घारीचे बाळ

(आसामी लोककथा)

एक कुंभार होता. त्याला तीन मुली होत्या. मुलगा नव्हता. त्याला आता
पुन्हा चौथी मुलगी नको होती. कुंभार बायकोला म्हणाला, “आता तुला पुन्हा
मुलगी झाली तर मी तुला घरात घेणार नाही.” कुंभाराची बायको माहेरी गेली. दुर्दैवाने तिला चौथी मुलगीच झाली.



(आसामी लोककथा)

एक कुंभार होता. त्याला तीन मुली होत्या. मुलगा नव्हता. त्याला आता
पुन्हा चौथी मुलगी नको होती. कुंभार बायकोला म्हणाला, “आता तुला पुन्हा
मुलगी झाली तर मी तुला घरात घेणार नाही.” कुंभाराची बायको माहेरी गेली. दुर्दैवाने तिला चौथी मुलगीच झाली. तिच्या अंगाचा थरकाप झाला. आता नवऱ्याला कसे तोंड दाखवायचे याची तिला काळजी लागली. तो आपल्याला घरात घेणार नाही, याची तिला खात्री होती. तिच्या आईने पुढे काय होईल याचा अंदाज घेऊन त्या बाळाला कपड्यात
गुंडाळले, टोपलीत घातले आणि टोपली नदीत सोडून दिली. तरंगत तरंगत टोपली पाण्याच्या प्रवाहाबरोबर वहात गेली. पुढे दुसऱ्या गावाच्या किनाऱ्याकडे आली. तिथे धोबी कपडे धूत होता. उत्सुकतेने त्याने टोपली उघडून पाहिली. टोपलीत तान्हं बाळ पाहून तो गोंधळला. बाळाला तसेच वाहू देणे योग्य नाही, हे त्याला पटत होते. आपण बाळाला घरी नेले तर आपली बायको काय म्हणेल, याचा तो विचार करीत राहिला. तेवढ्यात आकाशातून एक घार उडत आली आणि तिनं ते बाळ उचलून नेलं. घार
वडाच्या झाडावर आली. तिथे फांदीवर बसून तिने बाळाला डोळाभरून
पाहिलं. तिला ते फार आवडलं. तिने ते ठेवून घ्यायचं ठरवलं. लहानाचं मोठं
करायचं ठरवलं. आपणच बाळाची आई आहोत असं तिला वाटू लागलं. तिने
फांदीवर बाळासाठी एक छानसं घरटं बांधलं. जमेल तसं बाळासाठी अन्न,
पाणी, कपडे, खेळणी गोळा करून आणू लागली. हळू हळू बाळ मोठं होत होतं.
एक छानशी गोड मुलगी झाडावरच्या घरट्यात वाढत होती एके दिवशी एक राजकन्या नदीत आंघोळ करीत होती. तिने आपले कपडे, दागिने काठावर काढून ठेवले होते. आकाशातून उडणाऱ्या घारीने ते पाहिले. आपल्या मुलीला आपण हे कपडे, दागिने घालवून नटवू या, असे म्हणून तिने एकेक करून ते उचलायला सुरुवात केली. राजकन्येचे कपडे, दागिने, आरसा, फणी, खेळणी उचलून तिने ते सुरक्षित जागी नेऊन ठेवले. मुलगी हळू हळू मोठी होत होती. आपली कन्या मोठी झाल्यावर तिला राजकन्येचे कपडे, दागिने घालून नटवण्याचे स्वप्न पहात घार लहानग्या मुलीशी खेळू लागली..
आता मुलगी बरीच मोठी झाली. नाचू बागडू लागली. घारीला तिच्यासाठीnअन्न आणण्यासाठी दूर जावे लागे. तिला मुलीची काळजी वाटे. एके दिवशी
जाताना ती मुलीला म्हणाली, “तू झाडाच्या आजूबाजूला खेळत रहा. एकटी
असेल तेव्हा जपून रहा. कुणी तुला त्रास दिला, तर मी सांगते ते गाणं म्हणायला
सुरुवात कर. मी असेल तेथून येईन. घाबरू नकोस. घारीने तिला परवलीच्या
ओळी सांगितल्या:
“वारा वाहू दे,
वडाची पाने गळू दे
घार आई लवकर ये,
माझी माय भेटू दे”
बोलता बोलता दिवस सरत होते. मुलगी आता चांगली देखणी दिसत होती. खेळत बागडत आनंदाने वाढत होती. उन्हाळ्याचे दिवस होते. एक प्रवासी विश्रांतीसाठी वडाच्या झाडाखाली बसला होता. अचानक एक लांबसडक सोनेरी केस उडत आला आणि प्रवाशाच्या तोंडावर पडला. त्याला आश्चर्य वाटले. एवढ्या जंगलात हा माणसाचा केस कसा? त्याने आजूबाजूला, खाली-वर पहायला सुरुवात केली. त्याला झाडावर एक सुंदर मुलगी केस विंचरताना दिसली. प्रवाशाने विचारले, “तू कोण आहेस? मुलगी आहेस की देवता?” मुलीने प्रथमच असे काही ऐकले होते. पहिल्यांदाच अशा अनोळखी पुरुषाला ती पहात होती. ती घाबरली. काय उत्तर द्यावे हे तिला कळेना. तिने मग घार आईने सांगितलेले गाणे म्हणायला सुरुवात केली.
पशु पक्ष्यांच्या गोष्टी
“वारा वाहू दे,
वडाची पाने गळू दे
घार आई लवकर ये,
माझी माय भेटू दे”
थोड्याच वेळात घार आली आणि म्हणाली, “काय झालं बाळा?” मुलीने
झाडाखाली बसलेल्या माणसाकडे बोट दाखविले. त्या माणसाकडे पाहून
घारीने विचार केला, माणूस तर चांगला दिसतो आहे. खरं तर आपल्या मुलीला
असाच नवरा मिळाला तर किती बरं होईल! झाडाखाली बसलेल्या
माणसासमोर पंख फडफडून ती म्हणाली, “अरे बाबा, हा सोनेरी केस त्या
झाडावरच्या मुलीचाच आहे. मला ती तान्हं बाळ असतानाच नदीत वाहणाऱ्या
टोपलीत सापडली. तिला मी माझ्या परीने सांभाळली, पालन पोषण केलं. तुला
आवडली असेल तर तू तिच्याशी लग्न करून तिला तुझ्या घरी ने मला
आवडेल. नाही म्हणू नकोस.” प्रवासी म्हणाला, “मी साधा एक व्यापारी आहे. देवकृपेनं माझं सगळं व्यवस्थित चाललं आहे. मी संसारी माणूस आहे. मला बायको मुलं आहेत.
तरीही तू म्हणत असशील तर मी तिच्याशी लग्न करून तिला सुखी ठेवण्याचा
प्रयत्न करील.” प्रवाशाचा हा प्रामाणिकपणाच घारीला खूप भावला. तिने ढोलीत लपवलेला राजकन्येचा पोषाख, दागिने काढून तिला नटवलं आणि त्या पुरुषाशी तिचं लग्न
लावलं. नवऱ्याकडे जाताना तिनं आठवणीने मुलीला सांगितलं, “तुला काही अडचण आली, संकटात सापडली तर मी सांगितलेलं ते गाणं म्हण, मी तुझ्या मदतीला असशील तिथे उपस्थित होईन.” तो व्यापारी आनंदाने तिला घेऊन आपल्या घरी परतला. ही नवी नटलेली नवरी पाहून व्यापाऱ्याच्या आधीच्या बायकोचा मत्सर जागा झाला. ती नव्याने घरात आलेल्या या मुलीला सगळी कामं सांगू लागली. स्वयंपाक करणं, धुणी धुणं, विहिरीवरून पाणी भरणं, जंगलातून सरपण आणणं, गोठा साफ करणं अशी सगळी कष्टाची कामं तिला करावी लागत. फार त्रास पडला की ती आपल्या घार आईनं सांगितलेलं गाणं म्हणायची. जंगलातलं सरपण गोळा करायला, गोठा साफ करायला घार आई मदत करायची. तिच्या नवऱ्याला आपली पहिली बायको या नव्या बायकोला सवती मत्सराने वागवते हे दिसत होतं. आणि तरीही कुठलीच तक्रार न करता ही नवी नवरी सगळी कामं निटनेटकी, विनातक्रार करत होती. यामुळे व्यापाऱ्याच्या मनातलं तिच्यावरचं प्रेम अधिकच वाढलं. वर्षात एक सण असा येई की, त्या दिवशी पत्नीने स्वतः विणलेलं वस्त्र नवऱ्याला भेट द्यायची प्रथा होती. या नव्या नवरीला त्याची कल्पना दिली गेली. नवऱ्याने तिला कापूस आणून दिला. पण तिला कापसाचे सूत कातून वस्त्र
विणता येईना. अखेर ती कापूस घेऊन गावाबाहेर गेली आणि गाणं म्हणू लागली,
“वारा वाहू दे,
वडाची पानंगळू दे
घार आई लवकर ये,
माझी माय भेटू दे”
गाणं ऐकताच घार आली. तिने सगळी कहाणी ऐकली. म्हणाली, “तो कापूस एका टोपलीत दे. त्या सणाच्या दिवशी मी टोपली तुझ्या मागच्या अंगणात ठेवून जाईल. तुझा सण साजरा होईल. काळजी करू नकोस.” त्याप्रमाणे ठरल्या दिवशी घार टोपली ठेवून गेली. टोपलीत मऊसूत वस्त्र होतं. तिने ते आपल्या नवऱ्याला प्रेमपूर्वक अर्पण केलं. नवरा खूष झाला; पण त्याची पहिली बायको धुसफुसली. प्रत्येक वेळी ही संकटातून बाहेर कशी येते हे पाहाण्यासाठी तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली. तेव्हा तिला कळलं की, हिला घार मदत करते. घारीला बोलावण्यासाठी ती गाणं म्हणते. पहिल्या बायकोने हे सगळं लक्षात ठेवून कपट कारस्थान रचलं. तिनं अंगणात जाऊन घार आईचं गाणं म्हटलं. घार आली. दबा धरून बसलेल्या त्या बाईनं झडप घालून घारीला पकडलं. तिला शेणात चिणून मारलं. आता नव्या नवरीचा सहारा संपला होता. नंतर हाल करून तिला घराबाहेर काढलं आणि नदीवर नेऊन नावाड्याला विकली. दु:खी कष्टी घार कन्या आता नावाड्याबरोबर मासे धरत होती. तिची घार आई आता तिच्या मदतीला नव्हती. एके दिवशी ती अशीच उदास मनाने नदीतल्या पाण्याशी बोलत दु:खी स्वरात गाणे म्हणत होती;
“वारा वाहिला,
वडाची पाने गळाली
दगा फटका झाला,
घार आई अंतरली
नदीबाई तूच आता आई,
तार नाही तर मार
नाही सोसवत आता
जगण्याचा भार”
ती असं उदास गाणं गात असतानाच तो प्रवासी नदीतल्या नावेतून पैलतीरावर जात होता. त्याने हे ओळखीचे सूर ऐकले. हे आपल्या दुसऱ्या बायकोचे सूर आहेत, हे त्याने चटकन ओळखले. प्रवाशाने नाव किनाऱ्याला लावली आणि तिची गाठ घेतली. नावाड्याला पैसे देऊन त्याने तिची सुटका केली आणि पुन्हा आपल्या घरी आणले. आपल्या नवऱ्याने या घारकन्येला शोधून पुन्हा परत आणल्याचे पाहून व्यापाऱ्याची पहिली बायको मनातून धास्तावली. आपण तिला विकले नसून तीच घर सोडून पळून गेल्याची बतावणी करू लागली. व्यापारी हुषार होता. तो म्हणाला, “मी तुझ्या शब्दावर विश्वास ठेवीन. पण त्यासाठी तुला एक परीक्षा द्यावी लागेल.” आपण आपल्या हुशारीने परीक्षेत यशस्वी होऊ असे वाटल्याने ती परीक्षेस तयार झाली. सत्त्व परीक्षेचा दिवस उगवला. व्यापाऱ्याने एक खड्डा खोदून त्यावर भरपूर बाभळीचे काटे पसरवले होते. खड्ड्याच्या दोन्ही टोकांना खांब रोवून एक दोर बांधला होता. व्यापाऱ्याने आपल्या दोन्ही बायकांना बोलावले. म्हणाला या
दोराला धरून पैल बाजूला जायचे, इतकी साधी परीक्षा आहे. जो खोटं बोलेल तो खड्ड्यात पडेल. दोघींनी परीक्षेला तयार व्हावं. आधी लहान असलेल्या दुसऱ्या बायकोला परीक्षेला सामोरं जायला सांगण्यात आलं. घार आईच्या मुलीनं डोळे मिटले आणि हलक्या सूरात गाणं म्हटलं.
“वारा वाहू दे,
वडाची पाने गळू दे
खड्ड्यातल्या काट्यांना
ठरवू दे
खऱ्याचे खरे, खोट्याचे खोटे
ठरू दे”
दोराला धरून घारकन्या सरसर पलीकडे सुखरूप जाऊन पोहचली. परीक्षेत ती पास झाली. आता पहिल्या बायकोची पाळी होती. तिचे मन तिला खात होते. दोराला धरून ती चालू लागली. पण तिचा आत्मविश्वास ढासळला होता. तिच्या सर्वांगाला कापरे सुटले आणि तोल जाऊन ती काट्यांच्या खड्ड्यात पडली. खड्डा इतका खोल होता आणि काटे इतके जबरी होते की तिची जगण्याची शक्यताच नव्हती. ‘जशी करणी तशी भरणी’ या न्यायाने पहिलीला शिक्षा भोगावी लागली. घार आईची मुलगी तटस्थपणे हे सारे पहात होती. तिच्यातला भगिनीभाव जागा झाला. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आपल्या पायी कुणाचा जीव जाऊ नये, असे वाटून तिने घार आईचे स्मरण केले आणि तिच्या गळ्यांतून गाणं उमलत बाहेर आलं: “वारा वाहू दे, वडाची पानं गळू दे काट्यांची फुलं होऊ दे
सवतीला माझ्या जगू दे” आपल्या दुसऱ्या पत्नीचा हा निर्मळ भाव पाहिल्यावर व्यापाऱ्याने भराभर काटे दूर केले आणि खड्यात दोर टाकून पहिल्या बायकोला वर काढले. घारकन्येने तिला पाणी पाजलं. काट्याच्या ओरखड्यांवर हलक्या हाताने तूप लावलं. पदरानं वारा घातला. हळू हळू ती शुद्धीवर आली. झाल्या प्रकाराचा तिला पश्चाताप झाला. आता दोन्ही मिळून बहिणीच्या मायेनं एकत्र राहू लागल्या. नदीकाठच्या झाडाखाली जाऊन दोघींनी मिळून गाणं म्हटलं,
“वारा वाहू दे, वडाची पानं उडू दे
घार आईला निरोप दे
दोन्ही मुलींना आशीर्वाद दे”

Author