(पंजाबची लोककथा)
एक राजा होता. एक दिवस तो शिकारीला गेला. रस्त्यात त्याला एक लाकूडतोड्या भेटला. तो लाकडं गोळा करीत होता. राजाने त्याला विचारले, “तुझं नाव काय आहे?” त्याने सांगितले, हुजूर, माझं नाव बहादुरशाह आहे.” राजा विचार करू लागला की याचं नाव पण बहादुरशाह आणि माझं नाव पण बहादुरशाह. पण मी संपूर्ण राज्याचा मालक आहे आणि हा लाकडं विकून उदर निर्वाह करतो……… हाच विचार करता करता तो शिकारीला न जाता परत आपल्या महालात आला. त्याने आपल्या राज्यातील विद्वानांना बोलाविले व त्यांना विचारले, “माझं आणि त्या लाकूडतोड्याचे एकच नाव आहे. मग आमच्या दोघांच्या भाग्यात इतके अंतर का आहे?”
पण त्याच्या प्रश्नाचे उत्तर कोणी देऊ शकले नाही. रात्री राजाने ही गोष्ट आपल्या बायकोला सांगितली. ती म्हणाली, “मला तर काही विशेष अंतर जाणवत नाही असे वाटते की त्या लाकूडतोड्याच्या बायकोला घर कसे चालवावे याची अक्कल नसेल.”
राजाला हे ऐकून वाईट वाटले आणि तो म्हणाला, “त्याचा अर्थ असाच आहे की तुझ्यामुळे मी राजा आहे. तेव्हा राणी म्हणाली, “माझा म्हणण्याचा असा अर्थ होता की घराच्या भरभराटीत पत्नीचा फार मोठा वाटा असतो.” हे ऐकून राजाला फारच राग आला आणि त्याने त्या लाकूडतोड्याला बोलाविले आणि राणीला त्याच्या स्वाधीन करीत सांगितले की, “जा याला राजा बनवून दाखव.”
राणी काय करू शकत होती. तिला लाकूडतोड्याबरोबर जावं लागलं. रस्त्यात ती लाकूडतोड्याला म्हणाली, “राजाने माझ्यावर चिडून तुमच्या स्वाधीन केलं आहे. आता मी तुमची कन्या आणि तुम्ही माझे वडील. काही दिवस विचार करू आणि मग ठरवू की काय करावं.” “”
लाकूडतोड्या स्वतः दुःखी होता, तो फक्त इतकंच म्हणाला, “बरं.
राणी त्याच्या घरी गेल्यावर तिनं पाहिलं की घरात लाकूडतोड्याची पत्नी, दोन मुले, दोन मुली असे सहा जणांचं कुटुंब आहे. सातवी ती होती. ती चूपचाप पाहत होती की ते सर्वजण कसे अर्धापोटी राहिल्यामुळे झोपू शकत नव्हते.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे लाकूडतोड्या वनात गेला. संध्याकाळी लाकडं विकून जे पैसे मिळाले त्यात पोळ्या विकत घेऊन आला. त्या पोळ्या कमी असल्यामुळे सर्व अर्धपोटी राहिले. दुसऱ्या दिवशी राणी म्हणाली, “बाबा आज तुम्ही पोळ्या न आणता गहू आणा.”
लाकूडतोड्याने तसंच केलं. त्यांनी गहू दळले आणि कणकेच्या पोळ्या बनविल्या. सर्वांनी पोटभर जेवण केलं तरीपण कणिक शिल्लक राहिली. राणी म्हणाली, उद्यापासून एक पाव गहू कमी आणा. अशाप्रकारे आपले काही पैसे पण वाचतील.”लाकूडतोड्या म्हणाला, “बरं बेटी.” अशाप्रकारे काटकसर केल्यामुळे त्यांच्याजवळ इतके पैसे जमले की त्यांनी गाढव विकत घेतले. आता तो जास्त लाकूड तोडून गाढवावरून बाजारात आणू लागला. त्यामुळे त्याची कमाई वाढली. आता ते पूर्वीपेक्षा चागलं खाऊ पिऊ लागले. लाकूडतोड्याला आणि त्याच्या बायकोला असं वाटलं की जणू लक्ष्मीच त्यांच्या घरी आली आहे. ते दोघं पक्क घर बांधण्याचं स्वप्न पाहू लागले. एके दिवशी राणी म्हणाली, “बाबा, आता पावसाळा सुरू होईल.
पावसाळ्यात लाकडं ओली असतात. म्हणून लोकं आधीच लाकडं विकत घेऊन ठेवतात. तेव्हा जर आम्ही सर्वांनी तुमची मदत केली तर आपली मिळकत वाढेल. काही पैसा शिलक राहिला तर पावसाळ्यात काही काम करता येईल.’ लाकूडतोड्याने विचारलं, “बेटी हे कसं शक्य होईल.” तेव्हा राणी म्हणाली, “आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर चलू. लाकडं गोळा करणे, त्यांचा ढीग लावणे आणि ते गाढवाच्या पाठीवर ठेवणे ही कामे आम्ही करू म्हणजे तुम्हाला लाकडे तोडायला जास्त वेळ मिळेल.’ लाकूडतोड्याने लागलीच होकार दिला.
सगळ्यांच्या मेहनतीमुळे रोज लाकडं आणून देखील वनात लाकडांचा एक मोठा ढीग तयार झाला. तेव्हा राणी म्हणाली, “बाबा, गाढवावर नेले तरी हा ढीग पंधरा दिवसात संपणार नाही आणि पावसाळा सुरू होईल म्हणून तुम्ही उद्या एक बैलगाडी भाड्याने घेवून या म्हणजे सगळी लाकडं घरी नेता येतील.
दुसऱ्या दिवशी लाकूडतोड्या बैलगाडी घेऊन जंगलात गेला तर त्याने पाहिलं की लाकडाचा ढीग जळून राख झाला आहे. सगळीकडे फक्त कोळसे दिसत आहेत त्यात काही पिवळे तुकडे चमकत आहे. त्यातील त्याने काही तुकडे उचलले व रडत रडत घरी आला आणि म्हणाला, “बेटी, आमचे सर्व काही श्रम वाया गेले, सर्व लाकडे जळून खाक झाली आहेत. तेथे फक्त कोळसे आणि हे असे पिवळे तुकडे पडले आहेत.” “”
राणीने ते तुकडे पाहिले आणि म्हणाली, “तुम्ही सर्व तुकडे आणले की तेथे अजून पडले आहेत.’ “”
तो उदास होऊन म्हणाला, “अजून तेथे बरेच तुकडे पडले आहेत. पण आम्हाला या तुकड्यांचं काय काम. आमचं तर नुकसानच झालं आहे.” राणी धैर्य देत म्हणाली, “बाबा, काळजी करू नका. हे तुकडे फार किमती आहेत.” आणि राणी त्याला व त्याच्या बायकोला घेऊन जंगलात गेली, त्यांनी तिघांनी त्या कोळशाच्या ढिगातून ते चमकणारे तुकडे गोळा केले. ते सोन्याचे तुकडे होते.
आता ते श्रीमंत झाले. आधी त्यांनी एक मोठे घर बांधले. आणि सोन्याचा व्यापार करू लागले. एक दिवस राणी म्हणाली, “बाबा, आता तुम्ही राजा आणि त्यांच्या मंत्र्यांना मेजवानीसाठी घरी आमंत्रित करा.”
राजा त्यांच्या घरी आला. पण त्याने कोणालाच ओळखले नाही. सगळ्यांनी बरोबर जेवण केले. नंतर राणी पुष्कळ सोनं घेऊन आली. आणि हात जोडून म्हणाली, “याच्याकडे पाहा, हा तोच लाकूडतोड्या आहे. मी तिच तुमची पत्नी आहे. जिला तुम्ही घराबाहेर काढलं होत.” राजा लाजिरवाणा झाला आणि आनंदीपण. तो राणीला घेऊन महालात आला आणि राणीच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा करू लागला.