(अलास्कन लोककथा)
सुरुवातीच्या काळात रात्रीच्या वेळी सूर्य, चंद्र आणि तारे नव्हते. रेव्हन हा सर्वशक्तिमान होता. त्याने सगळ्या प्राण्यांना, माशांना आणि माणसांना निर्माण केले होते. तरी ते सगळे प्राणी अंधारातच राहत होते. कारण त्याने अजून सूर्य तयार केला नव्हता.
एके दिवशी रेव्हनला समजले की नास नदीच्या काठी एक प्रमुख राहतो.
त्याला अशी एक विलक्षण मुलगी आहे जिच्याकडे सूर्य, चंद्र आणि तारे आहेत.
ते तिने देवदाराच्या लाकडापासून बनवलेल्या पेटीमध्ये ठेवले आहेत.
नदीकाठचा हा प्रमुख आणि त्याचे लोक तिचे आणि त्या पेटीचे उत्तम प्रकारे रक्षण करीत असतात.
रेव्हनच्या लक्षात आले की, त्या खेड्यातील लोकांकडून त्यांची ही संपत्ती युक्तीनेच चोरून घेतली पाहिजे. म्हणून त्याने स्वतःचे रूपांतर त्या प्रमुखाच्या नातवंडाच्या रूपात करायचे ठरवले. त्यांच्या घराजवळ असणाऱ्या उंच झाडावर रेव्हन उडत गेला आणि स्वतःला हेमलॉक झाडाच्या सुईसारख्या टोकदार पानामध्ये बदलवून घेतले. त्यानंतर टोकदार पानाच्या स्वरूपात तो त्या मुलीच्या पाणी प्यायच्या भांड्यात पडला. प्रमुखाच्या मुलीने ते भांडे पाण्याने भरून घेतले आणि त्या पानासकट ती पाणी प्यायली. अशा प्रकारे त्या प्रमुखाच्या मुलीच्या शरीरात प्रवेश करून रेव्हनने बाळाचे रूप घेतले. नंतर योग्य वेळी त्या तरुण मुलीने एका मुलाला जन्म दिला. तो मुलगा प्रमुखाचा अत्यंत लाडका होता. मुलगा मागेल ते त्याला मिळू लागले.
सूर्य, चंद्र आणि तारे देवदाराच्या एका सुंदर कोरलेल्या लाकडी पेटीत ठेवलेले होते. ती पेटी घराच्या लाकडी जमिनीवर ठेवलेली होती. त्यासाठी तो नातू सतत रडायला लागतो. आजोबांनी जेव्हा ती पेटी नातवाला दिली, तेव्हाच त्याचे रडणे थांबले. चंद्र आणि तारे त्या नातवाला खेळायला मिळाल्यावर लगेच त्याने चंद्र आणि ताऱ्यांना धुराड्यातून वर सोडून दिले. ते आकाशात सगळीकडे विखुरले. हे पाहून त्याच्या आजोबांना अत्यंत वाईट वाटले. पण नातू असा चुकीचा वागला तरी तो त्यांचा अत्यंत लाडका असल्यामुळे त्यांनी त्याला शिक्षा केली नाही.
चंद्राला आणि ताऱ्यांना मोकळे केल्यावर तो लहान सूर्यप्रकाश असलेल्या पेटीसाठी रडायला लागला. त्याचे रडणे काही केल्या थांबतच नव्हते. रडून रडून तो मुलगा आजारी पडला. आजोबांना शेवटी ती पेटी त्याला द्यावीच लागली.
नातूरूपी रेव्हन त्या पेटीशी खूप वेळ खेळला. मग अचानक तो परत पक्षी बनला आणि त्या पेटीसकट धुराड्यातून उडून गेला. उडत उडत शेवटी रेव्हन नास नदीवर असलेल्या खेड्यापासून बराच लांब आला. त्या वेळी अंधारात लोक बोलत बसलेले असतात. त्यांचे बोलणे रेव्हनने ऐकले. नंतर तो त्यांना जाऊन भेटला.
“तुम्ही कोण आहात? तुम्हाला प्रकाश मिळाला तर आवडेल का? ” असे त्या लोकांना रेव्हनने विचारले. ते लोक त्यावर त्याला म्हणाले की, तो खोटे बोलणारा आहे. कुणीही प्रकाश देऊ शकत नाही.
तो खरे बोलत आहे हे दाखवण्यासाठी रेव्हनने कोरीव कामाने सुशोभित केलेली पेटी उघडली आणि सूर्यप्रकाशाला जगात आणले. ते लोक त्यामुळे इतके घाबरले की जगाच्या कानाकोपऱ्यात पळून गेले.
आता जगात तारे असतात, चंद्र आणि सूर्यप्रकाश असतो आणि अंधार फार काळ राहत नाही.