सौभद्र’ ची ऐतिहासिक जुगलबंदी

सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’चे अधूनमधून प्रयोग होत होते. अधूनमधून नाट्यसंगीत मैफिलींसारखे कार्यक्रमही होत होते. मी जिथे रहातो (फॉर्जेट हिल) त्याच्यासमोर नवयुगनगर नावाची एक सोसायटी आहे. तिथे भालचंद्र ऊर्फ अण्णा पेंढारकर रहात होते. त्यांच्या संस्थेत काम करायला मिळावं अशी इच्छा होती. पण योग येत नव्हता.

१९७४ च्या डिसेंबर महिन्यात अण्णांचा फोन आला. त्यांनी भेटायला बोलावलं होतं. मी गेलो. त्यांनी विचारलं “सौभद्र’ नाटकात नारदाची भूमिका करणार का?” मी अर्जुन करत होतो. उंच असल्यामुळे नारद करण्याचा प्रश्न नव्हता.



सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’चे अधूनमधून प्रयोग होत होते. अधूनमधून नाट्यसंगीत मैफिलींसारखे कार्यक्रमही होत होते.

मी जिथे रहातो (फॉर्जेट हिल) त्याच्यासमोर नवयुगनगर नावाची एक सोसायटी आहे. तिथे भालचंद्र ऊर्फ अण्णा पेंढारकर रहात होते. त्यांच्या संस्थेत काम करायला मिळावं अशी इच्छा होती. पण योग येत नव्हता.

१९७४ च्या डिसेंबर महिन्यात अण्णांचा फोन आला. त्यांनी भेटायला बोलावलं होतं. मी गेलो. त्यांनी विचारलं “सौभद्र’ नाटकात नारदाची भूमिका करणार का?” मी अर्जुन करत होतो. उंच असल्यामुळे नारद करण्याचा प्रश्न नव्हता.

मी त्यांना म्हटलं, “अण्णा अर्जुन कोण करणार आहे?”

ते म्हणाले, “मी स्वत ! दहा प्रयोगांचा गोवा दौरा आहे आणि त्यांना कॉन्ट्रॅक्टरला अर्जुन मीच पाहिजे.”

मी म्हटलं, “ठीक आहे. मी नारद केलेला नाही. माझं काम तुम्ही बसवून द्या.” एवढं बोलून मी घरी आलो. दौऱ्याची तारीख जवळ येत होती. अण्णांचा फोन वगैरे काहीच नव्हता.

निघायच्या वेळी मी फोन केला तेव्हा ते म्हणाले, “आपला दौरा रद्द झाला आहे.” अर्थात कारण विचारायची सोयच नव्हती. स्वस्थ बसणं भाग होतं.

या दौऱ्याच्या निमित्ताने गोव्यात ‘सौभद्र’ची बरीच हवा निर्माण झाली होती. दौरा रद्द झाल्याचे कळताच तिथले दुसरे कॉन्ट्रॅक्टर्स नार्वेकर, पांगम आणि कापडी हे मुंबईत आले. अण्णा गोखले यांना भेटले आणि त्यांना ‘सौभद्र’चा दौरा ठरवून देण्याची विनंती केली. अण्णा गोखलेंनी स्पष्ट नकार दिला आणि त्यांना प्रसाद सावकार यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. ते तिघेही सावकारांच्या घरी गेले आणि त्यांना दौरा ठरविण्यासाठी गळ घातली. अण्णा पेंढारकरांचा दौरा रद्द झाल्याची खात्री करून घेऊन सावकार पुढील तयारीला लागले.

कान्होपात्रा किणीकर या सुभद्रेची करणार होत्या. त्यांना नक्की केलं. सावकार स्वतः कृष्ण, प्रकाश घांग्रेकर अर्जुन असा वेगळा संच तयार झाला आणि सर्वांना जानेवारी १९७५ च्या पहिल्या आठवड्यातील तारखा दिल्या. पहिला प्रयोग चिपळूण आणि पुढचे प्रयोग गोव्यात असा दौरा ठरला.

पण पुढे एक मोठाच पेच निर्माण झाला. ‘ललितकलादर्श’चे प्रयोग ठरवणारा कॉन्ट्रॅक्टर पुन्हा दौऱ्याचा प्रस्ताव घेऊन आला. त्यांचाही दौरा ठरला. त्यामुळे मी, कान्होपात्राबाई, प्रकाश घांग्रेकर आणि स्वतः सावकार आणि जोडीला इतर ‘ललितकले’तील कलाकार होते. त्याऐवजी नवीन कलाकार घ्यावे लागले. मी आणि कान्होपात्राबाईंनी ‘ललितकले’त कधीच काम केलं नव्हतं. त्यामुळे ‘ललितकले’च्या दौऱ्यात आम्ही बहुतेक नसू असं आम्ही गृहीत धरलं होतं. यावेळी अण्णा गोखले यांनी मध्यस्थाची भूमिका करून अण्णा पेंढारकरांची समजूत घालून काय जादू केली कोण जाणे, पण सावकारांचे सात आणि ‘ललितकलादर्श’चे नऊ असे ओळीने सोळा प्रयोग ठरले. १४ जानेवारीला संक्रांत असल्याने सुट्टी होती. त्यामुळे मी सावकारांबरोबर मुंबईला परत न येता गोव्यातच माझ्या मित्रिणीकडे कुसुम मुर्डेश्वर – नेवरेकरकडे मडगावला मुक्काम ठोकला. आणि डिचोलीच्या पहिल्या प्रयोगाला अण्णा पेंढारकरांच्या ‘ललितकले’त सामील झालो.

अण्णांनी माझी थोडीशी तालीम घेतली आणि दौरा सुरू झाला. पणजीच्या प्रयोगाला माधवराव गडकरी आले होते. तेव्हा ते गोव्यात होते. माझ्या नारदाच्या पदांना मिळणाऱ्या टाळ्या ऐकून म्हणाले, “काय हो, तुम्ही चांगले गाता म्हणून टाळ्या पडतात की तुम्ही गोव्याचे म्हणून? ” यावर मी काय उत्तर देणार !

सावकारांच्या दौऱ्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. परंतु अण्णांचे प्रयोग उत्तम झाले आणि भरपूर उत्पन्न झालं. सात प्रयोग गोव्यात आणि एक सावंतवाडी आणि एक आचरा असे नऊ प्रयोग करून आम्ही मुंबईत परतलो. अण्णांनी एसटीची बस ठरवली होती. पण ती वाटेत कुठेतरी बिघडली. परंतु नंतर संपर्क साधून दुसरी बस मागवून घेण्यात आल्यामुळे आम्ही सर्वजण निर्विघ्नपणे मुंबईत पोहोचलो.

या दौऱ्यानंतर अण्णा थोडे नाराज झाले होते. यामुळे यापुढे आपल्याला त्यांच्या संस्थेत काम करायला मिळणार नाही, याचं शल्य मनात टोचत होतं. पण तो योग गणपतीच्या कृपेने आला. त्याची हकीकत मुद्दाम सांगण्यासारखी आहे. १९७५ सालाची सुरुवात ‘सौभद्र’ने झाली. त्याचवेळी माझे गुरू दाजी भाटवडेकर साहित्य संघातर्फे ‘संगीत मृच्छकटिक’ या नाटकाच्या तालमी घेत होते. त्यात नारायण बोडस, रजनी जोशी व स्वतः दाजी असा संच होता. ( चारुदत्त, वसंतसेना व शकार) शर्विलकाच्या भूमिकेत अरविंद चाफळकर होते. हा प्रयोग स्तरनिविष्ट रंगमंचावर लेवल्सवर होणार होता. मी रिकामा असल्यामुळे तालमींना जात असे.

नाटक बसले व त्याचे प्रयोग सुरू झाले. पाच-सात प्रयोग झाल्यावर त्या नाटकाचा गोवा दौरा ठरला. मात्र अरविंद चाफळकरांना त्यावेळी आकाशवाणीवर नोकरी लागली. त्यामुळे त्यांना दौऱ्याला जाणे शक्य नव्हते. मी त्यावेळी मोकळाच असल्यामुळे संघाचे सेक्रेटरी तात्या आमोणकर यांनी मला ती भूमिका करण्याविषयी विचारलं. तालमी पाहून माझं पाठांतर झालंच होतं. दाजींनी माझ्या तालमी घेऊन भूमिका बसवावी असं ठरलं. पण दाजी अचानक आजारी पडले आणि दौऱ्याला जाऊ शकतील की नाही अशी परिस्थिती आली. मग कसल्या तालमी आणि कसलं काय ! दौऱ्याच्या आधी औषध वगैरे घेऊन दाजी साधारण बरे झाले. दौऱ्याला जाताना सबंध बसचा प्रवास दाजींनी झोपूनच केला. गोव्याला पोहोचल्यावर लगेच प्रयोग सुरू होणार होते. त्यामुळे तालीम वगैरे काही न करता मी तसाच भूमिकेसाठी उभा राहिलो. भूमिका तशी फार मोठी नव्हे. दोन गाणी, दोन साक्या आणि तीन-चार प्रवेश. त्यामुळे दौरा व्यवस्थित पार पडला. नारायण बोडस यांनी प्रथमच गोवा दौरा केला. चारुदत्त म्हणून ते शोभले.

मुंबईला परत आल्यावर पुन्हा दैनंदिन व्यवहार सुरू झाले. १९७४ च्या जानेवारीत अभिषेकी बुवा मुंबई सोडून लोणावळ्याला गेल्यामुळे तालमीत खंड पडला होता. यादरम्यान स्नेहल भाटकर (प्रसिद्ध भजनीबुवा व संगीत दिग्दर्शक) हे ‘दूरदर्शन’ साठी एक होळी गीत संगीतबद्ध करीत होते. हे गीत प्रसिद्ध कवी राजा बढे यांचं होतं. बुवांनी चाल फारच छान केली होती. गायला रामदास कामत, शरद जांभेकर व मी असे तिघे होतो.

एकदा त्यांच्या दादरच्या घरी तालमीसाठी गेलो होतो. तालीम संपल्यावर ते म्हणाले, “मला संघात जरा काम आहे. तुम्ही येता तर चला. त्यांच्याबरोबर मी संघात आलो.

संघात पोहोचताच सुधीर ठाकूर मला ऑफिसात घेऊन गेला. दहा-बारा दिवसांनंतर संघाच्या ‘स्वयंवर’चे सकाळी ‘रवींद्र नाट्यमंदिर’ आणि दुपारी ‘साहित्य संघ’ असे दोन प्रयोग होते. त्यात कृष्ण नारायण बोडस, रुक्मिणी- रजनी जोशी, रुक्मी – दाजी भाटवडेकर, शिशुपाल – माधव खाडिलकर असा नटवर्ग होता. भीष्मकाचं काम करणारे अरविंद चाफळकर यांनी भूमिका करायला नकार दिला होता. ‘मृच्छकटिक’च्या दौऱ्यानंतर शर्विलकाची भूमिका मीच करावी असं संघाने ठरवल्यामुळे कदाचित ते नाराज होऊन त्यांनी हा निर्णय घेतला असावा.

सगळी परिस्थिती समजावून सांगून भीष्मकाचे काम मी करावे अशी मला गळ घालण्यात आली. मी नाटक पाहिलं होतं. परंतु काकासाहेब खाडिलकरांची भाषा आणि पदं इतक्या कमी अवधीत कशी बसणार? मी भार्गवराम मामा आचरेकर, कृष्णराव चोणकर व अनंतराव वर्तक यांची नावं सुचवली आणि सहज म्हटलं, “कोणीच नसलं तर मी काम करीन.” त्या तिघांकडून नकार आल्यावर शेवटी माझ्यावरच संक्रांत आली. ‘तू म्हणाला होतास कोणी नसलं तर मी करीन. आता तिघेही नाही म्हणताहेत तर आता तूच ते काम केलं पाहिजे.

‘हे सगळं होईपर्यंत प्रयोग आठ दिवसांवर येऊन ठेपला. माझ्याकडे पुस्तकही नव्हतं. रजनी जोशींकडून तिचं पुस्तक उधारीवर आणलं ते प्रयोगाच्या दोन दिवस आधी परत करण्याच्या बोलीवर.

पाठांतराच्या मागे लागलो. तालीम घ्यायला कोणीतरी सापडेल म्हणून संघात गेलो. पण व्यर्थ! ‘जा भय न मम मना’ आणि ‘बोल होईल फोल’ ही दोन महत्त्वाची पदं ! भरीस भर म्हणून माझा शनिवारी रात्री पनवेलला ‘ललाटलेख’ या भयंकर मेलोड्रामाचा प्रयोग होता. दुसऱ्या दिवशी रविवारी ‘स्वयंवर’चे दोन प्रयोग कॉन्ट्रॅक्टचे हाऊसफुल्ल होते.

शुक्रवारी संध्याकाळी दाजींनी ब्राह्मण सभेत बोलवून माझ्याकडून नक्कल म्हणून घेतली. तोपर्यंत पाठांतर बऱ्यापैकी झालं होतं. दाजी म्हणाले, “आता बरं बोलतोयस. परवा आमचा बाप आहेस. काय करशील ते खरं!” कबूल करून बसलो होतो. त्यामुळे आलिया भोगासी सादर व्हावे, या न्यायाने पुढच्या तयारीला लागलो. रजनीचं पुस्तक तिला नेऊन दिलं.

‘ललाटलेख’चा प्रयोगही नवीनच होता. पण त्याच्या थोड्या तालमी झाल्या होत्या. तो प्रयोग आटपून पहाटे पाच वाजता घरी आलो. तासभर विश्रांती घेऊन, आंघोळ करून सात वाजता रवींद्रला हजर झालो. सत्त्वपरीक्षाच होती. पण रंगभूमी प्रसन्न होती. रवींद्रचा प्रयोग आटपून मेकअपसकट टॅक्सी करून आम्ही सगळे ‘साहित्य संघा’त आलो. संघातला प्रयोगही उत्तम झाला. इतरांच्या भूमिका तालमी करून बसलेल्या होत्या. मी माझं काम चोख करणं एवढंच अपेक्षित होतं. तेवढं मात्र परमेश्वरकृपेने झालं.

त्यानंतर ‘स्वयंवर’चे जे प्रयोग झाले त्या सर्वात मीच भीष्मकाची भूमिका केली. अशा तऱ्हेने संघाशी १९६४-६५ नंतर तुटलेली नाळ ‘मृच्छकटिक’ आणि ‘स्वयंवर’ या दोन नाटकांमुळे पुन्हा जोडली गेली. मी ‘संघाचा नट’ म्हणून ओळखला जाऊ लागलो.

यानंतर त्याचवर्षी संघाकडे एका संगीतिकेचं प्रपोझल आलं. त्याचं असं झालं की, विद्याधरजी गोखले यांच्या सांगण्यावरून श्रीमती कान्होपात्रा किणीकर या अभिनेत्रीने संघाला एक पत्र पाठवलं.

त्यातील मजकूर असा, ‘श्री गोविंदराव टेंबे प्रख्यात नट-नाटककार आणि संगीत दिग्दर्शक यांनी लिहिलेली ‘महाश्वेता’ नावाची संगीतिका आहे. ती ‘साहित्य संघा’तर्फे करण्यात यावी.

‘संघाचे तात्या आमोणकर हे सेक्रेटरी होते. त्यांनी ते मान्य करून सर्व जबाबदारी ही बाईंनी घ्यावी असं ठरवलं. कोल्हापूर शुगर मिलने बसवलेल्या या संगीतिकेत पूर्वी त्यांनी महाश्वेतेची भूमिका केली होती. त्यांना सर्व चाली पाठ होत्या. त्यामुळे संगीत मार्गदर्शनही त्यांनी करावं असं ठरलं. त्यात त्या स्वतः महाश्वेता, मी – पुंडरीक, चंदू डेगवेकर – कपिजल, नारायण बोडस – चंद्र असे कलाकार ठरले. महाश्वेतेच्या सख्या म्हणून दुर्गा शिंदे व शुभदा दादरकर या होत्या. कान्होपात्राबाईंनी सर्वांना संगीताची संथा द्यायला सुरुवात केली. साथीदार म्हणून चंद्रचूड वासुदेव आणि भोजराज साळवी हे ठरवले होते.

संगीतिकेमध्ये एकही गद्य शब्द नव्हता. अरे, अहाहा अशा उद्गारवाचक शब्दांनाही चाल होती. संगीतिकेचा पहिला अंक दीड तास व दुसरा एक तास असा होता. तालमी सुरू झाल्या. नाटकाचं नेपथ्य चित्रकार द. ग. गोडसे यांचं होतं. त्यांनी रंगमंचाच्या मध्यभागी चार – पाच पायऱ्या (लेव्हल्स) व त्यावर ढगाची प्रतिकृती रंगवली होती. (स्वर्गलोक दाखवण्यासाठी). दुसऱ्या अंकात वेगळं नेपथ्य होतं. संगीतिका असल्यामुळे त्यातील शब्दन्शब्द प्रेक्षकांपर्यंत जाणं महत्त्वाचं होतं. माझा गोडसे साहेबांशी ‘मृच्छकटिक’मध्ये काम केल्यापासून परिचय झालाच होता. त्यामुळे लेव्हल्सवर नाटक बसवण्याचं काम माझ्याकडे आलं. त्यांच्याशी चर्चा करून नेपथ्याचं पथ्य सांभाळावं लागलं. लेव्हल्सवर चढून हालचाली केल्यास शब्द प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार नाहीत हे गोडसे साहेबांना पटवून द्यावं लागलं. महाश्वेतेचा आवाज खूपच बारीक होता. त्यामुळे नेपथ्य पार्श्वभागी ठेवून सर्व मूव्हमेंट्स पुढच्या बाजूला कराव्या लागल्या. या संगीतिकेचे १५-१६ प्रयोग झाले. एक पुण्याला व एक कोल्हापूरला झाला. पण संगीतिका ( ऑपेरा) हा प्रकार आपल्याकडे फारसा रुजला नाही.

पहिल्या प्रयोगाच्या काही दिवस आधी कळलं की, संपूर्ण संगीतिकेचं संगीत मार्गदर्शन करणाऱ्या कान्होपात्राबाईंना नांदीची चालच आठवत नव्हती.

एक दिवस त्या म्हणाल्या, “अहो, बाकी सगळं आठवतंय. पण नांदीची चाल आठवत नाही. ”

मी म्हटलं, “ठीक आहे. कुठल्या रागात आहे? ‘ त्या म्हणाल्या, “वसंत!”

म्हटलं ‘चला काम सोपं आहे.’ त्या नांदीचे शब्द होते, ‘आला वसंत ऋतु आला, आम्रतरुवरि गात कोकिला, आला वसंत ऋतु आला. पाठोपाठ चालही आलीच. ती मी सर्व कलाकारांना शिकवली.

प्रयोगाला दोन-चार दिवस राहिलेले असताना लेखक गोविंदराव टेंबेंचे चिरंजीव माधवराव मुंबईत आले आणि त्यांनी तालीम पाहिली आणि कान्होपात्राबाईंच्या पाठांतर आणि स्मरणशक्तीचं कौतुक केलं. आश्चर्य म्हणजे नांदीची चालही ओके झाली. त्यात त्यांनी काहीही बदल केला नाही. कदाचित मी केलेली चाल मूळ चालीशी मिळतीजुळती झाली होती. पुन्हा एकदा माझ्या चाली करण्याच्या कलेवर शिक्कामोर्तब झालं.

‘मृच्छकटिक’ या नाटकाचे प्रयोग ‘साहित्य संघा’ने केले ते स्तरनिविष्ट (लेव्हल्स) रंगमंचावर. तेव्हापासून डॉ. भालेराव यांच्या डोक्यात ते वेड होतंच. त्यामुळे यानंतर ‘संगीत सौभद्र’ हे नाटक लेव्हल्सवर करायचं ठरलं. दिग्दर्शक आणि वक्रतुंडच्या भूमिकेत विहंग नायक होता. दाजी भाटवडेकर – बलराम, नारद, नारायण बोडस – कृष्ण, ललिता केंकरे – रुक्मिणी, अण्णा पेंढारकर सुभद्रा – रजनी जोशी आणि मी अर्जुन असा संच तयार झाला.

एकट्या नारायण बोडस यांची कृष्णाची भूमिका नव्यानेच बसवायची होती. आम्ही सर्वांनी भूमिका केलेल्याच होत्या. फक्त स्तर – निविष्ट नेपथ्यावर वावरायचं कसं हेच शिकायचं होतं. ‘मृच्छकटिक’ मध्ये पावसाचा सीन होता. तसा ‘सौभद्र’मध्ये कृष्ण रुक्मिणीच्या प्रवेशात झोपाळा होता. नेपथ्य, प्रकाश योजना, कपडेपट इत्यादीमध्ये छान नाविन्य होते. त्यामुळे प्रयोग करताना खूप आनंद व्हायचा.

तेव्हा मी अर्जुनाचं काम बाहेर करतच होतो. डॉ. भालेराव म्हणाले, “तू संघात अर्जुनाचं काम करणार आहेस तेव्हा बाहेर काम करू नकोस. मी म्हटलं, “का? मी बाहेर काम करतो तेच तुम्ही मला देणार. मला कृष्णाचं काम द्या. ते मी बाहेर करणार नाही. तुम्ही मला काम देऊ नका. पण मी बाहेर अर्जुनाचं काम करणार.

शेवटी माझं म्हणणं मान्य होऊन मला ती भूमिका मिळाली. या नाटकाचे पुण्या-मुंबईत तसेच बाहेरगावीही बऱ्यापैकी प्रयोग झाले. अर्थात ‘सौभद्र’ नाटकाची लोकप्रियता अजूनही टिकून आहे याचंच ते उदाहरण होतं.

‘सौभद्र’ मधल्या सूत्रधार, कृष्ण, नारद आणि अर्जुन या चारही भूमिका केलेला माझ्या पिढीतला मी एकटाच असावा. अर्थात माझ्या आधीच्या पिढीतले काही कलाकार आहेत की, ज्यांनी या चारही भूमिका केल्या आहेत.

मी प्रथम १९६९ मध्ये अर्जुन केला तेव्हा सुभद्रा होत्या निर्मला गोगटे. त्यानंतर पुढे मेधा गोगटे या त्यांच्या मुलीबरोबरही मी ही भूमिका केली. ‘रंगशारदा’ संस्थेने तरुण तरतरीत तरबेज नटसंचात प्रयोग केले. यात ज्ञानेश पेंढारकर नसताना मी अर्जुन केला. विकास जोशी नसताना कृष्णही केला आणि सुभद्रा होती नीलाक्षी पेंढारकर. जयमालाबाई शिलेदार सुभद्रा असताना मी अर्जुन केला आणि त्यांची कन्या कीर्ती शिलेदार हिच्या बरोबरही अनेक प्रयोग केले. माझ्या आधीच्या पिढीबरोबर मी कामं केली. माझ्या पिढीच्या कलाकारांबरोबर कामं केली. तशीच माझ्यानंतरच्या पिढीबरोबरही कामं केली.

अण्णा गोखले एकदा म्हणाले, “अरे तू जुन्याबरोबरही काम करतो आणि नव्या बरोबरही काम करतोस. दोन्ही ठिकाणी अगदी फिट बसतोस.

‘मी म्हटलं, “अण्णा मी पाण्यासारखा आहे. पानी तेरा रंग कैसा? जिसमें मिलाये वैसा !!”

Author