निग्रोधमिग जातक

एका काळी आमचा बोधिसत्त्व मृगकुलांत जन्मला होता. त्याची कांति सुवर्णासारखी होती; डोळे वज्रमण्यासारखे तेजस्वी होते; शिंगें रजत वर्णाची होती; तोंड अरुणवर्ण, आणि हातपाय लाक्षारसानें चित्रित केल्यासारखे सुंदर होते. त्याची वालधि चमरमृगाच्या वालधीसारखी शोभिवंत होती, व शरीर जवान घोड्यासारखे सुंदर दिसत होते. तो आपल्या पाचशे मृगांच्या परिवारासह अरण्यामध्ये राहत होता. त्याला त्याचे लोक न्यग्रोधमृगराज या नावाने ओळखत असत. त्याच अरण्यामध्ये बोधिसत्त्वाच्या जातीचा दुसरा एक शाख नावाचा मृग आपल्या मृगगणासह रहात असे.



एका काळी आमचा बोधिसत्त्व मृगकुलांत जन्मला होता. त्याची कांति सुवर्णासारखी होती; डोळे वज्रमण्यासारखे तेजस्वी होते; शिंगें रजत वर्णाची होती; तोंड अरुणवर्ण, आणि हातपाय लाक्षारसानें चित्रित केल्यासारखे सुंदर होते. त्याची वालधि चमरमृगाच्या वालधीसारखी शोभिवंत होती, व शरीर जवान घोड्यासारखे सुंदर दिसत होते. तो आपल्या पाचशे मृगांच्या परिवारासह अरण्यामध्ये राहत होता. त्याला त्याचे लोक न्यग्रोधमृगराज या नावाने ओळखत असत. त्याच अरण्यामध्ये बोधिसत्त्वाच्या जातीचा दुसरा एक शाख नावाचा मृग आपल्या मृगगणासह रहात असे.

त्या काळी काशीच्या राजाला मृगयेची फारच चट लागली होती. तो दररोज शिकारीला जातांना मृगांना वेढण्यासाठी आपल्या शेतकरी लोकांना घेऊन जात असे. त्यामुळे लोकांची फार हानी होई. शेतांतील कामे अर्धवट रहात असत, व वेळेवर शेताची पेरणी वगैरे न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असे. तेव्हा वाराणसीच्या आसपास राहाणाऱ्या लोकांनी असा विचार केला की, “भलत्याच वेळी शिकारीला जावे लागल्यामुळे आमची कामे तशीच रहातात, त्यापेक्षा आपण एक मोठे कुरण तयार करून व त्याच्या भोवती एक बळकट कुंपण घालून अरण्यातून पुष्कळ मृगांना त्या कुंपणात आणून सोडू. म्हणजे रोज राजा एखाद्या दुसऱ्या मृगाची शिकार करून मांस खाईल, व आम्हाला शिकारीला नेणार नाही.’ त्याप्रमाणे त्या लोकांनी एक मोठे कुंपण तयार केले, आणि मृगांना पाणी पिण्यासाठी तेथे एक लहानसा तलाव खोदला. पावसाळ्यानंतर जेव्हा त्या कुंपणात गवत वाढले तेव्हा नागरवासी आणि ग्रामवासी सर्व लोक आपापली शस्त्रास्त्रे घेऊन मृगांना आणण्यासाठी अरण्यात शिरले. तेथे त्यांनी न्यग्रोध मृगाच्या आणि शाखमृगाच्या स्थानाला वेढा दिला, आणि दांडक्यांनी झुडपे बडवून व मोठ्याने आरडाओरड करून त्या मृगांना तेथून हुसकावून लावले.

परंतु मृगांना पळून जाण्याला दुसरी वाट न ठेवल्यामुळे त्यांना वाराणसीच्या राजासाठी नवीन कुंपणात शिरल्याशिवाय दुसरे गत्यंतर राहिले नाही. ते सगळे मृग त्या कुंपणांत शिरल्यावर रयत लोकांनी त्या कुंपणाचे फाटक लावून टाकिले, व राजवाड्यात जाऊन ते राजाला म्हणाले, “महाराज, आपण आम्हाला घेऊन रोज शिकारीला जात असल्यामुळे आमचे फार नुकसान होत आहे. म्हणून आम्ही हजारएक मृगांना नवीन कुंपणात आणून सोडले आहे.

आता रोज आपणाला जे एक दोन मृग मारावयाचे असतील ते मारून त्यांचे मांस खात जा. पण आम्हाला मात्र शिकारीला जाण्याचा हुकूम करू नका.”

राजाला लोकांचे म्हणणे योग्य वाटलें, व शिकारीला जाण्याबद्दल त्यांच्यावर त्या दिवसापासून सक्ती करण्यात येणार नाही असे अभिवचन देऊन त्याने त्या लोकांना आपापल्या घरी पाठविले; आणि तो आपल्या मुख्य स्वयंपाक्यासह त्या कुंपणात गेला. तेथे न्यग्रोध आणि शाख ह्या दोन मृगांना पाहून तो अत्यंत संतुष्ट झाला, व त्या दोघांना त्याने अभयदान दिले. त्या दिवसापासून राजा स्वतः एखाद्या मृगाला मारून घेऊन येत असे किंवा त्याचा मुख्य स्वयंपाकी मृगाला मारून आणीत असे.

परंतु मृग राजाला किंवा त्या सूदाला पाहून इतस्ततः पळत सुटत, व एक मृग मरेपर्यंत चार पाच मृगांना बाण लागून ते घायाळ होत असत; आणि कधी कधी त्या जखमांमुळे मरण पावत असत. बोधिसत्त्वाच्या अनुयायी मृगांनी ही गोष्ट बोधिसत्त्वाला कळविली, तेव्हा शाखाला बोलावून तो त्याला म्हणाला, “मित्रा, एकासाठी पुष्कळ मृगांचा नाश होत आहे. दररोज एकाचे मरण तर चुकावयाचे नाहीच, पण एवढ्यासाठी इतरांचा नाश होऊ न देणे आम्हास शक्य आहे.

आम्ही राजाला अशी विनंती करू की, आजपासून बाणाने मृगाला मारण्यात येऊ नये. एक जागा तयार करून तेथे एक लाकडाचा ओंडका ठेवण्यात यावा, व रोज एका मृगाने जाऊन त्या ओंडक्यावर आपले डोके ठेवून तेथे पडून रहावे; आणि राजाने किंवा राजाच्या सूदाने त्याचे डोके कापून त्याला तेथून घेऊन जावे.” ही गोष्ट शाखमृगाला पसंत पडली. तेव्हा बोधिसत्त्व त्याला म्हणाला, “माझा आणि तुझा परिवार सारखाच आहे. अर्थात एक दिवस माझ्या गणावर पाळी असावी, व एक दिवस तुझ्या गणावर असावी.” ह्याही गोष्टीला शाखमृग कबूल झाला; व त्या दिवसापासून आळीपाळीने एक मृग निश्चित ठिकाणी पाठविण्याचे ठरले. दुस-या दिवशी राजा मृगाला मारण्याकरिता तेथे आला असतां अभयदान मिळालेले हे दोघे मृग पुढे सरसावून राजाला म्हणाले, “महाराज, आपणाला रोज एकाच मृगाचे मांस लागते, पण त्याच्यासाठी आमच्या गणांतील पुष्कळ मृग नाश पावतात.

एवढ्यासाठी आजपासून आमच्यावर मेहेरबानी करून आपण एक स्थान निश्चित करा. आमच्यापैकी रोज एक मृग त्या ठिकाणी जाऊन तेथे ठेवलेल्या ओंडक्यावर आपले डोके ठेवून पडून राहील. त्याला आपण एका घावाने ठार मारून तेथून घेऊन जावे. म्हणजे आजकाल बाणाच्या प्रहाराने जे पुष्कळ मृग घायाळ होतात, ते व्हावयाचे नाहीत; व आपणाला मृगामागे चहूंकडे धावण्याचेही श्रम पडावयाचे नाहीत.” राजाने त्या मृगांची विनंती मान्य करून त्यांच्या सांगण्याप्रमाणे एक स्थान तयार केलें; व त्या दिवसापासून त्या ठिकाणी ठेवलेल्या ओंडक्यावर डोके ठेवून निजलेल्या मृगालाच मारून आणावे असा त्याने आपल्या स्वयंपाक्याला हुकूम केला. काही काळपर्यंत ही व्यवस्था सुरळीत चालली होती.

एके दिवशी शाखमृगाच्या अनुयायांपैकी एका गर्भिणी मृगीवर त्या ठिकाणी जाण्याची पाळी आली. तेव्हा ती शाखाला म्हणाली “महाराज, आजची माझी पाळी दुसऱ्या कोणत्या तरी मृगाला द्या, मी सांप्रत गर्भिणी आहे; आणि प्रसूत झाल्यावर माझे लेकरू व मी अशी दोघेही पाळीवर जाऊ.” शाख म्हणाला. “बाई असे करण्याचा मला अधिकार पोहचत नाही.

ज्याच्यावर पाळी आली असेल त्यानेच त्या ठिकाणी गेले पाहिजे. मी जर अन्यायाने वागू लागलो तर आमच्या समाजात मोठी अव्यवस्था होईल. तेव्हा मला तुझ्या विनंतीला मान देता येत नाही.”

ती मृगी मोठ्या कष्टी अंतःकरणाने न्यग्रोधमृगाजवळ गेली, व त्याला म्हणाली, “महाराज, मी शाखमृगाच्या परिवारापैकी एक गर्भिणी मृगी आहे. आज राजाच्या अन्नासाठी देह अर्पण करण्याची माझ्यावर पाळी आली आहे. पाळी दुसऱ्याला देऊन सध्या मला मोकळे करावे, अशी मी आमच्या पुढाऱ्याला विनंती केली; परंतु त्याने ती फेटाळून लाविली. आता जर आपल्या मंडळीपैकी माझ्याऐवजी एखादा मृग पाठविण्याची मेहेरबानी कराल तर पुढे प्रसूत झाल्यावर तुमच्या समाजावर पाळी येईल त्यावेळी मी व माझे लेकरू त्या पाळीचा आनंदाने स्वीकार करू.

बोधिसत्त्व म्हणाला, “बाई, तू काही काळजी करू नको. मी तुझ्या पाळीची व्यवस्था करतो. तू चारा खाऊन आणि पाणी पिऊन आनंदाने रहा.” त्या दिवशी राजाचा स्वयंपाकी त्या ठिकाणी येऊन पाहतो, तो अभयदान मिळालेला न्यग्रोधमृगच त्या ओंडक्यावर डोके ठेवून पडला होता. ते आश्चर्य पाहून तो तसाच धावत राजापाशी गेला आणि म्हणाला, “महाराज, आज मी मृगाला मारून आणण्यासाठी रोजच्या ठिकाणी गेलो होतो. तेथे आपण अभयदान दिलेल्या दोन नायक मृगांपैकी एक जण त्या ओंडक्यावर डोके ठेवून पडलेला आहे ! परंतु आपल्या हुकूमावाचून त्याला मला कसा हात लावता येईल? म्हणून मी तसाच धावत येथे आलो आहे, आता आपला हुकूम होईल त्याप्रमाणे करण्यात येईल.” राजा त्या स्वयंपाक्याबरोबर स्वतः त्या ठिकाणी गेला, आणि ओंडक्यावर डोके ठेऊन निजलेल्या न्यग्रोधमृगाला म्हणाला, “मित्रा, मृगराजा, तुला मी अभयदान दिले असतां तू या ठिकाणी येऊन का निजलास?”

“महाराज, मी मृगसंघाचा नायक असल्यामुळे माझ्यावर पाळी येण्याचा संभव नाही. परंतु शाखाच्या परिवारापैकी एका गर्भिणी मृगीवर पाळी आली होती. तिने ती दुसऱ्या मृगाला देण्याची मला विनंती केली. परंतु एकाचे मरण भी दुसऱ्याला कसे द्यावे? तेव्हा तिची पाळी माझ्यावर घेऊन मी येथे पडलो आहे.

मला मारिले असता आपल्या वचनाचा भंग होईल अशी शंका धरू नका. का की मी मजसाठी मरत नसून गर्भिणी मृगीसाठी मरण्यास सिद्ध झालो आहे.” राजा म्हणाला, “मी त्या गर्भिणी मृगीलाही अभय देतो. तू आतां या ओंडक्यावरून ऊठ.” “पण महाराज, इतर मृगांची वाट काय? गर्भिणी मृगीची पाळी मी घेतली व त्यामुळे तिला अभयदान मिळाले, ही बातमी मृगसंघाला लागल्याबरोबर प्रत्येक मृग आपली पाळी चुकविण्यासाठी मला विनंती करील; व त्या योगे मला वारंवार येथे येऊन आपणाला तसदी द्यावी लागेल! त्यापेक्षा आपण आजच मला मारावे हे बरे!”

राजा म्हणाला, “असे असेल तर मी सर्व मृगांना अभय देतो.”

बोधिसत्त्व म्हणाला, “महाराज या उद्यानातील मृगांनाच आपण अभय देता.

पण अरण्यातील इतर श्वापदांनी काय करावे? त्यांची गती काय होणार?” राजाने सर्व प्राण्यांना अभयदान देण्याचे अभिवचन दिल्यावर बोधिसत्त्व त्या ओंड्यावरून उठला, आणि त्याने राजाला शील राखण्यासाठी व धर्माने राज्य करण्यासाठी उपदेश केला. नंतर राजाने त्या सर्व मृगांना कुरणातून मोकळे केले व ते अरण्यात आपल्या मूळच्या ठिकाणी गेले.

तेथे त्या गर्भिणी मृगीला एक सुंदर पुत्र झाला तो लहानपणी वारंवार शाखमृगाजवळ जात असे. आईला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ती त्याला म्हणाली, “बाबारे, तुला तुझे कल्याण व्हावे अशी इच्छा असेल तर शाखमृगाचा सहवास न करिता न्यग्रोधाची संगति धर. न्यग्रोधाबरोबर मरणे श्रेयस्कर आहे; पण शाखाबरोबर जगणे श्रेयस्कर नाही.

=======Statistics======= Total number of lines: 133 Maximum of characters per lines: 503 Total number of characters: 7486 Total number of words: 1061 Total number of words with special characters split: 1173 =======Statistics=======

Author