<मैखाना
<टोकदार होत चाललेल्या काळाचे बोथट विचार
<प्रसव वेदनांनी विव्हळत.. जळत राहणारी
<संम्भ्रमाच्या कुशीत निजलेली ही भयाण रात्र
<मेजावरच्या पेल्यात मिसळलेले
<भविष्य - भूतकाळाचे असंख्य पंखछाटले पक्षी
<जखमांच्या किनार्याशी पहुडलेल्या
< ....काही हुल्लड साउल्या
< ....अल्लड विचार
<आता आपणच आवरायला हवं
<आपलं हे जग
<उद्याही चालायचं आहे मग
<पावलांना बांधून रस्ते
<...न दिसणाऱ्या दिशेचा दिशेने
< ....संध्याकाळ होईपर्यंत
<या सुंदर थकल्या स्वप्नांची थैली
< काखोटीला मारून
<"हा रस्ता अटळ आहे
<अटळ आहे घाण सारी " म्हणत
<पण आज... आत्ताची वेळ
<फक्त माझ्यापुरतीच ...
< ... थोडी सरलेली
< थोडी उरलेली
<नकोच घाई
<गाऊ देत अंगाई
<जरा या उरातील वादळांसाठी
<मग्नातून उठू देत भग्नांचेही मिनार
<सुटू देत ग्रहण उजेडाचे क्षणभर
< .....निघू नंतर
<बस्सं....!
<हा शेवटचाच पेग
<स्वतःच्या शेवटासाठी
<बधीराच्या भुंग्यांच रव
<आजून सुरु व्हायचाय
<पाहायचाय मला माझाच चेहरा
<आर्काचा तवंग होऊन फेसाळलेला
<बुडबुडयांसम उसळलेला
<गाव दूर ...दूर ...
<स्वप्न चूर ...चूर..
<पहाटेचा गंधगार स्वप्नील अरुण
<डोळे येण्याआधी भरून
<ही मैफिल ...अनोळख्यांची
<ही सोबत ...नसणार्यांची
<विझलेल्या या ओळी
< निजलेला मैखाना
< थोडेसे श्वास
< आणि न दिसणाऱ्या क्षितीज्यावरून
< तिने दिलेल्या आर्त हाका
<मित्रा.....!
<आता मला निघायलाच हवं...!
— गजानन मुळे
