महादेव पार्वतीची जन्मकथा

– फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. इथे फक्त पाणीच पाणी होते. त्या पाण्यातील एका कमलपत्रावर देवाचा जन्म झाला.



फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. इथे फक्त पाणीच पाणी होते. त्या पाण्यातील एका कमलपत्रावर देवाचा जन्म झाला. देवाने एकदा आपला खांदा घासला तर त्यातून कावळ्याची अन् खेकड्याची निर्मिती झाली. कावळा देवाच्या खांद्यावर येऊन बसला. देवाने कावळ्याला एक कामगिरी सोपविली. कुठूनही आणि कसेही करून माती आणायची. कावळा फिर-फिर फिरला. पण त्याला कुठेच माती मिळाली नाही. तो थकून खेकड्याच्या पाठीवर विश्रांतीसाठी बसला. तेव्हा खेकडा आणि कावळा आपापसात गोष्टी करू लागले. कावळ्याने आपली व्यथा त्याला सांगितली. तेव्हा खेकडा म्हणाला, “देवाने माझी पाठ कडक केली तर मी माती शोधून आणतो. खेकड्याने थेट समुद्राच्या तळाशी बुडी मारली. तेथे त्याला गांडूळ सापडले. त्या गांडूळाच्या मानेला पकडून खेकड्याने त्याला समुद्राच्या वर आणले. आजही गांडूळाच्या मानेवर खेकड्याने पकडल्याची खूण दिसते. तेव्हा गांडूळाने आपल्या तोंडातून माती काढून देवाला दिली. देवाने ती माती समुद्रावर पसरली. तेव्हा जमिनीचे तुकडे समुद्रावर दिसू लागले. देव त्या जमिनीवर चालू लागले आणि काय गंमत! देवाच्या हातावर एक मोठा फोड आला. त्या फोडातून महादेव पार्वती जन्माला आले.

Author