(कोरियन लोककथा)
कोणे एके काळी पृथ्वीवर डोंगरांच्या घळ्यांमध्ये तारा राजाचे राज्य होते. सर्व बाजूंनी उंचच उंच डोंगर आणि चहुबाजूंनी पसरलेलं घनदाट जंगल यामुळे इथे अंधाराचेच राज्य असायचे. राजाने आपल्या प्रजेला किमान गरजेपुरता का होईना प्रकाश देण्यासाठी म्हणून खास योजना आखली होती. डोंगररांगाच्या मधोमध सपाट भूपृष्ठावर अखंड पेटलेल्या धुनीची राजाने व्यवस्था केली होती. अग्नीची होळी पेटविण्यासाठी नित्यनेमाने मोठमोठे ओंडके आणून टाकणे ही काही साधी गोष्ट नव्हती. सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात न येणारी ही कामगिरी पार पाडण्यासाठी राजाने मोठमोठे दणकट बांध्याचे कुत्रे पाळले होते वादळवाऱ्यात, पावसापाण्यात हे कुत्रे टनावारी लाकडाचे ओंडके वाहून आणत. ‘अग्नीश्वान’ या नावाने हे कुत्रे ओळखले जात.
आकाशात एक प्रखर उष्णता देणारा तेजस्वी दिवा असल्याची वार्ता राजाच्या कानावर आली होती. असा कायम प्रकाश आणि उष्णता देणारा दिवा आपण आपल्या राज्यात आणला तर सर्व प्रजाजनांची कायमची सोय होईल, या कल्पनेने त्याला पछाडले होते. अखेर एके दिवशी त्याने राजदरबारातील मंत्रीगणांपुढे हा प्रस्ताव ठेवला. हा तेजस्वी दिवा आपण प्राप्त करू शकलो तर आपल्या राज्यातला अंधार कायमचा दूर होईल. हा दिवा कसा प्राप्त करता येईल, याविषयी दरबारात चर्चा सुरू झाली.
एवढा मोठा शक्तिशाली दिवा आणायचा तर त्यासाठी तेवढ्याच ताकदीची माणसे पाठवावी लागतील. तशी माणसे आपल्याकडे नाहीत, त्यामुळे तेजस्वी दिवा प्राप्त करणे हे दिवास्वप्नच ठरेल, असे सर्व मंत्रीगणांचे मत पडले. शेवटी राजालाच पर्याय सापडला. ही कामगिरी आपल्या पदरी असलेल्या अग्नीश्वानांकडे सोपविण्याचा पर्याय मांडण्यात आला. सर्वात शक्तिशाली अग्नीश्वानाला दरबारात पाचारण करण्यात आले. राजाने या महाअग्नीश्वानाला आपली कल्पना सांगितली. राजाने आपल्यावर जो विश्वास दाखविला त्याने प्रसन्न होऊन महाअग्नीश्वानाने ‘भुंकार’ करून प्रस्तावाला संमती दिली.
राजाज्ञा घेऊन महाअग्नीश्वान तत्काळ आपल्या कामगिरीवर निघाला. मोठमोठे ओंडके वाहून आणण्याच्या आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या सत्वपरीक्षेची वेळ आली आहे, या भावनेतून त्याने आपला प्रवास सुरू केला.
राज्याच्या सर्व हद्दी पार करून पृथ्वीच्या टोकाशी येऊन पोहोचल्यावर महाश्वानाला आकाशात प्रकाशणारा तो तेजस्वी दिवा दिसला. दीर्घ श्वास घेऊन त्याने आकाशाच्या दिशेने छलांग लावली. त्या तेजोगोलाच्या जवळपास तो पोहचला होता. त्याने आपल्या पुढच्या पायांचे पंजे पसरून ओंजळीत तो दिवा पकडण्यासाठी झेप घेतली खरी, पण त्याचे पंजे भाजून निघाले. दिवा तर हाताला लागलाच नाही, पण त्या दिव्याच्या अग्निज्वालांनी त्याचा महाकाय देह बटाट्यासारखा भाजून निघाला. रिकाम्या हातानेच त्याला परत फिरावे लागले.
राजापुढे जाऊन महाश्वानाने मान खाली घातली. राजाने काय झाले ते ओळखले. आपले अग्नीश्वान कर्तव्यात कुचराई करणार नाहीत, याची राजाला खात्री होती. त्याने महाश्वानाचे सांत्वन केले आणि एवढे धाडस हसत हसत स्वीकारले म्हणून त्याचे कौतुकच केले.
अर्थात राजाच्या डोक्यातून आकाशातला चमकणारा दिवा आणण्याची कल्पना हद्दपार झालेली नव्हती. हा प्रखर तेजस्वी दिवा मिळाला नाही, तरी आकाशात चमचमणारा आणखी एक तेजस्वी दिवा आहे, तो मिळवण्यासाठी काय करता येईल या विचारात तो गढून गेला. पण आता महाअग्नीश्वानाच्या तोडीचा दुसरा अग्नीश्वान दिसेना. अखेर महाराजांनी परत मंत्रीसभा बोलावली. प्रखर उष्णतेचा दिवा आपल्याला मिळवता आला नाही, तरी आपण दुसरा नुसताच चकाकणारा आकाशातला थंड दिवा आणण्यासाठी प्रयत्न करण्याची कल्पना राजाने सर्वांसमोर मांडली.
या मोहिमेवर कुणाला पाठवावे याविषयी खलबते सुरू झाली. राज्याच्या सरसेनापतींनी अग्नीश्वानदलातील फारसा अनुभवी नसलेला एक तरणाबांड कुत्रा आणून समोर उभा केला. हे काम त्याच्या कुवतीबाहेरचे आहे, असे राजासकट दरबारातील सर्व मानकऱ्यांचे मत पडले. पण सरसेनापती म्हणाले, या युवाश्वानाने महाश्वानासारखे जड ओंडके जरी वाहून आणले नसले, तरी जंगलात सर्वदूर पसरलेली जास्तीत जास्त लाकडे गोळा करून आणण्यात त्याचा हातखंडा आहे. त्याचा स्वभाव जिद्दी असून काम फत्ते केल्याशिवाय तो जंगलातून परत येत नाही. तेव्हा नव्या दमाच्या या युवाश्वानाला ही कामगिरी देऊन पहावी, असा प्रस्ताव सेनापतींनी आत्मविश्वासाने मांडला. प्रयत्न करून पहायला हरकत नाही, असे म्हणून सर्वांनी या प्रस्तावाला संमती दिली.
राजाज्ञा मिळताच युवाश्वान राजवाड्यातून बाहेर पडला. नदीत सचैल स्नान करून त्याने आपले अंग ताजेतवाने करून घेतले; आणि मजल दरमजल करीत तो टेकड्या ओलांडून पृथ्वीच्या टोकाला येऊन पोहचला. सगळीकडे अंधारून आले होते. अजून चंद्रोदय व्हायचा होता. तोपर्यंत पुरेशी विश्रांती घेऊन तो आकाशात पेटणाऱ्या दिव्याची वाट पहात राहिला.
आता चंद्रोदय झाला होता. गोल चेंडूसारखा हा दिवा आपल्या पंजात मावेल का, तो निसटून तर जाणार नाही ना, याचा स्वत:शी अंदाज घेतला. पंजात दिवा पकडण्याची योजना त्याने सोडून दिली. त्याचा त्याच्या जबड्यावर जबरदस्त विश्वास होता. जंगलात लचके तोडून त्याने वाघाला सुद्धा जेरीस आणले होते. त्याने स्वत:भोवती एक मोठी गिरकी घेतली आणि पक्ष्यासारखा तो आकाशात झेपावला. त्याचा वेग इतका होता की, जमिनीवरील झाडे हलून वादळ निर्माण झाले. वाऱ्याच्या भोवऱ्यांतून तो भेंडोळ्यासारखा वर भिरकावला गेला. पांढऱ्या शीतल दिव्याच्या गारठ्याने त्याचा देह कुडकुडू लागला. पण जिद्दी युवाश्वान हटला नाही. त्याने आपल्या जबड्यातले दात त्या थंडगार गोळ्यात खुपसले आणि झटकन लचका तोडला. सगळाच्या सगळा दिव्यगोल त्याच्या तोंडात मावणारच नव्हता. म्हणून एकेक लचका तोडून आणायचे त्याने ठरवले.
एकामागून एक लचके तोडल्याने चंद्रगोल क्षीण होत गेला. तोंडातले दात पडल्यावर तोंडाचे बोळके व्हावे तसा तो खपाटीला लागला. अर्ध्या भाकरीसारखा दिसू लागला. आता सगळीच्या सगळी भाकरी आपण हडप करू अशा मिजाशीत युवाश्वानाचा हल्ला सुरूच होता.
आकाशातला हा चंद्रदिवा बर्फापेक्षाही शीतल असल्याने युवाश्वानाचा जबडा गोठून बधिर झाला. त्याच्या जबड्याची हालचाल थांबली. तोंडातले चंद्रगोळे ओघळून पडले आणि पुन्हा चंद्रदिव्यात मिसळून गेले. अर्ध्या भाकरीचा चंद्रदिवा पूर्वीसारखाच गोलाकार झाला.
युवाश्वान जिद्दीचा होता. त्याने पुन्हा आपली आघाडी सुरू केली. पुन्हा चंद्रदिव्याचे लचके तोडले, चंद्रदिवा रोडावत गेला.. पुन्हा चंद्रदिव्याच्या शीतल थंडीत जबडा बधिर झाला. चंद्रगोळे निसटून पुन्हा मुळच्या रूपात जोडले गेले. हा खेळ बरेच दिवस चालू राहिला. चंद्रदिवाही हट्टी आणि युवाश्वानही हट्टी. कुणीच मागे हटायला तयार नाही. तारा राजा अजूनही त्या युवाश्वानाची वाट पहात आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. जिद्दी युवाश्वानाची चंद्रावरची स्वारी अजून पराभूत झालेली नाही. आजही लचके तोडले गेल्याने चंद्रदिवा रोड होतांना दिसतो, कधी अर्ध्या भाकरीसारखा, कधी वाकलेल्या म्हाताऱ्या काठीसारखा, कधी अगदीच विरघळून दिसेनासा होणारा आणि पुन्हा एकदा अंगभर फुगणारा!