५१. सुगंधी उटणे लावून केलेली आंघोळ साबण लावून केलेल्या आंघोळीपेक्षा कितीतरी पटीने आरोग्यदायी आहे. तरीसुद्धा आपण वैचारिक गुलामीमुळे स्वतंत्र विचार करू न शकल्याने साबणाच्या फेसातून बाहेर पडण्याची मानसिकताच नाहीये.
५२. आंघोळीनंतर मऊ पंचाने अंग, केस पुसण्याऐवजी खरखरीत टर्कीश टाॅवेलला अंग पुसणे ही पद्धतही भारतीय नाही.
५३. आंघोळ झाल्यावर केसांचा कोरडेपणा कमी होण्यासाठी केसांना, केसांच्या मुळात, खोबरेल तेल लावावे. केसांना तेल लावण्याची पद्धत भारतीय आहे, हे विसरल्यामुळे, उलट आहे ते तेल नाहीसे करून टाकण्यासाठी शांपूसारखी रसायने वापरली जात आहेत. केसांच्या समस्या आणखीनच वाढत आहेत.
केरळमधे केसांच्या समस्या कमी आहेत, असे दिसते. तेथे खोबरेल तेलाचा वापर सढळपणे केलेला दिसतो. त्याचा परिणाम आजही आपण बघतोय. बघा. केरळीयन लोकांचे केस कसे दिसतात ते ! काळे कुळकुळीत कुरळे. आपल्याकडे आलेले सगळे केरळीयन बेकरीवाले, टायरवाले तर आंघोळ झाल्यावर सुद्धा डोक्यावर खोबरेल तेल घालतात.
५४. खोबरेल तेल हे अत्यंत चांगले औषध असून केस, पोट, चरबी, स्नायु, शिरा, मेंदु, कान, नाक, घसा, डोळे, दात, त्वचा यांच्या रोगावर अप्रतिम औषध आहे. केरळमधे अनेक मिठायादेखील खोबरेल तेलात केल्या जातात. असे गुणकारी खोबरेल आज अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांनी वैद्यकीय यंत्रणेला वेठीला धरून आरोग्याचा एक नंबरचा शत्रू म्हणजे खोबरेल असे बदनाम करून टाकले आहे. पाश्चात्य देशात मात्र ओरीजिनल कोकोनट ऑईल बदाम तेलापेक्षा जास्त विक्री होणारे तेल बनले आहे.
माझे माझ्या देशावर प्रेम आहे असं फक्त प्रतिज्ञेमधे म्हटले जातेय, ही गोष्ट वेगळी !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021