मतिपोसक जातक

अनेक जन्मींच्या संसारात संसरत असता आमचा बोधिसत्त्व एकदा हत्तीच्या योनीत जन्माला येऊन वयात आल्यावर मोठ्या गजसंघाचा धुरीण झाला होता. वृद्धापकाळामुळे त्याची आई अंध झाली व हत्तीच्या कळपाबरोबर तिला रानावनात फिरणे अशक्य झाले. तिला एका सुरक्षित स्थळी ठेऊन बोधिसत्त्व इतर हत्तींबरोबर चांगली चांगली फळे वगैरे आहाराचे पदार्थ पाठवीत असे. परंतु ते रसलोलुप हत्ती वाटेतच ती फळे खात असत व बिचाऱ्या वृद्ध हत्तीणीच्या वाट्याला पालापाचोळा वगैरे नीरस पदार्थच येत असत.



अनेक जन्मींच्या संसारात संसरत असता आमचा बोधिसत्त्व एकदा हत्तीच्या योनीत जन्माला येऊन वयात आल्यावर मोठ्या गजसंघाचा धुरीण झाला होता. वृद्धापकाळामुळे त्याची आई अंध झाली व हत्तीच्या कळपाबरोबर तिला रानावनात फिरणे अशक्य झाले. तिला एका सुरक्षित स्थळी ठेऊन बोधिसत्त्व इतर हत्तींबरोबर चांगली चांगली फळे वगैरे आहाराचे पदार्थ पाठवीत असे. परंतु ते रसलोलुप हत्ती वाटेतच ती फळे खात असत व बिचाऱ्या वृद्ध हत्तीणीच्या वाट्याला पालापाचोळा वगैरे नीरस पदार्थच येत असत.

एकदा आईच्या समाचाराला गेला असता बोधिसत्त्वाला आपल्या आईची दीनावस्था दिसून आली व त्याचे कारण समजून आल्यावर त्याने असा निश्चय केला की, इतःपर गजसंघाचे नायकत्व सोडून देऊन आपल्या मातेच्या सेवेत ती जिवंत असे तोपर्यंत रहावयाचे. त्याचा हा बेत हस्तियुथाला पसंत पडला नाहीं. तथापि तो त्याने अमलात आणला.

एके दिवशी एक वनचर त्या अरण्यात वाट चुकून इतस्ततः भटकत फिरत असलेला बोधिसत्त्वाच्या पहाण्यात आला. या अजस्र हत्तीला पाहिल्याबरोबर वनचर भयकंपित होऊन पळत सुटला. पण रस्ता बिकट असल्यामुळे त्याला दूर जाता येईना. त्याची अशी गाळण झालेली पाहून बोधिसत्त्व म्हणाला, “बा मनुष्या, माझ्यापासून तुला भय आहे अशी शंका मनांत आणून इतस्ततः पळू नकोस. तुझ्यावर काही आपत्ती आली असावी असे मला वाटते. आणि जवळ येऊन तू जर मला आपला वृत्तांत सांगशील तर कदाचित या आपत्तीतून तुझा मी उद्धार करू शकेन.”

वनचर जवळ जाऊन साष्टांग प्रणिपात करून म्हणाला, “गजपुंगव, आज सात दिवस मार्ग चुकल्यामुळे मी या अरण्यात आहे.” यांतून पार पाडून मला मनुष्यवस्तीत नेऊन सोडाल तर मी आपला अत्यंत ऋणी होइन, त्या हस्तिनागाने वनचराला आपल्या पाठीवर बसवून अरण्यांतून पार पाडले आणि वाराणशीला जाणाऱ्या मोठ्या सडकेवर नेऊन ठेविले.

त्याच वेळी वाराणशीच्या राजाचा मंगळहस्ती मरण पावला होता व तशा प्रकारचा दुसरा हत्ती मिळणे मुष्कील होते. राजाने तसा हत्ती मिळवून देणाऱ्या मनुष्यास मोठे बक्षिस मिळेल असे सर्व शहरात भेरी वाजवून जाहीर केले होते.

द्रव्याच्या लालुचीने त्या वनचराने हत्ती पकडणाऱ्या राजाच्या माहुतांना बोधिसत्त्वाचे वसतिस्थान दाखवून दिले.

त्यांनी बोधिसत्त्वाला घेरून त्याच्यावर शस्त्रास्त्रांचा वर्षाव केला. आपणाला वेढणाऱ्या सर्व माणसाला तुडविण्याचे सामर्थ्य बोधिसत्त्वाच्या अंगी असूनही त्याने आपल्या गंभीर शांतीचा भंग होऊ दिला नाही. तो आपल्या मनाशीच म्हणाला, “मी क्रोधोन्मत्त झालो तर या सर्वांचा संहार करण्यास विलंब लागणार नाही. पण तेणेकरून मी शीलभ्रष्ट होईन, म्हणून सहनशीलपणाने यांचे प्रहार सोसावे हेच चांगले. मुख्य माहुताने बोधिसत्त्वाची लक्षणे तेव्हाच ओळखिली व तो त्याच्या जवळ जाऊन त्याला मोठ्या प्रेमाने वाराणसीला घेऊन गेला.

राजाच्या हत्तीशाळेत बोधिसत्त्वाचा मान उत्तम प्रकारे राखण्यात आला होता हे निराळे सांगावयास नकोच. परंतु त्याने अन्नपाणी ग्रहण करण्याचे अगदीच वर्ज्य केले. हे वर्तमान राजाला समजले तेव्हा हस्तिशाळेत जाऊन तो बोधिसत्त्वास म्हणाला, “हे नागराज, अन्नपाणी वर्ज्य करून तू आपल्या शरीराला ताप देऊ नकोस. येथे सुखाने राहून आमच्या राज्याचे पुष्कळसे हित तुला करिता येईल.” हत्ती म्हणाला, “परंतु ती बिचारी अनाथ, आंधळी, एकाकी अरण्यात काय करील? चंडोरण पर्वतावर मोठमोठाल्या खुंटाला आदळून तिची गति काय होईल? ” राजा म्हणाला, “ही बाई कोण आहे?” “महाराज, ती माझी आई आहे.” हत्ती उत्तरला. हे त्या हत्तीचे मातृप्रेम पाहून राजा अत्यंत गहिवरला आणि म्हणाला, “माहुतहो, या मातृभक्त गजाला ताबडतोब मुक्त करा व त्याच्या मूळच्या ठिकाणी नेऊन सोडा.’ त्याप्रमाणे बोधिसत्त्वाला सोडण्यात आल्यावर त्याने सोंडेत पाणी घेऊन ते आपल्या आईच्या पाठीवर शिंपडले. तेव्हा ती म्हणाली, “अरे, हा मेघ देखील भलत्याच वेळी वर्षाव करीत आहे. माझ्यापाठी संतप्त पृष्ठभागावर पाणी शिंपडणाऱ्या माझ्या प्रियपुत्राची मला हा आठवण देत आहे.” तेव्हा बोधिसत्त्वाने आपण स्वतःच सेवेसाठी हजर आहे असे सांगून आपल्या आईला अत्यंत मुदित केले. तिने काशीराजाला मनःपूर्वक आशीर्वाद दिला.

त्या राजाने बोधिसत्त्वाच्या गुणांवर प्रसन्न होऊन तेथील पुष्करणीच्या जवळ एक गाव वसविला आणि त्याला व त्याच्या आईला रोज आहार मिळावा अशी व्यवस्था केली.

आई निवर्तल्यावर बोधिसत्व करंडक नावाच्या आश्रमात राहून तेथील ऋषीची सेवा करू लागला. राजाने बोधिसत्त्वाची एक पाषाणप्रतिमा करवून तिचा मोठा गौरव केला आणि जंबुद्वीपातील लोक प्रतिवर्षी त्या ठिकाणी जाऊन गजोत्सव करू लागले.

Author