पोरकी







आई ग ……

तू असतीस तर

दारी मोगरा फुलला असता

स्वागतकक्षी फुलदाणीमध्ये

गेंद टपोरा झुलला असता ।

हृदयाच्या पायघड्यांवरूनी

नेले असते देवघराशी

हळदीच्या पाऊलखुणांची

उठली असती घरभर नक्षी ।

मायेच्या नजरेने मजला

पुसलें असते गूज कालचे

लाज लाजरी नजर हासरी

उत्तर देते तुजला त्याचे ।

ताटा भोवती असती महिरप

पाटा खाली असते स्वस्तिक

वेढी विरोद्या लग्नचुड्याचे

झाले असते अपूर्व कौतुक ।

तू असतीस तर

घरास आपल्या असते घरपण

अवेळीच हे प्रौढपणाचे

नसते आले मजवर दडपण ।

मायेच्या वर्षावाखाली

मोहरून मी गेले असते

कसे कुठे ह्या ठेवू लाडकीस

असे तुलाही झाले असते ।

तू नसलीस तरी तुझीच छाया

फिरत रहाते माझ्या भोवती

वस्तू वस्तू अन् वास्तू तुनी या

दिसते मजला तुझीच मूर्ती ।

— सौ. सुधा मोकाशी

Author