मोहन वाघला नानांनी नवीन नाटक दिलं नाही, पण यादरम्यान मोहन तोंडवळकर यांच्या कलावैभवला मात्र एक नवीन नाटक दिलं. विषय होता सत्यभामा आणि पारिजात. आणि नाव होतं ‘पारिजात फुलला’. ‘शिवाजी मंदिर’ला प्रयोग पहायला गेलो. प्रयोग संपल्यावर नानासाहेबांना भेटायला आत गेलो. इकडची तिकडची बोलणी झाल्यावर कसं काय चाललंय यावर एकमेकांच्या आगामी कार्यक्रमाविषयी बोलणं निघालं.
नाना म्हणाले, ” मी एक गुजराती नाटक करतोय. ‘भाव तोचि देव’ या नाटकाचं गुजराती रूपांतर नरसी मेहता.
मी म्हटलं, “अरेच्चा! मला आवडलं असतं गुजराती नाटकात काम करायला.
“तुम्हाला गुजराती येतं? ”
मी म्हटलं, “हो. पूर्वी मी एका गुजराती नाटकात (‘लाखोमां एक’) काम केलं होतं. ”
“मग तुम्ही उद्या संध्याकाळी रंगभवनला या. आमच्या तालमी तिथे चालतात.” मी गेलो. विष्णुभाई व्यास, जे नाटकाचे दिग्दर्शन करणार होते, त्यांनी माझ्याशी गुजरातीतून संवाद साधला आणि नरसी मेहताची भूमिका मी करायची हे नक्की झालं. मी बऱ्यापैकी गुजराती बोलू शकतो अशी त्यांची खात्री झाली होती.
नाटकाचं संगीत हा महत्त्वाचा भाग होता. नानांची मुलगी शशिकला शिरगोपीकर हिने चाली रेकॉर्ड करून पाठवल्या होत्या. पण त्या गुजराती वाटत नव्हत्या. शिवाय नानासाहेब स्वतः व रसनाबाई हे भूमिका करणार होते. या दोन्ही गोष्टी दिग्दर्शकाला पसंत नव्हत्या. भावना या अभिनेत्रीच्या ‘नाट्यसुमन’ संस्थेतर्फे प्रयोग रंगमंचावर सादर होणार होता. त्यांच्यापर्यंत दिग्दर्शकाची नाराजी पोचली की नाही कोण जाणे. दिग्दर्शक विष्णुभाई व्यास यांनी दिग्दर्शन करायचं नाकारलं. अर्थात नाना दिग्दर्शन करू शकत होते. संगीताची जबाबदारी अजितभाई मर्चंट या संगीत दिग्दर्शकाकडे सोपवली गेली. मी अजितभाईंच्या कॅडेल रोडच्या घरी सकाळी गाणी बसवायला जात असे. ‘वैष्णव जन तो’, ‘जाग ने जादवा’, ‘रासरमन्ता मारी नथणी खोवाणी’, पाच गवळणींचं गुजरातीमधलं भाषांतर अशी आठ-दहा गाणी होती. गद्याची तालीम चर्च हॉल, रणजित स्टुडिओशेजारी संध्याकाळी चालायच्या. नरसी मेहताला त्रास देणाऱ्या शास्त्रीची भूमिका नामदेव लहुटे या गुजराती रंगभूमीवरील शंकर घाणेकर समजला जाणारा नट करणार होता. पण तालमीच्या वेळी तो येता जाता ‘हे नाटक चालणार नाही’ असं भविष्य वर्तवत होता.
नाटकाचं नेपथ्य, कपडेपट सर्व तयार होतं. तरीही ‘हे नाटक चालणार नाही’ या सबबीवर बंद करण्यात आलं. अरविंद चित्रे हे प्रॉडक्शन मॅनेजर होते. त्यांना मी म्हटलं, “अहो गेले महिनाभर मी माझ्या खिशातले पैसे खर्च करून तालमी करतोय त्याचं काय?” त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. कारण त्यांनी सगळी मलई खाऊन फक्त ५ हजार रुपये भावनाबाईंच्या हातावर टेकवले होते.
नामदेव नावाच्या व्हिलनची बत्तिशी वठली आणि नाटक रंगभूमीवर आलंच नाही.
त्यातल्या त्यात आनंदाची एक गोष्ट म्हणजे अजितभाईंशी माझा स्नेहसंबंध दृढ झाला. पुढे यथावकाश त्यांनी त्यांच्या कार्यक्रमासाठी माझ्याकडून गाऊन घेतलं.
याच संदर्भात एक गोष्ट आठवली. डी. अमेंबल म्हणजे दिनकरराव अमेंबल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कर्नाटक संघात एक कार्यक्रम होता. आकाशवाणीवरील त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमात त्यांनी स्वरबद्ध केलेली गाणी म्हणायची होती. कर्नाटक संघाचे प्रकाश बुर्डे यांची व माझी चांगली ओळख होती. कारण त्यांच्या कर्नाटक संघात मी शास्त्रीय व नाट्यसंगीत असे बरेच कार्यक्रम केले होते. त्यांचा मला एक दिवस या संदर्भात फोन आला.
अजित मर्चंट यांनी आकाशवाणीसाठी दिनकररावांच्या बरोबर काम केलं होतं. त्यातलं एक गाणं (गुजराती) सादर करायचं होतं. अजितभाईंनी त्यासाठी माझं नाव सुचवलं होतं. गाणं बसवून घ्यायला मी अजितभाईंच्या घरी गेलो. नरसी मेहताच्या वेळच्या स्नेहबंधाचा धागा अजून मजबूत होता. त्यांनी
बुर्डे यांना सांगितलं की, “माझे शिष्य सगळे अमेरिकेत आहेत. तुमच्याच एरियामध्ये राहणाऱ्या अरविंदभाई (पिळगांवकर) यांना माझ्याकडे पाठवा मी त्यांना ते गाणं शिकवीन.” ( अजितभाईंनी जुनी ओळख लक्षात ठेवून माझं नाव सुचवलं ही गोष्ट माझ्यासाठी फार मोलाची आहे.) अशा तऱ्हेने मी महाराष्ट्रातून व्हाया कर्नाटक गुजरातला पोहोचलो. त्याच्यात ‘उदयाचलि रवी आला, उजळित दाहि दिशांना’ हे एके काळी पुरुषोत्तम सोळांकूरकर यांचं लोकप्रिय गाणं माझ्या वाट्याला आलं. ‘बदकांचे गुपित’ या मर्ढेकरांच्या आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या संगीतिकेला डी. अमेंबल यांचं संगीत होतं. त्यातील काही भाग मी व राजश्री महाजन या दोघांनी गायला.