(ऑस्ट्रेलियन लोककथा)
कुणी एके काळी आद्यदेव सृष्टी निर्माता बाईमी यांनी पशुपक्षी, जलचर, कीटक, फुले, वृक्ष अशी सारी सृष्टी निर्माण केली. परंतु ही सारीसृष्टी चित्रासारखी स्तब्ध होती. निर्जीव होती. या सृष्टीत चैतन्य नसल्यामुळे जमिनीतून रोपांना अंकूर फुटत नव्हते. तळ्यातील पाण्यावर बर्फाचे दाट थर असल्यामुळे जलचर बंदिवान झाले होते. अतिथंडीमुळे पक्षी गारठले. त्यामुळे पशुपक्षी गुहांमध्ये लपून राहिले ! सृष्टी निर्माता बाईमीला काळजी वाटू लागली. सूर्यदेवता ‘यी’ अनेक काळांपासून गाढ झोपली होती. बाईमीने तेजोदेवता ‘यी’ला हाक मारली, ‘हे देवते, ऊठ आणि पृथ्वीवर ये. पृथ्वीवर तुला खूप काम आहे, लवकर ये ! बाईमीचा आवाज ऐकताच तेजो देवतेने डोळे उघडले आणि पृथ्वीवर दाटलेला दाट काळ्या अंधाराला चिरीत पृथ्वीवर उतरली.
तेजोदेवतेचे पाऊल पृथ्वीवर पडताच धरतीचे हृदय आनंदाने खालीवर होऊ लागले. पृथ्वीचे अंतरंग चैतन्याने उमलू लागले. जमिनीतील रोपे, वृक्ष, गवत, फुले सारेच चैतन्याने डोलत डोलत हर्षभरीत नजरेने ‘यी’कडे पाहू लागले. सारी सृष्टी उमलू-फुलू लागली. सफल झाली. सृष्टीने भाज्या, फळे, धान्य, फुले, फळांचा कोश उघडा केला ! या चैतन्याने बाईमीला खूप आनंद झाला ! बाईमीने तेजोदेवतेला तळी, नद्या, समुद्रावरही फिरावयास सांगितले. तेजोदेवतेच्या प्रकाश-किरणाच्या उष्णतेने बर्फ वितळले. जलचर मुक्त झाले पाण्यात पोहू लागले ! सगळ्यात शेवटी तेजोदेवता गुहांच्या प्रवेशव्दाराशी गेली. तेजोदेवतेच्या उष्ण किरणांमुळे थंडीने गारठलेले पशुपक्षी, किटक चैतन्यमय झाले. गुहेबाहेर हिंडू-फिरू लागले. सारी जीवसृष्टी सजीव झालेली पाहून सृष्टीनिर्माता बाईमी आनंदित झाला.