वारी आषाढी एखाद(अ)शी !

दरवर्षी आषाढी एकादशी येते आणि वारकरी नेहमीच पायी पंढरीची वारी करतात. त्या वारीत वयोवृद्ध, तरुण, स्त्री/पुरुष, गरीब/श्रीमंत, वारा/पाऊस याची तमा न बाळगता पायकरी पंढरीची वारी करत असतात. कित्येक दशके हे अव्याहत चालू आहे आणि चालू रहाणार. त्यांना कधी दम, कंटाळा किंवा थकवा जाणवत नाही. खरचं सगळ्या वारकर्‍यांना मनापासून नमस्कार आणि त्यांचे अभिनंदन…!!



|| हरि ॐ ||

धरणीवरती उतरती मेघ पांडुरंगी,
आषाढी या एकादशीचे,
पांडुरंगी धावते मन हे,
सफर करती वारकरी त्याचे !
वारकर्‍यांची वारी आषाढी एखादशी !
आम्हीं वारकरी विठ्ठलाचे,
वार न करती कोणावर ते,
वार मनातल्या षडरिपूवर ते,
आम्हीं पायकरी पंढरीचे !
आषाढीचा नेम वारकऱ्यांचा,
न चुकला गतानुगतीचा,
सदैव चाले भरभर पळभर,
कधी न कंटाळा, ना दमला विळभर !
वारकर्‍यांची वारी आषाढी एखादशी !
नाही रुसवा, नाही फुगवा,
नाही छोटा, नाही मोठा,
नाही श्रीमंत, नाही गरीब,
आम्हीं पायकरी पंढरीचे !
दुरुनी दर्शन पांडुरंगी कळसाचे,
भाग्य उजळे पायवारीचे,
चंद्रभागी स्नान उरकती ते,
दर्शन घ्याया समोर समोरी ते !
वारकर्‍यांची वारी आषाढी एखादशी !
नाही पाऊस, नाही वारा,
नाही सावली, नाही उन,
नाही भूक, नाही तहान,
आम्हीं पायकरी पंढरीचे !
पंढरी दर्शन विठूरायाचे,
समाधान मनी सत्कर्माचे,
चंद्रभागे तीरी देह विसावे,
रंगरंगी रूप निश्चळ दिसावे !
वारकर्‍यांची वारी आषाढी एखादशी !
नाही पुरुष, नाही स्त्री भेद,
नाही तरुण, नाही वृद्ध,
नाही उच्च, नाही निच्च,
आम्हीं पायकरी पंढरीचे !
श्री विठ्ठल, जयहरि विठ्ठल,
मुखात हा मंत्र महान,
झाले दर्शन विठुरायाचे,
चंद्रभागेच्या तीरावर ते,
आम्हीं वारकरी पंढरीच्या विठ्ठलाचे !
कृतकृत्यतेचे समाधान मुखी,
पांडुरंगी वारकऱ्यांच्या मुखी दिसे !
वारकर्‍यांची वारी आषाढी एखादशी !

जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)

Author