गाईचे सैन्य

एके दिवशी ‘तांबू’ गाय रानात गेली. रानात चरता चरता दिवस कसा संपला
ते कळलंच नाही. जरासं अंधारून आलं होतं. हळूहळू ती परतीच्या वाटेवर
आली. परंतु बरोबरीच्या ‘पांढरी’, ‘ढवळी’, ‘राणू’ कुणीच दिसत नाही, हे लक्षात
येताच तांबू गायीने आपला चालण्याचा वेग वाढवला.



एके दिवशी ‘तांबू’ गाय रानात गेली. रानात चरता चरता दिवस कसा संपला
ते कळलंच नाही. जरासं अंधारून आलं होतं. हळूहळू ती परतीच्या वाटेवर
आली. परंतु बरोबरीच्या ‘पांढरी’, ‘ढवळी’, ‘राणू’ कुणीच दिसत नाही, हे लक्षात
येताच तांबू गायीने आपला चालण्याचा वेग वाढवला. जवळजवळ रानातली
वाट संपतच आली होती. दूरवर दिवे दिसत होती. इतक्यात वाघोबाराजे दत्त
म्हणून समोरी आले! क्षणभर तांबू गायीला काही सुचेनासे झाले. भीती वाटली.
पण चेहऱ्यावर भीती दिसू नये म्हणून qवाघोबालाच विचारले, ‘काय म्हणतोस
वाघोबा? आज लवकरच सफरीवर निघालास?’ वाघोबा म्हणाला, ‘होय,
लवकर बाहेर पडलो की शिकार चांगली मिळते!’ ‘म्हणजे तू मला खाणार?’ तांबू
गायीने असे म्हणताच वाघोबाने डरकाळी फोडली आणि दोन पावले
आणखीनच पुढे आला. तांबू गायीची पाचावर धारण बसली. आता वाघोबाच्या
तावडीतून सुटणे अवघड आहे हे तांबूच्या लक्षात आले. क्षणाचाही विलंब न
करता तांबूने मान खाली घातली आणि म्हणाली, ‘ए वाघोबा दादा, तू मला खा.
पण माझी एक विनंती आहे, प्रथम तू मला माझ्या गोठ्यात जाऊ दे. गोठ्यात
माझं वासरू वाट पाहतं आहे. ते खूप छोटं आहे. वासराला दूध देते आणि लगेच
परत येते. तुझी गुहा कुठे आहे मला सांग. मी खरंच परत येईन. माझ्यावर विश्वास
ठेव. माझा गोठा समोर दिवे दिसतात ना, तिथेच आहे. जर मी लवकर परत
आली नाही तर तू गावात ये. पण खरंच सांगते, मी परत येईन. ‘शब्दाला जागणं
हाच खरा धर्म आहे’ हे माझ्या आई-आजीने शिकवलं आहे. मला थोड्या
वेळासाठी जाऊ दे! तांबूची विनवणी ऐकून वाघोबा दादाला दया आली. तांबूचा गोठ्याकडे जाण्याचा रस्ता मोकळा केला आणि तिला म्हणाला, ‘याच जागी भेटू या,
लवकर परत ये! मलाही खूप भूक लागली आहे. मान वळवून तांबूने होकार
दिला आणि वेगाने गावाकडे गेली. गोठ्यात वासरू वाट पाहात होतं. तांबूला
पाहताच वासराने हंबरडा फोडला. घरातील रखमा, साजरा बाहेर आल्या.
तांबूला बादलीत पाणी दिलं. गोठ्यात दिवा लावला. तांबूला नमस्कार करून
दोघी घरात गेल्या. वासरू तांबूला लचावलं. वासराला दूध देता देता तांबू
वासराला म्हणाली, ‘बाबारे, हे शेवटचं दूध देते आहे. उद्यापासून तुझं पोट
तुलाच भरावं लागेल. रानातला वाघोबा माझी वाट पाहतो आहे. त्यालाही भूक
लागली आहे. तुला असं सोडून जाताना मलाही खूप वाईट वाटतं आहे, पण
इलाज नाही. हे जग असंच आहे. मोठा मासा छोट्या माश्याला खातो.
अन्नसाखळी वगैरे म्हणतात म्हणे. हाच जगव्यवहार आहे. आपण शाकाहारी
वर्गातले प्राणी. असं दुसऱ्याला मारून आपलं पोट भरणं आपल्या संस्कृतीत
नाही. पण वाघोबाच्या मांसाहारी संस्कृतीविषयी काय बोलणार? तुला अखेरचं
दूध द्यावं, यानंतर आईशिवाय जगण्याची सवय करायला हवी, हे सांगण्यासाठी
मी आले. वाघोबा राजांना विनंती केली. त्यांनी मला तेवढी सवलत दिली म्हणून
तुला अखेरचं भेटायला येऊ शकले. यापुढे तुला स्वतंत्रपणे जगावं लागेल.
रस्त्यातले खाचखळगे ओलांडून चालत राहा. पुढ्यात आलेला चारा आपलाच
आहे की नाही हे वास घेऊन खात जा! मांसाहारी प्राणी आणि सभोवतालचे
मानव सारखेच! वाघोबासारखे प्राणी सरळ सरळ शिकार करतात. मानव प्राणी
छुपेपणे घाव घालतात. मंत्रतंत्र करून, पूजा करून कुठलेही भातासारखे अन्न
रस्त्यावर ठेवतात. अन्न चांगलेच असते. पण त्यावर टाकलेले गुलाल, कुंकू,
काळा बुक्का या पदार्थांमुळे अन्नही दूषित होते. आपण अनवधानाने खातो
आणि मग त्रास होतो. म्हणून पुढ्यातले पदार्थ खाताना काळजी घे. या जगात
जशा चांगल्या गोष्टी आहेत तशाच वाईटही असू शकतात, हे समजून घे. जगता
जगता अनुभवातून तुला बऱ्याच गोष्टी शिकता येतील.’ तांबू गायीचा उपदेश
ऐकता ऐकता वासराने पान्हा सोडला. वासराच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
तांबूचाही आवंढा दाटून आला. मायलेकराच्या ताटातूटीच्या प्रसंगी इतर
कुणीही आसपास नव्हते. अंधार दाटून आला होता. जड अंतःकरणाने तांबू
गाय गोठ्यातून बाहेर पडली. पुन्हा मागे वळून पाहिले नाही. रस्त्याच्या कडेच्या गोठ्यातून ‘पांढरी’, ‘ढवळी’, ‘राणू’ या तांबूच्या मैत्रिणींनी पाहिले की तांबू परत रानवाटेकडे जात आहे. तांबूच्या पाठोपाठ त्याही रानवाटेकडे निघाल्या. वाटेत तांबूला थांबून विचारले, ‘काय गं एवढ्या अंधाराची रानाकडे निघालीस?’ तांबू म्हणाली, ‘वाघोबा वाट पाहतो आहे.

मघाशी रानात भेटला. खातो म्हणाला. पण मीच वासराला दूध पाजण्यासाठी
वेळ मागून घेतली. आता दिलेला शब्द पाळला पाहिजे ना!’ गायी मैत्रिणींनी
हंबरडा फोडला. गावातील सगळ्याच गायी रानाकडे चालू लागल्या. तांबू गाय
पुढे आणि मागून सगळ्या गावातल्या गायी चालत होत्या. वाघोबा तांबूची वाट
पाहत उभा होता. दूरवर त्याला तांबू गाय दिसली. त्याला खूप आनंद झाला.
पण हा आनंद क्षणार्धात मावळला. कारण तांबूच्या पाठीमागे इतर गायींचे सैन्य
पाहून वाघोबा घाबरला आणि गुहेत पळाला. तांबूने आणि मैत्रिणींनी हे दृश्य पाहिले आणि एकमेकींना गळाभेट दिली. तांबूने सगळ्यांचे मान डोलवून आभार मानले. म्हणाली,
‘असंच एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ !
तांबूसह सगळा कळप गावाकडे परतला. तांबू वेगाने गोठ्यात आली आणि
वासराला पोटाशी घेऊन आनंदाश्रू गाळले. म्हणाली, ‘बाळा, एकीच्या बळाने
आज साऱ्या जणींनी माझ्या मृत्यूला परत पाठविले. ही कृतज्ञता जपली पाहिजे.
एवढंच लक्षात ठेव!‘ वासराने मान हलवून होकार दिला आणि आईच्या कुशीत
शांत झोपला.

Author