आतून कीर्तन वरून तमाशा !

१९७४ साली ‘जय जगदीश हरे’ नाटकाच्या तालमीला अप्पासाहेब इनामदारही येत असत. त्यांचा मुलगा प्रकाश हा खलनायकाच्या मदतनिसाचं काम करीत असे. माझा प्रिय मित्र जयंत सावरकर माझ्या मित्राचं काम करायचा.

एकदा लंच टाइममध्ये अप्पासाहेब म्हणाले, “मला ‘आतून कीर्तन वरून तमाशा’ या लोकनाट्याचे काही प्रयोग करायचे आहेत. त्यात शाहिराचं काम करशील का? ” हे लोकनाट्य मधुकर नेराळे (हनुमान थिएटरचे मालक) ‘जसराज थिएटर्स’ या संस्थेतर्फे पूर्वी सादर झालेलं होतं. (त्यावेळी हे लोकनाट्य फारसं चाललं नाही. पण नंतर ते ‘वैशाली थिएटर’ चे बी. पालांडे यांनी चालवायला घेतलं आणि त्याचे बरेच प्रयोग केले. ) दामू केंकरे दिग्दर्शित या लोकनाट्यात अप्पासाहेब स्वतः कीर्तनकाराची भूमिका करत असत. पूर्वरंगात शाहिराचं काम गायक नट प्रकाश घांग्रेकर हा करायचा व त्यातील कोतवालाची मुख्य विनोदी भूमिका नटवर्य शंकर घाणेकर करायचे.

मला लोकनाट्याचा अनुभव होताच. त्यामुळे मी लगेच होकार दिला. ‘जय जगदीश हरे’चे प्रयोग सुरू झाल्यावर आम्ही तालमी राजाराम शिंदे यांच्याच तालीम हॉलमध्ये केल्या आणि काही प्रयोग तसेच दौरेही केले. मला फक्त पूर्वरंगातच काम होतं. मी जेव्हा संपूर्ण नाटक वाचलं तेव्हा असं लक्षात आलं की शंकर घाणेकर ( वगात) जी भूमिका करत होते कोतवालाची, त्याला लावण्या होत्या. त्या लावण्यांना विश्वनाथ मोरे यांनी चालीही लावल्या होत्या. परंतु घाणेकर हे गद्य नट असल्यामुळे त्या लावण्यांचा वापर झालाच नव्हता.

आता या लावण्यांसह भूमिका करणं मला शक्य होतं. तो मैनेच्या ( नर्तकीच्या) माडीवर जातो. तिथे तो लावणी म्हणतो आणि ती नृत्य करते असे प्रसंग होते.

अप्पासाहेब म्हणाले, “फार छान. अशोकजी परांजपेंशी बोलून बघा. त्यांनी परवानगी दिली तर आपण प्रयोग करू शकू.
यथावकाश अशोकजींशी साहित्य संघात भेट झाल्यावर त्यांच्यापुढे ही कल्पना मांडली. त्यांनीही ते मान्य करून आवश्यक ते जुजबी बदल करण्यास संमती दिली. परंतु तो योग आला नाही. मात्र या लोकनाट्याच्या निमित्ताने विश्वनाथ मोरेंसारख्या प्रतिभावंत संगीत दिग्दर्शकाचा परिचय झाला हेही नसे थोडके ! लालबागच्या हनुमान थिएटरमध्ये पारंपरिक घरंदाज लावण्यांचा फड असला की त्या ऐकण्यासाठी ते मला फोन करून आवर्जून बोलावून घेत.

त्याचबरोबर आणखी एका लोकनाट्यात काम करण्याचा योग आला. नक्की साल आठवत नाही. पण याच दरम्यान असावं. कारण याच्याही तालमी ‘नाट्यमंदार’च्या तालीम हॉलमध्येच झाल्या. ‘मृच्छकटिक’ नाटकाचे लोकनाट्यात रूपांतर करणारे लेखकही ‘नमुनेदार माणसं’ हा एकपात्री कार्यक्रम सादर करणारे मुरलीधर राजूरकर. मुळात त्याचं नाव होतं ‘चारुदत्ता मीच तुझी मालमत्ता’, दिग्दर्शन बाबूराव गोखले, ‘श्री स्टार्स’ चे मालक दिग्दर्शन करणार होते व शकाराची भूमिका तेच करणार होते. दादू इंदूरीकरांनाही त्यात एक विनोदी भूमिका होती.

वसंतसेना ही तमाशाच्या बोर्डावर नाचणारी कलावती आणि गावचा पाटील (शकार) हा तिला त्रास देत असतो. त्यातून चारुदत्त आणि मैत्रेय हे दोघे शुद्ध बोलणारे होते. बाकी भाषा लोकनाट्याची होती. वसंतसेनेचे काम करायला संजीवनी बिडकर ही नृत्यांगना होती. तिने दोन-तीन दिवस तालमींचा रंग पाहिला आणि यायची बंद झाली. हे लोकनाट्य विद्या सिन्हाचे मॅनेजर ‘मास्टरजी’ म्हणून एक गृहस्थ होते. (त्यांनी निर्मितीची जबाबदारी स्वीकारली.) त्यावेळी रजनी व माला केमकर या दोन भगिनी नृत्यांगना होत्या. त्यांचंही गणित काही जमलं नाही. नंतर गणेश नाईक हा एक निर्माता (जो पूर्वी बी. पालांडे यांचा भागीदार होता) त्यांनी करायचं ठरवलं. लालबागची प्रसिद्ध नर्तिका मंदा काळे हिने वसंतसेनेची भूमिका केली.

‘चारुदत्ता मीच तुझी मालमत्ता’ हे लोकनाट्याचं नाव वाटत नाही. या सबबीवर दिग्दर्शक बाबुराव गोखले यांनी ते बदलून ‘वसंतसेना म्हंत्यात मला’ असं लोकनाट्याला साजेसं नामकरण केलं होतं. पण पुढे गोखले आणि राजूरकरांचं काहीतरी बिनसलं आणि राजूरकर स्वतःच दिग्दर्शक बनले. शकार आणि मैत्रेय अशा दोन्ही भूमिका त्यांनी केल्या. पण हेही नसे थोडके म्हणून दोनचार प्रयोगांनंतर बबन प्रभू यांना शकार करण्यासाठी बोलावलं गेलं. असे अघोरी प्रयोग करून त्या प्रयोगांचं काय झालं असेल हे न सांगताच कळण्यासारखं आहे. हे सगळं सहन न होऊन शेवटी मी नाटकाला राम राम ठोकला.

Author