एका काळी वाराणसी नगरीत उत्सवाची उद्घोषणा करण्यात आली होती.
त्या दिवसापासून सर्व लोकांनी उत्सवास सुरुवात केली. पण राजाच्या
बगीच्यांतील माळ्यास आपले काम टाकून या उत्सवास जाता येईना. पुढे
त्याला अशी एक युक्ति सुचली की, आपल्या उद्यानात रहाणाऱ्या वानरांच्या
टोळीवर बगीच्याला पाणी देण्याचे काम सोपवून आपण एक दिवस तरी
उत्सवाला जावे. तो त्या टोळीतील मुख्य वानराला म्हणाला, “मित्रा या
उद्यानापासून मला जसा फायदा आहे तसा तो तुम्हाला देखील आहे. येथील
फलपर्णादिक खाऊन तुम्ही आपला निर्वाह करिता. तेव्हा एक दिवस माझे थोडे
काम करणे तुमचे कर्तव्य आहे.
तो वानर म्हणाला, “आपले काय काम आहे ते आम्हास समजावून द्या
म्हणजे आम्हाला शक्य असेल ते आम्ही करू.”
माळी म्हणाला, “तुम्ही या झाडाच्या रोपांना आजचा दिवस तेवढे पाणी द्या
म्हणजे तेवढ्या अवधीत मी उत्सवाची थोडी मौज पाहून माघारी येतो. तो वानर
म्हणाला, “ठीक आहे, आम्ही मोठ्या संतोषाने हे काम करितो.”
माळी पखाली आणि लाकडाची भांडी वानरांच्या स्वाधीन करून शहरात
गेला. इकडे मुख्य वानर आपल्या टोळीतील वानराला म्हणाला, “आमच्यावर
सोपविलेले काम आम्ही मोठ्या शिताफीने केले पाहिजे. येथल्या पाण्याचा
अपव्यय न करिता ते मोठ्या काटकसरीने वापरले पाहिजे, नाहीतर आम्हास
आणि बागवानाला पाण्यासाठी त्रास सोसावा लागेल. तेव्हा तुम्ही झाडाच्या
रोपाला पाणी देत असतांना त्यांच्या मुळाच्या प्रमाणाने पाणी देत जा. ज्यांची
मुळे खोल गेली असतील त्यांना जास्ती पाणी द्या व ज्यांची उथळ असतील
त्यांना कमी द्या.”
वानरांनी आपल्या पुढाऱ्याच्या आज्ञेप्रमाणे सर्व रोपे उपटून पाहून त्यांच्या
मुळांच्या प्रमाणावर त्यांस पाणी दिलें!
या वानरांच्या कृत्यामुळे बिचाऱ्या बागवानाचे किती नुकसान झाले असेल
याची कल्पनाच केली पाहिजे ! मूर्खावर जो आपल्या कामाचा भार टाकतो
त्याची शेवटी अशीच हानी होते !!