मराठी भाषा आणि आपण

सुमारे पंधरा-सोळा वर्षापूर्वीची ही गोष्ट.त्यावेळी माझी मुलगी इयत्ता पहिलीत होती.तिला 'माझी आई'ह्या विषयावर पाच ओळी लिहायला सांगितले होते,व तिने काय लिहायचे हे तिच्या वर्ग-शिक्षिकेने वर्गात फळ्यावरच लिहून दिले होते.

फळ्यावरची आई,माझ्या मुलीच्या आई सारखी नव्हती! म्हणून तिने 'आपल्या आई' विषयी पाच ओळी लिहिल्या!! वर्ग-शिक्षिकेला अर्थातच राग आला! व फळ्यावरचीच आई सर्वांनी लिहिली पाहिजे असा आग्रह केला.

ह्या संदर्भात त्यांना भेटलो.'प्रत्येकाची आई वेगवेगळी आहे. मुलांनी फळ्यावरची आई उतरवून काढण्यापेक्षा,त्यांना स्वत:च्या आई बाबत काय वाटते हे मोकळेपणाने लिहिणे अधिक महत्वाचे आहे'असे समजावण्याचा त्यांना प्रयत्न करत होतो.

त्यावेळी त्या गुरुमाउलीने मला एका ब्रम्हवाक्य ऐकवले, “हे पाहा,मला सत्तर वह्या तपासायच्या असतात. सगळ्यांनी सारखे लिहिले की तपासायला सोपे जाते! काय कळले?”

मला एव्हढेच कळले की,आणखी वाद घालणे म्हणजे (स्वेच्छेने) कपाळमोक्ष करून घेणे! त्यानंतर आम्ही काही पालक एकत्र आलो आणि आम्ही 'सृजन घर'सुरू केले.सृजन घर म्हणजे,'रविवारची गंमत शाळा.' विशेष म्हणजे आमच्या पैकी कुणीही 'शिक्षक'नव्हते. शाळेशी व्यर्थ वाद न घालता,शाळेला पूरक भूमिका घेणं हे मुख्य उद्दीष्ट.त्याचप्रमाणे,शाळेने मुलांसाठी जे-जे करावं असं आम्हाला वाटे,ते-ते आम्ही इथे करायला सुरुवात केली. उदा.पावसाळ्यात मुलांनी त्यांच्या शालेय परंपरेनुसार 'पावसाळ्यातील एक दिवस'हा निबंध त्यांनी शाळेत लिहिला.आम्ही आमच्याी शाळेत पावसाळ्याचे तीन गट केले.गावातला पावसाळा, शहरातला पावसाळा आणि झोपडपट्टीतला पावसाळा.वर्तमान पत्रातील फोटो,बातम्या, शाळेजवळच्या झोपडपट्टीत जाऊन मुलाखती,शेजाऱ्यांची व पालकांची मदत आणि त्यांच्या गटांची निरीक्षणे ह्यांची मदत घेऊन मुलांनी धमाल निबंध लिहिले.एका मुलाने निबंधात लिहिले होते, 'माझ्या घराच्या बाजूला गॅरेज आहे.पाऊस आला की रस्त्यावर विचित्र आकाराची इंद्रधनुष्ये वाहात असतात.हातात काठी घेऊन आम्ही वाहणारी इंद्रधनुष्ये जोडण्याचा खेळ खेळतो!' 'वाहणारी इंद्रधनुष्ये जोडण्याचा खेळ!!'ही उत्तुंग कल्पना केवळ मुलेच करू शकतात. मुलांवर विश्वास ठेवला आणि त्यांना जर अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले तरच हे शक्य होऊ शकते, असा एक नविनच साक्षात्कार मला त्यावेळी झाला.(मी 'त्या वर्ग-शिक्षिकेचा' आजन्म ऋणी आहे.)

सृजन घरात मुलांच्या मदतीने निबंध लेखनाच्या विविध पध्दती विकसित केल्या. भाषा, गणित,विज्ञान आणि परिसराबाबत वेगवेगळे उपक्रम आणि प्रकल्प कार्यान्वित केले.इयत्ता पहिलीपासूनच मुलांनी स्वत:हून वेगवेगळे प्रयोग केले व निष्कर्ष काढले. शैक्षणिक सहलींचे आयोजन केले.मुलांनीच मुलांची धमाल प्रदर्शने आयोजित केली.धड्यांची नाट्यीकरणे केली. संवाद कथांसाठी पपेटस् चा वापर केला.दिवाळीत मुलांनी पालकांच्या मदतीने फराळ तयार केला,त्याच्या रेसीपी लिहिल्या! आमची ही रविवारची शाळा पाच वर्ष सुरळीत चालली.

पालक आणि शिक्षक म्हणून मी ह्या शाळेतल्या मुलांच्या मदतीनेच घडत गेलो.हे काम सुरू असतानाच अनेक शिक्षण चळवळींशी,शिक्षण संस्थांशी,शिक्षकांशी सातत्याने संबंध येत गेला.त्यांच्यासाठी /त्यांच्या शिक्षकांसाठी 'अध्यापन कौशल्य कार्यशाळांचे'आयोजन करत होतो. ह्या कामाची 'युनिसेफ'ने दखल घेतली आणि त्यांच्या सोबत दोन वर्ष 'शिक्षण सल्लागार' म्हणून ग्रामीण/नागरी भागातील शाळांसाठी पण काम केले.त्यातूनच आढळलेले काही मुद्दे सूत्ररुपात पुढे मांडत आहे.

लहानपणीच मातृभाषेबाबात अरुची निर्माण होण्याची काही प्रमुख कारणे पुढील प्रमाणे आहेत.(जिथे भाषेचा पाया घातला जातो,अशा प्राथमिक शाळेपासून जरी सुरुवात केली असली तरी पूर्व-प्राथमिक विभागाला पण सोबत जोडून घेतले आहे.पुढील कारणे ही दोन्ही विभागांचा विचार करून एकत्रितपणे दिली आहेत.ह्या लेखापुरता जागेच्या मर्यादेमुळे फक्त पूर्व-प्राथमिक व प्राथमिक विभागांचाच विचार केला आहे.त्याचप्रमाणे पुढील सर्व कारणांसाठी,काही सन्माननीय अपवाद हे गृहितच धरलेले आहेत.)

-- पालक मुलांना गोष्टी सांगत नाहीत.
-- हातात पुस्तक घेऊन,गोष्टी वाचून दाखवत नाहीत.
-- पालक वेगवेगळ्या विषयांवर मुलांशी गप्पा मारत नाहीत.तसेच मुलांची मते जाणून घेण्यात त्यांना अजिबात रस नसतो.
-- आपण जशी गोष्ट सांगितली होती,तशीच/त्याचप्रकारे/त्यात काहीही बदल न करता मुलांने आपल्याला सांगावी अशी पालकांची/शिक्षकांची अपेक्षा असते. मुलांनी केलेले भाषिक/काल्पनिक बदल मोठ्या माणसांना सहन होत नाहीत. त्यांचा (काल्पनिक)इगो दुखावतो.
-- घरात पाहुणे आले असता,आपले मूल हे 'टेपरेकॉर्डर'आहे/असावे ह्याबाबत पालक ठाम असतात! 'अमूक गाणे/गोष्ट आत्ताच्या आत्ता म्हण/सांग'अशी आज्ञा सोडून पालक वाट पाहात बसतात.मुले अनिच्छेने,नाईलाजाने (खरंतर पालक बलशाली असल्याने,मार मिळण्याच्या भीतीने) गाणं/गोष्ट, म्हणतात/सांगतात. असल्या अपमानास्पद वागणूकीमुळे मुलांच्या मनात गोष्टी/गाणी ह्याविषयी एक अढी निर्माण होते पर्यायाने ती वाचनापासून लांब जातात.
-- घरात मुलांसाठी पुस्तकेच नसतील तर..आणि 'पुस्तक वाचणारे पालक'मुले पाहात नसतील तर..
-- मराठी भाषेबाबत अरुची निर्माण करण्याचे सर्वात मोठे योगदान बालभारतीचे म्हणजे पाठ्यपुस्तकांचे पण आहे!! (ह्याबाबत सविस्तर पणे पुढे लिहिले आहे.)
-- शिक्षक भाषा शिकविण्याचा (केविलवाणा)प्रयत्न करतात/भाषा शिकविणे म्हणजे पाठ्यपुस्तक पुरे करणे,असे काही शिक्षक समजतात. त्यामुळेच मुले भाषा शिकत नाहीत.जर मुलांवर विश्वास टाकला आणि शिकवण्यापेक्षा ही मुलांसोबत शिकण्याचा अनुभव घेतला,त्यांना शिकण्याची संधी दिली तरच मुलांना भाषेची गोडी लागेल.
-- विविध भाषिक खेळांचा अध्यापनात उपयोग केला जात नाही.
-- पाठ्यपुस्तकातील रटाळ स्वाध्याय.
-- 'फाटक्या नोटेचे आत्मवृत्त' 'पावसाळ्यातील एक दिवस' 'माझा आवडता नेता' हे तेच ते घिसा-पिटा निबंध! (गाइड घ्या,निबंध लिहा)
-- शाळेतील बंद वाचनालये (पुस्तके फाटतील म्हणून केवळ पुस्तकांच्या काळजीखातर ती नीट जपून ठेवलेली असतात.)
-- 'वाचन विकास प्रकल्पाची कार्यवाही केवळ कागदोपत्रीच'पाहायला मिळते.
-- विश्वकोश,व्युत्पत्ती कोश,संस्कृती कोश,शब्द कोश,इत्यादी संदर्भ ग्रंथांचा वापर शिक्षकच करत नसतील तर मुलांना कसे समजावे?
-- 'अवांतर वाचन म्हणजे केवळ वेळ फुकट घालवणे! त्यापेक्षा अभ्यासाचे काही वाचा.'अशा ठाम (आणि अपरिवर्तनीय) मताचे अनेक पालक/शिक्षक.
-- विविध भाषिक उपक्रम आणि प्रकल्पांचे मुलांच्या मदतीने शाळेतूनच आयोजन होत नाही.
-- परीक्षा पद्धती ही आकलनापेक्षाही स्मरणशक्तीवर भर देणारी असल्याने,'घोका आणि ओका' यात मुले अडकतात.
-- 'आपण काही वेगळं करू शकतो'हा विश्वासच शिक्षक/पालक हरवून बसले आहेत.


खरंतर ह्या वरील सर्व मुद्यातच 'काय करायला पाहिजे'ह्याचे उत्तर लपलेले आहेच.म्हणून त्याशिवाय आणखी पूरक काय-काय करता येईल त्याचा विचार करुया.
हे काम तीन टप्प्यावर करावे लागेल.

1. शिक्षक.
2. पालक.
3. इतर घटक.

विनोबांनी शिक्षणाची व्याख्या केली आहे,'जे देता येत नाही ते शिक्षण.'

पण आपल्या शिक्षकांना वाटतं 'शिकवणं ही त्यांची मक्तेदारी आहे!'खरंतर शिक्षकांनी शिकवायचं नाही तर,शिकण्यासाठी मुलांना उत्सुक करायचं;शिकण्यासाठी/शिक्षणासाठी पोषक वातावरण तयार करायचं व स्वयंअध्ययनासाठी त्यांना संधी द्यायची.ह्या संदर्भात विविध भाषिक खेळ,उफम व प्रकल्प कसे कार्यान्वित करावेत ह्याचे प्रशिक्षण शिक्षकांना द्यावे लागेल.

त्याचप्रमाणे शिक्षकाला भाषा शिकविताना येणारी नेमकी अडचण व त्यावरील ठोस उपाययोजना,ह्याचा मुख्यत्वे प्रशिक्षणात सहभाग करावा लागेल.(अशा गोष्टी शासकीय प्रशिक्षणात शिकविल्या जात नाहीत.) त्यामुळे शिक्षकाला भाषेविषयी असणारा आकस व भीती कमी होण्यास मदत होईल.त्याला मोकळेपणाने प्रश्न विचारता येतील. उदा.त्यांच्या काही समस्या अशा असू शकतात,'मुलांना शब्दाचा अर्थ समजतो,पण त्याचा त्यांना वाक्यात उपयोग करता येत नाही.किंवा,बैल लिहिण्यास सांगितले असता, 'बईल'लिहितो.' अशावेळी काय करावे? इत्यादी.

म्हणून शिक्षकांना मिळणारे प्रशिक्षण हे शिक्षकांतील सुप्त सर्जनशीलता जागे करणारे, त्यांा कार्यप्रवण करणारे त्यांना मातृभाषेविषयी अभिमान व आत्मविश्वास देणारे असायला हवे.
मुलांची भाषिक गोडी वाढविण्यासाठी कुठल्याही शाळेत सहज शक्य होणारे आणि शून्य खर्चाचे काही उफम/प्रकल्प पुढीलप्रमाणे :

1. प्रत्येक वर्गाचे,प्रत्येक महिन्याचे एक भिंती-पत्र,त्यात अधिकाधिक मुलांचा सहभाग.
2. शाळेत वर्गा-वर्गांच्या व केंद्रात शाळा-शाळांच्या भिंती-पत्र स्पर्धा.
3. इयत्ता चौथीच्या मुलांनी लिहिलेले लेखनपाठ हे इयत्ता पहिलीच्या/दुसरीच्या मुलांसाठी वाचनपाठ.
4. प्रत्येक वर्गाचे त्रैमासिक.
5. प्रत्येक वर्गाचा'म्हणी व वाक प्रचार संग्रह.'
6. प्रत्येक शाळेची 'वर्ड बँक.'
7. शाळेच्या वाचनालयातील पुस्तकांचा उपयोग करून,मासिक स्पर्धा.
8. 'शाळेचे वाचनालय हेच गावाचे वाचनालय!' हे लक्ष्य समोर ठेवून समाजाच्या मदतीने शाळेचे वाचनालय वर्षभर खुले राहील व मुलांप्रमाणेच गावालाही त्याचा फायदा होईल ह्यासाठी शाळेने/शिक्षकांनी प्रयत्नशील असणे.
9. 'वेगवेगळ्या भाषांतील समान अर्थी शब्द शोधा'..स्पर्धा.उदा.वडिलांच्या भावाला मराठीत काका म्हणतात.हिंदी,गुजराती,इंग्रजी,तेलगू किंवा आणखी कोणत्याही बोली भाषेत सुध्दा काय म्हणतात ते शोधून काढा.चार पेक्षा अधिक भाषातून नावे शोधणाऱ्या मुलांची नावे आठवडाभर शाळेच्या फलकावर लिहा व त्यांनी लावलेले शोध सुध्दा!! (ह्यासाठी संदर्भ ग्रंथांची किंवा परिसरातील कुणाचीही मदत घ्या.)
10. निबंध लेखनाच्या विविध पध्दती.
11. किमान वर्षातून एकदा,'भाषा जत्रा,विज्ञान जत्रा'असे काही उपक्रम.
12. मुलांनीच भरवलेली 'बोलकी प्रदर्शने.'(संदर्भ : प्रस्तुत लेखकाचे 'आमची शाळा'हे पुस्तक.प्रकाशक : मनोविकास प्रकाशन.)
13. शाळेतील वाचनालये कार्यान्वित करुन मुलांसाठी/शिक्षकांसाठी 'वाचन पुरस्कार'(वाचन श्री,वाचन भूषण,वाचन रत्न,वाचन हिरा इत्यादी.)
14. मुलांच्या वाढदिवशी एक पुस्तक शाळेला भेट.(ही योजना वैयक्तिक किंवा एकत्रितपणे पण कार्यान्वित करता येईल.)
15. 'वाचनातून वाचनाकडे!' महिन्याच्या शेवटच्या दिवशी ज्या-ज्या मुलांना शक्य आहे त्यांनी आपापल्या घरातील वर्तमानपत्रांची रद्दी शाळेत जमा करायची. ही रद्दी एकत्रिपणे विकून त्यातून मुलांसाठी/शाळेच्या वाचनालयासाठी गोष्टीची पुस्तके घ्यायची.
16. प्रत्येक शाळेत आठवड्याला एक 'वाचन गप्पा' तासिका.
17. मूल्यांकनाच्या विविध सुलभ पध्दती.(निव्वळ लेखी परीक्षा नव्हे, तर उपक्रम/प्रकल्प/मुलांशी झालेल्या गप्पा/निरीक्षणे/मुलांचा शैक्षणिक सहभाग अशा विविध पध्दती.)
18. समाजाचा सहभाग असणारे काही भाषिक उपक्रम/स्पर्धा.
19. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे,विनोबांनी सांगितल्याप्रमाणे 'शाळा घरात आली पाहिजे आणि घर शाळेत गेलं पाहिजे.'

ही यादी आणखी खूप वाढविता येईल.पण केवळ विषयाचा अंदाज यावा म्हणून अतिशय थोडक्यात मांडणी करत आहे.

पालक ह्या गटात प्रचंड ऊर्जा सामावलेली असते.ह्या ऊर्जेचा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कसा कौशल्याने उपयोग करून घ्यायचा,हे चांगला शिक्षक जाणतोच.

1. 'गृहपाठ'म्हणजे घरी करावयाचा अभ्यास,असा विचार न करता,गृहपाठ म्हणजे 'घराने करावयाचा अभ्यास'असा विचार केला तर अनेक प्रश्न सोपे होतात.
2. विशिष्ट वयोगटातील मुलांनी कोण-कोणती पुस्तके वाचावीत,ह्याची यादी पालकांना मिळायला हवी.
3. कथाकथन/वाचन तंत्र,मुलांचा अभ्यास घेण्याच्या (खरं म्हणजे,मुलांना अभ्यास करू देण्याच्या) विविध अभिनव पध्दती,मुलांची भाषा आणि आपण अशा वेगवेगळ्या विषयावर पालक कार्यशाळा व्हायला हव्यात.
4. शाळेतील वाचनालय चालविण्यासाठी/वाचन विकास प्रकल्पासाठी पालकांची मदत घेता येईल.
5. भाषेच्या खेळांचे,व्याकरणांचे,समान अर्थी शब्दांचे,वाकप्रचार व म्हणींचे,हमखास चुकणारे शब्द योग्य प्रकारे कसे लिहावेत ह्यांचे तक्ते तयार करण्यासाठी पालकांची मदत. (काही दिवसांनी हे तक्ते दुसऱ्या शाळेला द्यावेत व त्यांच्या शाळेतील तक्ते आपण आणावेत.ह्यामुळे मुलांसाठी नाविन्य व उजळणी आणि आधीच्या तक्त्यांवर परीक्षा.)

इतर घटक ह्या प्रकारात भाषा विषयक काम करणाऱ्या अनेक संस्थांचा/नागरीकांचा/ गोष्टींचा समावेश करता येईल.उदा.

-- महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ.
-- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद.
-- बाल चित्रवाणी.
-- दूरदर्शन व इतर मराठी वाहिन्या.
-- चिल्ड्रन फिल्म सोसायटी.
-- राज्य मराठी विकास संस्था.
-- साहित्य अकादमी.
-- नॅशनल बुक ट्रस्ट (मराठी विभाग)
-- नेहरू बाल पुस्तकालय (मराठी विभाग)
-- साहित्य संस्कृती मंडळ.
-- मराठी विज्ञान परिषद.
-- मराठी प्रकाशक संघटना.
-- खाजगी व शासकीय वाचनालये.
-- पुस्तकांची दुकाने व फिरती पुस्तक प्रदर्शने.
-- मराठी वृत्तपत्रांचे व त्यातील पुरवण्यांचे संपादक.
-- कॉलेजातील मराठी विभाग प्रमुख व तेथील मराठी वाङमय मंडळे.
-- स्वयंसेवी संस्था.
-- मराठी प्रेमी नागरीक.इत्यादी.

मराठीची रुची वाढण्यासाठी ह्या वरील सर्व घटकांची विस्तृतपणे मदत मिळू शकते.


पाठ्यपुस्तकाकडून म्हणजेच बालभारती कडून काही माफक अपेक्षा असतात उदा :

-- भाषेची गोडी लावणं.
-- भाषेच्या विविध प्रकारांची ओळख करुन देणं.
-- विविध वाङमय प्रकारांची ओळख करून देणं.
-- वाचनाची आवड रुजवणं.
-- मुलांना स्वयं लेखनास प्रवृत्त करणं.
-- रटाळ नव्हे तर रंजक व आव्हानात्मक वाटतील असे स्वाध्याय.
-- शब्द कोडी,शब्द-चित्र कोडी.
-- मुलांची शब्द संपत्ती वाढेल,अशा भाषिक खेळांचा समावेश.
-- मुलांना आपल्या मातृभाषेविषयी अभिमान वाटेल,ह्यासाठी समाजाचा सहभाग असणारे काही उफम.
-- मराठीतील विविध लेखकांची/कवींची मुलांना ओळख व्हावी,व त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची किमान नावे तरी मुलांना समजावीत.
-- पाठ्यपुस्तकात संदर्भ पुस्तकांची सूची असणं.
-- संदर्भ ग्रंथांचा उपयोग कसा करावा ह्याची माहिती व त्याचे फायदे मुलांना समजतील ह्याची काळजी घेणं.इत्यादी.

पण ह्या निमित्तमात्र असणाऱ्या माफक अपेक्षा पाठ्यपुस्तक पुरे करते का? तर प्रामाणिकपणे ह्याचं उत्तर 'नाही' असेच द्यावे लागेल! किंबहुना अरुची निर्माण करण्यातच पाठ्यपुस्तकाचे योगदान आहे! ह्याबाबत तीन प्रमुख गोष्टींकडे मी शिक्षणप्रेमींचे लक्ष वेधू इच्छितो.

एक,घरात बसून किंवा थंड हवेच्या ठिकाणी जाऊन बालसाहित्य लिहिता येत नाही. मुलांसाठी सोपं लिहिणं कठीणच आहे! कारण मुलांचा विचार करताना प्रथम त्यांच्या वयोगटाचा व त्यांच्या भावविश्वाचा विचार करावा लागतो.अनोळखी मुलाशी पण बोलू शकणारा,मूल समजून घेऊ शकणारा आणि ह्रदयातलं मूल जागं असणारा माणूसच मुलांसाठी लिहू शकतो. बालभारतीच्या भाषा विषयाच्या अध्यक्षपदी असणारी व्यक्ती ही लहान मुलांशी आणि बाल साहित्याशी संबंध असलेली असावी.

दोन,मराठी विषयाची समिती ही 'कोटा पध्दतीने'तयार होते.समितीमधल्या व्यक्तींचा बाल साहित्याशी किंवा मुलांशी काय संबंध आहे हे मुद्दे तिथे गौण आहेत.'इतर घटक' अधिक प्रभावी आहेत,असे समजते.

तयार झालेली समिती कधीही बरखास्त होऊ शकते.किंवा काम पूर्ण होत आल्यावर समितीतील काही व्यक्तींना अचानक वगळले जाऊन,त्यांच्या जागी आलेल्या नवीन व्यक्ती आधीच्या कामाचा सहजी ताबा घेऊ शकतात.त्यामुळे ह्या समितीचे काम प्रचंड दडपणाखाली सुरू असते.असा संशयाने पछाडलेल्या आणि दडपणाखाली वावरणाऱ्या समितीकडून सर्जनशील कामाची अपेक्षा तरी काय करणार? सध्या तर हे काम 'निमंत्रित' मंडळीच करत आहेत. 'निमंत्रित'चा अर्थ,विभागप्रमुखाची मर्जी असेल तर निमंत्रण! नाहीतर फक्त शुभेच्छाच!!

तीन,बालभारतीची साहित्य निवड पध्दती आणि पाठाखालील स्वाध्यायांची रचना.(हा खरं तर संशोधनाचा आणि प्रबंधाचाच विषय आहे.)बालभारतीच्या मराठी विभागाच्या,साहित्य निवड पध्दती बाबत माझे वैयक्तिक मत इथे नोंदवत आहे.इतर भाषांच्या निवड पध्दती बाबत मला माहित नाही.

बालभारतीच्या मराठी समितीने एखाद्या लेखकाचे साहित्य निवडले (साहित्य कसे निवडले जाते ही एक मनोरंजक व उत्कंठावर्धक कहाणी आहे.जागेअभावी ती इथे देताच येणार नाही.) की, त्याला तसे पत्र पाठवले जाते.'साहित्यात काही बदल करावे लागल्यास आपली परवानगी असावी' असे त्या लेखकाला कळवून त्याच्याकडून होणाऱ्या बदलासाठी 'आगाऊ परवानगी' घेतली जाते.पण त्यानंतर त्याच्या लेखनात काय बदल केले आहेत हे त्या लेखकाला न कळवताच,त्या बदलाला जणू काही लेखकाने परवानगीच दिली आहे असे गृहित धरून बदलासकट मजकूर प्रकाशित होतो. हे अनैतिक व लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे असे मला वाटते. लेखकाची परवानगी मिळाल्यानंतर,समिती त्यात जो बदल करते,तो बदल लेखकाला कळवलाच पाहिजे.केलेला बदल जर त्या लेखकाला मान्य नसेल तर त्याचे साहित्य सन्मानपूर्वक त्याला परत पाठविले पाहिजे.हे बालभारतीच्या प्रतिष्ठेला शोभा देणारे आहे.

बालभारतीच्या ह्या मनमानी कारभाराचा तडाखा विंदा करंदीकरांना पण बसला आहे.(संदर्भ : सुलभ भारती.इयत्ता 6 वी.2001) विंदा करंदीकरांनी कधी लिहिलीच नाही अशा कवितेखाली विंदांचे नाव आहे! आणि ही कविता महाराष्ट्रातील चाळीस लाख मुले विंदांचीच समजून वाचत आहेत.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासकच त्यावेळी मराठी समितीचे अध्यक्ष होते.

त्यावेळी वर्तमानपत्रातून ह्याबाबत अनेक पत्रे आली.पण हे गैर आहे असे, बालभारतीचे संचालक,मराठी विभागाचे प्रमुख आणि मराठी समितीचे अध्यक्ष ह्यांना वाटले नाही हे विशेष!! त्यामुळे ह्या 'अनैतिक प्रकाराला राजाश्रय मिळाला आहे' ह्याची खात्रीच पटल्याने,बालभारतीच्या मराठी विभाग प्रमुखांनी ही (महान) परंपरा तशीच इमानेइतबारे पुढे चालू ठेवलेली आहे!!

असले दुय्यम दर्जाचे 'ढवळाढवळ साहित्य' जर मुलांना,भाषा शिक्षणाच्या पहिल्या पायरीवरच भेटत असेल तर त्यांना का वाटावा मातृभाषेविषयी अभिमान? आणि कशी निर्माण होणार त्या मराठीची गोडी? बालभारती मधले स्वाध्याय हा एक अजबच प्रकार आहे.मुख्य म्हणजे हे स्वाध्याय स्मरणशक्तीवर आधारित आहेत,आकलनशक्तीवर नाहीत! त्याचप्रमाणे हे स्वाध्याय हे निव्वळ पाठावर आधारित आहेत,पाठातील आाशयावर नाहीत! हे स्वाध्याय इतके पकाव असतात की मुले अक्षरश: पिसून निघतात. 'सक्तमजूरी परवडली पण हे स्वाध्याय नको' अशी त्यांची अवस्था होते.आणि त्यामुळेच पाठ्यपुस्तकातील धडे/कविता ह्याविषयी एक घृणा त्यांच्या मनात पैदा होते!

वानगी दाखल एक छोटेसे उदाहरण पाहू.'चामड्याची एक चौकोनी पिशवी घेऊन सुरेश ऑफिसला निघाला होता.' ह्या वाक्यावरचा 'बालभारतीय स्वाध्याय' पुढीलप्रमाणे असू शकतो :

1. सुरेश कुठे निघाला होता?
2. चामड्याच्या पिशवीचा आकार कोणता असतो?
3. ऑफिसमधे कशाची पिशवी नेतात?
4. सुरेश किती पिशव्या घेऊन ऑफिसला जातो?

ह्या स्वाध्यायात नाही काही कल्पकता/रंजकता/उपक्रम/प्रकल्प किंवा मुलांच्या सर्जनशीलतेला आवाहन व आव्हान! केवळ 'घोकंबाज' मुलेच ह्यातून तयार होतात.
स्वाध्यायातील प्रश्न हे बहुआयामी असायला हवेत.त्या प्रश्नांना अनेक उत्तरे असायला हवीत.मुलांच्या विचाराला चालना मिळणे,त्याच्यातील सूप्त सर्जनशीलता जागी होणे,विचार करण्याच्या विविध पध्दतींची त्यांना ओळख होणे आणि मी स्वत:हून शिकू शकतो/नवीन शोधू शकतो हा विश्वास त्याच्या मनात निर्माण होणे हे स्वाध्यायाचे मुख्य उद्दीष्ट असले पाहिजे.

समजा, त्याच वाक्यातील आशयावर जर स्वाध्याय तयार करायचा असेल तर तो पुढील प्रमाणे असावा :
1. कुठल्या-कुठल्या गोष्टींपासून पिशव्या तयार होतात? उदा.नायलॉन,कापड इ.
2. ऑफिसला नेण्यासाठी,भाजी आणण्यासाठी,तेल आणण्यासाठी अशा आणखी कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या तुम्हाला माहित आहेत?
3. एकच पिशवी वेगवेगळ्या कामासाठी वापरता येऊ शकते का? कशाप्रकारे?
4. पिशव्यांचे किती वेगवेगळे आकार तुम्हाला माहित आहेत? तुम्हाला आवडणारा आकार तुमच्या वहीत काढा व रंगवा.
5. जुनी वर्तमानपत्रे घेऊन त्यापासून वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्या तयार करा.त्यावर नक्षी काढून त्या रंगवा.ह्यासाठी कुणाचीही मदत घ्या.तुम्ही तयार केलेल्या पिशव्यांचे वर्गातच प्रदर्शन भरवा.इ.

भाषेची गोडी निर्माण करण्याचे प्रयत्न पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळांपासूनच सुरू व्हायला हवेत.आणि हे जरी खरं असलं तरी,ह्याच्याशी संबंधित पुन्हा अनेक घटक आहेत.त्यांचाही आपल्याला विचार करावाच लागेल कारण ते 'मराठीशी'संबंधित आहेत. उदा.

-- इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मराठी मुलांचे भाषिक प्रश्न.
-- परराज्यात राहणाऱ्या मराठी मुलांचे भाषिक प्रश्न.
-- परदेशात राहणाऱ्या मराठी मुलांचे भाषिक प्रश्न.
-- पालकांपैकी एक मराठी व दुसरा अन्य भाषिक असणाऱ्या मुलांचे प्रश्न.
-- कर्ण बधिर मुलांचे,मराठी भाषा विषयक प्रश्न.(उदा.ह्या मुलांना प्रत्यय आणि उपसर्ग शिकविताना खूप त्रास होतो.)
-- अंध मुलांचे मराठी भाषेबाबतचे प्रश्न.
-- अंधांसाठी मराठीतून सीडी व ब्रेल मधे पुस्तके उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या अडचणी.

असो.काम तर खूपच आहे,आणि ते आपल्यालाच करावयाचे आहे.त्यामुळे कामाचा आराखडा तयार करण्यासाठीच हे छोटेसे टिपण.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राजीव तांबे.
ए/202 पूर्णिमा दर्शन. श्रीखंडे वाडी.
डोंबिवली (पूर्व) 421201



सुमारे पंधरा-सोळा वर्षापूर्वीची ही गोष्ट.त्यावेळी माझी मुलगी इयत्ता पहिलीत होती.तिला ‘माझी आई’ह्या विषयावर पाच ओळी लिहायला सांगितले होते,व तिने काय लिहायचे हे तिच्या वर्ग-शिक्षिकेने वर्गात फळ्यावरच लिहून दिले होते.

फळ्यावरची आई,माझ्या मुलीच्या आई सारखी नव्हती! म्हणून तिने ‘आपल्या आई’ विषयी पाच ओळी लिहिल्या!! वर्ग-शिक्षिकेला अर्थातच राग आला! व फळ्यावरचीच आई सर्वांनी लिहिली पाहिजे असा आग्रह केला.

ह्या संदर्भात त्यांना भेटलो.’प्रत्येकाची आई वेगवेगळी आहे. मुलांनी फळ्यावरची आई उतरवून काढण्यापेक्षा,त्यांना स्वत:च्या आई बाबत काय वाटते हे मोकळेपणाने लिहिणे अधिक महत्वाचे आहे’असे समजावण्याचा त्यांना प्रयत्न करत होतो.

त्यावेळी त्या गुरुमाउलीने मला एका ब्रम्हवाक्य ऐकवले, “हे पाहा,मला सत्तर वह्या तपासायच्या असतात. सगळ्यांनी सारखे लिहिले की तपासायला सोपे जाते! काय कळले?”

मला एव्हढेच कळले की,आणखी वाद घालणे म्हणजे (स्वेच्छेने) कपाळमोक्ष करून घेणे! त्यानंतर आम्ही काही पालक एकत्र आलो आणि आम्ही ‘सृजन घर’सुरू केले.सृजन घर म्हणजे,’रविवारची गंमत शाळा.’ विशेष म्हणजे आमच्या पैकी कुणीही ‘शिक्षक’नव्हते. शाळेशी व्यर्थ वाद न घालता,शाळेला पूरक भूमिका घेणं हे मुख्य उद्दीष्ट.त्याचप्रमाणे,शाळेने मुलांसाठी जे-जे करावं असं आम्हाला वाटे,ते-ते आम्ही इथे करायला सुरुवात केली. उदा.पावसाळ्यात मुलांनी त्यांच्या शालेय परंपरेनुसार ‘पावसाळ्यातील एक दिवस’हा निबंध त्यांनी शाळेत लिहिला.आम्ही आमच्याी शाळेत पावसाळ्याचे तीन गट केले.गावातला पावसाळा, शहरातला पावसाळा आणि झोपडपट्टीतला पावसाळा.वर्तमान पत्रातील फोटो,बातम्या, शाळेजवळच्या झोपडपट्टीत जाऊन मुलाखती,शेजाऱ्यांची व पालकांची मदत आणि त्यांच्या गटांची निरीक्षणे ह्यांची मदत घेऊन मुलांनी धमाल निबंध लिहिले.एका मुलाने निबंधात लिहिले होते, ‘माझ्या घराच्या बाजूला गॅरेज आहे.पाऊस आला की रस्त्यावर विचित्र आकाराची इंद्रधनुष्ये वाहात असतात.हातात काठी घेऊन आम्ही वाहणारी इंद्रधनुष्ये जोडण्याचा खेळ खेळतो!’ ‘वाहणारी इंद्रधनुष्ये जोडण्याचा खेळ!!’ही उत्तुंग कल्पना केवळ मुलेच करू शकतात. मुलांवर विश्वास ठेवला आणि त्यांना जर अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले तरच हे शक्य होऊ शकते, असा एक नविनच साक्षात्कार मला त्यावेळी झाला.(मी ‘त्या वर्ग-शिक्षिकेचा’ आजन्म ऋणी आहे.)

सृजन घरात मुलांच्या मदतीने निबंध लेखनाच्या विविध पध्दती विकसित केल्या. भाषा, गणित,विज्ञान आणि परिसराबाबत वेगवेगळे उपक्रम आणि प्रकल्प कार्यान्वित केले.इयत्ता पहिलीपासूनच मुलांनी स्वत:हून वेगवेगळे प्रयोग केले व निष्कर्ष काढले. शैक्षणिक सहलींचे आयोजन केले.मुलांनीच मुलांची धमाल प्रदर्शने आयोजित केली.धड्यांची नाट्यीकरणे केली. संवाद कथांसाठी पपेटस् चा वापर केला.दिवाळीत मुलांनी पालकांच्या मदतीने फराळ तयार केला,त्याच्या रेसीपी लिहिल्या! आमची ही रविवारची शाळा पाच वर्ष सुरळीत चालली.

पालक आणि शिक्षक म्हणून मी ह्या शाळेतल्या मुलांच्या मदतीनेच घडत गेलो.हे काम सुरू असतानाच अनेक शिक्षण चळवळींशी,शिक्षण संस्थांशी,शिक्षकांशी सातत्याने संबंध येत गेला.त्यांच्यासाठी /त्यांच्या शिक्षकांसाठी ‘अध्यापन कौशल्य कार्यशाळांचे’आयोजन करत होतो. ह्या कामाची ‘युनिसेफ’ने दखल घेतली आणि त्यांच्या सोबत दोन वर्ष ‘शिक्षण सल्लागार’ म्हणून ग्रामीण/नागरी भागातील शाळांसाठी पण काम केले.त्यातूनच आढळलेले काही मुद्दे सूत्ररुपात पुढे मांडत आहे.

लहानपणीच मातृभाषेबाबात अरुची निर्माण होण्याची काही प्रमुख कारणे पुढील प्रमाणे आहेत.(जिथे भाषेचा पाया घातला जातो,अशा प्राथमिक शाळेपासून जरी सुरुवात केली असली तरी पूर्व-प्राथमिक विभागाला पण सोबत जोडून घेतले आहे.पुढील कारणे ही दोन्ही विभागांचा विचार करून एकत्रितपणे दिली आहेत.ह्या लेखापुरता जागेच्या मर्यादेमुळे फक्त पूर्व-प्राथमिक व प्राथमिक विभागांचाच विचार केला आहे.त्याचप्रमाणे पुढील सर्व कारणांसाठी,काही सन्माननीय अपवाद हे गृहितच धरलेले आहेत.)

— पालक मुलांना गोष्टी सांगत नाहीत.
— हातात पुस्तक घेऊन,गोष्टी वाचून दाखवत नाहीत.
— पालक वेगवेगळ्या विषयांवर मुलांशी गप्पा मारत नाहीत.तसेच मुलांची मते जाणून घेण्यात त्यांना अजिबात रस नसतो.
— आपण जशी गोष्ट सांगितली होती,तशीच/त्याचप्रकारे/त्यात काहीही बदल न करता मुलांने आपल्याला सांगावी अशी पालकांची/शिक्षकांची अपेक्षा असते. मुलांनी केलेले भाषिक/काल्पनिक बदल मोठ्या माणसांना सहन होत नाहीत. त्यांचा (काल्पनिक)इगो दुखावतो.
— घरात पाहुणे आले असता,आपले मूल हे ‘टेपरेकॉर्डर’आहे/असावे ह्याबाबत पालक ठाम असतात! ‘अमूक गाणे/गोष्ट आत्ताच्या आत्ता म्हण/सांग’अशी आज्ञा सोडून पालक वाट पाहात बसतात.मुले अनिच्छेने,नाईलाजाने (खरंतर पालक बलशाली असल्याने,मार मिळण्याच्या भीतीने) गाणं/गोष्ट, म्हणतात/सांगतात. असल्या अपमानास्पद वागणूकीमुळे मुलांच्या मनात गोष्टी/गाणी ह्याविषयी एक अढी निर्माण होते पर्यायाने ती वाचनापासून लांब जातात.
— घरात मुलांसाठी पुस्तकेच नसतील तर..आणि ‘पुस्तक वाचणारे पालक’मुले पाहात नसतील तर..
— मराठी भाषेबाबत अरुची निर्माण करण्याचे सर्वात मोठे योगदान बालभारतीचे म्हणजे पाठ्यपुस्तकांचे पण आहे!! (ह्याबाबत सविस्तर पणे पुढे लिहिले आहे.)
— शिक्षक भाषा शिकविण्याचा (केविलवाणा)प्रयत्न करतात/भाषा शिकविणे म्हणजे पाठ्यपुस्तक पुरे करणे,असे काही शिक्षक समजतात. त्यामुळेच मुले भाषा शिकत नाहीत.जर मुलांवर विश्वास टाकला आणि शिकवण्यापेक्षा ही मुलांसोबत शिकण्याचा अनुभव घेतला,त्यांना शिकण्याची संधी दिली तरच मुलांना भाषेची गोडी लागेल.
— विविध भाषिक खेळांचा अध्यापनात उपयोग केला जात नाही.
— पाठ्यपुस्तकातील रटाळ स्वाध्याय.
— ‘फाटक्या नोटेचे आत्मवृत्त’ ‘पावसाळ्यातील एक दिवस’ ‘माझा आवडता नेता’ हे तेच ते घिसा-पिटा निबंध! (गाइड घ्या,निबंध लिहा)
— शाळेतील बंद वाचनालये (पुस्तके फाटतील म्हणून केवळ पुस्तकांच्या काळजीखातर ती नीट जपून ठेवलेली असतात.)
— ‘वाचन विकास प्रकल्पाची कार्यवाही केवळ कागदोपत्रीच’पाहायला मिळते.
— विश्वकोश,व्युत्पत्ती कोश,संस्कृती कोश,शब्द कोश,इत्यादी संदर्भ ग्रंथांचा वापर शिक्षकच करत नसतील तर मुलांना कसे समजावे?
— ‘अवांतर वाचन म्हणजे केवळ वेळ फुकट घालवणे! त्यापेक्षा अभ्यासाचे काही वाचा.’अशा ठाम (आणि अपरिवर्तनीय) मताचे अनेक पालक/शिक्षक.
— विविध भाषिक उपक्रम आणि प्रकल्पांचे मुलांच्या मदतीने शाळेतूनच आयोजन होत नाही.
— परीक्षा पद्धती ही आकलनापेक्षाही स्मरणशक्तीवर भर देणारी असल्याने,’घोका आणि ओका’ यात मुले अडकतात.
— ‘आपण काही वेगळं करू शकतो’हा विश्वासच शिक्षक/पालक हरवून बसले आहेत.

Author