बैल आणि खेचर

एक श्रीमंत जमीनदार शेतकरी होता. आपल्या बायका-मुलांसह तो शेतावरच राहात असे. त्याला पशुपक्ष्यांची भाषा अवगत होती. फक्त हे ज्ञान दुसऱ्या कुणाला सांगायचे नाही, असे त्याच्यावर बंधन होते. त्याने ते ज्ञान दुसऱ्या कुणाला सांगितले तर त्याच्या वाट्याला मृत्यू येणार होता. त्यामुळे हे रहस्य त्याने कुणालाच कळू दिले नव्हते. पण या भाषिक देणगीमुळे त्याला पशु-पक्ष्यांच्या भावभावना चटकन समजायच्या. गोठ्यातले वासरू भुकेने व्याकूळ झाल्यामुळे त्याच्या आईचा धावा करते आहे; घोड्याला कंटाळा आला आहे, त्याला चक्कर मारून आणली पाहिजे हे त्याला चटकन कळायचे. मांजरांची भांडणं, कोंबड्यांचा कलकलाट, पक्ष्यांचे गुंजन यातला भावार्थ त्याला समजायचा.



एक श्रीमंत जमीनदार शेतकरी होता. आपल्या बायका-मुलांसह तो शेतावरच राहात असे. त्याला पशुपक्ष्यांची भाषा अवगत होती. फक्त हे ज्ञान दुसऱ्या कुणाला सांगायचे नाही, असे त्याच्यावर बंधन होते. त्याने ते ज्ञान दुसऱ्या कुणाला सांगितले तर त्याच्या वाट्याला मृत्यू येणार होता. त्यामुळे हे रहस्य त्याने कुणालाच कळू दिले नव्हते. पण या भाषिक देणगीमुळे त्याला पशु-पक्ष्यांच्या भावभावना चटकन समजायच्या. गोठ्यातले वासरू भुकेने व्याकूळ झाल्यामुळे त्याच्या आईचा धावा करते आहे; घोड्याला कंटाळा आला आहे, त्याला चक्कर मारून आणली पाहिजे हे त्याला चटकन कळायचे. मांजरांची भांडणं, कोंबड्यांचा कलकलाट, पक्ष्यांचे गुंजन यातला भावार्थ त्याला समजायचा.

या शेतकऱ्याच्या गोठ्यात एक बैल आणि एक गाढव आणि घोड्याच्या प्रजातीतले खेचर बांधलेले असायचे. बैल रोज शेतात काम करायचा. खेचराला तसे काही काम नसायचे, कधीतरी मालक फेरफटका मारण्यासाठी त्याच्या पाठीवर बसायचा, एवढेच त्याला काम. त्याची निगाही चांगली ठेवली जाई. एके दिवशी शेतकरी अंगणात बसलेला असताना त्याच्या कानावर बैल आणि खेचर यांच्यातला संवाद कानावर पडला.

बैल गाढवाला म्हणाले, “नमस्कार खेचर राजे! तुमचे आपले बरे असते, काही काम ना धाम, आपले मस्तीत पडून रहायचे. सकाळी सकाळी खिंकाळून सगळ्यांना उठवण्याचे काम मात्र तुम्ही इमाने इतबारे करता. मालकाची तुमच्यावर मेहेरबानी असल्यामुळे गडी माणसे तुमची निगाही चांगली ठेवता तुमची ऐट काय वर्णावी? तुमच्या आसपासची जमीन कायम झाडून स्वच्छ केलेली असते. नाहीतर आमचे पहा, सतत शेणा-मुतात पडलेलो असतो. तुम्हाला खायला सडवलेल्या धान्याचे आंबोण, आम्हाला आपला सुका कडबा. तुम्ही आपले चैनीत राहाता, आम्ही मात्र दिवसभर नांगराला जुंपलेले असतो. दिवसभर नांगरून कोळपून मी तर बाबा अगदी थकून जातो. पण सांगा कुणाला? जरा कामात ढिलाई केली तर वरून काठीचे रट्टे बसतात आणि शिव्यांची लाखोली वाहिली जाते. एवढे थकून भागून रात्री गोठ्यात आल्यावर काय, तर म्हणे गव्हाणीतला सुका कडबा! दुखऱ्या शरीराला रात्र रात्र झोप येत नाही. तुम्ही मात्र डाराडूर झोपता. जाऊ दे बाबा, नशीब ज्याचे त्याचे ‘ खेचराने बैलाची व्यथा शांतपणे ऐकून घेतली. मग सज्जन मित्राचा आव आणून ते बैलाला म्हणाले, “ बैलोबा, तू खरोखरच गरीब आहेस बाबा. तू अगदी भोळा भाबडा आहेस, शहाणपणा तुला ठाऊकच नाही. अगदी मट्ठासारखा वागतोस. उगाच नाही तुला सगळे जण “बैलोबा” म्हणत. मालकासाठी तू इतका राब राब राबतोस, पण त्यांना आहे का काही तुझ्या कष्टाची किंमत. उलट तुला ते काठीने बडवतात. शिव्या देतात. खायला कोरडा कडबा देतात. गोठ्यातली तुझी जागा स्वच्छ ठेवीत नाही. पण तू अगदीच कोडग्यासारखे सारे काही मुकाट्याने सहन करीत असतो. आपण नाही बाबा, हे एवढे कष्ट आणि हलाखीचे जगणे सहन केले असते.” बैल निराश होऊन फक्त मान हलवीत राहिला. मग खेचराला बैलाची दया आली. त्याने बैलाला दोन शाहाणपणाच्या गोष्टी शिकवायचे ठरविले. खेचर बैलाला म्हणाले, “ तुला जर माझ्याहूनही सुखी जीवन जगायचे असेल, तर माझ्या सल्ल्याप्रमाणे वाग.” बैल मनातून हुरळून गेला, म्हणाला, “सांगा खेचर राजे सांगा. आता तुम्हीच मला गुरूच्या स्थानी. आपण द्याल तो उपदेश लक्षात ठेवून मी वागेन.” यावर खेचराने बैलाला दोन युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. खेचर म्हणाले, “बैलोबा, उद्या तुम्ही उठल्यापासून आजारपणाचे सोंग करा. म्हणजे शेतावर
तुझ्या मानेवर जू ठेवले की तू लागलीच खाली बैस. ते तुला मारतील, झोडतील, पण तू जागचा उठू नकोस. उठला तरी चालू नकोस, चाललास तरी थोड्याच वेळात पुन्हा बसकण मार. असे चारदोन वेळा झाल्यावर काय होते ते तुला समजेलच. तुला संध्याकाळी गोठ्यात बांधल्यावर तुझ्यापुढे अगदी सरकीची ढेप ठेवली तरी तोंड लावू नकोस. गव्हाणीतल्या कडब्याला शिवू नकोस. उगाच भूक भागवण्यापुरत्या रात्री चारदोन काड्या खा. दुसऱ्या दिवशी शेतावर गेल्यावर असेच पहिल्यासारखे नाटक सुरू ठेव. बघ, ते तुला विश्रांती देतात, की नाही ते मला सांग.

खेचराचा सल्ला बैलाला पटला. दुसऱ्या दिवशी बैलाने मानेवर जू ठेवल्यावर बसकण मारली. काठ्यांचे रट्टे बसू लागले. तरी उठत बसत त्याने आपला खेचराचा सल्ला अमलात आणला. गड्याने त्याला काठीने बडवले, मारले- झोडपले, पण त्याने आपला निर्धार कायम ठेवला. त्याने कामात चालढकल करीत दिवस पार पाडला. गड्याने संध्याकाळी बैलाला गोठ्यात बांधले. मालकाला बैल आजारी असल्याचे सांगितले. मालकीणीने बैलाच्या पुढे ठेवण्यासाठी सरकीची ढेप आणि आंबोण तयार करून दिले. पण बैलाने त्याला तोंडसुद्धा लावले नाही. रात्रभर तो पोट फुगवून आजारपणाचे सोंग घेऊन पडून राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो नेहमीप्रमाणे झडझडून उठला नाही.
हंबरला नाही. शेपूट उडवली नाही. सकाळी पुन्हा त्याला सरकी देऊन पाहिली, पण बैलाने तोंडही लावले नाही. आता गड्याची खात्री पटली, की बैल आजारी आहे. त्याने काळजीने मालकाला सांगितले, “धनी, बैल आजारी आहे. गुरांच्या दवाखान्यात नेऊन उपचार केले पाहिजेत. आपला कामाचा खोळंबा होईल, पण त्याला चार-दोन दिवस विश्रांती दिली पाहिजे.”

गड्याचे बोलून झाल्यावर मालक गड्याला म्हणाला, “ ठीक आहे, त्या बैलाला आज गोठ्यातच विश्रांती घेऊ दे. तू आज बैलाच्या जागेवर खेचराला घेऊन जा. त्या बदमाशाच्या मानगुटीवर जू ठेवून नांगराला जुंपा. बैलाचे सगळे काम खेचराकडून करून घ्या. हयगय करू नका.” गड्याला खेचरावरचा राग कळला नाही. धन्याची आज्ञा प्रमाण मानून तो मुकाट्याने खेचराला घेऊन शेतात गेला. दिवसभर बैलाचे काम खेचराकडून करून घेतले. ते त्याला जमेना तेव्हा त्याने खेचराला भरपूर मारले-झोडपले.
शेवटी मार खाऊन त्याच्या बरगड्या दुखू लागल्या, मानेची लक्तरे लोंबू लागली. संध्याकाळी घरी परत येताना त्याला धड चालता सुद्धा येईना. इकडे बैल मात्र मजेत होता. आंबोण खाऊन सुस्तावला होता. कितीतरी दिवसांनी त्याला एवढी विश्रांती मिळाली होती. हे सगळे खेचराच्या सल्ल्यामुळेच शक्य झाले होते. तो मनातून सारखा गुरू खेचराचे आभार मानून त्याला दुवा देत होता. संध्याकाळी खेचर आल्यावर बैल आदराने उठून उभा राहिला. त्याने खेचर राजांचे आभार मानले.
गाढव चांगलेच ओशाळले होते. आपला फुकटचा सल्ला आपल्याच अंगाशी आला, म्हणून त्याला पश्चाताप होत होता. राग, पश्चाताप आणि मार खाऊन आलेला थकवा यामुळे गाढवाला काही बोलताच येईना. त्याने आपले मौनच पाळले. पण त्याच्या मनात दुसरेच काही शिजत होते. उद्याही बैलाच्या जागी आपल्यालाच जावे लागले तर आपले काही खरे नाही. यातून सुटका कशी करून घेता येईल या विचारात ते दंग होते. यानंतर रात्र झाली, चांदणे पडले. शेतकरी आपल्या बायका-मुलांसह पौर्णिमेच्या चांदण्याचा आनंद लुटण्यासाठी गच्चीवर आले. सगळीकडे निरव शांतता होती. तेवढ्यात मालकाला खालून बैल-खेचर यांच्यात चाललेली गुजगोष्ट ऐकायला आली. खेचर बैलाला विचारत होते, “काय बैलोबा, उद्या काय बेत आहे तुमचा?” बैल म्हणाला “काही वेगळा बेत नाही महाराज. तुमच्या शिकवणुकीचं तंतोतंत पालन करायचं ठरवलं आहे, मी. पोट फुगवून आजारपणाचा बहाणा मी कायम ठेवणार आहे. राजे, तुमच्या सल्ल्यानेच माझ्या
वाट्याला हे दुर्मिळ सुख आले, मी आता तुमच्या शब्दाबाहेर नाही.” यावर खेचराने बैलाला स्वप्नातून खडबडून जागे करणारे बोल सुनावले. खेचर म्हणाले, “ जरा जपून रहा. शहाणपणाने वाग. मी आजच मालकाचे आणि गड्याचे संभाषण ऐकले. मालक गड्याला सांगत होता, उद्या जर हा बैल असाच बसत रहिला तर त्याला संध्याकाळी गोठ्यात आणूच नको. त्याला थेट खाटकाकडे नेऊन घाल. त्याला मारून त्याचे मांस गोरगरिबांना वाटून टाक. चामडे कमावून तेवढे मात्र बरोबर आण.” हे ऐकून बैलाला घामच फुटला. त्याने खेचराला भाबडेपणाने विचारले, “आता मी काय करावे?” यावर खेचर म्हणाले,” घाबरू नकोस. मी सांगतो तसे वाग. उद्या सकाळी तुझ्यासाठी आंबोण आले, तर तू नेहमीसारखे हंबरून त्याचा फडशा पाड. शेतात जाऊन नेहमीसारखे काम कर. नाहीतर मालक तुला कापून काढील.’

दुसऱ्या दिवशी सकाळी बैलाला गोठ्यातून बाहेर नेण्याच्या वेळेस मालक आपल्या बायकोसह तिथे आला. बैलाने शेपूट वर केली, मालकाला खूश करण्यासाठी हंबरला, डरकाळला. त्याचे आजारपणाचे नाटक संपले होते. पण बैलाचे हे उंडारणे पाहून मालक जोरजोराने हसू लागला. आपले पती असे उगाच का पोट धरून हसू लागले, हे त्या बाईला कळेना. तिने मालकाला विचारले, “अहो, असे अचानक काय झाले हसायला? तुम्ही ठीक आहात ना?” यावर मालक पुन्हा हसू लागले. म्हणाले, “माझ्या हसण्याचे रहस्य तुला सांगता येणार नाही; पण गोठ्यातल्या खेचराला मात्र ते चांगलेच समजले आहे.” मालकाच्या या उत्तरावर त्याची बायको आणि गडी आवाक होऊन पहात राहिले.
पक्ष्यांच्या भाषेची गंमत त्यांना थोडीच समजणार होती?

Author