कळीचा माकड

(इंडोनेशियन लोककथा)

इंडोनेशियन लोक म्हणतात की, फार वर्षांपूर्वी, आता जसे माणसांत व जनावरांत आपापसांत वैर आहे, तसे नव्हते. सगळेजण एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहात. हे सगळे वैर एका कळीच्या नारदाने – ‘माकडाने निर्माण केले. ते कसे केले याबद्दल एक गंमतीदार गोष्ट सांगतात; ती अशी..



(इंडोनेशियन लोककथा)

इंडोनेशियन लोक म्हणतात की, फार वर्षांपूर्वी, आता जसे माणसांत व जनावरांत आपापसांत वैर आहे, तसे नव्हते. सगळेजण एकमेकांशी
गुण्यागोविंदाने राहात. हे सगळे वैर एका कळीच्या नारदाने – ‘माकडाने निर्माण केले. ते कसे केले याबद्दल एक गंमतीदार गोष्ट सांगतात; ती अशी…

एक दिवस एक माकड भटकता भटकता दमून एका पर्वताच्या उंच शिखरावर बसले होते. तिथून त्याला खालचे सर्व जग दिसत होते. त्याने पाहिले. शेतकरी गाणे गात आनंदाने आपल्या भातशेतात काम करीत होता. म्हशी शेजारीच नदीत थंड पाण्यात डुंबत होत्या, वाघ जवळच्या रानात उन्हात पडून डुलकी घेत होता. चित्ता स्वस्थपणाने ऐटीत पायवाटेने जात होता, पक्षी घरट्यांत झोप घेत होते. आणि मधमाशा गुणगुणत पोळ्याभोवती मजेत घिरट्या घालीत होत्या.

माकडाला सगळेजण आनंदात आहेत हे पाहून बरे वाटेना. तो तिथून खाली उतरला नि सरळ चित्त्याकडे आला. चित्त्याने त्याला पकडले व खाऊ लागला.’अरे थांब, मला रे बाबा का खातोस? इथे सगळीकडे कशी धष्टपुष्ट गुरे फिरताहेत. आंधळाच दिसतोस तू!’ ‘हट्, मला नाही गुरेबिरे दिसत. मला तूच एकटा दिसतो आहेस. मी तुलाच खाणार,’ चित्ता म्हणाला. “चल माझ्याबरोबर. तुला सुंदर गुरे दाखवतो.” माकड म्हणाला. चित्ता त्याच्याबरोबर निघाला. माकडाने त्याला एका उंच तुटक्या कड्याजवळ नेले. कड्याच्या कडेजवळ पाठ करून त्याला बसविले. मग तो त्याला म्हणाला, ‘थांब, मी आग पेटवतो प्रथम. ती चांगली पेटली की आपण गुरे भाजून खाऊ.’ माकडाने आग पेटवल्यानंतर ती जास्त वाढवली आणि नंतर तो चित्त्याच्या बाजूने तिच्यात जास्त जास्त सरपण टाकू लागला. थोड्याच वेळात जमीन तापली व चित्ता मागे सरकला. माकडाने आणखी सरपण घातले. जमीन आणखी तापली. चित्ता मागे सरकला तो मुळी कड्यावरून सरळ खालीच गेला. मग माकड त्या शेतकऱ्याकडे जाऊन म्हणाला, ‘काय रे, तुला सुंदरसे चित्त्याचे कातडे पाहिजे का ? तर मी एक मेलेला चित्ता दाखतो. तुझी सुरी घेऊन माझ्याबरोबरचल.’

तो शेतकरी आपली सुरी घेऊन त्याच्याबरोबर निघाला. माकडाने त्याला तो खाली पडून मेलेला चित्ता दाखविला. माणूस कातडे सोलण्यांत गुंग झाला असे पाहून माकड म्हशीकडे गेला नि त्यांना म्हणाला, ‘शेतकरी कुठेतरी लांब गेला आहे. तुम्ही शेतातले पीक का खात नाही ? ‘म्हशी नदीतून उठून तडक शेतात शिरल्या व भराभर पीक खाऊ लागल्या. माकड ताबडतोब मधमाशांकडे जाऊन त्यांना म्हणाला, ‘त्या पहा म्हशी भातांचा सगळा फुलोरा खाऊन टाकताहेत. मग तुम्ही मध कसा गोळा करणार? त्यांना डसून घालवून का देत नाही तुम्ही ? मधमाशा सगळ्या ताबडतोब म्हशीवर हल्ला करण्यासाठी गेल्या. मग माकड शेतकऱ्याच्या थोरल्या मुलाकडे गेला. तो मुलगा घोड्यांची राखण करीत होता. त्याला माकड म्हणाला, ‘अरे, त्या बघ मधमाशा सगळ्या गेल्या आहेत तू पोळ्यातला मध का काढून घेत नाहीस?’ मुलाने कुऱ्हाड उचलली आणि तो मध काढायला गेला. त्याने झाडावर उंच लटकलेली पोळी पाहिली व झाड तोडण्यासाठी तो कु-हाडीचे घाव घालू लागला. मग माकड कावळ्यांकडे गेला आणि म्हणाला, ‘ते बघा घोडे कसे चरताहेत. तिथे त्यांना राखायला कोणी नाही. तुम्ही त्यांचे रक्त का खात नाही ? सगळे कावळे उडून गेले. आणि घोड्याच्या पाठीवर बसून त्यांना टोचू लागले. त्याचे रक्त काढू लागले. त्यामुळे घोडे सैरावैरा पळूल गाले. नंतर माकड वानरांकडे जाऊन त्यांना म्हणाला, ‘कावळे घोड्यांच्या पाठी लागले आहेत. तुम्ही त्यांच्या घरट्यातली अंडी का खात नाही ? ‘वानरांनी ताबडतोब कावळ्यांच्या घरट्यांकडे मोर्चा वळविला.’ माकड वाघाकडे जाऊन चिंतातुरमुद्रा करून म्हणाला, ‘काय करावे ? शेतकऱ्याचा मुलगा एक सारखी झाडावर झाडे तोडून टाकतो आहे! असे चालू राहिले तर औषधालासुद्धा झाड रहाणार नाही शिल्लक. मग आपण काय करायचे.’ वाघ म्हणाला, ‘झाडे गेली की जंगल गेले मग माझ्या भक्षाची सोय काय ? छेः छे: मी जाऊन आत्ता त्याला थांबवतो.’ ‘म्हणून वाघ निघून गेला. मग माकड शेतकऱ्याच्या दुसऱ्या मुलाकडे जाऊन त्याला म्हणाला, अरे, पळ लवकर, वाघ तुझ्या भावाच्या मागावर जातो आहे. तो त्याला ठार मारणार आहे. ‘तो मुलगा पळत आपल्या भावाच्या बचावाला गेला. नंतर माकड हत्तीचा थवा कुरणात चरत होता तिथे गेले. त्याने गवताला आग लावून दिली. हत्ती जिकडे तिकडे पांगले आणि त्यांना परत येतांना पाहून सगळी जनावरे बिचकून वाट फुटेल तिकडे पळून गेली. मग माकड ऐटीत आपल्या पहिल्या जाग्यावर जाऊन बसले व खाली सगळीकडे पाहू लागले. खाली एकच गोंधळ झाला होता. शेतकरी चित्त्याचे कातडे काढीत होता, म्हशी त्याचे शेत लुटीत होत्या, मधमाशा म्हशीच्या मागे लागल्या होत्या,शेतकऱ्याचा मोठा मुलगा मधासाठी झाड तोडत होता, कावळे घोड्यांना पीडीत होते, वानर कावळ्यांची अंडी खात होते, वाघ मोठ्या मुलाचा मागोवा घेत जात होता, त्याच्या मागोमाग त्याला मारायला शेतकऱ्याचा दुसरा मुलगा जात होता, गवताचे कुरण जळत होते, हत्ती व इतर प्राणी इकडे तिकडे सैरावैरा पळत होते.माकड मोठ्या आनंदात हसू लागला, नि म्हणाला, ‘पहा,मी एकट्याने थोड्या वेळात या जगात केवढा गोंधळ माजवला आहे तो ! आता हे सगळेजण एकमेकांचे कायमचे शत्रू होतील. केवढे हे माझे सामर्थ्य!’

Author