अग्नीची अख्यायिका

(उत्तर अमेरिकेतील लोककथा)

जमीन तयार केल्यानंतर रेव्हनने माणूस निर्माण करायचे ठरवले. त्याने माती व समुद्राकाठची वाळू घेतली आणि पहिला माणूस तयार केला.



(उत्तर अमेरिकेतील लोककथा)

जमीन तयार केल्यानंतर रेव्हनने माणूस निर्माण करायचे ठरवले. त्याने माती व समुद्राकाठची वाळू घेतली आणि पहिला माणूस तयार केला.

हे झाल्यावर रेव्हनने ठरवले की सगळ्या जगात फिरून आपण काय काय निर्माण केले आहे, ते पाहावे. रेव्हन त्याच्या प्रवासात विचार करीत होता की, आपण माणसाला असे काही देऊ शकू का, की ज्यामुळे त्याला त्याचे जीवन चांगल्या पद्धतीने जगता येईल. नंतर त्याच्या लक्षात आले की, माणसाला अग्नी द्यायचे आपण विसरून गेलो आहोत. आपण माणसाला अग्नी दिल्यास माणूस त्याचे अन्न शिजवू शकेल आणि स्वतःला उबदारपण ठेवू शकेल.

रेव्हनने त्याच्या मित्रांना व इतर पक्षांना बोलावून घेतले आणि अग्नी कसा मिळवायचा, हे त्यांना माहीत आहे का, असे विचारले. सीगल नावाचा समुद्रपक्षी म्हणाला, ‘दहा हजार धुरांच्या दरीत’. त्याने अग्नी पाहिला आहे. हे ऐकून रेव्हनने विचारले, की कुणी स्वयंसेवक होऊन त्याच्यासाठी अग्नी आणायला तयार आहे का?

रानघुबडाला हे माहीत होते की, आपली चोच इतर सगळ्यांपेक्षा लांब आहे. त्यामुळे आपले पंख न जळू देता आपण जळते लाकूड सुरक्षितपणे आणू शकतो. म्हणून रानघुबड जळणारे लाकूड आणायला तयार झाले. सगळे पक्षी आणि रेव्हन घुबडाला पाठवायला जरी तयार झाले असले तरी त्या छोट्याशा रानघुबडाच्या लांब चोचीचा सगळ्यांना फार मत्सर वाटला.

मग घुबडाने पाण्याचे खूप मोठे अंतर उडून पार केले आणि ते ‘दहा हजार धुरांच्या दरी’ जवळ पोचले. ‘दहा हजार धुरांची दरी’ म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात असलेला लहान लहान ज्वालामुखींचा समूह. तेथे हवा इतकी गरम होती की त्यामुळे रानघुबडाचे काही पंख होरपळून गेले.

रानघुबडाने जळणारे लांब लाकूड शोधले, लांब चोचीत पकडले आणि माणूस जिथे राहत होता, तिथे परत उलटे उडायला सुरुवात केली. पण तो तिथे पोचायच्या आधीच जळणाऱ्या लाकडामुळे त्याची चोच भाजायला सुरुवात झाली. घुबडाला आता जळणारे लाकूड समुद्रात टाकून द्यावे असे वाटू लागले.

त्याचवेळी रेव्हन त्याच्याजवळ उडत आला आणि ओरडून म्हणाला, ‘जळणारे लाकूड तू खाली टाकू नकोस ! जर तसे केलेस, तर ते नक्कीच पाण्यात पडून जाईल.’

चोच जरी जळत होती आणि खूप वेदनाही होत होत्या तरी रेव्हनचे ते बोलणे ऐकून छोटे घुबड उडतच राहिले. शेवटी माणूस राहत होता तिथे रानघुबड आणि रेव्हन पोचले. रानघुबडाने जळणारे लाकूड तिथे टाकून दिले. त्यामुळे आता माणूस अन्न शिजवू शकणार होता आणि स्वतःला उबदारही ठेवू शकणार होता.

घुबडाच्या लांब चोचीचा खूप भाग जळाल्यामुळे त्याची छोटीशीच चोच मागे शिल्लक उरली. उष्णतेने त्याचे पंख होरपळून गेले. त्यामुळे त्याला लांबवर प्रवास करता येईना आणि धुरामुळे त्याचा आवाजही बदलून गेला. त्यामुळे रानघुबड फक्त कर्कश शीळ घालू शकत होते. म्हणून त्याची सगळी संतती, वंशज आता याच रुपात दिसू लागले आहेत.

Author