श्रेष्ट गं तू रातरानी



एकदा समारंभात जातां

प्राप्त जाहला सुमनांचा गुलदस्ता

वाटले, सुवास सुमनांचा घेत असता

सुगंध कसा बरें दुरापास्त ? ||१||

त्यात एक फुल असे

कदापिही त्यास सुवास नसे

झुबका तयाचा मोहक दिसे

वदलो मी फुल हे कसे ..||२||

विचारात ह्याच स्वगृही परतलो

तंद्रित त्याच शेजेवरती बसलो

क्षणात पडला निद्रेचा बाहुपाश

झोपी गेलो मी निमिषात ||३||

निद्रासमयीं एक सुंदरी आली

‘ कसा रे तू मुर्ख नर ? ‘वदली

कशापायीं दिलेस मला दोष

सुगंधाने माझ्या होशील बेहोश ||४||

मीही तिच्या दाव्याला ललकारिले

ओढित तिने मला शेजेपासुनी नेले

अनिलाचा स्पर्श तो, मंद-मंद

सौरभाने झालो मी बेधुंद ||५||

पुसिले मी तिजपाशी,कोण गं तू कामिनी ?

कुणी संबोधि रजनीगंधा, कुणी रातरानी

ऐकताच मी काढल्या उठाबशा ,कान पकडुनी

नकळत बोललो श्रेष्ट गं तू फुलांमध्ये रातरानी …..!||६||

* काव्य *

नरेन्द्र श्रावणजी लोहबरे

— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश

Author