अवचित काही गोष्टी आपल्याही नकळत आपल्या आयुष्यात घडत असतात.त्या आपल्याला कायम आठवणीत रहातात. एखादी मैफल असेल,तर त्याची रंगत काही औरच असते. तसा माहोल पुन्हा जमून येईलच,असं नाही.आपापसातील आनंद,प्रेम,आस्था वृध्दींगत करण्यासाठी एकत्र यायचं असतं,तिथे. नाहीतर एखादं विशिष्ठ निमित्त असतं. ते गुपित घोषित करण्यासाठी हा सारा जामानिमा असतो. अशातच कुणीतरी “खास” अवतरलंच तर,त्याला विशेष महत्त्व असतं.तो आल्यापासून मैफिलीला एक वेगळाच रंग चढलेला असतो. त्याच्या येण्याने “प्रफुल्लीतपणा” सर्वदूर पसरत जातो. त्याचं व्यक्तिमत्वच इतकं विलक्षण आणि आकर्षक असतं की,सर्वांची नजर त्याच्याकडे आपसूक वळत असते.त्याचा रुबाब,त्याचा थाट हा त्याचा जलवा असतो.
मग चर्चा होत रहाते,त्याच्याविषयी विविधांगाने. त्याच्या सवयी,लकबी यात एक परिणामकारक आत्मीयता असते,म्हणूनच तो प्रत्येकाला आपलासा वाटतो. विनम्रपणा हा शालीनतेचाच एक भाग असतो.तो संस्कारातून आलेला असतो. प्रेमभरल्या नजरेने एकाद्याकडे पाहिल्यास त्यावर आपोआप आपली छाप पडते.त्यासाठी मनात उमाळा असावा लागतो.तो कुठे विकत मिळत नाही.
सर्वकष आस्था असणं,हे प्रेमाद्रतेचं लक्षण आहे.त्याने परस्परांतील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होते.निरपेक्ष प्रेम करणारी माणसं लोकप्रिय होतात.म्हणून त्यांच्याभोवती घोळका असतो.त्यांना वेगळ्या ओळखीची गरज भासत नाही. नेमकं हेच आपण आचरणात आणायला हवं.हिच खरी “श्रीमंती”. पैसे काय सगळेच कमावतात……
हा कोण आलाय?हि पूर्ण मैफिल
उजळलीय कोणाच्या नावाने?
माझ्या घरी जणू काही सूर्य
सायंकाळीच उगवलाय,गं!
हा कोण आलाय?…………
या आठवणी आल्यायत की,
तेजस प्रभावळ चमकतेय?
हृदयी निजलेली गीतंही
फिरून वळून पाहताहेत
आकांक्षांचा कैफ ओसंडतोय
नेत्रपल्लवीच्या प्याल्यातून
हा कोण आलाय?………
हलकेच लागलेल्या चाहुलीने
पैंजणांची धडधडही वाढतेय
त्याच्या स्मितहास्याने यौवनाही
उडता पदर सावरू पहातायत
कुणीतरी राधा हळूच कानात
आपल्या मोहनाला विचारतेय
हा कोण आलाय?………
त्याच्या येण्याला काय म्हणू मी?
घायाळ करण्यासाठीच आलाय तो
त्याने प्रत्येकाकडे पाहून स्मित केलं
पण,माझ्या “शुभेच्छा” मात्र अगदी
सहज बेपर्वाईने अव्हेरतोय तो….…
हा कोण आलाय?………
सन १९६८ साली आलेल्या “#साथी” या चित्रपटातील एक ‘मर्यादशील पुरुषोत्तमाचे’ यथार्थ वर्णन असणारं एक गाणं त्यातील बध्द असलेल्या आशयामुळे लक्षवेधक ठरतं.त्याची रचना करतांना मजरुहजींची लेखणीवरील हुकूमत समजते.एका स्त्रीच्या नजरेत असलेली आदर्शवत पुरुषाची प्रतिमा दुसऱ्या एका पुरुषाने शब्दबध्द करणं,हे धाडसच आहे.काव्यातून तंतोतंत अर्थ प्रदर्शित होतांना जाणवतो.
संगीतकार नौशाद यांनी स्वरसाज देत हि रचना अगदी टिपेला नेवून ठेवली आहे. त्या प्रत्येक वेळी तिच्या मनावर उठणारे तरंग नेमके वलयांकीत करणारा वाद्य मिलाप साधत तिच्या मनातील भावनांना एक वेगळी उंच देण्याचं कसब गाण्याला सार्वत्रिक करतं.तिच्या अंतर्मुख मनोबंधातील सुप्त जाणीवा उलगडतायत,याची प्रचिती सहज प्रकट होते.
लतादीदींनी गावं आणि आपण फक्त ऐकत राहावं,यापलीकडे आपण दुसरं काय करू शकतो?मर्मबंधातील आंदोलनं स्वरांकीत करून कर्णफुलं तृप्त करण्यापर्यंतचा हा प्रवास अविरत शाश्वत रहावा,असंच वाटत रहातं. धन्य!
राजेंद्र कुमारने चित्रणापूर्वी हे गाणं ऐकलं असेल,त्यावेळी त्याची काय अवस्था झाली असेल?आपल्यासाठी कुणीतरी असे शब्द लिहून प्रशंसा करणं,हे किती भाग्याचं! मलाही नेमकं असंच वाटलं असतं,मी नायक असतो तर. सिम्मी गरेवालनेही त्याला योग्य साथ दिलीय.पूर्ण चित्रीकरण आणि गीताची मांडणी अप्रतिम.
त्या काळातल्या स्त्रीच्या अंतर्मनातील सलज्जतेचे आविष्करण,म्हणजे हे गीत. ”मनोगत” बंधनातून विशद करणारे.सलाम त्यातील सर्व संबंधित कलावंतांना!ज्यांनी हि कलाकृती आमच्यासमोर आदर्श म्हणून ठेवली. समाजाच्या एका कालखंडाचा इतिहास त्यामुळे जपला गेला.आपल्या संस्कृतीची नोंद कायम राहिली.
आपलं व्यक्तिमत्त्व कसं असावं,याचा परिपाठ आहे हा! प्रयत्न करून तर पहा.मग समोरून कुणीतरी नक्कीच गाईल. खडा टाकल्याशिवाय तरंग उठत नाहीत, हेच खरं!
अनिल वासुदेव तावडे.
दि. २६/११/२०२३.