मुंबईची महालक्ष्मी, गव्हर्नर हॉर्नबी आणि दादाजी धाकजी

सात बेटांची मुंबई एकसंध नव्हती. इथे व्यापार वाढूच शकला नसता. सर्वत्र माजलेली दलदल, सुकत घातलेली मासळी, त्यापासून बनविला जाणारा खताचा कुटाणा,अनेक प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि कीटक, भरतीबरोबर खाऱ्या पाण्याने भरून जाणारी सातही बेटे, सतत चिखल यामुळे इथे जमिनीवरून मोठी वाहतूक करणे शक्य नव्हते.



सात बेटांची मुंबई एकसंध नव्हती. इथे व्यापार वाढूच शकला नसता. सर्वत्र माजलेली दलदल, सुकत घातलेली मासळी, त्यापासून बनविला जाणारा खताचा कुटाणा,अनेक प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि कीटक, भरतीबरोबर खाऱ्या पाण्याने भरून जाणारी सातही बेटे, सतत चिखल यामुळे इथे जमिनीवरून मोठी वाहतूक करणे शक्य नव्हते. मुंबई बंदर हे कितीही जरी श्रेष्ठ असले तरी मुंबईची जमीन एकसंध झाल्याखेरीज इथे देशोदेशी व्यापार वाढविता येणार नव्हता. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नर हॉर्नबी याने सात बेटे जोडण्याचा उद्योग सुरु केला आणि मुंबईला व्यापारी शहर म्हणून नावलौकिक मिळवून दिला.

खाडीचा आणि दलदलीचा भाग बुजवून तिथे बांध घालण्याचे काम सोपे नव्हते . ब्रिटिशांनी प्रचंड पैसा आणि अक्कल जरी मुंबईत गुंतवलेली असली तरी बांध घालणारी माणसे इथलीच होती. दादाजी धाकजी हे अशा चिवट आणि जिद्दी माणसांपैकी एक. वरळी आणि मलबार हिल ही दोन टोके भराव घालून ज्यावेळी एकत्र करण्याची सुरुवात झाली त्यावेळी अर्धवट तयार झालेला बांध समुद्राच्या जोरकस भरतीमुळे कोसळून जाई. दादाजी धाकजी यांना या बांधाचे काम करताना एकदा देवीची एक मूर्ती सापडली. तिची स्थापना त्यांनी समुद्राजवळ केली. देवळाची जमीन त्यांना कंपनीकडून बक्षीस मिळाली. देवीची स्थापना झाल्यानंतर वरळीचा बांध पूर्ण झाला आणि तो हॉर्नबी वेलार्ड रिक्लेमेशन म्हणून प्रसिद्ध झाला.

गव्हर्नर विल्यम हॉर्नबी हे एक जबरदस्त व्यक्तिमत्व होते. इतक्या प्रचंड प्रमाणात अफाट पैसा गुंतवून मुंबईची बेटे सांधण्याची ही योजना इंग्लंडमध्ये मंजूर झालेली नव्हती तरीदेखिल तशी मंजुरी गृहीत धरून गव्हर्नर विल्यम हॉर्नबी यांनी निसबिट लेडी नेसबिट नावाच्या एका अती धनाढ्य स्त्री कडून या प्रकल्पासाठी पैसा मिळविला आणि आपले काम धडाडीने पुढे नेले इंग्लंडमध्ये ही बातमी पोहोचताच गव्हर्नर विल्यम हॉर्नबी यांच्या सस्पेन्शनचे पत्र बोटीने हलत डुलत मुंबईत रवाना झाले. ते पत्र हातात पडले तेव्हा हॉर्नबी यांच्या निवृत्तिला फक्त काही महिनेच शिल्लक राहिले होते. शिवाय त्या लिफाफ्यामध्ये काय असेल याचा अंदाज गव्हर्नरने बांधला होता. म्हणून ते पत्र न उघडतात त्यांनी तसेच ठेवून दिले आणि हॉर्नबी वेलार्ड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी लेडी नेसबिट यांच्या सहाय्याने पूर्ण केला.

ब्रिटिशांची डोकेबाज आयडिया आणि प्रचंड पैसा गुंतविण्याची आणि खर्च करण्याची त्यांची व्यापारी ताकद पाहून मुंबईकरांचे डोळे विस्फारले. आजपर्यंत रामायणात प्रभू श्रीरामाने समुद्रात सेतू बांधल्याचे लोकांनी ऐकले होते, परंतु माणसेसुद्धा समुद्राला अडवून तिथे बांध घालू शकतात ही कमाल त्यांनी जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली तेव्हा त्यावर कुणा अज्ञात व्यक्तीने एक कवन रचले. त्यात त्याने ब्रिटिशांची तुलना प्रभू श्रीरामचंद्राशी केली. वरळीचा सेतू बांधून झाल्यानंतर तिथे महालक्ष्मी स्थापन झाली असे वर्णन त्यात करण्यासही हा अज्ञात माणूस विसरला नाही.

“बांधिला दर्यात सेतू जैसा
श्रीराम लंकेवरी,
मोठी हुन्नर जान्गळा खर्चीले
द्रव्यास कोटीवरी,
केली वाट सपाट खाडी अवघी
बुजवून ती टाकली
जे ठाई मग ती महाभगवती
लक्ष्मी तिथे स्थापिली

एकेकाळी अतिशय निसर्गरम्य असलेले समुद्रालगतचे महालक्ष्मी मंदिर आज गर्दीने वेढलेले असते. पूर्वी महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागच्या समुद्रावर जाता येत असे आज तिथे तशी परिस्थिती नाही. तरीही जाता येता महालक्ष्मीला लांबूनच नमस्कार करताना मुंबईच्या अशा लहान सहान गोष्टी आठवत राहतात आणि या शहरावरचे प्रेम अधिकच दृढ होते.

-अलका सुहास जोशी

Author