भाजीचा प्रताप

एक राजा होता. तो एकदा आपल्या महालाच्या खिडकीपुढं बसला होता. तिथं त्याला रस्त्यावरून एका फेरीवाल्याची आरोळी ऐकू आली.. ‘भाजी घ्या हो भाजी ! चमत्काराची भाजी! भाजी घ्या भाजी!’ राजाला नवल वाटलं. चमत्काराची भाजी म्हणजे कसली भाजी बुवा? त्यानं नोकराला सांगितलं, ‘जा, त्या भाजीवाल्याला बोलाव.’ भाजीवाला आला तेव्हा राजानं त्याला विचारलं चमत्काराची भाजी म्हणालास काय?



(झेकोस्लोवाकियाची लोककथा)

एक राजा होता. तो एकदा आपल्या महालाच्या खिडकीपुढं बसला होता.

तिथं त्याला रस्त्यावरून एका फेरीवाल्याची आरोळी ऐकू आली.. ‘भाजी घ्या हो भाजी ! चमत्काराची भाजी! भाजी घ्या भाजी!’ राजाला नवल वाटलं. चमत्काराची भाजी म्हणजे कसली भाजी बुवा? त्यानं नोकराला सांगितलं, ‘जा, त्या भाजीवाल्याला बोलाव.’ भाजीवाला आला तेव्हा राजानं त्याला विचारलं चमत्काराची भाजी म्हणालास काय?

भाजीवाला म्हणाला, ‘होय महाराज!’ ‘म्हणजे काय? मेथीची भाजी, पालकाची भाजी, भेंडीची भाजी म्हटलं तर समजतं; पण चमत्काराची भाजी म्हणजे काय? ‘ ‘ते, महाराज, जो भाजी विकत घेईल त्यालाच मी सांगेन.’ ‘मी घोतो तुझी ही भाजी विकत.’ ‘पण त्यासाठी माझी किंमत भारंभार सोनं ही आहे!’ राजाला आश्चर्य वाटलं.

साध्या भाजीपाल्याची एवढी किंमत? तो म्हणाला, ‘दाखव बघू तुझी भाजी.

भाजीवाल्यानं वरचा कपडा काढून भाजी दाखविली. साधी पालेभाजीसारखी तर ही भाजी दिसत होती. पण राजाला ही काय गंमत आहे, ते समजून घ्यायची उत्सुकता लागली होती. तो म्हणाला, बरं, चल दिली तुला ती किंमत!’ तेव्हा भाजीवाला म्हणाला, ‘महाराज, या भाजीचा गुण असा आहे की जो ही खाईल त्याला पशु-पक्षी, किडे-मुंग्या वगैरे सर्व जीवजंतूंची भाषा आपोआप समजायला लागेल!’ राजा म्हणाला, ‘असं? वाः खरंच चमत्कार म्हणायचा!’ त्यानं ती भाजी ठेवून घेतली, तिचं वजन केलं आणि त्या वजनाचं सोनं द्यायला आपल्या खजिनदाराला सांगितलं. मग त्यानं आपल्या स्वैपाक्याला बोलावलं आणि म्हणाला, ‘बुढा, ही भाजी आज करून मला वाढायची आहे. पण लक्षात ठेव यातलं एक पान देखील दुसऱ्या कुणाला तोंडात घालायलादेखील द्यायचं नाही!’ बुढ्ढा हात जोडून ‘बरं आहे, महाराज! म्हणाला आणि त्यानं ती भाजी मुदपाकखान्यात (मोठ्या स्वैपाकघरात) नेली. त्यानं ती भाजी हातात घेऊन उलटून पालटून पाहिली. पानन् पान तपासलं; पण त्याला तिच्यात विलक्षण असं काही आढळलं नाही. त्याला आश्चर्य वाटलं. तो आपल्याशीच पण जरा मोठ्यानं म्हणाला, कुणालादेखील एक पानसुद्धा तोंडात घालायला द्यायचं नाही एवढं या भाजीला काय लागलंय? ‘ त्याचे हे शब्द जवळच त्याचा साथीदार उभा होता त्याच्या कानी पडले, त्यानं चमकून बुढ्ढ्याकडं पाहिलं अन् विचारलं ‘बुढेबाबा, काय म्हणालात?’ ‘काही नाही, ही भाजी आत्ताच महाराजांना खाऊ घालायची आहे, सगळीच्या सगळी. आजवर महाराज गुरासारखी आख्खी पेंडी पाल्याची कधी खात नव्हते; ही भाजी मात्र आख्खीच्या आख्खी आपण खाणार म्हणाले. एवढं या भाजीत काय विशेष आहे, कुणास ठाऊक!’ बुढ्ढ्या स्वैपाक्याचा हा साथीदार तरुण होता, हुशार अन् चलाख होता.

एका गरीब बाईचा मुलगा वशिल्यानं राजवाड्यात कामाला म्हणून लागला होता.

अन् तूर्त त्याला मुदपाकखान्यात बुढ्ढा स्वैपाक्याच्या हाताखाली मदतीला देण्यात आलं होतं. त्याचं नावं होतं ब्रजकिसन.

सारा स्वैपाक तयार झाला. त्याबरोबर अर्थात् भाजीही तयार झाली. आता राजेसाहेब जेवायला येणार, एवढ्यात ब्रजकिसनला वाटलं, आपण थोडी भाजी चपातीबरोबर खाऊन तर पाहू. एवढीशी भाजी खाल्ली तर कुणाला कळणार आहे? असं मनात म्हणून, त्यानं इकडं-तिकडं बघून, चोरून त्यातली थोडी भाजी अन् चपाती घेतली अन् जरा बाजूला तोंड करुन खाऊन टाकली. भाजी त्याला फार छान लागली.

तोंडात कोंबलेला शेवटचा खास त्याच्या पोटात जातो न जातो तो त्याच्या कानांवर कोणी बोलत असल्यासारखे शब्द आहे, ‘मला बाई इथली मिठाई फार आवडते. राजाच्या स्वैपाकघरातली मिठाई फार छान असते!’ कोण बोलतंय्? इथं या मुदपाकखान्यात या वेळेला तर कोणीच नाही; पण आपल्याजवळच कोणीतरी आपपसात बोलताहेत ते कोण हे तो पाहू लागला.

तर पुढच्या मिठाईवर घोंगावणाऱ्या दोन माशा आपपसांत हे बोलत आहेत असं त्याला दिसलं. त्याला आश्चर्य वाटलं. माशांचं बोलणं आपल्याला समजलं?

एवढ्यात त्याला दुसरा एक आवाज ऐकू आला. तो जरा दूर असलेल्या कोपऱ्यातून येत होता.. ‘मी एक खातो ना?’ ‘नाही, नाही, मी दोन्ही खाणार?’ ‘ते का म्हणून?’ ‘ते का म्हणून? हे लाडू मी ओढून आणले आहेत!‘ अरेच्चा ! हे कोण बोलतंय्? तर कोपऱ्यात एक बीळ होतं. अन् त्याच्या तोंडाशी छोन छोटेसे उंदीर आपापसांत भांडत होते. अरे, म्हणजे आपल्याला जीव-जंतूसुद्धा बोललेलं कळायला लागलं ! हा त्या भाजीचाच प्रताप आहे हे किसननं ओळखलं.

एवढ्यात दोन कावळे खिडकीत ‘काव काव’ करीत आले. किसनला त्यांचीही बोली कळली. एक कावळा म्हणत होता, माझ्या मुलाशी जर तू तुझ्या मुलीचं लग्न केलंस, तर मी तिला रोज राजाच्या उष्टयातला भात देत जाईन!

दुसरा कावळा म्हणाला, ठीक आहे, मला कबूल आहे.

वाः वाः ! पक्ष्यांचीदेखील भाषा आपल्याला समजू लागली.

राजाची स्वारी शिकारीला निघाली तेव्हा त्याच्या मागे असणाऱ्या शिलेदारांपैकी एक ब्रजकिसनचा दोस्त होता. त्यानं किसनलाही एका घोड्यावर घेतलं. घोडे दौडत चालले असताना किसनच्या कानावर शब्द आहे, ‘घोड्यावरचा स्वार कसा वजनदार अन् घट्ट पकडीचा पाहिजे. माझ्यावरचा स्वार अगदीच माशीच्या वजनाचा अन् ढिल्या पकडीचा आहे, त्यामुळे दौडायला उत्साहच वाटत नाही, फुर्र फुर्र! हे शब्द ऐकून ब्रजकिसनला हसू आवरेना आणि तो खो खो करून हसू लागला. त्याच्या शेजारचे शिलेदार आणि खुद्द राजाही या अचानक चमत्कारिक हसण्यानं त्याच्याकडं पाहू लागले. राजानं घोडा थांबविला अन् विचारलं, ‘हा कोण रे नवा शिलेदार!’ राजाच्या दिमतीतल्या शिलेदारानं भीत-भीत सांगितलं, ‘हां माझा एक दोस्त आहे आणि तो आपल्या मुदपाकखान्यात तूर्त काम करतो. पण तो हुशार अन् चलाख आहे म्हणून मी त्याला आपल्या टोळीत घ्यायचा विचार करून आज आणलंय्, महाराज!

राजानं ब्रजकिसनकडं पाहिलं. त्यानं हात जोडले अन् तो म्हणाला, ‘माफी करावी महाराज ! ‘ ब्रिजकिसनचा उमदा चेहेरा राजाला आवडला असावा.

त्यानं विचारलं, ‘दौड चालली असताना एकदम इतकं मोठ्यानं हसण्याइतकं काय तुला दिसलं?’ ‘दिसलं नाही महाराज ऐकू आलं!’ ‘ऐकू आलं? काय ऐकू आलं?‘राजानं विचारलं.

ब्रजकिसन गप्प राहिला. घोडा जे बोलला ते राजाला कसं सांगावं? तो काही बोलेना. राजा रागानं ओरडला, ‘सांग, काय तू ऐकलंस? नाहीतर आज तुझीच शिकार करीन!

ब्रजकिसन हात जोडून म्हणाला, ‘माफी करावी सरकार; पण मी ते सांगू शकत नाही. आपण माझ्यावर फार रागवाल.’ “मी रागावण्यासारखं काय ऐकलंस? बोल, मला कळलंच पाहिजे.

‘आपण मला माफी करीत असला तर सांगतो. राजानं माफी कबूल केली.

तेव्हा ब्रजकिसन म्हणाला, महाराज आपला घोडा बोलत होता की मला दौडायला उत्साहच वाटत नाहीय कारण माझ्यावरचा स्वार माशीसारखा हलका आहे अन् त्याची पकडच ढिली आहे!’ माझा घोडा बोलला अन् ते तुला कळलं? थापा मारतोस काय? बोलावून आण.’ ‘माझ्या जिवाची शपथ महाराज, आपला घोडा हे बोलला अन् ते मी ऐकलं.’ राजा क्षणभर गप्प राहिला. मग म्हणाला, ‘म्हणजे माझ्यासारखी तुलादेखील पशूंची बोली समजते? तू मुदपाकखान्यात काम करतोस? तू त्या दिवशीची चमत्काराची भाजी खाल्ली होतीस?’ ब्रजकिसन गोरामोरा झाला. हात जोडून म्हणाला, ‘होय महाराज, मी थोडीशी भाजी चाखून पाहिली होती!’ ‘तरीच! घोडा काय बोलला ते मला जसं कळलं तसं तुला कळलं. पण तू माझा हुकूम मोडून भाजी का खाल्लीस? त्याबद्दल तुला जबर शिक्षा का करू नये? चला रे, आपण परत जाऊ!’ असं म्हणून राजा परत महालाकडं आला.

राजा महालात येऊन आपल्या पलंगावर पडला. आपल्या घोड्यानं आपल्या म्हातारपणाची चेष्टा केली आणि ती आपल्या ह्या नोकराला कळली आणि तो आपल्याला हसला, याचं त्याच्या मनाला दुःख वाटलं अन् रागही आला. आता आपली अशी चेष्टा बाहेर लोकांतही होणार याचं त्याला दुःख वाटलं. याला काय उपाय करावा? आपण लग्न करावं, म्हणजे लोक आपली अन् आपल्या म्हातारपणाची चेष्ट करणार नाहीत असं त्याच्या मनात आलं. पण आपणाशी या वयात कोण राजकन्या लग्न करायला तयार होणार किंवा कोण राजा आपली तरुण मुलगी आपल्याला देणार?

असा त्याचा विचार चालला असताना कोणाची तरी भांडाभांडी चाललेली त्याच्या कानावर पडली, ‘हा केस तुझा नाही, माझा आहे. मी तो अगोदर बघितला अन् तुला सांगितलं.

‘पण तो चोंचीत धरून आणला मीच ना, म्हणून त्यावर माझाच हक्क आहे. ‘ ‘ते काही नाही, तू चोर आहेस, मी सांगितल्यावर तू त्यावर झडप घालून मी जायच्या अगोदर तू उचलून घेऊन पळालीस.

‘फार शहाणी आहेस. ज्याला दिसलं त्याचं धन की ज्याला मिळालं त्याचं?’ असं भांडण अन् बाचाबाची चालली होती आणि राजा ऐकत होता.

त्याला दिसलं, दोन सुगरण पक्षी आपापसात भांडत होते. दोन्ही पक्षिणी असल्या पाहिजेत. त्या कशाबद्दल भांडताहेत हे राजा बारकाईनं बघू लागला, तर एकीच्या चोचीत एक लांबसडक सोनेरी चमचम करणारा केस होता अन् त्याबद्दल दोघीचं भांडण चाललं होतं. एक म्हणत होती, ‘राजकन्या सोनचंपा केस विंचरायला बसली असतानाच तिचे गळलेले केस वेचून घ्यायला मी टपून बसले होते, तू कुठं तिथं होतीस? तुला मी बोलले तेव्हा तू तिकडं उडत गेलीस ना?’ ‘हो, पण अग, मला किनई माझ्या बाळासाठी रजई करायची आहे, तू मला दे ना तो केस ! ‘ राजाच्या मनात आलं, ‘कोण बरं ही सोनचंपा राजकन्या’ आत्तापर्यंत नाव कधी ऐकलेलं नाही. कुठल्या तरी लांबच्या देशाची राजकन्या असावी. ती बरी आपल्याला राणी करायला. पण तिला इथं आणायची कशी? कुणाला हे काम सांगावं? राजा विचार करू लागला, इतक्यात त्याचं संध्याकाळचं खाणं-पिणं घेऊन एक दासी अन् एक नोकर आला. हा नोकर म्हणजे ब्रजकिसन होता.

त्याला बघून राजाच्या मनात एक विचार झटकन येऊन गेला. खाणं पिणं ठेवून दोघे परत फिरणार, तोच राजा ब्रजकिसनला म्हणाला, ‘तू थांब.’ तो उभा राहिला. दासी निघून गेली.

राजा त्याला म्हणाला, तू माझा हुकूम मोडून माझा अपमान केला आहेस आणि घोड्यानं माझी केलेली चेष्टा तू ऐकली आहेस. तुला मी जिवंत ठेवणार नाही. बोल, तुला फासावर चढवू की तुझं डोकं उडवू?”

ब्रजकिसन गयावया करीत म्हणाला, ‘महाराजांनी विनाकारण गरिबाचा जीव घेऊ नये. पशु-पक्षांची बोली मला समजू लागल्यानं महाराजांचं मी काही नुकसान करणार नाही. महाराज जी भाजी खाणार ती बिनमाहितीची, कधी कोणी न बघितलेली, कधी कोणी न चाखलेली, अशी जर महाराजांना खाऊ दिली तर महाराजांच्या जीवाला धोका कशावरून पोचणार नाही, असं वाटून मी ती भाजी अगोदर चाखून पाहिली आणि मग महाराजांना दिली. यात मी आपला अपराध केला असं महाराजांना वाटतं कां?’ ब्रजकिसनचा प्रश्न बिनतोड होता. स्वतःचा जीव धोक्यात घालून आपला जीव वाचविण्याची काळजी घेणाऱ्याचाच आपण जीव घ्यायचा काय, असा हा प्रश्न होता.

महाराज काही वेळ गप्प बसले. मग त्याला म्हणाले, ‘तुझ्यावर एक कामगिरी सोपवितो. ते बघ, त्या खिडकीत दोन सुगरण पक्षी भांडताहेत, दिसले?

त्यांच्यापैकी एका पक्षाच्या चोचींत एक चमचम करणारा सोनेरी केस आहे, दिसला? नीट बघून घे.’ ब्रजकिसननं जरा पुढं सरकून जवळून तो केस बघितला. राजा म्हणाला, ‘तो केस आहे एका राजकन्येचा. तिचं नाव सोनचंपा. या राजकन्येचा शोध लावून तिला इकडं तू घेऊन ये. तिला मी माझी राणी बनविणार आहे. जर हे काम तू केलंस तर तुझा जीव वाचेल, न केलंस तर या माझ्या देशात तुला पुनः पाऊल टाकू देणार नाही, आलेला दिसलास तर तिथल्या तिथं तुझं डोकं उडवलं जाईल!

ब्रजकिसनच्या मनात आलं, आत्ता तरी आपण जीवे सुटलो; पुढचं पुढं पाहू.

त्यानं ती कामगिरी कबूल केली. त्यानं राजाकडून एक चांगला घोडा मागितला आणि वाटखर्चीला काही धन मागितलं. राजानं ते सर्व देण्याचा आपल्या प्रधानाला हुकूम केला आणि ब्रजकिसन आपल्या कामगिरीवर निघाला. बुढ्ढा स्वैपाक्यानं त्याला वाटेत खाण्याकरिता शिदोरी बांधून दिली.

घोड्यावर स्वार होऊन ब्रजकिसन निघाला, पण कुठं, कुणीकडं जायचं ते काही त्याला ठाऊकच नव्हतं. घोडा नेईल तिकडं, नशिबावर हवाला ठेवून, जायचं असं त्यानं ठरविलं. घोडा दौडत दौडत घोर जंगलात शिरला.

ब्रजकिसनही पाहत पाहत चालला. एके ठिकाणी त्याला आग लागलेली दिसली. तिकडं तो गेला, तेव्हा आगीच्या मधोमध मुंग्यांचं एक मोठं वारुळ असलेलं त्याला दिसलं. त्यातून हजारो मुंग्या रडत ओरडत बाहेर धावत होत्या.

‘आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा’ असं त्या ओरडत असलेल्या तो ओरडा ऐकून त्याला दया आली. तो घोड्यावरून खाली उतरला आणि झाडांच्या ढाप्या मोडून आजूबाजूला पसरत चाललेली आग विझविण्याचा प्रयत्न करू लागला. पुनः काही ढाप्या मोडून तो आगीच्या आत-आत शिरला आणि त्यानं सारी आग विझवून टाकून त्या मुंग्यांचा बचाव केला. मुंग्यांनी बघितलं की एक माणूस आला अन् त्यानं आपला बचाव केला. त्या मोठ्या संख्येनं त्याच्यापुढे आल्या आणि माना वळवून त्यांनी त्याचे आभार मानले. त्या म्हणाल्या, ‘तू आज आमचा जीव वाचविलास; कधीतरी आम्ही देखील तुला मदत करू.’ ब्रजकिसन हसला. तेव्हा मुंग्यांची राणी म्हणाली, ‘तुला खरं वाटत नाही?

पण वेळ आली की बघ, आम्ही तुझ्या मदतीला येतो की नाही! नुसती आमची तू आठवण कर, की आम्ही आलोच समज! ‘ “ब्रजकिसन घोड्यावर स्वार होऊन पुढं निघाला. जाता-जाता एके ठिकाणी त्याला कावळ्याची दोन पिलं घरट्यातून खाली पडलेली दिसली. प्रत्येक पिलू रडून म्हणत होतं, ‘आई,मला घरट्यात ने, आई मला घरट्यात ने.’ आणि त्यांचे आई-बाप कावळे त्यांच्याभोवती फक्त घिरट्या घालीत रडत होते. त्यांना त्या पिलांना उचलता येत नव्हतं. ब्रजकिसन घोड्यावरून उतरला,त्यानं ती दोन पिलं आपल्या तळहातावर घेतली आणि झाडावर चढून त्यांच्या घरट्यात अलगद ठेवून दिली.

कावळा – कावळीनं ब्रजकिसनचे आभार मानले. म्हणाले, ‘कधी काही आमची गरज लागली तर आमची आठवण कर, आम्ही येऊन तुला मदत करू!’ ब्रजकिसनला वाटलं, आपण कुठं असणार अन् ही जोडी कुठं असणार? आणि ही तिथं आपल्याला काय मदत करणार ! पण तो बोलला नाही. तसाच घोड्यावर स्वार होऊन पुढं चालला.

खूप वेळानं तो त्या जंगलातून बाहेर पडला आणि एका मोठ्या तलावाच्या काठावर आला. घोड्याला तलावापाशी नेऊन ब्रजकिसन खाली उतरला आणि त्यानं अगोदर घोड्याला पाणी दाखविलं आणि मग आपण पाणी पिण्यासाठी जरा पुढं गेला, तो दोन मच्छीमार आपापसात भांडत होते. एक म्हणत होता, ‘हा सोनेरी मासा मी मारलाय्, तो माझा आहे, तर दुसरा म्हणत होता, ‘पण जाळं माझं होतं, म्हणून मासा माझा आहे, ‘ आणि पलीकडं तो सोनेरी मासा अर्धवट पाण्यात उलथापालथा होऊन ओरडत होता, ‘मला वाचवा, मला वाचवा. ‘ ब्रजकिसनला त्या माशाची दया आली. तो पुढं होऊन त्या मच्छीमारांना म्हणाला, ‘तुमचा हा मासा मी विकत घेतो, मला द्या.’ असं म्हणून त्यानं आपल्या खिशात जेवढ्या मोहोरा होत्या, त्या सर्व मुठीत घेऊन त्यांच्यापुढं केल्या.

मच्छीमारांना हा सौदा खूपच फायदेशीर वाटला आणि त्यांनी चट्कन् मोहोरा घेऊन तो मासा त्याला देऊन टाकला.

ब्रजकिसननं तो मासा तसाच त्या तलावाच्या खोल पाण्यात सोडून दिला.

म्हणाला, ‘जा, सुखानं रहा! ‘पाण्यात शिरता शिरता तो मासा म्हणाला, तुमचे हे उपकार मी कधी विसरणार नाही. कधी माझी गरज लागली तर माझी आठवण करा, की मी येऊन तुमचं काम करीन!

मच्छीमारांना आश्चर्य वाटलं इतक्या मोहोरा देऊन खरेदी केलेला मासा हा माणूस फिरून पाण्यात सोडून देत आहे हे कसं, त्यांना कळेना. त्यांनी विचारलं, ‘बाबारे, तू कोण आहेस? इथं काय करतोस?

ब्रजकिसननं आपण कोणत्या कामगिरीवर निघालोय् ते थोडक्यात त्यांना सांगितलं आणि उसासा टाकून म्हणाला, ‘पण ही सोनचंपा कुठं अन् कशी?

नशीबावर हवाला ठेवून जीव बचावावा म्हणून मी आपला भटकत निघालोय् खरा! ‘ हे ऐकून ते मच्छीमार म्हणाले, ‘अरे, ती सोनचंपा? सोनचंपा राजकन्येला शोधणं काय कठीण? ती या तलावाच्या मध्यातच ते दूर बेट दिसतंय ना, तिथल्या राजाची मुलगी आहे. ते बघ तो राजाचा महाल इथून दिसतो आहे. तू बस आमच्या होडीत, आम्ही नेतो तुला त्या बेटावर. पण एक अडचण आहे. त्या राजाला एक नव्हे, बारा मुली आहेत त्यातून या सोनचंपेला तू कशी शोधणार?’ ब्रजकिसन म्हणाला, ‘तिथपर्यंत तर जाऊ. ज्यानं मला इथंवर आणलं आणि राजकन्येचा पत्ता माहीत करुन दिला, तोच पुढं काय अन् कसं करायचं ते दाखवील.’ त्यानं आपला घोडा एका झाडाला बांधून त्याला तोबरा दिला आणि त्या होडीत बसून तो निघाला.

मच्छीमारांनी त्याला बेटावर उतरविला आणि ते परत गेले. ब्रजकिसन हळूहळू राजवाड्यापाशी आला आणि चौकीदाराला म्हणाला, ‘ मला महाराजांना भेटायचं आहे. मी दूरच्या देशाहून त्यांना भेटायला आलोय्.’ चौकीदारानं त्याला आत राजापाशी नेऊन सोडलं.

राजा त्यावेळी बुद्धिबळाचा खेळ खेळत होता. त्याने या नव्या पाहुण्याकडं पाहिलं अन् म्हणाला, ‘हं बस, आणि टाक डाव!’ ब्रजकिसन बसला. त्यानं डाव पाहिला अन् एक प्यादं पुढं सरकवलं. असं खेळता खेळता तो राजाला म्हणाला, ‘मी माझ्या देशाच्या राजाकडून आपल्या सोनचंपेला मागणी घालण्याकरिता आलो आहे!’ हे ऐकून राजानं डोकं वर करून पाहिलं. जवान चांगला तगडा, रूपानं डोळ्यांत भरण्याजोगा, वागण्यात आदबशीर अन् बोलण्यात चतुर असा त्याला दिसला. तो म्हणाला, ‘माझ्या सोनचंपेला मागणी? माझी मुलगी काय वाटेवर पडली आहे असं वाटलं की काय तुझ्या राजाला? कुठं आहे तो तुझा राजा?

इतक्या दूर त्याला सोनचंपेचा वास कसा आला?

“ब्रजकिसननं पक्षांच्या चोचीत दिसलेल्या सोनचंपेच्या केसांची हकिगत सांगितली. पक्षांची बोली कळून त्यांच्याकडून सोनचंपेचं नाव कळलं हे ऐकून राजाला मजा वाटली. पण तो म्हणाला, ‘तू त्या राजाचा दूत आहेस ना? जर तुझ्या राजाला सोनचंपा हवी असली तर तुला पहिल्यांदा माझी एक शर्त पुरी करावी लागेल!’ ‘ती कोणती!‘ब्रजकिसननं विचारलं.

‘शर्त अशी की तीन दिवस जी तीन कामं मी तुला दाखवीन, ती तुला करता आली पाहिजेत. तर मग पुढची गोष्ट.’ ब्रजकिसन म्हणाला, ‘बोला, आजच्या या पहिल्या दिवशी आपलं कोणतं पहिलं काम आहे? ‘ राजा उठून त्याला आपल्या गडाच्या खिडकीपाशी घेऊन गेला, म्हणाला, ‘खाली तुला काय दिसतंय?’ ‘गवत.’ ‘साधं गवत नाही, हत्ती गवत. हत्ती जरी या गवतात शिरला तरी दिसायचा नाही इतकं उंच हे गवत आहे. माझी सोनपंचा एके दिवशी या खिडकीत बसून आपल्या गळ्यातल्या मोत्यांच्या माळेशी चाळा करीत असताना सगळे मोती ओघळून खाली पडले अन् त्या गवतात गडप झाले. तू ते एकूण एक मोती शोधून आणून मला दे. हे माझं पहिलं काम ‘ ब्रजकिसन खाली गवतात उतरला. खिडकीखालचा बहुतेक भाग त्यानं फिरुन खाली हात घालून शोधला; पण एकही मोती हाती लागला नाही. मोती केवढे बारीक, त्या मानानं गवत किती मोठं अन् गच्च, मोती सापडावीत कशी?

त्यासाठी गवताच्या मुळातल्या मातीचा कण न् कण तपासावा लागेल. हे माणसाच्या साध्या डोळ्यांना कसं शक्य आहे? मुंग्यांसारख्यांकडूनच हे काम होण्यासारखं आहे ! असं मनात येताच त्याला त्या जंगलातल्या मुंग्यांची आठवण झाली.

इतक्यात त्याच्या कानी आवाज आला, मित्रा, चिंता करू नकोस. का आमची आठवण केली सांग ! त्या मुंग्यांच्या राणीला बघून ब्रजकिसनला आश्चर्य वाटलं. त्यानं तिला आपलं काम सांगितलं. मुंग्यांचा थवाचा थवा कामाला लागला. काही वेळानं दोन-दोन मुंग्या एक-एक मोती ढकलीत ढकलीत ब्रजकिशोरपाशी आणून ठेवू लागल्या. संध्याकाळपर्यंत त्यांच्या पायापाशी मोत्यांचा लहानसा ढीग झाला.

मुंग्या म्हणाल्या, ‘आता गवतात एकदेखील मोती नाही. ब्रजकिसननं सगळे मोती गोळा करून आपल्या रुमालात भरले अन् तो चालू लागणार इतक्यात आवाज आला.. थांबा ! ‘ एक लंगडी मुंगी एक लहानसा मोती लंगडत लंगडत ढकलीत आणीत होती.

ती म्हणाली, ‘माझा एक पाय त्या आगीत भाजल्यामुळं मी लंगडी झाले. पण तुझं काम मी लंगडी असले तरी टाकलं नाही हं!’ ब्रजकिसन तिचे आभार मानून म्हणाला, ‘शाबास, शाबास ! तूसुद्धा काही कमी नाहीस बरं ! एवढा एक लहानसा मोती राहिला असता तरी मी हरलो असतो. तू लंगडी असूनसुद्धा मोठं काम केलंस हं!’ ब्रजकिसननं राजापुढं जाऊन सगळे मोती ठेवले. राजानं ते मोजून पाहिले.

सगळे बरोबर जेवढे होते तेवढे मिळाले ! तो म्हणाला, ‘हां, हे काम तू पुरं केलंस खरं! आता उद्या दुसरं.’ दुसऱ्या दिवशी राजा म्हणाला, ‘हा तलाव पाहिलास? ‘ किसन म्हणाला, ‘पाहिला. ‘ राजा म्हणाला, ‘एक दिवस माझी सोनचंपा या तलावात अंघोळ करीत असताना तिच्या बोटातली अंगठी पाण्यात पडली, ती सापडत नाही. लाल माणिक असलेली ती अंगठी होती. ती अंगठी तू शोधून काढ हे आजचं दुसरं काम ! ‘ ब्रजकिसन अंगठी शोधायला काठावर गेला. त्यानं पाहिलं, तलाव इतका मोठा होता की पलीकडचा तीरच दिसत नव्हता, जणू समुद्रच. तो तलावात उतरला आणि त्याचा तळ शोधू लागला तर तो तळही त्याला सापडला नाही.

अशा या अथांग तलावात पडलेली एवढीशी अंगठी शोधायची कुठं अन् कशी !

पाण्यात राहणारा मासाच हे काम करणं शक्य आहे असं त्याच्या मनात आलं अन् त्याला त्या सोनेरी माशाची आठवण झाली. त्याबरोबर त्याच्या लगतच त्याला शब्द ऐकू आले, ‘मी हजर आहे!’ मग ब्रजकिसननं त्याला आपली कामगिरी सांगितली. मासा म्हणाला, ‘त्यात काय आहे? माझे सगळे भाईबंद इथं तुझ्या मदतीला आहेत असं समज.

तलावाचा तळ सगळाच्या सगळा आम्ही शोधून काढू!

ब्रजकिसन काठाच्या बाजूच्या पाण्यात उभा राहून वाट पाहू लागला. बराच वेळ गेला, कोणी आलं नाही, तसा तो निराश होऊ लागला. तो वर काठावर येऊन बसला. आता सूर्य मावळतीकडं झुकत चालला होता अन् दिवस संपणार होता. ही या प्रचंड तलावात हरवलेली अंगठी आपल्याला मिळणं कठिणच, असं त्याला वाटू लागलं. तेवढ्यात त्याच्या पुढ्यात डोकं वर काढून तो सोनेरी मासा आला आणि म्हणाला, ‘हीच का सोनचंपेची अंगठी, पाहा.’ ‘ब्रजकिसनने माशानं टाकलेली अंगठी उचलली. ती मध्ये माणकाचा खडा बसविलेला राजानं सांगितली तशी अंगठी होती. त्याला खूप आनंद झाला. तो माशाला म्हणाला, ‘मित्रा, तुझे किती आभार मानू कळत नाही. ‘ मासा म्हणाला,’तुझ्या उपकाराच्या ओझ्यातून बाहेर पडण्याची एवढी संधी मला मिळाली याचा मलाच आनंद वाटतो. आता मी जातो. असं म्हणून सोनेरी मासा दिसेनासा झाला.

अंगठी पाहून राजाला आनंदही वाटला आणि खूप आश्चर्यही वाटलं. त्याला वाटत होतं, माणसाला हे काम करणं अशक्य आहे. तो ब्रिजकिसनला म्हणाला, ‘वाः ! हे दुसऱ्या दिवसाचं दुसरं कामदेखील तू यशस्वी केलंस. आता उद्या तिसऱ्या दिवसाचं तिसरं काम.

‘तिसऱ्या दिवशी त्यानं त्याला सांगितलं, ‘माझ्या सोनचंपाला विषजळ अन् अमृतजळ हवं आहे, ते तू आणून दे.’ आता ही दोन जळं म्हणजे काय, ती कशी असतात, कुठं मिळतात हे राजानं काहीच सांगितलं नाही. ती शोधायची कुठं?

असा विचार करीत ब्रजकिसन इकडे-तिकडे फिरू लागला. त्याला वाटलं, पाण्याचे असे झरे असतील; पण विषाचं पाणी अन् अमृताचं पाणी हे तरी ओळखायचं कसं? काही न सुचून तो घनदाट जंगलात पोचला. आपल्याला भेटलेलं ते कावळ्यांचं जोडपं हे काम करू शकेल कां? असं मनात आलं तोच ती जोडी हजर झाली. म्हणाली, ‘आम्ही इथं या झाडावर आहोत, काय काम करायचं सांग ! ‘ ब्रजकिसननं पाहिलं तर ते दोन कावळे ! तो त्यांना म्हणाला, ‘राजानं मला फक्त विषजळ आणि अमृतजळ आणि एवढंच सांगितलं; त्या संबंधानं आणखी काही सांगितलं नाही. ही दोन जळं आता कुठं शोधायची? तुमची काही मदत होईल?’ ती जोडी म्हणाली, ‘ते काम आमचं. आम्हाला ते माहीत आहे. तू इथं थोडा वेळ वाट पहा.’ असं सांगून ती दोघं उडाली. ब्रजकिसन त्याच झाडाखाली वाट पाहत बसला.

तासाभरात ती जोडी परत आली. एकेकाच्या चोंचीत एक-एक कुपी होती.

कावळा म्हणाला, ‘ही विषजलाची कुपी.’ कावळी म्हणाली, ‘ही अमृतजळाची कुपी. ‘ दोन्ही त्याच्या पुढ्यात ठेवून तो आभाराचे शब्द उच्चारण्याच्या पूर्वीच ती दोघं उडून गेली.

त्या कुप्या घेऊन ब्रिजकिसन राजाच्या गडाकडं परत आला. इतक्यात त्याच्या कानावर एक किंकाळी आली, ‘वाचवा, वाचवा, कुणी मला वाचवा!‘ ब्रजकिसनला दिसलं, की गडाच्या दरवाजाच्या कमानीत कोळ्याचं एक मोठ्ठे जाळं होतं अन् त्यात एक माशी अडकून त्यातून सुटू पाहत होती; पण अधिकाधिकच गुरफटत होती. आणि तिकडून एक मोठा कोळी हळूहळू आपल्या त्या भक्ष्याकडे नजर ठेवून येत होता, म्हणून ती माशी ओरडत होती.

ब्रजकिसन तिला वाचविण्यासाठी धावत जातो, तो कोळ्यानं तिला आपल्या तोंडात धरलेलं त्याला दिसलं. रागारागानं त्यानं विषजळाच्या कुपीतला फक्त एकच थेंब त्या कोळ्याच्या अंगावर टाकला अन् तो कोळी तत्काळ तिथल्या तिथं मेला. ब्रजकिसननं अमृतजळाचा एकच थेंब त्या कोळ्याच्या तोंडात मेलेल्या माशीच्या अंगावर टाकला, तोच ती माशी जिवंत होऊन तोंडातून बाहेर पडली आणि उडून ब्रिजकिसनच्या खांद्यावर बसली. म्हणाली, ‘किती मानू मी तुझे उपकार ! वेळ येईल तेव्हा या उपकारांची परतफेड मी जरूर करीन!’ असं म्हणून ती उडून गेली.

ब्रजकिसननं त्या दोन्ही कुप्या राजाला नेऊन दिल्या. ‘वाहवा, वाहवा ! हे सुद्धा अगदी अशक्य काम तू केलंस? ‘राजा उद्गारला.

ब्रजकिसन म्हणाला, ‘मग आता सोनचंपाला…’ ‘थांब थांब, सोनचंपा इतकी स्वस्त नाही, मुला! मला बारा मुली आहेत; त्यांच्यातून सोनचंपाला तू शोधून काढलंस तर तू जिंकलास!’ असं म्हणून राजा त्याला एका मोठ्या ऐसपैस असलेल्या दिवाणखान्यात घेऊन गेला. तिथं बाराही राजकन्या गोल गोल करून नाचत होत्या. राजा आणि ब्रजकिसन बाजूला उभे राहून पाहू लागले. एकाही राजकन्येचा चेहराच काय, पायाचं बोटसुद्धा दिसत नव्हतं. सगळ्या एकाच उंचीच्या होत्या.

नाच संपला आणि सगळ्याजणी एका रांगेत उभ्या राहिल्या. आता यातून सोनचंपाला शोधून कसं काढायचं? सगळ्यांचे पोशाख एकसारखे, म्हणजे सर्वांनी पांढराशुभ्र बुरखा घेतलेला. ही शेवटची कसोटी अतिकठीण दिसते.

‘यात आता मला कुणाची मदत होणार? ‘तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला, तोच त्याच्या कानाजवळच आवाज आला, ‘कां बरं? मी नाही का मदत करायला? तू एक-एक मुलीकडून पुढं पुढं चल, मी तुला सांगते सोनचंपा कोणती ती?

बोलणारी ती माशी होती.

‘ब्रजकिसन पहिल्या मुलीपुढं उभा राहिला, माशी म्हणाली, ‘अंहं, ही नव्हे.’ दुसऱ्या मुलीपुढं गेला. ‘ही पण नव्हे. तिसरी, चवथी असं करीत करीत सातव्या मुलीपाशी जाऊन तो उभा राहिला अन् माशी म्हणाली, ‘हीच ती!’ ब्रजकिसननं बोट करुन ‘हीच सोनचंपा’ असं सांगितलं, त्याबरोबर राजकन्या सोनचंपानं आपला बुरखा काढून फेकून दिला. तिचं ते परीसारखं रूप अन् डोकीवर मुकुटासारखे चमकणारे सोनेरी केस पाहून ब्रिजकिसन चकितच झाला. राजा म्हणाला, मुला सगळ्या शर्ती तू पुऱ्या केल्यास. तू जिंकलास; मी हरलो!’ दुसरे दिवशी ब्रजकिसन सोनचंपाला घेऊन परत आपल्या देशाला जायला निघाला. राजानं मुलीबरोबर पुष्कळ धन, नोकरचाकर आणि लवाजमा दिला.

ब्रजकिसन सर्व लवाजम्यासह जिथं त्याचा घोडा बांधला होता तिथं आला.

त्याला पाहताच घोडा फुरफुरू लागला. त्या घोड्यावर स्वार होऊन ब्रजकिसन एखाद्या राजासारखा निघाला. जंगल ओलांडून ते नगरात आले. ब्रजकिसन या सगळ्या प्रवासात राजकुमारीशी एक शब्दही बोलला नव्हता. त्यानं राजापुढं जाऊन राजकुमारी सोनचंपाला पुढं केली. तिचं सुंदर अन् परीसारखं रूप पाहून म्हातारा राजा तर आनंदानं वेडा झाला. पण त्याच्या मनात एक शंका जोरानं उठली. मी म्हातारा असं सांगून या पोरानं राजकन्येचं मन भडकविलं तर नसेल ना? हा चांगला, दिसायला उमदा, हुशार तरुण आहे. एवढा शोध करून तिला इथंवर आणण्याचा पराक्रम करणाऱ्या तरुणाला सोडून ही माझ्यासारख्या म्हाताऱ्याशी लग्न करील? त्याकरिता या ब्रजकिसनला ठार मारुन टाकलं पाहिजे; त्याशिवाय तिच्या मनातून तो जाणार नाही.

राजा ब्रजकिसनला म्हणाला, ‘माझ्या मागणीप्रमाणं राजकन्येला तू घेऊन आलास हे उत्तम. तुला मी वचन दिल्याप्रमाणं इतके दिवस तू जगलास. पण माझ्या राज्यात राजाचा हुकूम मोडणाऱ्याची शिक्षा कधीच कमी होत नाही.

म्हणून तुला मी मारणार. उद्या सकाळी माझं राजकन्येशी लग्न होईल त्या अगोदर तुझा निकाल!‘ हे ऐकताच सोनचंपा म्हणाली, ‘छेः छेः, राजाला ही गोष्ट शोभणारी नाही.

याला तुम्ही मारू नका!

हे ऐकून तर राजाच्या मनातला संशय अधिकच वाढला. तो म्हणाला, ‘ते होणार नाही. याला मेलंच पाहिजे. मी उद्या सूर्य उगवायच्या आधी त्याचे डोके उडवायला सांगणार होतो; पण तू त्याची बाजू घेते आहेस तर आताच मी त्याचं डोकं उडवायला लावतो.’ असं म्हणून त्यानं टाळी वाजविली.त्याबरोबर एक काळा काळा सैनिक हाती तलवार घेतलेला राजापुढं येऊन सलाम करून उभा राहिला.

ब्रजकिसन आता ताठ उभा राहिला. म्हणाला, ‘राजेसाहेब, मोठी माणसं वचनाची धड असतात असं मी समजत होतो. तुमच्या शब्दावर भरवसा ठेवून मी खटपट करून राजकन्येला इथं आणलं. पण राजकन्येला काय दिसलं इथं?

तुमचं म्हातारपणच नव्हे, तर तुमची दगलबाजी. अशा राजाबरोबर ती लग्न लावायला तयार तरी कशी होईल? आणि अशा विश्वासघातकी राजापुढं मी जीव वाचविण्याची भीक तरी कशाला मागू? हा मी तयार आहे, उडवा माझं त्याच्या या बोलण्यानं राजा अधिकच भडकला आणि त्यानं सैनिकाला हुकूम केला. ‘याला राजवाड्याच्या चौकात नेऊन आत्ताच्या आत्ता याचं डोकं उडवा!’ राजकन्या सोनचंपा म्हणाली, त्याचं मरण बघायला मी तिथं जाईन. यानं मला माझ्या वडिलांकडून इथवर आणलं, ‘मरणाच्या वेळी तरी मला त्याच्याजवळ राहू दे! ‘राजा ‘ठीक आहे’ म्हणाला.

ब्रजकिसनला राजवाड्याच्या चौकात नेण्यात आलं. नगरातले लोक हे क्रूर कृत्य बघायला तिथं जमले. राजाही येऊन बसला. ब्रजकिसनला बघून सगळ्यांना हळहळ वाटू लागली. ते आपापसात (हलक्या आवाजात) म्हणू लागले, ‘अरेरे, एवढा तरुण वयाचा हा उमदा जवान फुकट मरणार ! काय हा राजा निष्ठुर, किती क्रूर ! असा राजा नसलेला बरा!’ आजूबाजूच्या लोकांत सोनचंपाही आपल्या सेवकांसह जाऊन उभी राहिली. ब्रजकिसननं हात जोडून आणि मान वाकवून लोकांना नमस्कार केला आणि छाती पुढं काढून अभिमानानं तो उभा राहिला. सैनिकानं हातातली तलवार आपल्या डोक्याभोवती तीन वेळा गरगर फिरविली आणि एका फटक्यासरशी ब्रजकिसनचं डोकं उडविलं. डोकं आणि धड एकदम खाली पडलं. त्याबरोबर राजकन्या सोनचंपा एकदम पुढं झाली आणि तिनं ते डोकं धडाला चटकन चिकटवून त्यावर अमृतजळाची धार टाकली. त्याबरोबर ब्रजकिसन पूर्वी होता तसा… नव्हे, त्यातूनही अधिक सुंदर झाला. तो उठून बसला. हा चमत्कार बघून जमलेल्या लोकांनी आनंदानं टाळ्या वाजविल्या.

राजा आश्चर्यानं थक्क झाला. राजकन्येजवळ हे अमृतासारखं पाणी आहे अं? ते आपल्यावर टाकलं तर आपणही बुट्ट्याचे जवान होऊ. तो राजकन्येला म्हणाला, ‘ते अमृतजळ माझ्याही अंगावर टाक.‘ पण राजकन्या म्हणाली, याला जिवंत करण्यात ते सारं संपलं.’ ‘संपलं कसं? ती दुसरी कुपी दिसते आहे, ती ओत माझ्या अंगावर’.

‘ती तुमच्या अंगावर ओतण्यासारखी नाही, महाराज ! भलता आग्रह करू नका ! ‘ राजा आता हट्टाला पेटला. म्हणाला, ‘ते काही चालणार नाही. त्या कुपीतलं जळ माझ्यावर तू ओतलंच पाहिजेस. नाहीतर मी ते तुझ्यापासून जबरदस्तीनं काढून घेईन!‘असं म्हणत तो पुढं सरकला.

त्याबरोबर राजकन्येनं ती दुसरी कुपी हातात घेऊन उघडली आणि त्यातलं विषजळ राजाच्या अंगावर टाकलं. त्याबरोबर राजाच्या अंगाचा भडका झाला आणि राजा तडफड करीत मेला.

राजा मेल्याचा कुणालाही शोक झाला नाही. लोकांनी सोनचंपा राजकन्येचा जयजयकार केला. ‘राजकन्या सोनचंपा हीच आमची राणी ! राजकन्या सोनचंपा हीच आमची राणी ! ‘ राजकन्येनं पुढे होऊन ब्रजकिसनचा हात आपल्या हाती घेतला आणि लोकांनी दोघांचाही राजा-राणी म्हणून जयजयकार केला. दुसऱ्या दिवशी दोघांचं समारंभपूर्वक लग्न झालं. लग्नाला मुदपाकखान्यातला बुढ्ढा स्वैपाकीच आला होता असं नाही; तर आजूबाजूचे सारे पक्षी आणि पशुसुद्धा आले होते. प्राणिमात्रांवर ज्याचं प्रेम, त्याच्यावर प्राणिमात्रही प्रेम करणारच!

Author