ज्या काळात केवळ फिरकी गोलंदाजी हेच भारतीय क्रिकेटच्या यशाचे मुख्य शस्त्र मानले जात होते, त्या काळात आपल्या मध्यम द्रुतगती गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पध्र्याचा थरकाप उडविणारे गोलंदाज म्हणून वसंत रांजणे यांची ख्याती होती. त्या काळात वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व इंग्लंड आदी संघांकडून कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे अनेक द्रुतगती गोलंदाज क्रिकेट क्षेत्र गाजवीत होते.
भारतीय क्रिकेट संघटकांनी मात्र रांजणे यांचे कौशल्य अपेक्षेइतके ओळखलेच नाही. त्या काळी जर आपल्या संघटकांनी फिरकीबरोबरच द्रुतगती गोलंदाजीस महत्त्व दिले असते तर विंडीजच्या तोफखान्यासारखीच कामगिरी रांजणे यांच्याद्वारे भारताला करता आली असती. कोणत्याही खेळाडूला पदार्पणाचा सामना उत्साहजनक असला तरी काहीसे दडपणही त्याच्यावर असते, मात्र रांजणे हे मुलखावेगळेच गोलंदाज होते. त्यांनी १९५६-५७ च्या मोसमात रणजीमध्ये पदार्पण करताना पहिल्याच सामन्यात सौराष्ट्राविरुद्ध एकाच डावात ३५ धावांमध्ये हॅट्ट्रिकसह नऊ बळी घेतले. रांजणे यांनी या सामन्यात केवळ ७१ धावांमध्ये १३ बळी घेतले. या कामगिरीमुळे त्यांना कसोटीचीही दारे खुली झाली. १९५८ मध्ये कानपूर येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याद्वारे त्यांना कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. त्यांनी सात कसोटींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. कसोटीमध्ये फलंदाजीत त्यांना कौशल्य दाखविण्याची फारशी संधी मिळाली नाही, मात्र गोलंदाजीत त्यांनी १७ बळी घेत कौतुकास्पद कामगिरी केली. १९६१-६२ मध्ये वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर त्यांना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. या दौऱ्यातील शेवटच्या कसोटीत त्यांनी कॉनरॉड हंट, रोहन कन्हाय, गॅरी सोबर्स, फ्रँक वॉरेल या दिग्गज फलंदाजांना बाद करीत विंडीजला चकित केले होते. या डावात ७२ धावांमध्ये चार बळी ही त्यांची कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्यांनी प्रथम दर्जाच्या ६४ सामन्यांमध्ये १७५ बळी मिळविले. एकाच डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची किमया त्यांनी सहा वेळा केली, तर एकाच सामन्यात दहा किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद करण्याचा पराक्रम त्यांनी दोन वेळा केला. अचूक टप्पा व दिशा ठेवीत गोलंदाजी करणे ही त्यांची हुकमत होती. इंग्लिश वातावरणात चमक दाखविण्याची शैली त्यांच्याकडे होती. वेस्ट इंडिज, इंग्लंडच्या फलंदाजांवर प्रभुत्व त्यांनी गाजविले होते. त्यांची भेदक शैली पाहून फलंदाजीच्या वेळी त्यांना जखमी करीत त्यांना गोलंदाजीस येऊच द्यायचे नाही हे तंत्र विंडीजने यशस्वी केले होते. तरीही रांजणे यांनी मिळेल त्या संधीचा पुरेपूर उपयोग करीत शानदार कामगिरी केली. फलंदाजीत त्यांनी ७०१ धावा केल्या. त्यामध्ये नाबाद ५६ ही त्यांची सर्वाधिक कामगिरी होती. अतिशय गरिबीतून व प्रतिकूल परिस्थितीस तोंड देत क्रिकेट कारकीर्द करणाऱ्या रांजणे यांना तत्कालीन अन्य क्रिकेटपटूंइतकी लोकप्रियता लाभली नसेल, पण प्रसिद्धिपराङ्मुख असलेल्या या खेळाडूने सतत आपल्या संघाच्याच हिताचा विचार करीत कारकीर्द केली. त्यामुळेच ‘अजातशत्रू क्रिकेटपटू’ म्हणूनच त्यांची ख्याती होती. रांजणे यांचा क्रिकेटचा वारसा त्यांचा मुलगा सुभाष यांनी पुढे ठेवताना महाराष्ट्राकडून प्रथम दर्जाच्या सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले. आता सुभाष यांचा मुलगा शुभम हा १९ वर्षांखालील मुलांच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राकडून चमक दाखवीत आहे. आपल्या आजोबांचे स्वप्न साकार करण्यासाठी तो कसोशीने प्रयत्न करीत आहे.