भारतमातेच्या वीरांगना – 1 : मातंगिनी हाजरा

१९३२ साली गांधीजींच्या नेतृत्वात संपूर्ण देशभर अनेक आंदोलने सुरू होती. एक जुलुस असाच मातंगिनी च्या घरासमोरून गेला, बंगाली परंपरेनुसार तिने शंखध्वनी करून त्याचे स्वागत केले आणि त्या जुलूसचा एक भाग बनली. तामलूक मधील बाजारात एका सभेत मातंगिनी ने तन-मन-धन देशासाठी समर्पित करेन अशी शपथ घेतली. एक न शिकलेली विधवा स्त्री त्या क्षणी हजारो भारतीयांची प्रेरणा स्थान क्रांतिकारी बनली.



आई, बहीण, मुलगी, पत्नी ह्या सगळ्या जवाबदऱ्या सहज पार पाडून आपले देशप्रेम आणि राष्ट्रीयकर्तव्य लीलया पार पडणाऱ्या अनेक वीरांगना भारतमातेच्या उदरी जन्माला आल्या. त्या नुसतीच मैदानावरची लढाई नाही लढल्या तर त्यांनी कठोर लढा दिला समाजरचनेला, शत्रूला, जो त्यांच्या आणि त्यांच्या राष्ट्र प्रेमाच्या आड येईल त्या सगळ्यांना आणि आपलं स्त्रीपण झुगारून नव्हे तर ते सुंदर रित्या स्वीकारून, सांभाळून मानाने जगल्या आणि तश्याच विरगतीला प्राप्त झाल्या. अश्या वीरांगना आज इतिहासाच्या पानात कुठेतरी लपल्या, लोपल्या त्यांना ही माझी शाब्दिक मानवंदना.


मातंगिनी हाजरा

गांधी बुढी असं प्रेमाने हाक मारली जाणारी स्त्री कशी असेल ह्याचा शोध घायचा ठरवला आणि मातंगिनी हाजरा पांढरी खादीची साडी नेसणारी एक वृद्ध महिला इतिहासाच्या पानात लपलेली आढळली.

ही क्रांतिकारी इतकी इतिहासात गहाळ झाली की तिच्या आधीच्या आयुष्याबद्दल फार कुठे वाचनातच नाही आलं. मग ह्या मातंगिनी चा शोध सुरू झाला. १८६९ साली होगला गावात मातंगिनी चा जन्म एका अतिशय गरीब शेतकरी कुटुंबात झाला. घरात अठराविश्व दारिद्र्य नांदत असतांना तिथे सरस्वतीचा वास कसा होणार? मातंगिनी ला शिक्षण मिळालेच नाही. नशिबात लक्ष्मी परत एकदा आडवी आली, हुंडा देण्याची परिस्थिती नव्हतीच मग काय वयाच्या १२ व्या वर्षी ६० वर्षीय त्रीलोचन हाजरा ची पत्नी झाली. केवळ सहा वर्षाचे संसार सुख आणि मातंगिनीला वैधव्य आलं.

मातंगिनी आपल्या व्यवहाराने सगळ्या गावाची आई झाली. १९३२ साली गांधीजींच्या नेतृत्वात संपूर्ण देशभर अनेक आंदोलने सुरू होती. एक जुलुस असाच मातंगिनी च्या घरासमोरून गेला, बंगाली परंपरेनुसार तिने शंखध्वनी करून त्याचे स्वागत केले आणि त्या जुलूसचा एक भाग बनली. तामलूक मधील बाजारात एका सभेत मातंगिनी ने तन-मन-धन देशासाठी समर्पित करेन अशी शपथ घेतली. एक न शिकलेली विधवा स्त्री त्या क्षणी हजारो भारतीयांची प्रेरणा स्थान क्रांतिकारी बनली.

मिठाचा सत्याग्रह : १९३० साली त्यांना सशक्त कारावास झाला. शिक्षा भोगून बाहेर आली पण तिने कर निर्मूलनासाठी परत एकदा निषेध केला आणि परत एकदा कारावास नशिबी आला ह्यावेळी ६ महिन्यांसाठी बहारामपूर येथे. ६ महिन्यानंतर बाहेर आल्यावर ती काँग्रेस कार्यकर्त्या बनली आणि गांधीजींच्या प्रभावामुळे खादी सूत कातायला आणि विणायला शिकली.

आता भारत छोडो आंदोलन सगळीकडे जोर पकडत होते. त्या अंतर्गत सरकारी कचेऱ्यांवर आपला झेंडा फडकवणे असा कार्यक्रम भारतभर सुरू होता. ७२ वर्षीय मातंगिनी ६००० कार्यकर्त्यांच्या तुकडीचे नेतृत्व करत तामलूक पोलीस ठाण्याकडे पुढे गेली. पोलिसांनी आंदोलनकरींवर गोळ्या झाडायला सुरवात केली, पहिली गोळी मातंगिनी च्या दंडावर लागली, तरीही पुढे होत तिने पोलिसांना आव्हान केले की तुम्ही निशस्त्र लोकांवर गोळ्या झाडू नका. तरीही गोळीबार सुरू राहिला. मातंगिनी ला ३ गोळ्या लागल्या, ती चालतांना ‘वंदे मातरम’ असं मोठ्याने घोषणा देत होती, आपल्या सहकाऱ्यांना साथ देत होती. हातात तिरंगा घेऊन पुढे चालत असलेली मातंगिनी कोसळली आणि विरगतीला प्राप्त झाली.

कुठलंही शिक्षण नसतांना केवळ आपल्या मनाच्या निर्धारावर देशासाठी वयाच्या ७२ व्या वर्षी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या वीरांगनेला माझे शतशः नमन.

— सोनाली तेलंग.

संदर्भ: विकिपीडिया, अमारदेश ऑनलाइन.कॉम, Amritmahotsav.nic.in

०४/०६/२०२२.

Author