संपला होता. आता अचानक अशा परिस्थितीत ही माझ्यासमोर आली आहे. बहुतेक ती मला आठवण्याचा प्रयत्न करते आहे. पण तिला मी आठवत नसावा. एका दृष्टीने चांगलेच आहे. पण तिची ही दयनीय अवस्था, हे तिचे रिपोर्ट्स; दोनीही मी सहन करू शकत नाही. इतर वेळी मी तिला घरी पाठवून दिले असते. परंतू मी तसेही करू शकत नाही. तिला घरी तरी कसे पाठवू? तिच्या नवऱ्याची तर तिला दोन दिवस औषधपाणी करण्या इतपत देखील परिस्थिती दिसत नाही. बहुतेक त्याला पश्चाताप झालेला असावा. सिस्टर सांगत होती, हा माणूस दोन दिवसापासून काहीही न खाता पिता इथेच बसला आहे.
अशा परिस्थितीत मी काय करू संगीता सांग? मी काय करू हेच मला समजत नाही. डॉक्टर म्हणून हिच्या बरोबर वागू आणि हिला discharge देऊन टाकू की एक जवळचा बालमित्र म्हणून मला शक्य होईल तेवढे औषधपाणी करू? तू सांग काय करू? तू जसे सांगशील तसे करतो.”
असे बोलून रडणारा, हतबल झालेला त्याचा चेहरा तिला अजूनही अस्वस्थ करीत होता.
एवढे त्याचे बोलणे ऐकूनही तिने त्याला काहीच उत्तर दिले नव्हते. शेवटी त्याने सिस्टरला सांगून राजश्रीच्या नवऱ्याला केबिनमध्ये बोलावून घेतले होते. त्याला समोरच्या खुर्चीत बसवले आणि शांत डोक्याने त्याला सांगितले होते की “हे बघा तुमच्या बायकोचे म्हणजे राजश्रीचे कुठलेही report चांगले आलेले नाहीत. आमच्याकडून जे शक्य होते ते सगळे प्रयत्न आम्ही केले. त्या काही जास्त दिवस काढतील असे दिसत नाही. तेंव्हा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यांना दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जा किंवा घरी घेऊन जा”. हे सांगत असताना देखील समरचा गळा दाटून येत होता. तो स्वतःला खूप आवर घालतोय हे देखील तिच्या लक्षात येत होते. तरी देखील ती काहीच बोलली नव्हती.
समरचे बोलणे ऐकून राजश्रीचा नवरा मात्र अगदीच केविलवाणा झाला होता. तो दीनवाण्या स्वरात त्या दोघांचीही आर्जवं करत होता. काही वेळाने त्याने स्वतःला सावरले होते आणि तो समरला म्हणाला, “डॉक्टर मी तुम्हाला काय सांगू ? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. परंतु आम्ही दोघेही खूप चांगल्या घरात जन्माला आलेली माणसे आहोत. राजश्री तर वसंतराव देशमुखांची मुलगी आहे. ती खूप सालस आहे. तिने आमचा संसार टिकविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु मी अतिशय दुष्टपणे वागलो. आमच्या लग्नापूर्वी हिचे कुठल्यातरी आजूबाजूच्या मुलाशी काही प्रेमप्रकरण होते असे माझ्या ऐकण्यात आले होते. त्यामुळे मी सदैव तिच्यावर संशय घेत राहिलो. तिला कुठेही घराच्या बाहेर एकटीला जावू देत नव्हतो. माहेरी तर बिलकूलच नाही. देशमुखांची ती एकुलती एक मुलगी होती त्यामुळे तेच आमच्या बाजूला येवून राहिले होते. परंतु माझे मन संशयाने पूर्ण खावून टाकलेले होते. मी त्यांच्यावर आणि राजश्रीवर खूप अन्याय केला. कितीतरी वेळा मारझोडही केली. परंतु तिने घराची लाज ठेवण्यासाठी कधी शब्दही उच्चारला नाही. माझ्या या वागण्याचा देशमुखांवर खूप परिणाम झाला. ते दोघेही धसक्याने मरून गेले. त्यानंतर मी स्वतःला खूप दोषी मानू लागलो. राजश्रीला तोंड दाखवण्याची देखील मला लाज वाटू लागली. मी सतत घराबाहेर राहू लागलो आणि व्यसनाधीन झालो. माझ्या वडिलांचीही खूप इस्टेट होती. परंतु माझ्या अशा वागण्यामुळे त्यांनी मला त्यांच्या आयुष्यातून काढून टाकले. ते राजश्रीला घरात घ्यायला तयार होते. परतू तिने त्याही परिस्थितीत माझ्याजवळ राहून मला साथ देण्याचा निर्णय घेतला होता. आणि मी दुर्दैवी तेंव्हा देखील हाच विचार करत होतो की हिला सासरी राहून तिच्या मित्राला भेटता येणार नाही म्हणून ती माझ्याजवळ राहण्याचे नाटक करते आहे. त्या नंतर दारूच्या आहारी जाऊन मी खूप आजारी पडलो. मला वाचविण्यासाठी तिच्याजवळ जे काही उरले होते ते विकून तिने माझा जीव वाचवला. ह्या नंतर मात्र माझे डोळे उघडले. परंतु तेंव्हा खूप उशीर झाला होता. संसार सावरण्यासाठी आमच्याकडे काहीच राहिले नव्हते. मोठे घर विकून ह्या एक बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहायला आलो. माझ्या तब्येतीमुळे आणि माझ्या विचित्र स्वभावामुळे मला कोणीही कामधंदा दिला नाही. ती मात्र लोकांचे डबे करून आमची पोटे भरण्याचा प्रयत्न करीत राहिली त्यात मी तिला थोडी मदत करत होतो. माझ्या तेवढ्या प्रेमळ सहवासाने देखील ती खूप खुश होती. गेले वर्ष-दीड वर्षच काय ते आम्ही नीट रहायला लागलो होतो. आणि अलीकडे तिची तब्येत सारखी बिघडायला लागली होती. जवळच्याच एका डॉक्टर कडून औषध आणत होतो. तिला थोडे बरे वाटले कि ती उठून परत कामाला लागत होती. आमचे पोट भरण्याची जबाबदारी तिच्यावरच येऊन पडली होती ना? ती तरी काय करणार होती बिचारी. गेल्या महिन्यापासून ते डॉक्टर मागे लागले होते कि तिला मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जा. परंतु आमच्याकडे पैसेच नव्हते. तिला खूप सांगायचा प्रयत्न केला कि हे राहते घर विकून टाकू. भाड्याच्या घरात राहूया पण तुझे औषधपाणी करूया. पण डॉक्टर तिने नाही ऐकले. आणि आता ही वेळ आली आहे”. असे म्हणून तो ओक्साबोक्शी रडायला लागला होता. “डॉक्टर काहीही करा तिला वाचवा. माझे घर मी तुम्हाला देऊन टाकतो, माझ्याकडे तेवढेच आहे पण तिला वाचवा. तो हात जोडून विनवणी करत होता.”
पुन्हा एकदा समरने तिच्याकडे बघितले होते परंतु काही न बोलता ती घरी निघून आली होती. त्या वेळेस तिच्या डोक्यावर जसे भूत सवार झाले होते. राजश्री त्याच्या आयुंष्यात होती हे त्याने तिच्यापासून लपवून ठेवले होते ह्याचे तिला दुःख झाले होते. खरे तर तिचे समरवर जीवापाड प्रेम होते. आणि समरचे सुद्धा तिच्यावर तितकेच प्रेम आहे ह्याची तिला पूर्ण खात्री होती. पण शेवटी ती एक स्त्री होती. तिच्या मधील स्त्री समरच्या आयुष्यात तिच्याशिवाय दुसरी मुलगी होती ही कल्पना पण सहन करून घ्यायला तयार नव्हती. त्या रात्री ती रात्रभर विचारांनी तळमळत होती.
समर मात्र त्या रात्री देखील दवाखान्यातच राहिला होता. राजश्रीची तब्येत आणखीनच खालावली होती. त्याला शक्य होईल ते सगळे तो करण्याचा प्रयत्न करीत होता.
रात्रभर तळमळत पडलेल्या संगीताच्या डोक्यातील विचारांची दिशा पहाटेच्या थंड वाऱ्याच्या झुळुकेने बदलली होती. एका क्षणी तिला ती पण एक डॉक्टर असल्याची जाणीव झाली होती. आणि ती ताडकन उठून बसली होती. तिने तिच्या समरला कोणत्याही इमरजन्सी मध्ये एकटा सोडला नव्हता. आणि आज तिने हे काय केले ह्या विचाराने तिने स्वतःला सावरले. तिच्या लक्षात आले कि राजश्री एक गरजू पेशंट आहे. आणि ह्या विचित्र प्रसंगी समरला एकटा न सोडता त्याची पूर्ण मदत करण्याचे तिने ठरवले. तिने माणुसकी आणि डॉक्टरकी अशा दोन्ही भूमिका आनंदाने करण्याचा ठाम निश्चय केला होता.
सकाळी नेहमीपेक्षा ती लवकरच तयार झाली होती. समरसाठी कॉफी घेऊन ती दवाखान्यात पोहचली होती. समरच्या कॉफीबरोबर तिने राजश्रीच्या नवऱ्याची कॉफी देखील आणली होती. तिने समरला आपल्या हाताने कॉफी दिली आणि त्याच्या बरोबर आनंदाने कामाला लागली होती.
संगीताचे ते रूप बघून समरला खूप धीर आला होता. आणि दोघे मिळून राजश्रीच्या सेवेत उभे राहिले होते. दोन रात्रीच्या जागरणानी समर थकून गेला होता. दिवसभर जवळ जवळ सगळे पेशंट संगीताने पहिले होते. समरला जराही त्रास होणार नाही ह्याची तिने पूर्ण काळजी घेतली होती. दुपारी त्या दोघांच्या जेवणाच्या डब्याबरोबर राजश्रीच्या नवऱ्याचा सुद्धा डबा तिने मागावून घेतला होता. दर अर्ध्या एक तासाने ती राजश्रीच्या बेडपाशी जावून तिच्या ट्रीटमेंट वर स्वतः जातीने लक्ष घालत होती. सिस्टरला तिने तसे सांगितले होते. “सरांची बालमैत्रीण आहे. तिच्याकडे पूर्ण लक्ष द्या.” हे कळल्यावर सगळा स्टाफ देखील राजश्रीकडे जरा जास्तच लक्ष देत होता. दोन दिवसाच्या थकव्याने समरला बाजूच्या रुममध्ये थोडी डुलकी लागली होती. तेवढ्यात सिस्टरने इमरजन्सी बेल वाजवली. संगीता आणि समर धावत धावत राजश्री पाशी पोहोचले होते. ती पाणी मागत होती. नर्सने पटकन पाणी दिले. लेडी डॉक्टर इमरजन्सी इंजेक्शन देत होती. ही सगळी धावपळ बघून तिचा नवराही दाराशी येऊन उभा राहिला होता. समर “राजश्री, राजश्री हे पाणी घे” असे म्हणत तिला पाणी पाजण्याचा प्रयत्न करत होता. पण काळाने घाव घातलाच. राजश्रीने समरच्या हातावरच तिच्या नवऱ्याकडे एकटक बघत प्राण सोडला. समर केविलवाण्या नजरेने हातावरच्या राजश्रीकडे बघत होता. संगीता एखाद्या भिंतीसारखी त्याच्या मागे उभी राहिली होती.
तिचा नवरा तर वेडाच झाला होता. “आता मी काय करु? मी कुठे जाऊ? हिला घरी कसा घेऊन जाऊ? मला कोणी नाही डॉक्टर,” असे रडत रडत म्हणत होता. राजश्रीचे आईवडीलही तिला सोडून गेले होते. शेवटी समरच्या दवाखान्यातील लोकांनीच माणुसकी समजून तिचा अंत्यविधी करायचे ठरविले होते. संगीताने एक छानशी साडी आणून समरच्या हातात दिली होती. समरने संगीताकडे एकदम बघितले, “तुझे हे उपकार माझ्या कडून कसे फिटतील?” असा आशय त्याच्या नजरेत संगीता स्पष्टपणे वाचू शकत होती. समर दुसऱ्या दोघा डॉक्टरांना बरोबर घेऊन तिच्या अंत्यविधीला निघाला होता. संगीताने इथेही त्याची साथ सोडली नव्हती.
अंत्यविधीच्या नंतर मात्र तिथे समर स्वतःवर ताबा ठेवू शकला नव्हता. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रूंची धार लागली होती. राजश्रीच्या नवऱ्याची परिस्थती तर स्वतःला सावरण्याच्या पलीकडची होती. तरीही तो समरजवळ येऊन त्याच्या पायाच पडला आणि म्हणाला, “डॉक्टर तुम्ही एवढे वाईट वाटून नका घेऊ. तुम्ही खूप केलेत. मी तर काहीच करू शकलो नाही. तुमच्यामुळे तिला शेवटी चांगले औषधपाणी झाले. मी तर तिला शेवटी एक साडीही घेऊ शकलो नाही. तुमचे किती उपकार मानू?” असे म्हणत त्याने खिशात हात घातला आणि खिशातून किल्ल्या काढून त्या समरच्या हातात घट्ट धरून ठेवल्या, म्हणाला “डॉक्टर मी तुम्हाला आणखी काही देऊ शकत नाही, तुम्ही हे घर ठेवा; तुमचे सगळे पैसे घ्या म्हणजे माझी बायको खूप खुश होईल तिला कुणाकडूनही काहीही घेतलेले आवडायचे नाही. तिने भरपूर कष्ट केले पण कोणासमोर आपले हात पसरले नाही. तुम्ही ते तुमच्याजवळ ठेवा. मी कसाही रस्त्यावर राहून माझे आयुष्य जगीन. तिला तुमच्या उपकाराच्या ओझ्यात नाही ठेवायची मला. माझ्या डोक्यावर मात्र सदैव तुमचे उपकार राहतील.”
त्याच्या ह्या विचित्र वागण्याकडे बघून समरने स्वतःला सावरले. तो म्हणाला “मी काही कोणावर उपकार केले नाहीत. आणि राजश्रीवर तर नाहीच. मी माझे कर्तव्य केले, आणि एक मैत्रीचे नाते निभावले. परवा तुम्ही म्हणत होतात ना, तिचे लग्नाआधी काही प्रेमप्रकरण होते. तिचा कोणी मित्र होता म्हणून. तोच तिचा मित्र मी डॉ. समर आहे. आमची मैत्री होती.”
राजश्रीचा नवरा अवाक होऊन समरकडे बघत राहिला होता. त्या किल्ल्या त्याच्या हातात ठेवून समर तिथून निघून आला होता.
घरी परत येताना त्याने संगीताला विचारले, “हा कसला ग योगायोग? इतकी वर्षे ती मला कधीही भेटली नव्हती आता शेवटी कशाला मला भेटायला आली? मी तर तिला विसरूनही गेलो होतो. परमेश्वराने असा खेळ का खेळला असेल?”
संगीता शांतपणे बसून ऐकत होती. तो मात्र डोळ्यात पाणी आणून बोलत होता, “मी तर तिला पूर्णपणे विसरून गेलो होतो. मला कधी तुला हे सांगावे असे सुद्धा वाटले नव्हते. कारण हा भूतकाळ कधी मला इतका महत्वाचा वाटलाच नाही. तू please माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस.”
त्याच्या बोलण्यात तिला guilt जाणवत होती. तिला त्याची खूप दया आली होती. त्याचे म्हणणे अगदी खरे होते. तो एक भूतकाळ होता आणि नियतीने अचानक त्याच्या समोर आणून उभा केला होता. त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर तिच्याकडे नव्हते.
तरीही तिने त्याला थोडा समजविण्याचा प्रयत्न केला होता, “समर कदाचित असे असू शकते कि राजश्रीचे तुझ्यावर खरोखरीच मनापासून प्रेम असेल. पण तिच्या वडिलांनी ज्या वेळेस तिचे लग्न लाऊन दिले असेल त्यावेळेस तिचा नाईलाज झाला असावा. आयुष्यभरात, तुला कुठेतरी एकदा भेटून हे सांगण्याची तिची तीव्र इच्छा असावी. आणि कदाचित ती खरोखरीच निर्दोष असावी.” आता संगीता बोलत होती, आणि समर ऐकत होता. “शेवटी कुठेतरी परमेश्वरालाही तिची दया आली असावी आणि तिला निदान शेवटचे पाणी तुझ्या हातून पाजण्याचे आयोजन त्याने घडवून आणले असावे. परंतु हे करताना तुझ्यावर अन्याय होऊ नये ह्याची सुद्धा त्या परमेश्वराने काळजी घेतली. आज हा एवढा मोठा धक्का सोसायला त्याने तुझ्या सोबत मला तुझ्याजवळ उभे केले आहे.” ती मनात येईल ते बोलतच होती. खरे तर काय बोलावे हे तिला समजत नव्हते. ती फक्त समरला आधार देण्याचा प्रयत्न करीत होती.
“समर मला माहित आहे, हे सगळे विसरणे फार कठीण आहे पण ह्याला एक हादसा समजून भूतकाळात जमा करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न कर. Try to accept it as co-incidence. तरच तू ह्या विचित्र प्रसंगातून लवकर बाहेर निघशील. मला समजतंय हे सगळे बोलणे फार सोपे आहे. पण कृतीत उतरवणे अतिशय अवघड आहे. But you know Samar, I am sure you can do it.”
त्याने तिचा हात घट्ट धरला होता. त्याला खूप धीर आला होता. सगळे बळ एकवटून तो म्हणाला, “संगीता मी तुझा खरच खूप आभारी आहे. ह्या अतिशय कठीण प्रसंगात तू माझी खरी अर्धांगिनी होऊन उभी राहिली आहेस. मी तुझ्यासाठी, माझ्या संगीतासाठी हा प्रसंग लवकरात लवकर विसरण्याचा प्रयत्न करीन. तू माझ्यासाठी खूप केले आहेस आणखीन एक छोटीशी गोष्ट करशील का? आजचा दिवस मला एकट्याला सोड, मी स्वतःला नक्की सावरीन. I promise you.”
असे सांगून तिच्याकडून त्यानेच हा एकांत मागून घेतला होता. तिला त्याची खूप काळजी वाटत होती. पण लांबूनच त्याच्यावर नजर ठेऊन ती बसली होती. ह्या विचित्र प्रसंगात ती त्याची काहीही मदत करू शकत नव्हती. पण तिचा तिच्या समरवर पूर्ण विश्वास होता. तो लवकरच ह्या सगळ्यातून बाहेर निघेल ह्याची तिला खात्री होती.
नियतीचा खेळ अजब असतो एवढे मात्र खरे हे तिला कळून चुकले होते.
सौ वैजयंती गुप्ते.
9638393779