दुर्लक्षित गणपती

 



बसलोय एकटाच मी

एक दुर्लक्षित गणपती

भल्या मोठ्या या मंडपात

कर्णकर्कश गाणी सहन करत

कृत्रिम प्रकाशाचा रंगीबेरंगी

मारा सहन करत…

माझ्यासाठी वर्गणी गोळा करताना

जमले होते वीस -पंचवीस डोमकावळे

आणि आता माझ्या सेवेला सोडा आरतीलाही

हजर नसतो त्यातला एकही

रात्री जमा होतात सारे माझ्या मंडपा बाहेर

पण माझी सोय पाहण्यासाठी नाही

तर स्वतःची सोय करण्यासाठी …

माझी सेवा करायचीच नव्हती

तर कशाला मांडलात बाजार

माझ्यावरील तुमच्या खोट्या श्रद्धेचा

आणि का उधळलेत लोकांकडून

जमा केलेले लाखो रुपये

विनाकारण माझ्या नावावर …

माझ्या नावावर तुमच्याकडे जमा झालेल्या

वर्गणीवर आणि माझ्या मंडपाबाहेर माझ्या दर्शनासाठी

लागलेल्या रांगेवरच ठरणार असेल

माझी सेवा किती करायची तर

असा पाहुणचार न घेतलेलाच बरा नाही का ?

माझ्या खऱ्या भक्तानो …

कवी – निलेश बामणे

— निलेश बामणे

Author