१.वाराणशीचे राज्य. राजाचे नाव ब्रह्मदत्त. या राज्यातल्या एका व्यापाऱ्याच्या कुळात बोधिसत्त्वाचा जन्म झाला. बोधिसत्त्व मोठा झाला. देशोदेशी हिंडून व्यापार करू लागला.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसाळा संपल्यावर वाराणशीचे व्यापारी दूरदेशी व्यापाराला निघण्याची तयारी करीत होते. देवदत्त या दुसऱ्या एका व्यापाऱ्याचा पाचशे गाड्यांचा जथा तयार होता. बोधिसत्त्वाच्याही पाचशे गाड्या तयार होत्या. बोधिसत्त्वाने विचार केला आपल्या दोघांच्या मिळून हजार गाड्या एकाच वेळी निघाल्या तर बैलांच्या चारापाण्याची फरफट होईल. त्यापेक्षा दोघांनी काही दिवसांचे अंतर ठेवून निघणे शहाणपणाचे राहील. त्याने देवदत्तला हा विचार बोलून दाखवला. देवदत्तने स्वतःशी विचार केला आणि तो बोधिसत्त्वाला म्हणाला, तुझा प्रस्ताव योग्य आहे. मी पुढे निघतो, तू ये सवडीने.
आणि तो पाचशे गाड्या घेऊन पुढे गेलासुद्धा.
आपण पुढे गेलो तर बैलांना चारापाणी नीट मिळेल एवढाच विचार त्या व्यापाऱ्याने केला नव्हता. आपला माल पहिल्यांदा विक्रीला उपलब्ध झाल्याने भाव पण चांगला मिळेल असा मतलबी हिशेब त्याने केला होता. देवदत्तचा हा विचार ऐकून त्याच्या साथीदारांना आनंद झाला. त्याने केलेल्या हिशेबी निवडीतली ही चलाखी बोधिसत्त्वाच्या जथ्याला कळल्याशिवाय राहिली नाही.
त्यांनी ती बोधिसत्त्वाच्या कानावर घातली. आता आपल्याला पहिल्यापेक्षा कमी भाव मिळेल याची हळहळ साथीदारांनी व्यक्त केली.
बोधिसत्वाने त्यावर आपणच कसे फायद्यात राहू याचं समर्थन केलं. तो म्हणाला, असं पहा, पावसानं खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी केल्याशिवाय देवदत्तला पुढे जाता येणार नाही. नद्या दुथडी वाहत असल्याने त्याला नव्या वाटा शोधाव्या लागतील, जंगलातल्या झऱ्यांचा केरवारा साफ करावा लागेल आणि मगच पुढे जावं लागेल. त्यामुळे आपल्यासाठी मार्ग प्रशस्त करण्याचं काम आपोआपच होणार नाही का? शिवाय भावाचं म्हणाल तर, त्याने एकदा भाव ठरवल्यामुळे किंमतीची वहिवाट पडलेली असेल. आपल्याला घासाघीस करावी लागणार नाही. तेव्हा मागे रहाण्यात आपला तोटा नसून फायदाच आहे.
बोधिसत्वाच्या या युक्तिवादातला शहाणपणा कुणाला नाकारता आला नाही.
२.तिकडे देवदत्त निपाणी जंगलातून वाट काढीत होता. या जंगलात पाणी नसते म्हणून त्याने आपल्या माल भरलेल्या गाड्यांसोबत मोठ मोठे रांजण भरलेल्या गाड्याही सोबत घेतल्या होत्या. या अपर्ण जंगलातून वाट तुडवताना समोरून पांढऱ्या बैलांच्या गाड्यांचा एक ताफा येताना दिसला. गाड्यांवरच्या नोकरमाणसांच्या गळ्यांत कमळांचे हार होते. गाड्या समोरासमोर आल्या.
समोरच्या तांड्यातला कमळापती व्यापारी खाली उतरला. देवदत्तही आपल्या गाडीतून खाली उतरला. दोघांनी परस्परांचा परिचय करून घेतला. कमळापती म्हणाला, ‘तुमच्या गाड्यांमध्ये हे मोठ्ठाले रांजण कसे काय?’ निपाणी जंगलात पाणी नाही, म्हणून आपण हा पाण्याचा साठा सोबत घेतला आहे देवदत्तने खुलासा केला.
कमळापतीने छद्मी हास्य केले. म्हणाला, “कशाला हे मुक्या जनावरांना फुकटचे ओझे? कुणी सांगितलं तुम्हाला या जंगलात पाणी नाही म्हणून? अहो हा बारमाही पावसाचा पट्टा आहे. आमच्या बैलांकडे पहा. अजून त्यांच्या पाठी ओल्या आहेत. गाडीच्या चांकांना लागलेली चिखलाची पेंड अजून दूर झालेली नाही. पलिकडच्या हिरव्यागार झाडीमंडळाजवळ तर मोठ्ठा तलावसुद्धा आहे.
मला वाटतं हे फुकटचं ओझं तुम्ही वाहू नये.”
देवदत्तला वाटलं, आपलं खरंच काहीतरी चुकलं आहे. त्याने पाण्याचे रांजण तिथेच ओतून बैलांचं ओझं हलकं केलं. अपर्ण जंगलात मिळालेल्या ह्या सुखद सल्ल्याने त्याचं मन उल्हसीत झालं आणि त्याने आपला ताफा झाडीमंडळाच्या दिशेने हाकारला.
पण काही केल्या रस्ता सरेना. झाडीमंडळ येईना. सगळे जण तहानेने व्याकूळ झाले. पाण्यावाचून बैलही तडफडू लागले. अखेर जंगलात गाड्या सोडून सगळे पायउतार झाले. सगळ्यांना ग्लानी आली होती. तेवढ्यात कमळापती आणि त्याच्या साथीदार यक्षांनी आपले मूळ रूप धारण केले. या मानवभक्षक यक्षांनी देवदत्त, त्याचे साथीदार, बैल, या सगळ्यांवर ताव मारला.
हाडे तिथेच टाकून ते उडत्या चालीची गाणी गात पसार झाले.
३. देवदत्त व्यापाराला निघून गेल्यानंतर पंधरवाड्याने बोधिसत्व आपला ५०० गाड्यांचा लवाजमा घेऊन त्याच वाटेने कूच करू लागला. त्यानेही सोबत पाण्याचे रांजण घेतले होते. फक्त फरक एवढाच होता की, बोधिसत्व देवदत्तप्रमाणे तांड्याच्या अग्रभागी न रहाता शेवटच्या गाडीत बसला होता.
निपाणीच्या जंगलात गाड्या आल्या. समोरून पांढऱ्या बैलांचा, कमळांचे हार घातलेल्या गाड्यांचा ताफा येऊन थांबला. बोधिसत्वाच्या गाडीवानांनी ही वार्ता क्रमाने शेवटच्या गाडीत बसलेल्या बोधिसत्वापर्यंत पोहचवली. त्याने तिथूनच पहिल्या गाडीवानापर्यंत संदेश पोहचवला, “तुम्ही कुणीही ह्या कमळापतीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. तारतम्याने विचार करा. गाडीच्या चाकांची चिखलाची पेंड, बैलांच्या ओल्या पाठी आणि गळ्यांतले कमळांचे हार ह्या जलखुणा नसून ती मायाजाल निर्माण करण्याची, भ्रमात टाकणारी दुःश्चिन्हे आहेत. जर नुकताच पाऊस पडलेला असेल तर हवेत गारवा असायला हवा होता. आभाळात ढगांची वर्दळ असायला हवी होती. पण असं काहीच नाही.
उलट सगळा रखरखाट आहे. समोर दिसणाऱ्या झाडीमंडळाची व तलावाची आपण प्रत्यक्ष खात्री करून घेऊ आणि मगच वाटले तर रांजण तलावात उपडे करू. पण तोपर्यंत या मृगजळावर विश्वास ठेवायला नको.”
बोधिसत्वावर पूर्ण विश्वास असणाऱ्या त्याच्या सवंगडी गाडीवानांनी यक्षाच्या युक्तिवादांना भीक न घालता आपल्या गाड्या रेटून पुढे हाकारल्या.
काही अंतर कापून गेल्यावर त्यांना मालाने भरलेल्या पाचशे गाड्या दिसल्या. पण जवळपास ना माणसं ना बैलं. हाडांचे ढीग तेवढे पडलेले होते.
बोधिसत्वाने काय घडले असेल याचा खुलासा केला. देवदत्त मायाजालाला भुलला. तारतम्य आणि विवेक गहाण टाकून त्याने परमत जसेच्या तसे स्वीकारले. त्यामुळे त्याची ही दुर्दशा झाली. बोधिसत्वाच्या ह्या खुलाशाने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्या पाचशे बेवारशी बैलगाड्यातला माल उतरवून आपल्या गाड्यांत भरला. बोधिसत्वाच्या नेतृत्वाखाली योग्य मुक्कामास पोहचला. मालाला उत्तम भाव मिळाला. भरपूर नफा कमवून तांडा वाराणशीला सुखरूप परतला.