एक जंगल होते. त्याचे नाव होते चंपकवन. तेथे खूप झाडे, ओढे, डोंगर होते. जंगल म्हटल्यावर प्राणी होतेच. माकड, चित्ते, हरीण, वाघ, सिंह, हत्ती, लांडगे, कोल्हे इत्यादी. ते चंपकवनात अतिशय आनंदात राहत. माकडे तर खूपच धडपडी होती. नेहमीच काहीतरी करण्यात दंग असत. त्यातच सर्कशीतून पळून आलेल्या एका माकडाची भर पडली. त्याचे नाव होते ‘विचित्र ‘नावाप्रमाणेच त्याच्याअंगीसुद्धा तसेच गुण होते.
माकडांनी त्याची आपुलकीने विचारपूस केली. त्यांचे हे प्रेम पाहून विचित्र थक्क झाला. त्याला या माकडांसाठी खूप काही करावेसे वाटू लागले. मग माकडांच्या सभेत त्याने माणसांच्या मुलांसाठी सुरू असलेल्या सर्व शिक्षा अभियाना’प्रमाणेच माकडांसाठी ‘शिक्षण अभियान’ सुरू करण्याचे ठरवले.
माकडांनी त्याला विविध शंका विचारल्या. विचित्रने त्यांच्या शंका दूर केल्या. मग शाळेसाठी एक चांगलेसे झाड निवडण्यात आले. विचित्र माकडाच्या हातून ‘भूमीपूजना’प्रमाणे ‘वृक्षपूजन’ झाले. मग झाडाचे खोड घासून घासून माकडांनी कसे बसे ओबडधोबड फळे बनवले. रंगीत मातींची ढेकळे आणून खडूंचा प्रश्न सोडवण्यात आला. तसेच माकडांसाठी सवलत म्हणून पुस्तके वाटण्यात आली. त्यानंतर माकडांमध्ये शिक्षक व मुख्याध्यापक या हुद्द्यांसाठी भांडणे सुरू झाली. तेव्हा विचित्रने ‘इलेक्शन’ घेऊन हा प्रश्न सोडवला. मुख्याध्यापक म्हणून विचित्र व शिक्षक म्हणून मोंटू व चिंटू यांची निवड झाली.
दुसऱ्या दिवसापासून शाळा सुरू झाली. मोंटू मास्तर वर्गात आले. नमस्ते वगैरे झाल्यानंतर माकडे खूपच गडबड करू लागली. तेव्हा मोंटू सरांनी राजू हा चुणचुणीत माकड ‘मॉनिटर’ म्हणून नेमला. मग मुले ‘फळा’, ‘खडू’ हे काय आहे हे विचारू लागली. मग सरांनी बिचकत-घाबरत ते रंगीत ढेकूळ हातात घेतले व जोरजोरात त्या ओबडधोबड फळ्यावर घासले. त्यातून पडणारी माती पाहून मास्तर म्हणाले, “हे एक कीस मिळवण्याचे साधन आहे.” हे बोलणे संपले व सोनू माकडाने एक तास संपल्याची घंटा म्हणून दोन दगड एकमेकांवर जोरात आपटले. तो आवाज ऐकून माकडे घाबरली. दप्तरे न घेताच त्यांनी घरचा रस्ता पकडला. हा गोंधळ ऐकून काय झाले हे पाहण्यासाठी मोंटू माकड बाहेर आले. पण पळणाऱ्या माकडाच्या धक्क्याने तोल जाऊन ते जमिनीवर जोरात आपटले. त्यामुळे त्याला दोन दिवस दोरीने फांदीला पाय बांधून राहण्याचा सल्ला देण्यात आला.
या गोंधळामुळे घंटा न देण्याचा निर्णय मुख्याध्यापकांनी घेतला. दुसरे दिवशी चिंटू सर वर्गात आले. पुस्तकातील फळांच्या चित्रांची माहिती मुलांना द्यावी म्हणून त्यांनी मुलांना पुस्तके उघडण्याची ‘ऑर्डर’ दिली. चिंटू सर स्वतः प्लॅस्टिकची फळे दाखवू लागले. राजू माकडाने मागचा-पुढचा विचार न करता सरांच्या हातातील फळांवर झडप घातली व तो ती फळे खाऊ लागला. त्यामुळे राजूचे दात निकामी झाले. बाकीच्या माकडांनी पुस्तकातील चित्रातल्या फळांवर ताव मारण्यासाठी पाने फाडून टाकली. अशा रितीने पुस्तकांचा बट्ट्याबोळ झाला.
आता शाळेची परीक्षा जवळ आली. सर्व माकडांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षणाधिकारी म्हणजेच माकडांच्या टोळीचे प्रमुख ‘राज शेरोबाबा’ शाळेत आले. वर्गात जाऊन ते पाहू लागले. त्यांना सर्व माकडे बेंच तोड, ढेकळे एकमेकांना मार, फळे खराब कर, एकमेकांच्या चुगल्या कर, असे उद्योग करताना दिसले. त्यामुळे ते संतप्त झाले. त्यांनी तातडीने सभा बोलावली. त्यांनी मुलांनी केलेले उपद्व्याप सांगितले. मात्र मुख्याध्यापक ‘विचित्र’ या माकडाच्या बोलण्याने खुष झाले.
शिक्षणाधिकाऱ्यांना हार घालावा असे मुख्याध्यापकांच्या मनात आले. त्यांनी वर्गातील मुलांना फुले आणण्याचे फर्मान सोडले. मुलांना फुले न मिळाल्याने त्यांनी मिळतील त्या लहान-मोठ्या फळांचा हार बनवला.
मुख्याध्यापकांनी ‘राज शेरोबाबांना’ तो हार घातला. त्यातील फळे पाहून ते खुष झाले व अधाशासारखे फळे खाऊ लागले. खाण्याच्या नादात बाबा खाली पडले. चार-पाच माकडांनी त्यांना कसे बसे उचलून आणले. इतर माकडे देखील फळे घेण्यासाठी भांडू लागली. हे पाहून मुख्याध्यापक ‘विचित्र’ यांनी कार्यक्रम आटोपता घेतला. शाळा काढून देखील माकडांच्या वर्तनात काडीचाही फरक न पडल्याने माकडांसाठी सुरू झालेले ‘सर्व शिक्षा अभियान’ बंद करण्यात आले. माकडांनी त्याबद्दल केस ओढत, दात विचकत, चित्रविचित्र आवाज काढत आनंद व्यक्त केला आणि अशा प्रकारे शाळेचा ‘इति’ झाला.