
प्रभु श्री राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. नागपूरपासून ५५ कि.मी. वर असलेले हे शहर अतिशय सुबक आहे. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे. येथून आजूबाजूच्या परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. राम मंदिर परिसरातच एक विशाल नंदी आहे व श्रीगणेशाचे पुरातन मंदिर आहे. येथे श्रीरामाचे सेनागण म्हणजे वानरांचा मुक्त संचार आहे. नागपूरकर भोसल्यांच्या खास शस्त्रांचा साठा या मंदिरात आहे. या मंदिरात कार्तिक महिन्यात येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेस यात्रा भरते. त्या रात्री १२ वाजता उंच कळसावर त्रिपुर प्रज्वलित केला जातो.
इ. स. २५० मध्ये रामटेकचा परिसर मौर्य शासकांच्या अधिपत्याखाली होता. सातवाहनांच्या कालात प्रवरपूर (सध्याचे मनसर) हे एक महत्त्वाचे ठिकाण होते. इ.स. ३५० मध्ये त्यांचा पडाव करून वाकाटकांनी सत्ता काबीज केली. त्याच काळात कालिदास झालेत असा समज आहे. संस्कृत काव्यातील एक अभिजात कलाकृती म्हणजे ‘मेघदूत’. कविकुलगुरू कालिदासाने हे काव्य याच रामटेक परिसरात लिहिले आहे. सन १९७०-१९७१ मध्ये, रामटेक गडमंदिर परिसरात, महाराष्ट्र शासनाने ‘कालिदास स्मारकाची’ निर्मिती केली. आज या कालिदासांच्या नावाने येथे संस्कृत विद्यापीठ सुरू आहे. या ठिकाणी दरवर्षी ‘कालिदास महोत्सव साजरा होत असतो.
जवळच, तोतलाडोह हे धरण आहे. रामटेकच्या दक्षिणेला असलेला वाकाटककालीन नगरधनचा किल्ला, त्यांची राजधानी होता.

संकलन – सुधीर लिमये पेण
Vidarbha Darshan