शेतकर्‍यांच्या विवंचना

आज आपण पाहता सगळीकडे दुष्काळ पसरला आहे. पाण्याविना पशु, पक्षी आणि मानव हैराण झाले आहेत. कधी निसर्ग कोपतो तर कधी राजकारणी कोपतात. कधी नैसर्गिक आपत्ती येते तर कधी मानवाने घडवलेली आपत्ती त्रास देते. एकूणच सर्व आनंदी आनंद आहे. सगळीकडे मर्यादेचे उलंघन होत आहे.



शेतकरीही सुद्धा माणूस आहे,

शेती करून पोटाची खळगी भरत आहे !

निसर्गही त्याच्यावर कोपला आहे,

पाण्याविना तडफडत आहे !

शेतकरी गुराबैलांवर मुलांप्रमाणे प्रेम करतो,

चारापाणी न मिळाल्याने धायमोकलून रडत असतो !

गुराबैलांसाठी सरकारी छावण्या उभारल्या आहेत,

भ्रष्टाचार्यांमुळे उघड्या बोडक्या झाल्या आहेत !

कोणाला सांगणार ही व्यथा?

व्यथांच्या झाल्या आहेत कथा,

ज्यांना सांगायचे तेच “खफा” !

व्यथा सांगून सांगून दमला आहे,

सावकारांची देणी फेडता फेडता

कंठात प्राण आला आहे !

माणूस माणसालाच परका झाला आहे,

देवाच्या अकारण कारुण्याने

कसाबसा दिवस ढकलतो आहे,

माणुसकी जपता जपता

स्वत:लाच हरवून बसला आहे !

सरकार दरबारी न्याय मिळेल म्हणून आशावादी आहे,

कुंपणच शेत खाऊ लागले आहे,

नाही म्हणायला आता ‘त्याच्या’वरच अवलंबून आहे !

जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)

— जगदीश पटवर्धन

Author