(अलास्कन लोककथा)
एकदा समुद्रात होडी वल्हवत असताना रेव्हनला गनूक भेटला. त्यावेळी गनूकला त्याचे सामर्थ्य दाखवायची आणि रेव्हनवर त्याचे वर्चस्व सिद्ध करून दाखवायची इच्छा झाली. म्हणून त्याने त्याची जादूची टोपी काढून टाकली आणि सगळ्या समुद्रावर दाट धुके निर्माण केले. हे धुके इतके दाट होते की,
रेव्हन त्याच्या होडीचे पुढचे टोकही पाहू शकत नव्हता!
रेव्हनला एकटे मागे ठेवून गनूक त्याची बोट वल्हवत रेव्हनपासून लांब गेला.
रेव्हन तेव्हा पांढऱ्या रंगाचा होता. काहीच पाहू शकत नसल्यामुळे रेव्हन
समुद्रावर खूप वेळ भरकटत राहिला. शेवटी तो घाबरून गेला आणि आपल्या
मेव्हण्यावर ओरडला, “गनूक कुठे आहेस तू?”
पण तरीही गनूक गप्पच राहिला आणि रेव्हन होडी वल्हवत कोणत्या मार्गाने
गेला आहे आणि कुठे हरवला आहे, हे शांतपणे लक्ष देऊन पाहत राहिला.
रेव्हन गनूकला सतत हाका मारीत राहिला. धुके नाहीसे करण्याविषयी
आणि तो स्वतः कुठे आहे ते कळवण्याविषयी विनवू लागला.
“काय झाले आहे ? तू का बरं रडत आहेस ?” गनूकने मदत मागणाऱ्या
आपल्या मेव्हण्याला पांढऱ्या रंगाच्या रेव्हनला विचारले.
गनूकने टोपी परत स्वतःच्या डोक्यावर ठेवली आणि त्याच क्षणी धुके
नाहीसे झाले.
रेव्हनने त्याच्याकडे बघितले आणि म्हटले, “तू माझ्यापेक्षा जास्त
सामर्थ्यवान आहेस.”
“तू केव्हापासून या जगात राहत आहेस?” गनूकने विचारले.
रेव्हनने त्यावर उत्तर दिले की, “हे जग अस्तित्वात येण्यापूर्वीच त्याचा जन्म
झालेला आहे.”
मग गनूकला विचारले, “तो किती काळापासून या जगात राहत आहे?”
गनूकने उत्तर दिले, “जगणारा जीव खालच्या जागेतून वर आला
तेव्हापासून.’
यानंतर “दैकी नूव’ नावाच्या बेटावरील स्वतःच्या घरी गनूकने रेव्हनला
जेवायचे आमंत्रण दिले. दोघे मिळून मेजवानीचे जेवण जेवले आणि गनूकने त्या
पांढऱ्या पक्ष्याला ताजे पाणी देऊ केले. रेव्हन यापूर्वी कधीही असे पाणी प्याला
नव्हता. कारण त्याच्या जगामध्ये फक्त समुद्राचेच पाणी होते. केवळ
गनूकजवळच हे ताजे पाणी होते. ते पाणी त्याने एका भल्या मोठ्या प्रचंड दगडी
विहिरीत ठेवले होते. त्या विहिरीवर दगडाचेच जड झाकण होते.
रेव्हनला त्या पाण्याची चव खूपच आवडली. त्याला ते पाणी अजून जास्त
प्यायचे होते. पण गनूक रेव्हनपेक्षा जास्त सामर्थ्यवान असल्यामुळे त्याच्याकडे
पाणी मागायला रेव्हन घाबरला. जेवल्यानंतर रेव्हनने त्याला त्याच्या मूळ
वंशाच्या गोष्टी सांगितल्या आणि जगाच्या निर्मितीबाबतही तो त्याच्याशी
बोलला. गनूकने बराच वेळ ऐकले पण मग तो दमून गेला. ताज्या पाण्याचे रक्षण
करण्यासाठी तो मोठ्या दगडाच्या झाकणावर झोपून गेला.
जेव्हा रेव्हनचा मेव्हणा गाढ झोपून गेला, तेव्हा रेव्हनने कुत्र्याची थोडी विष्ठा
घेतली आणि गनूकच्या खाली ठेवून दिली. हे सगळे करून तो थोडे चालत लांब
गेला आणि त्याने गनूकला हाक मारली.
“जागा हो! आणि बघ, तू काय करून ठेवले आहेस ते!” रेव्हन किंचाळला.
गनूकने जेव्हा रेव्हनचे हे शब्द ऐकले तेव्हा त्याने उडी मारली आणि घाण
पाहिली. स्वतः घाण केली असे समजून ती स्वच्छ करण्यासाठी तो समुद्राकडे
धावत गेला. रेव्हनने आता वेळ वाया घालवला नाही. तो विहिरीकडे पळत गेला
आणि त्याने ते शक्तिशाली झाकण वर उचलले. आधी तो थोडे पाणी प्याला.
जेव्हा त्याची तहान भागली तेव्हा त्याने तोंडभरून पाणी घेतले. धुराड्यातून
उडायला सुरुवात केली. पण गनूकने त्याला थांबवले.
गनूकने जाळ तयार केला आणि रेव्हनने त्याला फसवल्यामुळे त्या
जाळाबरोबर निर्माण होणाऱ्या धुरात त्याला लपेटून टाकले. परिणामतः त्या
धुराने रेव्हनचा रंग काळा झाला. तो याच्या आधी नेहमीच पांढरा होता. शेवटी
गनूकला त्याच्या मेव्हण्याची दया आली आणि त्याने रेव्हनला जाऊ दिले.
रेव्हन “नास’ नदीवर असलेल्या त्याच्या घराकडे उडून गेला. उडताना
त्याने चोरून घेतलेल्या ताज्या पाण्याचे थेंब पडत राहिले. जिथे जिथे हे पाणी
पडले, तिथे तिथे जमिनीवर सरोवरे, नद्या आणि ओढे तयार झाले.