संत कान्होपात्रा

१९७४ च्या जानेवारीत अभिषेकी बुवा शिवाजी पार्कची जागा सोडून लोणावळ्याला गेल्यामुळे गाण्याच्या शिक्षणात खंड पडला होता. एकदोनदा मी तिथे गेलो. परंतु मनासारखं शिकणं होईना. तेव्हा त्यांच्याच परवानगीने मी नंतर पं. गोविंदराव अग्नि यांच्याकडे गाणं शिकायला सुरुवात केली. त्यांच्याकडे साधना पालांडे (वैशाली थिएटरचे मालक बी. पालांडे यांची पत्नी) या गाणं शिकण्यासाठी येत होत्या. श्रीमती कान्होपात्राबाई, रजनी जोशी याही येत असत.



१९७४ च्या जानेवारीत अभिषेकी बुवा शिवाजी पार्कची जागा सोडून लोणावळ्याला गेल्यामुळे गाण्याच्या शिक्षणात खंड पडला होता. एकदोनदा मी तिथे गेलो. परंतु मनासारखं शिकणं होईना. तेव्हा त्यांच्याच परवानगीने मी नंतर पं. गोविंदराव अग्नि यांच्याकडे गाणं शिकायला सुरुवात केली. त्यांच्याकडे साधना पालांडे (वैशाली थिएटरचे मालक बी. पालांडे यांची पत्नी) या गाणं शिकण्यासाठी येत होत्या. श्रीमती कान्होपात्राबाई, रजनी जोशी याही येत असत.

एकदा सहज बोलता बोलता वैशाली थिएटर्स या संस्थेला एक संगीत नाटक करायचं आहे असं समजलं. माझ्या घरी बरीच संगीत नाटकांची पुस्तकं होती आणि त्यात बालगंधर्वांनी एकेकाळी गाजवलेल्या ‘संत कान्होपात्रा’ या नाटकाचं पुस्तक होतं. याबद्दल साधना पालांडे यांना सांगताच त्यांच्या घरी नाट्यवाचन करायचं ठरलं. नाटक मीच वाचून दाखवलं व ते त्यांना आवडलं.

या नाटकाचे प्रयोग वैशाली थिएटर्सतर्फे करायचे असं ठरलं. त्यातल्या विलासरावाच्या भूमिकेसाठी प्रख्यात गायकनट रामदास कामत यांना विचारावं असं सर्वांना वाटत होतं. माझा त्यांचा परिचय होताच.

ते म्हणाले, “मला ऑफिसच्या कामासाठी परदेशात जावं लागणार आहे. तेव्हा माझ्यामुळे नाटक अडेल.

म्हटलं, “अहो तुम्ही इथे आहात तोपर्यंत प्रयोग करा. सुरुवात तर चांगली होईल. पुढचं पुढे पाहता येईल. ”

त्यांनी त्यांचे मामा श्रीपादराव नेवरेकर (हे बालगंधर्वांच्या कंपनीत ती भूमिका करत असत) त्यांचाही सल्ला घेतला आणि आपला होकार कळवला.

संत कान्होपात्रेची भूमिका कान्होपात्रा किणीकर, विलासराव रामदास कामत, शीलवती -लता अरुण आणि चोखामेळा –मी स्वतः अशा भूमिका ठरल्या. कान्होपात्राबाईंनी दिग्दर्शनासाठी जोगळेकर यांचं नाव सुचवलं. परंतु त्यांच्याशी बोलणं झाल्यावर त्यांनी कान्होपात्रा ही दिसायला सुंदर होती. तेव्हा हे जमणार नाही असं कळवलं. त्यामुळे दिग्दर्शन आणि आनंदराव हे व्हिलनचं काम बाबा वैशंपायन यांच्याकडे सोपवण्यात आलं. तालमी सुरू झाल्या. संगीताची जबाबदारी पं. गोविंदराव अग्नि यांनाच देण्यात आली.

रामदास कामत यांनी नाटकात भूमिका करण्याचं मान्य केलं ही खूप चांगली गोष्ट झाली. त्या भूमिकेसाठी एकंदर सात गाणी होती.

कामत म्हणाले, “एवढी गाणी कशाला? चार पुरेत.

मी म्हटलं, “तुम्ही अग्निबुवांकडून चाली समजून घ्या आणि तुम्हाला हवी ती चार गाणी आपण कायम करू!” चाली ऐकून रामदासजी गाण्यांच्या प्रेमातच पडले आणि सातही गाणी म्हणणार असा आग्रह धरून बसले. ही गोड अट सर्वांनीच मान्य केली. कान्होपात्राची पदे व चोखामेळ्याचे अभंग अशी एकंदर वीस पदे कायम केली. चोख्याची गायकीची पदे बाद करून टाकली. नाटक संत कान्होपात्रेचं असल्यामुळे त्या कामाला जास्ती गाणी असणं अपेक्षितच होतं. या नाटकाचं नेपथ्य बाबा पार्सेकर या गुणी नेपथ्यकारानी केलं होतं.

तालमींना सुरुवात झाली आणि लता अरुण हिचा ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा दौरा ठरला. त्यामुळे शीलवतीचं काम कोण करणार हा प्रश्न आला. तो लतानेच सोडवला. तिची वहिनी माया जाधव (प्रसिद्ध सिने कलाकार) ही भूमिका करायला तयार झाली आणि तिचे पती शहाजी काळे हा त्यातील झेंडूची विनोदी भूमिका करायला तयार झाले.

या नाटकाचे गोवा, कोकण दौरे व इतर प्रयोग मिळून चाळीस-पंचेचाळीस प्रयोग झाले. त्यानंतर रामदासजी नोकरीच्या निमित्ताने परदेशी गेले. त्यामुळे ती भूमिका विश्वनाथ बागूल यांनी केली. मात्र त्यांनी गाण्यांची संख्या सातवरून चारवर आणली. ते दिसायला देखणे होते. त्यामुळे प्रयोगाच्या रंगतीत फारसा फरक पडला नाही. नंतर ही भूमिका प्रकाश घांग्रेकर यांनीही केली. पुढे ‘वैशाली थिएटर्स’ ने ‘संत गोरा कुंभार’ या अशोकजी परांजपे लिखित नाटकाची निर्मिती केली आणि ‘संत कान्होपात्रा’चे प्रयोग जवळ जवळ बंद झाले.

यानंतर रामदास कामत भारतात परत आल्यावर त्यांना घेऊन पुन्हा ‘संत कान्होपात्रा’ या नाटकाचे प्रयोग मी स्वतः करायचं ठरवलं. त्यासाठी एका संस्थेच्या नावाची गरज होती. त्यामुळे ‘योगायोग’ या नावाने या नाटकाचे प्रयोग करायचे ठरले. सर्व कलाकारांनी सहकार्य केल्यामुळे मी या नाटकाचे काही प्रयोग केले. काही कॉन्ट्रॅक्टचे प्रयोगही मिळाले. यावेळी मात्र मी शीलवतीची भूमिका लता अरुण हिलाच दिली. ती तिने अतिशय चांगल्या प्रकारे निभावली. ‘योगायोग’ संस्थेच्या नावाने आम्ही ‘सौभद्र’, ‘मानापमान’, ‘संशयकल्लोळ’ इत्यादी संगीत नाटकांचे प्रयोगही केले. जी नटमंडळी उपलब्ध होती त्यांना घेऊन हे प्रयोग केले. सर्व सोंगं आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. तेव्हा योगायोगाने सुरू झालेली संस्था योगायोगानेच बंद पडली. (वडाळा गणपतीत ललिता केंकरे शीलवती होती. )

वडाळ्याचा प्रयोग प्रसाद सावकार यांच्या ओळखीने ठरला. प्रयोग गणपतीत होता. लता अरुणचा दौरा असल्यामुळे ती उपलब्ध नव्हती. एकदम ललिता केंकरेंची आठवण आली. तिने हो म्हटलं. पण तालमीची अट घातली. अर्थात रामदासजींना पण तालमी हव्याच होत्या. त्यामुळे चर्नी रोडच्या ‘शांती हॉल’मध्ये तालमी ठेवल्या. ललिताचं पाठांतर एकदम चोख.

तालमीत रामदासजी व तिचा एक लव्हसीन होता. रामदासजींच्या डोक्यात पूर्वीच्या काही गोष्टी होत्या.

त्यामुळे त्यांनी विचारलं, “अहो लव्हसीनमध्ये तुम्हाला हात लावला तर चालेल ना?”

ललिता ताडकन म्हणाली, “कुठे पाहिजे तिथे हात लावा. परंतु तालमीतच ठरवा. आयत्यावेळी केलेले स्पर्श चालणार नाहीत.” प्रयोग छान झाला.

शीलवतीला आनंदराव फसवून वाड्याबाहेर काढतो आणि जंगलात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करतो असा एक प्रसंग आहे. ज्यावेळी तो तिला धरायला जातो तेव्हा “मी जर खरी पतिव्रता असेन तर देवालासुद्धा माझ्या रक्षणासाठी धावून यावं लागेल.” हे वाक्य ललिताने इतक्या परिणामकारक तऱ्हेने उच्चारलं त्याला तोड नाही. प्रयोग संपल्यावर मी तिला १०० रुपये बक्षीस दिले. हे वाक्य आधीच्या शीलवतींनी इतक्या आत्मविश्वासाने म्हटलं नव्हतं. Hats off to you, Lalita!!!

Author