राजाची चूक

एक राजा होता. त्याची एक राणी होती. राणी अतिशय देखणी होती. राज्य
भले मोठे होते. प्रजा अतिशय सुखी व गुण्यागोविंदाने नांदत होती. पण राजा
निपुत्रिक होता. त्यामुळे राजा-राणी दुःखी होते. त्यामुळे प्रजाही चिंतीत होती.
राजानंतर राजगादीवर कोण बसणार? राजा राणी आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम
करीत. त्यामुळे राज्यात भांडण-तंटा, चोऱ्या-माय होत नव्हत्या.



एक राजा होता. त्याची एक राणी होती. राणी अतिशय देखणी होती. राज्य
भले मोठे होते. प्रजा अतिशय सुखी व गुण्यागोविंदाने नांदत होती. पण राजा
निपुत्रिक होता. त्यामुळे राजा-राणी दुःखी होते. त्यामुळे प्रजाही चिंतीत होती.
राजानंतर राजगादीवर कोण बसणार? राजा राणी आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम
करीत. त्यामुळे राज्यात भांडण-तंटा, चोऱ्या-माय होत नव्हत्या. पण एकच
एक चिंता होती राजाला मूल-बाळ व्हावे म्हणजे राजगादीला वारस मिळावा.
एकदा काय झाले, राजा आणि राणी जरा फेरफटका मारण्यासाठी निघाले.
राजाचे लक्ष एका अनोळख्या व्यक्तीकडे गेले. राजाने त्याची आस्थेने चौकशी
केली. त्या व्यक्तीने आपला परिचय दिला. राजा तुझी कीर्ति ऐकून तुझ्या
राज्यात आलो. ऐकलेली कीर्ति खोटी नाही. तुझ्या राज्यात सगळेच
गुण्यागोविंदाने राहतात. पण तुमचे दुःखही मी जनतेकडून जाणले. माझा
आशीर्वाद आहे, लवकरच आपल्याला संतान प्राप्त होईल. राजा-राणी खूप
आनंदी होतात. राजा त्याचे पाय धरतो.
राजा-राणी त्यांना आपल्या महालात घेऊन येतात. राजा-राणीच्या आदर-
सत्काराने खूष झालेला सद्गृहस्थ म्हणतो, “राजा मी कुणी जादुगार नाही की
चेटूक करणारा भगत नाही. दीर्घ तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त झालेला ऋषी आहे.
राजा-राणी त्यांना राजमहालात राहण्याचा खूप आग्रह धरतात. पण ऋषी
महाराज राजाला समजावतात. बघ राजा, मी जास्त दिवस एके ठिकाणी राहत
नाही. पण तुला लवकरच संतान प्राप्त होईल व तुम्ही आनंदात राहाल हा माझा
आशीर्वाद आहे.
ऋषीची वाणी खरी ठरते. राजाला नक्षत्रासारखी कन्या होते. राजा-राणी
संपूर्ण प्रजा आनंदी होते. राजा आपल्या सेवकांना सांगतो या आनंदसोहळ्यात
सगळ्या प्रजेला जेवणासाठी आमंत्रित करा.
सेवक संपूर्ण नगरीत फिरतात आणि राजाच्या महालात जेवणासाठी
येण्याचे आमंत्रण देतात. त्यातील एक सेवक एका गरीब म्हातारीचे घर वगळतो.
सारी प्रजा राजवाड्यात राजकन्येला बघायला व जेवायला जाते. म्हातारी
अस्वस्थ होते. दुःखी होते. संतापते. क्रोधीत होऊन ती राजाच्या राजवाड्यात
पोहचते. सरळ राजापुढे जाऊन उभी राहाते आणि राजाला जाब विचारते,
“राजा, तुला कन्यारत्न झाले. साऱ्या प्रजेबरोबर मलाही आनंद झाला. तिला
बघावे, आशीर्वाद द्यावा असे मलाही वाटत होते. पण तू मला या आनंदात
सहभागी करून घेतले नाही. मी गरीब आहे म्हणून?”
राजा-राणी मुळातच नम्र, सद्गुणी, कृपाळू व सगळ्यांना समजून घेणारे
असल्याने ते दोघेही म्हातारीची क्षमा मागतात. चूक झाल्याचे कबूल करतात.
पण म्हातारी त्यांना समजून घेण्याच्या अवस्थेत नव्हती. ती अपमानाने क्रोधीत
होते आणि आपली शापवाणी उच्चारते, “राजा, राणी आजपासून बरोबर चौदा
वर्षांनी तुझी मुलगी झोपली की, झोपलेलीच राहील. तिला स्पर्श करणाऱ्याची
अवस्था तिच्यासारखीच होईल.”
शापवाणी ऐकून राजा-राणी स्तब्ध झाले. पुन्हा दोघे चिंतामग्न झाले. राजा-
राणी, प्रधान सगळेच म्हातारीला शापवाणी मागे घेण्यास विनवू लागले. पण
उच्चारली गेलेली वाणी मागे घेता येईना. तेव्हा दया येऊन म्हातारी म्हणाली,
“ठीक आहे. उःशाप देते. जोपर्यंत चंदनपूरचा राजपुत्र तिला येऊन उठवत
नाही, तोपर्यंत ती निद्रावस्थेतच राहील. तोच तिला शापमुक्त करू शकेल.”
म्हातारी न जेवता, राजकन्येला आशीर्वाद न देता निघून गेली. सगळ्या
आनंदावर पाणी फिरले. पुन्हा सगळी प्रजा चिंतामग्न झाली. राजाने शापमुक्त
होण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण व्यर्थ.
शेवटी तो काळा दिवस उजाडला. राजकन्या चौदा वर्षांची झाली. त्या रात्री
ती झोपली ती उठलीच नाही. राजा-राणी तिला उठवायला गेले. तिचा स्पर्श
होताच दोघेही निद्रावस्थेत गेले. प्रजा राजा-राणीला उठवायला गेली. त्यांचीही
तिच अवस्था झाली. एक-एक करता करता सगळी प्रजा निद्रावस्थेत गेली.
दिवसामागून दिवस लोटले. जंगले वाढली. पण चंदनपूरचा राजकुमार काही
येईना. उलट त्या जंगलातून कोणी वाटसरू जाऊ लागला की, निद्रावस्थेतील
माणसाला उठवण्यासाठी स्पर्श करायची आणि मग तेही निद्रेत जात.
एके दिवशी एक राजबिंडा तरुण घोड्यावर बसून जंगलात शिकारीसाठी
आला. तिथले दृश्य पाहून तो आश्चर्यचकित झाला. जंगलात माणसे उभी-
आडवी, तिरपी कशीही झोपलेली होती. तो वाट काढत राजवाड्यात पोहचतो.
तिथे त्याला एक अतिशय सुंदर राजकन्या दिसते. तिचे लावण्य बघून त्याला
आश्चर्य वाटते. ही स्वर्गाची परी की अप्सरा? पण ती निद्रावस्थेत होती. तो तिला
उठविण्यासाठी स्पर्श करतो तर ती शुद्धीवर येते. राजकन्या शुद्धीवर येताच
सगळ्यांची निद्रा भंग होते. राजा ओळखतो हाच चंदनपूरचा राजकुमार आहे.
राजाने या कृतीवरून धडा घेतला. प्रजेला समान वागणूक दिली पाहिजे. गरीब-
दुबळा कुणीच पंक्तीत सुटायला नको.
राजा राजकन्या व चंदनपूरच्या राजकुमाराचा विवाह करतो तेव्हा संपूर्ण
प्रजेला स्वतः त्यांच्या घरी जाऊन जेवणाचे व लग्नाचे आमंत्रण देतो. यावेळी
एकही घर सुटले नव्हते. सगळे पोटभर जेवण करतात, राजा-राणी, राजकन्या व
राजकुमारास पोटभरून आशीर्वाद देतात.
या लोककथेची शिकवण म्हणून की काय बंजारा समाजात कोणत्याही
कार्यक्रमात संपूर्ण तांड्याला आमंत्रण असते. तिथे भेदभाव नसतो.
‘गोरगरिबांना टाळू नये’ ही एका म्हातारीची शिकवण आजही टिकून आहे.

Author