माझ्या व्यवस्थापनाच्या कार्यकाळात आणि नंतरच्या काळात वेगवेगळ्या व्यवसायांसाठी सल्लागार म्हणून काम करत असताना एक तक्रार मला प्रकर्षाने जाणवून येई ती म्हणजे फार कमी लोक त्यांनी दिलेल्या स्वतःच्या शब्दाला जागतात. काही वेळा तर असे लोक स्वतः दिलेल्या वचना बाबत फार गंभीर ही नसत. अनेक व्यवस्थापकांकडूनही असे ऐकू येई की त्यांच्या कनिष्ठांनी दिलेल्या वचनांची पूर्ती करून घेण्यासाठी आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांचा खूपच वेळ खर्च होत असे. कनिष्ठांना पुन्हापुन्हा दिलेल्या वचनांची आठवण करून देण्यासाठी होणाऱ्या वेळेच्या अपव्ययामुळे त्यांना महत्वाच्या कामासाठी पुरेसा वेळ रहात नसे.
काही व्यवस्थापक तर असा पाठपुरावा करण्यासाठी लागणारा वेळ ही महत्वाचं पण अवघड काम टाळण्यासाठी एक सबब म्हणून वापरत असत. सगळ्यात मोठा विरोधाभास असा की काही व्यवस्थापकांना दिवसभर सतत पाठपुरावा करणे हेच त्यांचे काम आहे असे वाटते. सत्य मात्र असं आहे की कुठल्याही मॅनेजरच्या जबाबदारीच्या कार्यकक्षेत असा पाठपुरावा करण्याचा कुठेही उल्लेख नसतो. ह्या सगळ्याचा परिणाम मॅनेजर्स ज्या कामासाठी त्यांना पगार मिळतो ती कामे सुद्धा पुरेशी करू शकत नसत.
यावर उपाय म्हणून वैयक्तिक वचनबद्धता सुधारण्यासाठी मी स्वतः एक अशी कार्यशैली तयार केली की ज्याचा मला स्वतःला खूपच उपयोग झाला आणि नंतर मी लोकांना ह्या विषयावर उत्तम प्रशिक्षण ही देऊ शकलो.
A) कोणालाही कोणतेही वचन देण्यापूर्वी खालील मुद्द्यांचा विचार करावा
१. ज्याला वचन द्यायचे आहे त्याच्याकडून अपेक्षांची स्पष्टता करून घ्यावी.
२. ज्याला वचन द्यायचे आहे तो वरिष्ठ किंवा ग्राहक हा देव नसून एक माणूसच असतो. त्यामुळे त्याच्याशी योग्य चर्चा करूनच मग वचनांतील अपेक्षांचा निर्णय घ्यावा.
३. वचनपूर्तीसाठी कराव्या लागणाऱ्या सर्व कृतींचा आणि वेळेचा पूर्ण विचार करावा.
४. वचनपूर्ती साठी इतर कोणावर अवलंबून राहावे लागणार आहे का ह्याचाही विचार करावा.
५. दुसऱ्याच्या वतीने वचन द्यावयाचे असल्यास त्याच्याशी चर्चा करण्यासाठी थोडा वेळ मागून घ्यावा.
ह्या सर्व मुद्द्यांचा विचार करण्यासाठी थोडा वेळ घ्यावा. आणि त्यानंतरच गंभीरपणे “हो” अथवा “मी सहमत आहे” असे म्हणावे. असे विचारपूर्वक वचन दिले असता वरिष्ठ किंवा ग्राहक याना सुद्धा त्या वाचनाच्या पूर्ततेबद्दल जास्त खात्री वाटते.
B) दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी –
१. दिलेले वचन विसरण्याची शक्यता कमी करण्यासाठी स्वतःची अशी एखादी पद्धत ठरवावी. उदा वचनांची नोंद करणे, फोनमध्ये योग्य असा गजर लावणे वगैरे.
२. आपल्या कह्याबाहेर एखादी कृती वाटत असल्यास न लाजता इतरांची मदत मागावी.
३. सबबी सांगणे पूर्णपणे टाळावे, सबबी सांगण्यामुळे वचन घेणारा आणि देणारा, दोघांचाही वेळ वाया जातो. वचन घेणाऱ्याचा तुमच्यावर विश्वास असेल तर त्याला तुमच्याकडून सबबीची आवश्यकता नसते. आणि जर त्याचा तुमच्यावर विश्वास नसेल तर त्या सबबींचा तसाही काही उपयोगही होत नाही.
४. जर काही कारणाने तुमच्या हातून वचन पूर्तता वेळेत होणार नसेल तर ज्याला वचन दिले आहे त्याला आधीच ह्या गोष्टीची कल्पना द्यावी की जेणेकरून त्या व्यक्तीस वेळेवर अपेक्षा पूर्तीसाठी दुसरी काही उपाययोजना करणे शक्य होईल.
५. तुमच्या आसपास ज्यांची वचनबद्धता उत्तम असते अशा लोकांकडून काही शिकायला मिळाले तर शिकावे आणि त्यांचे अनुकरण करावे.
तुमची वचन बद्धता सुधारल्याने एकीकडे तुमचा आत्मसन्मान सुधारतो आणि त्याच वेळी इतरांच्या नजरेत (खास करून तुमचे वरिष्ठ) तुमची विश्वासार्हता वाढते.
येथे आपण फक्त स्वतःहून दिलेल्या वचनाच्या पुर्ततेबद्दल चर्चा करत आहोत. जर एखादे वेळीस तुमच्यावर वचनाची सक्ती करण्यात आली असेल तरी सुद्धा वचन पूर्तता करण्याचा मनापासून प्रयत्न करा पण जर जमले नाहीच तर स्वतःला दोषी मानू नका.
पाठपुराव्याची गरज आणि वेळेचा अपव्यय कमी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी काही टिप्स –
1. कामाच्या आणि वेळेच्या अपेक्षा नीट समजल्या आहेत की नाहीत हे कनिष्ठांना विचारून पक्के करा.
2. कनिष्ठाने ‘हो’ म्हंटल्यावर त्याला स्पष्ट विचारा की ‘तुला मी या वचनाची पुन्हा पुन्हा आठवण करून देण्याची अपेक्षा आहे का?’ बहुतेक स्वाभिमानी कनिष्ठ सहकारी अशी आठवण करून देण्याची अपेक्षा नाही असेच सांगतात. पण यामुळे त्यांच्यावरील वचन लक्षात ठेवण्याची आणि त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी निश्चितच वाढते. एखाद्याने आठवण एकूण देण्याची विनंती केलीच तर त्याला काही काळासाठी तरी अवश्य मदत करा.
3. अपेक्षा पूर्ति न झाल्यास, निव्वळ दोषारोप करण्याऐवजी, तसे का घडले याची त्याच्या बरोबर मीमांसा करा. थोडक्यात म्हणजे ती व्यक्ती वचनपूर्तता का करू शकली नाही याची करणे शोधून त्याला त्याची वचनबद्धता सुधारण्यास मदत करा
मी माझ्या वरिष्टांकडून असे बऱ्याच वेळा ऐकले आहे की याच्या तोंडून पटकन कधी ‘हो’ येत नाही, मात्र एकदा त्याने हो म्हंटले की आम्ही ती गोष्ट होणार याबद्दल निश्चिंत असतो.
ज्या माणसाला स्वतःला काहीच करायचे नसते त्याला कुठलीही गोष्ट अशक्य नसते!
विश्वास दात्ये यांच्या ऐकलंत का ! या इ-पुस्तकातील लेख.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.१००/-
सवलत किंमत : रु.८०/-
https://marathibooks.com/books/aiklat-ka-by-vishwas-datye/